विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मास्को- रशियन साम्राज्याची दुसरी राजधानी व त्याच नांवाच्या प्रांताचें मुख्य ठिकाण. येथील झारचा राजवाडा १८३८-३९ सालीं बांधण्यांत आला. येथील हवा थंड आहे. सन १९२४ मध्यें येथील लोकसंख्या १५११०४५ होती. येथें घरांचा प्रश्न फार बिकट झाला आहे. शेंकडा १० लोक तळघरांत राहतात. १४ व्या शतकापासून मास्को हें महत्त्वाचें व्यापाराचें ठिकाण आहे. तसेंच मास्को हें यूरोप व आशिया येथील मालाची वखार व व्यापाराचें केंद्र आहे. येथें बाल्टिक समुद्राकडे पाठविल्या जाणार्या धान्याचा व तेलाचा व्यापार आहे. चहा, साखर, कातडें, लोंकर वगैरेंचा व्यापार येथें बराच आहे. येथील कोळशाची निपज मोटी आहे. रेल्वेचें केंद्र म्हणून हें शहर इतकें महत्त्वाचें आहे. कीं यूरोपांत रशियांतील आगगाडीनें जितक्या मालाची ने आण केली जाते त्याचा एकषष्ठांशपासून एकपंचमांशपर्यंत माल मास्को येथें चढतो अगर उतरतो. मास्को येथें पुष्कळशिक्षणसंस्था व शास्त्रीय संस्था आहेत. येथील विश्वविद्यालय स. १७५५ त स्थापण्यांत आलें. मास्को येथें 'दि होली सिनॉड' उर्फ धर्ममंडळाची एक शाखा आहे.