विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुलतान, जिल्हा.- पंजाबांतील मुलतान विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ ५७६७ चौरस मैल. हा जिल्हा चिनाब व सतलज या नद्यांच्यामध्यें आहे, व यांत थोडासा रेचनादुआबमधीलहि भाग येतो. या नद्यांमुळें येथील जमीन चांगली सुपीक आहे. येथील हवा फार रुक्ष व उष्ण आहे. पाऊस सरासरी ४ ते ७ इंच पडतो.
इतिहासः- पूर्वी मुलतानचें नांव काश्यपपूर असावें. हिकेटेअस, हिरोडोटस, व टॉलेमी या ग्रीक ग्रंथकारांच्या ग्रंथांत निरनिराळया नांवांनीं याचा उल्लेख सांपडतो. अलेक्झांडरच्या स्वारीच्या इतिहासावरून त्यावेळेस ही माली नांवाच्या राजाची राजधानी असावी व या राजाचा अलेक्झांडरनें पराभव केला असें दिसतें. वॅक्ट्रियन राजांच्या वेळेसहि येथें ग्रीक लोकांचें वर्चस्व असावें असें येथें सांपडणार्या नाण्यांवरून दिसतें. इ. सनाच्या ७ व्या शतकांत राय नांवाच्या राजांची राजधानी येथें होती. यांपैकीं शेवटचा राजा ६३१ सालीं मरण पावला. नंतर चच नांवाच्या ब्राह्मणानें गादी बळकाविली. याच्या कारकीर्दीत ह्युएनत्संग हा चिनी प्रवासी आला होता. ६६४ सालापासून मुसुलमानी स्वार्या होऊं लागल्या. येथें दोन मुसुलमानी राज्यें प्रस्थापित झालीं; त्याच्या राजधान्या अनुक्रमें मनसूरा व मुलतान येथें होत्या. पुढें हा प्रदेश गझनीच्या ताब्यांत आला.
सन. १२२१ व १५२८ पर्यंत मुसुलमानांच्या एकंदर १० स्वार्या झाल्या. शेवटच्या स्वारींत बाबरनें हा प्रांत घेतला. नंतर दोन शतकें मुलतानचा कारभार दिल्लीचा बादशहा आपल्या सरदारातर्फे चालवी. १७४८ नंतर हा प्रांत काबुली सरदारांकडे गेला. १७५८ सालीं मराठयांनीं यावर स्वारी केली. १७७१-७९ पर्यंत भांगी नांवाच्या बारभाईचा येथें अंमल होता पण नंतर १७७९-१८१८ पर्यंत नबाब मुजफरखान हा येथें राज्य करूं लागला. नंतर १८१८ सालीं याला कोणाची मदत नसल्यामुळें रणजितसिंगच्या स्वारीला मुलतान बळी पडलें. श्रावणमल नांवाच्या एका सरदारानें मुलतानमध्यें बरीच सुधारणा घडवून आणली. पहिल्या शीख युद्धानंतर येथील सरदार मूलराज व ब्रिटिश सरकार यांच्यामध्यें युद्ध उपस्थित झालें व शेवटीं १८४९ सालीं हा प्रांत ब्रिटिशांचा ताब्यांत आला.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ८९०२६४. यांत ३ शहरें व १६४७ खेडीं आहेत. येथें जमीनींत कांहीं फूट खणल्यावर वाळू लागते. येथील शेतकीस पाटानें पाणी पुरविलें जातें. मुख्य पिकें, गहूं, हरभरा, जव, ज्वारी, बाजरी, कडधान्यें ही होत. येथील जंगलांत शिसूं सांपडतें व खजुराची झाडें पुष्कळ आहेत. येथें भांडीं, चांदीचे दागिने, भांडयांवर रंगीत काम, तसेंच गालीचे, रेशमी व कापसाचें किंवा मिश्र कापड यांचा मोठा व्यापार चालतो.
त ह शी ल.- क्षेत्रफळ ८४५ चौरस मैल. हा तहशिलीच्या वायव्येस चिनाब नदी वाहाते व चिनाब नदीचा सखल भाग या तहशिलींत मोडतो. येथेंहि बर्याच ठिकाणी पाटांनीं पाणी पुरविलें जातें. लोकसंख्या २४३३८५. हींत एकंदर २८२ खेडीं आहेत.
श ह र.- याच नांवाच्या विभागाचें, जिल्ह्याचें व तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवरील एक स्टेशन आहे. शहराच्या तिन्ही बाजूस १० ते २० फूट उंच असा तट आहे. येथें एक किल्लाहि आहे. हा शहाजहानाचा मुलगा मुराद यानें बांधला असें म्हणतात. लोकसंख्या (१९२१) ८४८०६. याचा इतिहास जिल्ह्याखालीं दिलाच आहे. शहरांत बर्याच मुसुलमान साधूंच्या मशिदी आहेत. तसेंच मोडकळीस आलेलें एक नरसिंहाचें देऊळहि आहे. येथें ह्युएनत्संगाच्या वेळीं सूर्यदेवतेचें एक भव्य मंदिर होतें. पण औरंगझेबानें त्या ठिकाणीं मशीद बांधली. मुलतान ही छावणीची जागा आहे. हें व्यापारी दृष्टीनें बरेंच महत्त्वाचें ठिकाण आहे. येथें गालीचे व कापड तयार होतें. येथील भांडयांवरील नक्षीकाम फार प्रसिद्ध आहे.