विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीरत, जिल्हा.- संयुक्त प्रांत. क्षेत्रफळ २३५४ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) १४९९०७४. उत्तरेस मुझफरनगर जिल्हा; दक्षिणेस बुलंदशहर; पूर्वेस गंगानदी, आणि पश्चिमेस यमुना नदी आहे. यांत २७ शहरें व ९४ गांवें आहेत. जमीन फार सुपीक आहे. गंगा व यमुनेच्या कांठाकांठानें थोडें जंगल आहे. जिल्हा उंच पठारावर असल्यामुळें हवा थंड व निरोगी आहे. पावसाची सरासरी २० ते ४७ इंच आहे.
इतिहासः- प्राचीन काळीं या भागांत सोमवंशी राजे राज्य करीत होते. त्यांची राजधानी हम्तिनापूर येथें होती. कालान्तरानें येथें अशोकाचा अंमल सुरू झाला. त्याची साक्ष, यांत सांपडलेले बौद्ध अवशेष व मीरतशहराजवळचा अशोकस्तंभ देतात. पुढें ११ व्या शतकांत या जिल्ह्याचा नैॠत्य भाग बुलंदशहराच्या हरदत्त नामक राजाच्या ताब्यांत आला. पुढें मुसुलमान लोकांच्या स्वार्या सुरू होऊन त्यांनीं आपला अंमल बसविला. दिल्ली, आग्रा या राजधान्यांच्या नजीकपणामुळें खुद्द मीरत शहरास बरेंच महत्त्व आलें व जिल्ह्याचीहि भरभराट झाली. पुढें औरंगझेबाच्या मरणानंतर हा जिल्हा निरनिराळया सरदारांच्या हातीं लागला, व इसवी सन १७७५ पर्यंत त्या सरदारांच्या आपसांतील भांडणांचें माहेरघर होऊन बसला. नंतर यांत मराठयांचें वर्चस्व सुरू झालें, पण लवकरच इसवी सन १८०३ मध्यें शिंदे सरकारनें हा जिल्हा इंग्रजांनां तोडून दिला. १८५७ मध्यें मीरत शहरीं नानागर्दीचा पहिला स्फोट झाला, त्यांत पुष्कळ इंग्रज अधिकार्यांची कत्तल उडाली. जिल्ह्यांत प्राचीन अवशेष विशेष नाहींत. जिल्ह्याची भाषा हिंदी आहे. शेंकडा ४९ लोक शेतकीवर व बाकीचे इतर धंद्यांवर उपजीविका करतात. या जिल्ह्यांतील जमिनींत गहूं, चहा, ज्वारी, ऊंस व कापूस हे जिन्नस होतात. पश्चिम भागांतील शेतास यमुना नदीच्या कालव्याचें व पूर्व भागांतील व पश्चिम भागांतील शेतांस गंगानदीच्या कालव्याचें पाणी मिळतें. या जिल्ह्यांत कोठें कोठें कातडें कमाविलें जातें व सुती कापडहि विणलें जातें. याशिवाय नीळ, साबण, साखर, बर्फ यांचे कारखाने आहेत. यांतील निरपुरगांवीं घोंगडया होतात, व बहादुरगड येथें नक्षीदार पितळेचीं भांडीं होतात. येथील साखर यूरोपांतहि जाते. या जिल्ह्यांत मीरत, गाझियाबाद, मबाना, बाघपट, सारधन व हापूर हे पांच तालुके असून या पांचहि शहरीं म्युनिसिपालिटया आहेत. जिल्ह्याचें मुख्य ठिकाण मीरत शहर आहे. जिल्ह्याचें उत्पन्न ४४२१००० रुपये आहे. शें. ३.१ लोकांनां लिहितांवाचतां येतें.
ता लु का.- तालुक्याचें क्षेत्रफळ ३६४ चौरस मैल असून यांत मीरत व लावर हीं दोन गांवें महत्त्वाचीं आहेत.
श ह र.- मीरत शहरीं गोर्या लोकांची छावणी आहे. शहराची लोकसंख्या (१९२१) १२२६०९. येथील म्युनिसिपालिटी १८६४ सालीं स्थापिली आहे. या शहराच्या नांवाची व्युत्पत्ति व प्राचीन इतिहास अनिश्चित आहे. इ. स. १८०६ मध्यें येथें लष्करी छावणी ठेवण्यांत आली तेव्हांपासून येथील लोकसंख्या झपाटयानें वाढूं लागली. या शहरांत, कुतुबुद्दीननें ११९४ सालीं बांधलेला दर्गा, महमूद गझनीच्या हसन माहदी नामक वजिरानें इ. स. १०१९ मध्यें बांधलेलीं जाममशीद, इ. स. १६२८ मध्यें नूरजहानें बांधलेला शाहपिराचा दर्गा, इ. स. १७१४ मध्यें बांधलेलें सूर्यकुड (सूरजकुंड) इत्यादि प्राचीन अवशेष अजून कायम आहेत. १८६४ सालीं टाऊन हॉल बांधण्यांत आला. सन १८६७ मध्यें मीरत जिल्ह्यांत आगगाडयांची वाढ झाल्यामुळें या शहरांत व्यापार मोठया प्रमाणावर होऊं लागला. सध्यां येथें ८-९ लक्ष मण धान्य व तितकीच साखर दरवर्षी खपते. येथील आयात माल सुती कापड, इमारतीला लागणारें सामान, गळिताचीं धान्यें, मसाले व तूप हा आहे. येथें एक कॉलेज, एक नॉर्मल स्कूल व बर्याच दुय्यम व प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत.