विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुरादाबाद, जि ल्हा.- संयुक्तप्रांत, रोहिलखंड विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ २२८५ चौरस मैल. पश्चिमेकडे गंगानदीजवळ खदार नांवाच्या जमिनीचें सखल मैदान असून मध्यभागीं एक मोठें सपाट व सुपीक मैदान आहे. या जिल्ह्यांतील सर्व जमीन नदीच्या गाळानें तयार झाली आहे. जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग बराच वालुकामय असून तो अतिशय रुक्ष आहे. या जिल्ह्याची हवा बहुतेक निरोगी आहे. येथें दरवर्षी सरासरी ४० इंच पाऊस पडतो.
इतिहासः- या भागांत संबळ व अम्रोहा या नांवांची दोन शहरें आहेत, ती फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. तीं शहरें व त्यांच्या आसमंतांतील प्रदेश मिळून हा मुरादाबाद जिल्हा बनला आहे. १६ व्या शतकापर्यंत संबळचा जो इतिहास तोच मुरादाबादचा होय. रुस्तमखान नांवाच्या काटेरच्या सुभेदारानें स. १६२५ त मुरादबाद हें शहर वसविलें. या शहराचें हें नांव मुरादबक्षाच्या नांवावरून पडलें. पुढें मोंगल लोकांच्या राज्यास उतरती कळा लागली व काटेरिया लोकांनीं बंड केलें व ते स्वतंत्र झाले. तेव्हां तेथील सुभेदारानें आपली राजधानी कनोज येथें नेली. पुढें अल्ली महम्मद नांवाच्या रोहिला सरदारानें बंड केलें. तें मोडण्याचा मुरादाबादच्या सुभेदारानें प्रयत्न केला पण शेवटीं स. १७४० च्या सुमारास अल्लीमहंमदचा विजय झाला, व तो सबंध टापू त्याच्या ताब्यांत आला. येथें रोहिले लोकांचें वर्चस्व सन १७७४ पर्यंत टिकलें. स. १७७४ त रोहिलखंड अयोध्येचा नबाबाच्या सत्तेखालीं आलें व पुढें १८०१ सालीं इंग्रजी राज्यास जोडण्यांत आलें. अम्रोहा व संबळ येथें सुंदर मशिदी व बौद्ध मंदीरें आहेत.
या जिल्ह्यांत १४ शहरें असून २४९ खेडीं आहेत. लोकसंख्या (१९२१) ११९३६५३. या संख्येंत मुसुलमानांपेक्षां हिंदु लोकांचे प्रमाण जास्त आहे. येथील हिंदु लोकसंख्येंत चांभार, जाट, रजपूत, ब्राह्मण, खागी (शेतकरी), अहीर, जुलाद (कोष्टी), सुतार, तेली या जातींचा समावेश होतो. येथें मुख्य उत्पन्न गव्हाचें व उंसाचें आहे. या जिल्ह्याच्या मध्यभागांत गहूं, ज्वारी, बाजरी, व ऊंस होतो. तांदूळ फारच थोडा पिकतो. येथील मुख्य धंदा म्हटला म्हणजे साखर स्वच्छ करणें हा होय. कोठें कोठें सुती व लोंकरीचें कापडहि विणण्यांत येतें. अम्रोहाल पितळेचीं उत्तम भांडी होतात. या जिल्ह्याच्या आग्नेय भागांत कांच तयार करतात.
त ह शी ल.- क्षेत्रफळ ३१३ चौरस मैल. लोकसंख्या २५३३०२. हींच ३ मोठीं गावें व २९५ खेडीं आहेत. मुख्य ठिकाण मुरादाबाद हें आहे.
श ह र.- जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सु. ८००००. येथें नदीच्या कांठी जुम्मा नांवाची फार सुंदर मशीद आहे. ती रुस्तमखानानें स. १६३१ मध्यें बांधली. तिच्या जवळ याच सुभेदारानें बांधलेल्या किल्याचे अवशेष अजून हयात आहेत. येथें पोलिस लोकांनां शिक्षण देण्याची संस्था आहे. येथें सन १८६३ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें उत्तम नक्षीदार पितळेचीं भांडा तयार करतात.