विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुझफरनगर, जिल्हा.- संयुक्तप्रांत, मीरत विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ १६७३ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें ८०८३६० येथील सर्व भागांत गंगानदीच्या कांठचा गाळ वगैरे पुराबरोबर वाहून सर्वत्र पसरतो. गंगा व यमुना नद्यांच्या कांठीं खादर नांवाचे सुपीक प्रदेश आहेत पण यांनां पुरापासून धोका असतो. पाऊस सरासरी ३० ते ३३ इंच पडतो. येथील हवा टेंकडयांच्या सान्निध्यामुळें बरीच थंड आहे.
इतिहासः- पूर्वी हा पांडवांच्या राज्यांतील भाग होता. नंतर हा पृथ्वीराज चव्हाणाकडे होता. येथें तैमूरलंगाचाहि दुष्ट फेरा आला होता, त्यावेळीं बर्याच रहिवाश्यांची कत्तल झाली. नंतर अकबराच्या वेळीं हा सहाराणपूरच्या ''सरकारां'' त मोडत होता. इसवी सनाच्या १७ व्या शतकांत येथें सय्यद घराण्याचा अंमल होता. १८ व्या शतकांत या प्रांताला शीख लोकांपासून बराच त्रास झाला. याच वेळीं येथें बरेचसे किल्ले बांधले गेलें. नंतर इसवी सन १७८८ त हा भाग मराठयांकडे आला. नंतर सन १८०३ त अलीगड पडल्यानंतर शिवालिक पहाडापर्यंतचा सर्व मुलुख अनायासें ब्रिटिशांनां मिळाला.
जिल्ह्यांत ९२९ खेडीं व १५ शहरें आहेत.येथील शेतकी करणारे लोक जाट होत. कालव्यामुळें शेतकीवर फार चांगला परिणाम झाला आहे. येथील मुख्य पिकें म्हणजे गहूं, हरभरा, ऊंस, तांदूळ, कापूस व नीळ हीं होत. येथें कापसाचा व्यापार चालतो, व कापडावर चित्रें छापणें, कांबळीं व एक प्रकारचीं रंगीत भांडी तयार होतात. शें. २.६ लोक साक्षर आहेत.
त ह शी ल.- मुझफरनगर जिल्ह्याच्या मध्यभागांतील तहशील. हिचें क्षेत्रफळ ४६५ चौरस मैल व लोकसंख्या सुमारें २२६९४५. हींत २८१ खेडीं व तीन शहरें आहेत. हा मुझफरनगर तालुका गंगानदीच्या 'खादरांत आहे. '
गां व.- मुझफरनगर जिल्ह्याचें व तहशिलाचें मुख्य ठिकाण. हें नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवर आहे. लोकसंख्या सुमारें २३८११. शहाजहानच्या कारकीर्दीत सन १६३३ मध्यें मुझफरखानचा मुलगा खानजहान यानें हें नगर वसविलें. हल्ली या गांवाला गव्हाच्या व कांबळयाच्या व्यापारामुळें महत्त्व आहे.