विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुलाना- हा बारा बलुत्यांपैकीं एक असून तो जातीनें मुसुलमान असतो. गांवांतील मशिदी व पीर यांची व्यवस्था, मुसुलमान लोकांचीं लग्नें व इतर धर्मकृत्यें याच्याच देखरेखीखालीं होतात. देवळांत किंवा स्थलदेवतेच्या शांत्यर्थ बकर्याला बळी द्यावयाचें असतें तेव्हां बकरा मारण्याचा हक्क पूर्वी हिंदु लोकांच्या मतानें देखील मुलानांचाच समजला जात असे. त्याचप्रमाणें खाटकांकरितां बकरा मारण्याचें कामहि मुलानालाच करावें लागत असे, व त्याला प्रत्येक बकर्यामागें दोन पैसे व त्या बकर्याचें काळीज देण्याची वहिवाट होती. कारण मुलानानें नैत किंवा प्रार्थना म्हणून मारल्याशिवाय बकर्याचें मांस हलाल (खाण्यास पवित्र) होत नाहीं अशी धर्मभोळया हिंदु लोकांची त्या काळीं समजूत होती.