विभाग आठरावा : बडोदें ते मूर                     

माळी- या जातीची माळी, माळीयार, बागवान व मालाकार अशीं इतर नांवें असून, यांची हिंदुस्थानांतील लोकसंख्या (१९११) २०३५८४३ आहे त्यांत १९१६४९१ हिंदु, ११७१४१ मुसुलमान व बाकीचे इतर धर्माचे आहेत. यांची सर्वांत जास्त वस्ती (५७२८६४) मध्यप्रांत व वर्‍हाड या भागांत असून, त्याखालोखाल राजपुताना, मुंबईइलाखा, बहार, व ओढया, पंजाब, संयुक्तप्रांत आणि मोगलाई इकडे आहे. मराठी भाषा बोलणारे माळी सुमारें ७ लाख आहेत. हे लोक आपणांस क्षत्रिय म्हणवितात. यांचे धंदे मुख्यत्वें शेतकी, बागाईत व मजुरी हे आहेत.

म रा ठा मा ळी.- यांचे मुख्य ११ भेद आहेत. फूलमाळी उर्फ फुले हळदे, काचा, कडू, पदे, बावने, अधप्रभु, अधशेटी, जिरे, उंडे लिंगायत. या सर्वांत फूलमाळी श्रेष्ठ समजले जातात. हळद, जिरे वगैरे धान्य पिकविणार्‍यांनां तीं तीं नांवें मिळालीं आहेत. काचे हे कापड विणणारे असतात. हळदे यांची वस्ती नांशिक भागांत जास्त असून त्यांचा दर्जा बराच कमी लेखतात. फुले, जिरे, मिरे, कोथिंबिरे व हळदे असे पांच भेद आणखी इतरत्र आढळतात. मराठा माळयांची आडनांवें फार आहेत. यांच्यांत सात देवकें आहेत. यांच्यांत मामे व आतेबहिणींशीं लग्नें लावतात. सातारा, सोलापूर जिल्ह्यांत भाचीशीं लग्नें लावल्याची उदाहरणें आहेत. एकाच वेळी दोन बहिणींशी लग्न करतां येतें. खाणेंपिणें, आचाररूढी, धर्म वगैरे बाबतींत माळी इतर मराठयांप्रमाणें आचरण ठेवतात. मुंगीपैठणचा मालगौडा हा यांचा एक धर्म गुरु आहे. यांच्यांत जातीच्या पंचायती आहेत.

गु ज रा थी मा ळी.- हे धर्मानें पोशाखानें व रूढीनें गुजराथी कणब्याप्रमाणें आहेत. अहमदाबादेस कांहीं माळी जैन देवळांत जातात. उत्तर गुजराथेंत कांहीं जैनधर्मी बनले आहेत. यांच्यांत वडील भावजय धाकटया दिराशीं पुनर्विवाह करूं शकते. हे नागाची पूजा करतात. पंचमहालांतील माळी मद्यमांस खातात व कांही अफूबाज आहे. हे व्यापार गुरवकी घरनौकरी करतात. कबीर, रामानुज, शैव स्वामीनारायण, वल्लभ या पंथाचे हे अनुयायी आहेत.

का न डी मा ळी.- यांनां कामटी किंवा कुंचगीवक्कल म्हणतात, कारण पावसाळयांत हे कुंचकी (कुंची) झगा वापरतात. यांची कुलदेवी म्हैसूरकडील सोब्रा येथील चंद्रगुत्ती नांवाची आहे. यांनां आडनांवें नाहींत; यांच्यांत मद्यमांसाची बंदी नाहीं. यांचे उपाध्याय ब्राह्मण असतात. यांच्या जातीच्या मेहतरा (सरपंचा)स तहाहयात सरपंचाचा अधिकार असतो व तो जातीकडून निवडलेला असतो (सेन्सन्स रिपोर्ट, १९११. पु. ७).

म ध्य प्रां त.- तिकडे यांनां मरार म्हणतात; छत्तीसगडाकडे कोसारिया म्हणून यांचा एक वर्ग आहे. ओढया (ओरिसा) देशांत योग्य नवरा न मिळाल्यास मुलीचें लग्न मोहाच्या खुंटीबरोबर लावून रानांतील कोणत्या तरी झाडाशीं तिला बांधून ठेवतात, नंतर जो कोणी तिला सोडवितो, तो तिचा नवरा होतो. बालाघाट व भंडार्‍याकडे वरानें बायकोसाठीं सासर्‍याच्या घरीं नोकरी करण्याची चाल (लमझान) आहे. ही चाल द्राविडी असल्यानें यांचा व डोंगराळ जातींचा कांहीं संबंध असावा असें म्हणतात. बैतूलकडे लग्नांत नवराबायको वरवंटयाभोवतीं प्रदक्षिणा घालतात, तर बालाघाटांत पाटयाभोवतीं घालतात. इकडील या लोकांत 'खोंडीया' नांवाचा एक विधि आहे, त्याबद्दल रसेलहिरालाल पुढील माहिती देतातः- लग्नांत वरपक्षाकडील कामार्त अशा एका तरुण पुरुषास खोंड (सांड) अशी संज्ञा देऊन, वधूच्या घरीं बरातीच्या वेळीं आलेल्या सर्व बायकांसह त्याला एका खोलींत रात्रभर कोंडतात. येथें जी स्त्री त्याच्या हस्तगत होईल तिच्याशीं त्यानें संग करावा अशी त्याला मोकळीक देण्यांत येते; त्यावेळीं बाकीच्या बायकांनीं त्याला रात्रभर मार द्यावा अशी त्यांनां परवानगी असते. (बालाघाट डिस्ट्रिक्ट गॅझेटियर पॅरा ५९). छत्तीसगडाकडे यांच्यांत छोटीशादी व बडीशादी असे लग्नाचे दोन प्रकार आहेत. छोटीशादी वराच्या घरी होते. थोडया जमिनींत माळी पुष्कळ पीक काढतो म्हणून त्यानें पुष्कळ बायका कराव्या अशी तिकडे समजूत आहे (रसेल व हिरालाल; सी. पी. गॅझेटियर).

बंगाल्यांत या लोकांची गणना नावासक जातींत करतात. त्रावणकोरकडे यांचा धंदा शेतीचा बनत चालला आहे. इकडील जे माळी देवळांतून कामें करतात ते गळयांत जानवें घालतात. माळयांनां सं. प्रांतांत सैनी, मोंगलाईंत तीरमाळी, बहारकडे करमाळी, ओरिसाकडे गंधमाळी, आसामकडे मालो, राजपुतान्याकडे काछी व राऊत हीं नांवें असून खेरीज घासी, सगर, आहार, अंध, अंदी, भैना, कहार, खैरा वाघेलवाल वगैरे नांवें आहेत. माळव्यांत अफूची लागवड बहुधां माळीच करतात. या समाजांत हल्ली शिक्षणाचा प्रसार होत असून, यांची पहिली माळी-शिक्षण-परिषद ही पुण्यास १९१० मध्यें भरली होती. यांच्यांतील अरणभेंडीचा रहिवासी सांवता माळी हा एक पंढरपूरचा विठोबाचा भक्त होऊन गेला.