विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूतखडा- लघवीमध्यें नैट्रोजनयुक्त अन्न पचून शेष राहिलेलें उत्सर्जित द्रव्य यूरिकऍसिड असतें. तें स्फटिक रूपानें अथवा सोडा व अमोरियाशीं मिश्रित होऊन भुकटीसारखें विटकरीच्या रंगाचें अशा दोन भिन्न स्वरूपांत आढळतें. मानवी शरीर क्षीण झालें असतां नैट्रोजनयुक्त पौष्टिक अन्न न पचून हें कीट जमूं लागतें. यामुळें अशी क्रिया थोडयाशा प्रमाणांत ज्वरामध्यें, क्षयासारख्या शरीर झिजविणार्या रोगांत व अति घाम जाईल इतका फाजील व्यायाम केल्यानें लघवींत सुरू झालेली आढळते. ज्यामानानें श्रमोत्पन्न उष्णता गोचर होऊन व्यायाम व झीज होईल त्यामानानें हें ऍसिडद्रव्य निर्माण होतें अशी क्रिया सुरू झाली असतां तीस उपाय म्हणजे रोग्याचा नैट्रोजनयुक्त पौष्टिक आहार कमी करून त्यास पाणी बरेंच व वरचेवर पीत जाण्यास सांगावें. विलायती मीठ किंवा त्या प्रकारचा क्षारयुक्त सारक औषधें देऊन कोठयाच्या मागें शरीरांत मूळ द्रव्याचें उत्सर्जन व्हावें व तें मूत्रपिंडामागें कांहीं कालपर्यंत होऊं नये अशी व्यवस्था ठेवणें जरूर असतें.
जी लघवी अल्कयुक्त असते तींत अमोनिया व म्याग्नेशियाचे फास्फेट क्षार विरघळत नाहींत म्हणून त्या क्षारांचें जाड कीट मूत्राशयांत अगर मूत्रपिंडांत जमूं लागतें. याकरितां मूत्राशय जंतुघ्न औषधाच्या पाण्यानें धुवून बरा करावा. आम्ल लघवी असणार्या लोकांत यूरिक ऍसिड किंवा आक्सेलट ऑफ लाईममिश्रित मूतखडा प्रथम बनतो, व तो मूत्राशयांत दाह उत्पन्न करतो. अशा रीतीनें आंतील गाभा ब्यूरिक ऍसिड किंवा आग्झेलेट ऑफ लाईम व वरील फास्फेटचे थर असा भला मोठा व कधीं तर सर्व मूत्राशय व्यापणारा असा मूतखडा तयार होतो. कधीं असें घडतें कीं लघवीमध्यें सर्वच क्षार वाजवीपेक्षां जास्त असतात, आणि मग ते स्फटिकरूपानें मूत्रमार्गांत कोठें तरी जमूं लागतात. यांची गांठ जमी कीं मूत्रपिंडांत लहान मूतखडा तयार होऊन तेथेंच राहातो अगर खालीं मूत्राशयांत वाहून येतो, व त्यावर आणखीं क्षारांचीं पुटें बसून मोठा मूतखडा तयार होतो. स्त्रियांचा मूत्रमार्ग बराच विस्तृत असल्यामुळें लहानसे मूतखडे मूत्रोत्सर्जनाच्या वेळीं लघवींतून सहज पडून जातात. मुलामध्यें असा बारीक मूतखडा मूत्रमार्गांत अडकू मूत्रावरोध होतो. अशा वेळीं धातूची नलिका घालून पाहिलें असतां तिच्या टोंकास मूतखडा स्पष्ट लागल्याचें ज्ञान होतें व तो अगदीं मूत्राशयाच्या मुखाशीं असल्यास आंत ढकलून काढतां येतों व मूत्रमार्गाच्या मधोमध अडकून बसल्यास तीक्ष्ण चाकूनें त्यावरील मांसल भागांत उभा छेद करून त्या जखमेंतून तो काढून घ्यवा. मूतखडा बनला म्हणजे तो मूत्राशयांत खुपूं लागून वरचेवर लघवी करण्याची इच्छा उत्पन्न करतो व तेथें पुष्कळ चिकट स्त्रावहि उत्पन्न होतो, व लघवींत कीट जमून त्याचे थर जमूं लागतात. लघवीच्या शेवटीं मूत्राशय संकोचन पावून आंतील फुगलेल्या रत्तच्वाहिन्यांस मूतखडयाच्या घर्षणानें इजा होऊन लघवी आटोपल्यावर थोडें रक्त पडतें. नंतर मूत्राशयदाह होऊन पुवाचा प्रवेश होतो. दुःख असतें पण तें शिश्नाच्या टोंकाशीं असतें. लघवीच्या वेळी मध्येंच एकदम प्रवाह बंद पडतो.
खा त्री ला य क प री क्षा क र ण्या ची री तः- (१) लोखंडाची नलिका मूत्राशयांत घालावी. खडा असेल तर तो नलिकेस लडथडतांना समजतो व आवाजहि ऐकूं येतो. तो लहान-मोठा आहे, मऊ अगर कठीण आहे किंवा सुटा आहे किंवा अडकलेला आहे याचेंहि साधारण अनुमान नलिकेनें करतां येण्यासारखें आहे. (२) मूत्राशयांतरदर्शक नलिकेच्या योगानें तिच्या टोंकाशीं असलेल्या बारीक विजेच्या दिव्यानें आंतील मूतखडा अगर गांठी दिसतात. (३) क्ष किरणांचाहि या कामीं उपयोग करतात. (४) गुदद्वारांत बोट घालावें व ओटीपोटावर हाताचा जरा दाब ठेवावा म्हणजे गुदद्वारांतील बोआस लहान मुलाचा मूतखडा लागतो.
उ प चा र.- शस्त्रक्रियेनें (१) त्याची भुकटी करून अलीकडे बहुधां मोठया माणसांचा किंवा मुलांचा मूतखडा काढतात. (२) मूतखडा अति मोठा अथवा कठिण असेल तर किंवा मूत्रमार्ग लहान असेल व मूत्राशयाच्या अंतमार्ग प्रोस्टेपिंड बराच विकृत असेल तर खालच्या बाजूनें छेद करून म्हणजे जुन्या पद्धतीनेंहि मूतखडा काढावा.
अश्मरीभंजनः- म्हणजे खडयाची पूड शस्त्रकियेनें करणें. प्रथम क्लोरोफार्मनें गुंगी आणल्यावर रोग्याच्या कमरेखालीं एक उशी ठेवावी. मूत्राशयांत आठ औंस कोमट पाण्याची पिचकारी मारून अश्मरीभंजकशस्त्रानें खडयाची भुकटी करावी. त्यानंतर शोषकयंत्रानें मोठया मूलशलाकेवाटे ती सर्व भुकटी आकर्षिली जाऊन शोषकयंत्रास एक कांचेचा फुगा असतो त्यांत येऊन पडते. मूतखडयास शस्त्रक्रियेवांचून खात्रीचा अन्य उपाय नाहीं. आंग्ल वैद्यकांत व आर्य वैद्यकांत मूत्रांतील क्षार विरघळून टाकणारीं कांहीं औषधें आहेत पण ती शस्त्रक्रियेनंतर खडे पुन्हां न होऊं देण्यास उपयोगी आहेत. लहानसा मूतखडा जरी आंत विरघळावयाचा राहिला तरी त्यावर थर बसून पुन्हां रोग वाढतो.