विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीकीर- आसाम. या नांवाच्या टेंकडया व एक राष्ट्रजात. मीकीर प्रदेश आसाम-पर्वतश्रेणी व ब्रह्मपुत्रानदी यांच्या दरम्यान असून यांतील डोंगराच्या दर्यांत व उत्तणींवर दाट जंगल आहे. या भागांत मीकीर नांवाचे लोक रहातात. हे लोक स्वभावतः आसामांतील कोणत्याहि पहाडी राष्ट्रजातींच्या लोकांपेक्षां भित्रे व शांत वृत्तीचे आहेत. या लोकांविषयी डालटन असें म्हणतो कीं, हे लोक पूर्वी उत्तर काचरमधील टेंकडयांत रहात असत. त्यांनां काचारच्या राजानें तेथून हांकून लावल्यामुळें ते जैंटिया डोंगरांत येऊन राहिलें, परंतु तेथेंहि ते असंतुष्टच असल्यामुळें या प्रदेशांत आले व तेव्हांपासून या डोंगराळ टापूस 'मीकीर डोंगर' हें नांव पडलें. हे लोक शांत वृत्तीचे कां बनले याचें कारण असें सांगण्यांत येतें कीं, तेथील त्यावेळच्या 'अहोम' सरकारनें आपण केव्हांहि हातांत शस्त्र धरणार नाहीं अशी यांच्याकडून शपथ घेवविली. सध्यां हे लोक या टापूंतील लहान लहान खेडयांत रहातात, व शेतकीवर आपली उपजीविका करतात. येथील शेतांत तांदूळ, थोडा कापूस व मिरच्या पिकतात. तांदुळावर या मीकीर लोकांची मुख्यतः उपजीविका चालते