विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर (१८२४-१८९१)- एक बंगाली विद्वान व संशोधक. याच्या वडिलांचें नांव जनमेजय असें होतें. घरची गरिबी असल्यामुळें राजेंद्रलालचें प्राथमिक व दुय्यम शिक्षण मोठया हालांत झाले. पुढें तो सरकारी वैद्यक शाळेंत गेला. परंतु त्याच्या कांही सहकारी मित्रांनीं बेशिस्त वर्तन केल्यामुळें त्यांनां हांकून लावण्यांत आलें व त्यांच्याबरोबर यालाहि पण शाळेंतून कमी करण्यांत आलें. पुढें तो कायद्याचा अभ्यास करून परीक्षेला बसला. पण त्याच परीक्षेचे पेपर फुटल्याची अफवा उठल्यामुळें निकालच जाहीर करण्यांत आला नाहीं व पुन्हां एक वर्ष अभ्यासांत घालणें राजेंद्रलालला शक्य नसल्यामुळें त्यानें नोकरी धरण्याचें ठरविलें. कायद्याच्या अभ्यासाशिवाय त्यानें फारशी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन या भाषांचाहि अभ्यास केला होता; व त्याची विद्वत्ता आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेच्या निदर्शनास आल्यामुळें तिनें त्याला आपल्या संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी व लायब्रेरियन नेमलें. या जागेवर असतांना त्यानें निरनिराळया विषयांचा व विशेषतः पुराणवस्तुसंशोधनाचा मार्मिक अभ्यास केला, व संस्थेच्या मासिकांत सुमारें ११४ लेख लिहिले. याशिवाय त्यानें १८५० सालीं 'विविधार्थसंग्रह' नांवाचें एक बंगाली मासिक सुरू केलें व तें सात वर्षेपर्यंत चांगल्या रीतीनें चालविले. १८५६ सालीं त्याला श्रीमंत पोरक्या मुलांच्या शिक्षणासाठीं काढलेल्या वार्ड कालेजचा डायरेक्टर नेमण्यांत आलें व या जागेवर असतांना त्याला बराच वेळ मिळाल्यामुळें त्यास आपलें वाचन चालू ठेवतां आलें. याशिवाय कलकत्ता युनिव्हर्सिटि, म्युनिसिपालिटि, जमीनदार-सभा, राष्ट्रीय सभा इत्यादि संस्थांच्या चळवळींतहि तो पुढाकार घेत असे. ख्रिस्तोदासच्या मरणानंतर 'हिंदु पेट्रियट' या पत्राचें संपादकत्व त्याजकडे होतें. रॉयल सोसायटी ऑफ ऑर्ट्स या संस्थेनें प्राचीन भरतखंडांतील शिल्पांचे ठसे घेण्याबद्दल सरकारच्या ताब्यांत मोठी रक्कम दिली तेव्हां त्या कामावर सरकारनें राजेंद्रलालची नेमणूक केली; व ती कामगिरी त्यानें उत्तम रीतीनें बजावली. त्याचे सर्व शोध 'अँटीक्विटिज ऑफ ओरिसा' या दोन विभागात्मक ग्रंथांत एकत्र आले आहेत. त्यानंतर राजेंद्रानें 'शाक्यमुनीचें निवासस्थान बुद्ध गया' व 'इंडो आर्यन्' हें दोन ग्रंथ लिहिले. त्याला कलकत्ता युनिव्हर्सिटीनें एल्. एल्. डी. व सरकारनें सी. आय. ई. हे किताब दिले होते.