विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुळा- ही भाजी सर्वत्र माहीत आहे. याच्या अनेक जाती आहेत. याचा आकार गोलापासून तो फूटभर लांब व २ इंच जाडीपर्यंत नाना प्रकारचा असतो. रंग पांढरा, पिवळा, तांबडा, गुलाबी, काळा व दुरंगीहि असतो. मुळयाच्या कित्येक जातींत तिखटपणा कमी असतो. मुळा ''द्विवार्षिक'' वनस्पतींपैकीं आहे. सामान्यतः थंडी संपल्यावर लाविलेल्या बिंयास मुळे चांगले पोसतात. परंतु कोंकणांत रत्नागिरी जिल्ह्यांत थंडीच्या दिवसांतच मुळे होतात. पावसाळयांत अगर उन्हाळयांत मुळींच होत नाहींत असा अनुभव आहे.