विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिंटो लॉर्ड, प हि ला (१८०७—१३)- ई. इं. कंपनीचा हिंदुस्थानांतील एक गव्हर्नर जनरल हा ग. ज. होण्यापूर्वी इंग्लडांत 'बोर्ड ऑफ कंट्रोल' चा अध्यक्ष होता. प्रथम हा उदारमतवादी व बर्कचा मित्र असून वारन हेस्टिंग्जच्या खटल्यांत याचा हात होताहि, परंतु लॉर्ड बनल्यावर याचीं मतें पालटलीं. ब्रिटिश मंत्र्यांनीं लॉर्ड वेल्स्लीचें साम्राज्यविस्ताराचें धोरण चालविण्याच्या अटीवर याला इकडे पाठविलें होतें, तेव्हां कंपनीचे डायरेक्टर या चढाईच्या धोरणाविरुद्ध असतांहि यानें अनेक लटपटी करून त्यांनां आपल्या धोरणास अनुकूल केलें. याच्या कारकीर्दीतच यूरोपांत नेपोलियनचा धुमाकूळ चालू असून त्यानें आशियाखंडांतील राष्ट्रांत व खुद्द हिंदुस्थानांतहि इंग्रजांविरुध्द चळवळ केली. परंतु मिंटोनें ती मोडून काढली. इराणांत त्याच्या विरुद्ध शिष्टमंडळ पाठविलें आणि आरमारी हल्ले करून व फ्रान्सचीं हिंदीमहासागरांतील सर्व बेटें काबीज करून पूर्वगोलार्धांत इंग्लंडास शत्रु ठेवला नाहीं. याच्या वेळीं स्वतंत्र इंग्रज व्यापार्यास हिंदुस्थानांत व्यापार करण्यास पुष्कळ सवलती मिळाल्या आणि कंपनीस मुदत संपल्यानें पुन्हां २० वर्षांची सनद मिळाली. यानें काबूलाकडे एक शिष्टमंडळ पाठविलें व रणजितसिंगानें सतलजच्या दक्षिणेकडे स्वारी केल्यानें त्याच्याशीं मैत्रीचा तह केला. त्यामुळें कंपनीचें राज्य यमुनेपासून सतलजच्या दक्षिणतीरापर्यंत वाढलें. बुंदेलखंडांतील कांहीं प्रांत यानें राज्यरक्षणाच्या नांवावर जिंकला आणि मराठयांशीं युद्धाची तयारी केली पण ती डायरेक्टरांनीं मोडून काढली. सिंधमध्यें यानें आपला हात सरकवून हिंदुस्थानांत सरकारी पाद्य्रांची नेमणूक केली आणि हिंदी लोकांच्या शिक्षणाप्रीत्यर्थ पहिली देणगी (१ लाख रु.) दिली. (स्मिथ- ऑक्सफोर्ड हिस्टरी ऑफ इंडिया).
दु स रा (१९०५-१०)- हा पहिल्या मिंटोचा पणतु. हा हिंदुस्थानचा ग. जनरल होण्यापूर्वी कानडाचा ग. जनरल होता. याच्या कारकीर्दीत हिंदुस्थानांत ठळक दोन गोष्टी झाल्या; एक हिंदी राष्ट्रीय चळवळ व दुसरी त्यामुळें सरकारनें दिलेल्या (मोर्लें-मिंटो) राजकीय सुधारणा. कर्झनच्या कृत्यानें देशांत असंतोष पसरला होता. म्हणून यास पाठविलें, परंतु यानें राष्ट्रीय आकांक्षा सफळ न करतां प्रथम दडपशाही (छापखान्याचा, ज्वालाग्राहीचा, सभाबंदीचा वगैरे कायदे करून) सुरू केली; त्यामुळें अराजकतेची चळवळ उद्भवली. तेव्हां स्टेटसेक्रेटरी मोर्लें यानें मिटोशीं संगतमत करून कांही सुधारणा दिल्या (१९०९). त्या १८५३ (चार्टर ऍक्ट) व १८६१आणि १८९२ च्या कौन्सिलऍक्टांची सुधारून वाढविलेली आवृत्ति होत. इराण, अफगाणिस्तान, तिबेट यांच्या बाबतींत रशियाशीं एक तह करून वायव्य सरहद्दीवरील मुसुलमानांनां स्वार्या करून धाकांत ठेविलें. कर्झनप्रमाणें हिंदी राजेरजवाडयांच्या अंतर्गत कारभारांत ढवळाढवळ न करतां, त्यांनां थोडेसें स्वातंत्र्य दिलें. चीनमध्यें अफू पाठविण्याच्या कामीं याच्या वेळींच प्रथम बंदीस सुरुवात होऊन हिं. सरकारचें सालीना ८-१० कोटीचें उत्पन्न बुडालें. सुधारणांमुळेंयेथील कारभार लंडनच्या व्हाईटहॉलच्या हातीं इतका गेला कीं, त्या वेळच्या एका अंडर सेक्रेटरीनें ''हिंदुस्थानचा व्हॉईसरॉय या स्टेटसेक्रेटरीचा एक गुमास्ता (एजंट) होय'' असें स्पष्ट उद्गार काढले होते. याच्या मागून लॉर्ड हार्डिंज हा ग. ज. झाला.