विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिथिल अल्कहल (कउ३ उप्र)- हा अल्कहल बॉईल यानें १६६१ सालीं काष्ठाचें ऊर्ध्वपातन करून प्रथमतः तयार केला. अद्यापहि हा तयार करण्याकरितां याच रीतीचा उपयोग करतात. लांकडाचें शुष्क ऊर्ध्वपातन केलें असतां मिळणार्या द्रवरूप पदार्थांतून डांबर, तेलकट पदार्थ व दार्वम्ल वगैरे काढून टाकून ऊर्ध्वपातन केलें असतां हा अल्कहल मिळतो. हा अल्कहल अगदीं शुद्ध स्वरूपांत मिळविण्याकरितां अशुद्ध अल्कहलमध्यें खटहरिद टाकून एक संयुक्त घन पदार्थ मिळवून त्याचें ऊर्ध्वपातन करतात. ह्या अल्कहलचा उकळण्याचा बिंदु ६६० आहे. ह्या अल्कोहलमध्यें चरब्या, राळ, स्थिर तेलें व डिंक तेव्हांच विद्रुत होतात. यामध्यें लाख व राळ विद्रुत करून व्हार्निशें तयार करतात व त्यांचा कलाकौशल्याच्या कामाकडे बराच उपयोग होतो. मिथिलेटेड स्पिरिटमध्यें ह्याचें शें. १० प्रमाण असून शें. ९० साधा अल्कहल असतो. ह्या स्पिरिटमध्यें तें पिण्यास निरुपयोगी करण्याकरितां थोडेसें पॅरॅफिन तेलहि टाकतात. ह्याचाहि उपयोग व्हार्निशें तयार करण्याकडे होत असून जाळण्यासहि हें उपयोगी असतें.