विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिदनापूर, जि ल्हा.- बंगाल, बरद्वान विभागांतील अगदीं दक्षिणेस असलेला जिल्हा. क्षेत्रफळ ५१५६ चौरस मैल. या जिल्ह्यांत हुगळी नदी व तिच्या रूपनारायण, हलदी, रसूलपूर ह्या शाखा, आणि सुवर्णरेखा ह्या नद्या वहातात. यांत दरवर्षी सरासरी ५९ इंच पाऊस पडतो. या जिल्ह्यांत कधीं कधीं वादळ जोराचें फारच होतें.
प्राचीन काळीं या जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग ताम्रलिप्त राज्यांत मोडत असे. या जिल्ह्यांती तमलूक नामक ठिकाणाचें नांव पूर्वी ताम्रलिप्त असें होतें; त्यावेळीं या ठिकाणी तांब्याचा मोठा व्यापार असे म्हणून याचें नांव ताम्रलिप्त असें पडलें. या देशांत पूर्वी मयूरकुलोत्पन्न क्षत्रिय राजे राज्य करीत होते; आणि त्यांच्यानंतर कैवर्तक राजे राज्य करूं लागले. पुढें पांचव्या शतकांत हा संबंध जिल्हा व कलिंग देश म्हणजे सध्यांचा ओरिसाप्रांत-बौद्ध धर्मीयांच्या अमलाखालीं आला. इसवी सनाच्या पांचव्या शतकांत तमलूक येथें फाहिआन नांवाचा चीनी प्रवाशी येऊन गेला; आणि सातव्या शतकांत ह्युएनत्संग आला. बौद्धानंतर हा जिल्हा मुसुलमान लोकांच्या ताब्यांत आला. शेवटीं १७६० सालीं जेव्हां मीर कासीमला बंगालचा नवाब बनविलें तेव्हां त्यानें हा जिल्हा ईस्ट इंडिया कंपनीस दिला, तेव्हांपासून हा इंग्रजांच्या ताब्यांत आहे. पुराणवस्तुसंशोधनशास्त्र दृष्टया या जिल्ह्यांतील तमलूक गांवचें प्राचीन बौद्धमंदिर, डोंगरांतील लहान लहान पडके किल्ले आणि मोठीं सरोवरें हीं स्थानें फार महत्त्वाचीं आहेत.
सन १९२१ मध्यें या जिल्ह्यांत २६६६६६० लोक होते. लोकसंख्येंत हिंदूचें प्रमाण शें. ८८, मुसुलमानांचें शें. ७ आणि वन्य हिंदूंचें शें. ५ होतें. शें. ७७ लोक शेतकीवर, शें. १० औद्योगिक धंद्यांवर आणि शें. ३ इतर धंद्यावर आपली उपजीविका करतात. या जिल्ह्यांत बंगाली भाषा प्रचलित आहे. शें. ८० लोक बांगली, १० उडिया, 3 हिंदी आणि बाकीचे इतर भाषा बोलतात.
भात, ज्वारी, बाजरी वगैरे धान्यें मका, गळिताची धान्यें व कडधान्यें येथें होतात. या जिल्ह्यांत एक ७२ मैल लांबीचा कालवा असून त्यांतून नावाहि चालतात. जिल्ह्यांत कुरुंदाचा दगड, चुनखडी, शंखजिरें व लोखंड हे खनिज सांपडतात. कोठें कोठें नद्यांच्या टापूमध्यें अल्प प्रमाणांत सोनेहिं सांपडतें. पितळेचीं भांडीं, काशाची भांडीं, चटया व रेशमी कापड हे जिन्नस कोठें कोठें तयार होतात.
गां व- जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. याला मेदिनीपूर असेंहि नांव आहे. लोकसंख्या सुमारें ३३०००. हें गांव कासै नदीच्या उत्तर तीरावर वसलें असून हें १७८३ सालीं मिदनापूर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण बनविण्यांत आलें. १८६५ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली.