विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुकुंद- या नांवाचे अनेक संत व कवी होऊन गेले. रा. गो. का. चांदोरकर यांच्या मताप्रमाणें खालील माणसें निरनिराळीं होतात. (१) नृसिंहसुतकृत एक मुकुंदचरित्र आहे त्या चरित्राचा नायक. याचें नांव ब्रह्मानंद होतें व याचे गुरु गंगाधर कोकिळ म्हणून होतें. याचे एकनाथ चरित्र, रुक्मिणीस्वयंवर हे ग्रंथ होत. (२) सारिपाट काव्याचे कर्ते. (३) ''प्रबंध'' कार. (४) ''मुकुंद'' म्ळणून एक रामदासी होते, भीमस्वामीचे शिष्य जे गोविंदबावा त्यांचे हे पुतणे. यांचे ग्रंथ देवभत्तचनुवाद, रामकृष्णविलास, गुरुबोधपंचक, पदे वगैरे होत. (५) मुकुंद (दीन). नेमाडांतील खांडव्यास याचा जन्म झाला. पिता नारायण, माता साखरबाई. यजुर्वेदी बाजसनेयी. हा पित्याच्या मरणानंतर बागलाणांत जैतापुरी आला व यवनांची सेवा स्वीकारली. १६०८ सालीं स्वप्नांत सद्गुरुदर्शन झालें. १८२३ सालीं प्रत्यक्ष सद्गुरुपदेश मिळाला. नंतर यानें तीर्थयात्रा केली. याचा समाधिकाल अद्याप निश्चित नाहीं. ग्रंथः- रामायण- सुंदरकांड (१६२३), रेणुकासत्वदर्शन (१६२८), दत्तजन्मदूतिप्रेषण, दानलीला (१६२८), यशोदागौळण संवाद (१६२८), छंदोरत्नाकर (१६२८), गुरुस्तुति (१६२४), अंगदशिष्टाई, सुदामचरित्र (१६२९), वेदान्त, अंकुशपुराण (१६१५), श्रीशंकराचार्यस्तुति, श्रीमध्वाचार्य, दत्तस्तोत्र, मातापिता-अग्रजकनिष्ठ बंधु-पुत्र स्त्री-मित्र-सद्गुरु श्रीसद्गुरुनिजधामगमन, तापिस्तोत्र, रामाजी गोसावी, आत्मचरित्र, बागलाणांतील साधू, ताबाजीबाबावर्णन. (६) प्रसिद्ध कवि मुकुंदराज, विवेकसिंधुकार. मराठी भाषेच्या आद्यकवीचा मान याला कोणी देतात. वैतुलाकडे पयोष्णीतीरीं अंबा नांवाच्या शहरांत यानें ग्रंथरचना केली. ग्रंथ-परमामृत, पवनविजय, विवेकसिंधु (१११०), पंचीकरण, मूलस्तंब (?), पंचीकरण. याचा संस्कृत ग्रंथ. दशोपनिषदांवर महाभाष्य नांवाचा उपलब्ध आहे. मुकुंदराजाचा विवेकसिंधु हा ग्रंथ अखिल महाराष्ट्राला समजेल व सर्वत्र वाचला जाईल याच उद्देशानें संस्कृत व प्राकृत या दोन्ही भाषांत रचिलेला आहे, व तो त्याप्रमाणें आज सर्वमान्य झाला आहे. याशिवाय 'मुकुंदराज' झारकरी याचा उल्लेख आजरेकरानीं 'महाराष्ट्र कविचरित्र' यांत केला आहे. (सं. क. कां. सूची; महाराष्ट्रसारस्वत.)