विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीना- ही राजपुतान्यांतील प्रसिद्ध जात आहे. यांची एकंदर लोकसंख्या सहा लाखांवर आहे, पैकीं राजपुतान्यांत साडेपांच लाख असून मध्यहिंदुस्थानांत पाऊण लाखपर्यंत आहे. मध्यप्रांतांत यांची वस्ती आठ हजार आहे. हे आर्य लोक येण्यापूर्वीचे राजपुतान्यांतील मूळचे रहाणारे आहेत. जयपूरच्या राजास अभिषेक करतांनां यांच्या आंगठयांच्या रक्ताचा टिळा लावावा लागतो. रजपूत राज्यकर्ते झाल्यावर मीना बायकांचा व त्यांचा सर्रहा संबंध झाला असला पाहिजे. कारण पंजाबांत कोणा बाईस व्याभिचारिणी म्हणावयाचें असेल तर तिला 'मीना देन' म्हणतात. यांच्यांत एक जमीनदारी व एक चौकीदारी वर्ग आहे. यांच्यांतील घेडियामीना हे गोमांस खातात. हे मोंगल राज्याच्या स्थापनेपासून चोर्या व दरोडे करण्याचा धंदा करीत होते. हे लोक कालीचे मोठे भक्त आहेत.