विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माहीम- मुंबई इलाखा, ठाणें जिल्ह्याच्या पश्चिमेस हा एक तालुका आहे. क्षेत्रफळ ४०९ चौरस मैल असून लोकसंख्या सुमारें ८० हजार आहे. यांत खेडीं १८७ आहेत. उन्हाळ्यांत हवा चांगली असते. पाऊस ६३ इंच पडतो. या तालुक्यांतून वैतरणी नदी वहात जाते. तींत लहान गलबतें चालतात. मुख्य गांव केळवेंमाहीम आहे. भात, इमारती लांकूड, केळी, विडयाची पानें हे मुख्य निर्गत जिन्नस होत.