विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूत्राशयभंग- मूत्राशयभंग हा लाथ किंवा मार लागल्यानें होतो अथवा अंगावर गाडीचें चाक जाऊन किंवा कटिरास्थि भंग होऊनहि ही इजा होते. मूत्राशयाच्या कांहीं भाग अंत्रावरणानें झांकलेला नसतो, तेथें जर ही इजा झाली तर शस्त्रक्रियेनें तो शिवून टाकून रोगी बचावतो. इतर भाग फाटल्यास मात्र अंत्रावरणदाह होऊन रोगी मरतो. हें इंद्रिय फाटल्याची निव्वळ शंका आली असतां प्रथम मूत्रशलाका घालून रक्तमिश्रित लघवी निघाल्यास मोजून पाणी मूत्राशयांत भरावें व शलाका घालून तितकेंच पाणी परत न आल्यास मूत्राशय फाटला आहे असें समजून शस्त्रक्रियेनें तो शिवावा. लवकर शस्त्रक्रिया केल्यास यशप्राप्ति होते.
झु ब के दा र ग्रं थी.- बारीक तंतू, धागे व फाटे असलेल्या गांठी एखाद्या झुडुपाप्रमाणें मूत्राशयाच्या खालीं उगवतात. पण त्या सौम्य स्वरूपी असतात. म्हणजे त्या इतर भागांत शिरकाव करून रोग्याचें जीवित धोक्यांत घालीत नाहींत. त्यांत रक्तवाहिन्या अतिशय असल्यामुळें एखादा तंतू दुखावला कीं, लघवींत रक्त येतें. पण त्यापासून त्रास व पीडा फारशी होत नाहीं हें या रोगाचें एक लक्षण समजतात. असे तुकडे लघवींत सांपडले तर शंकाच नको. ओटीपोटावर छेद करून चिमटयानें ती गांठ उपटून काढतात किंवा तोडतात आणि ती निघाली म्हणजे रोग साफ बरा होतो.
दु ष्ट ग्रं थी (क्यान्सर)- आंतील त्वचेच्या एपिथेलियम पापुदर्याच्या ठिकाणीं लहान कालीफ्लॉवरच्या गड्डयाप्रमाणें बारीक गांठ होते व तीस देंठाप्रमाणें कांही नसतें. वरचेवर लघवी होणें व ती नकळत होणें इत्यादि लक्षणांनीं रोग्यास त्रास होतो. शस्त्रक्रिया करणें जेथें शक्यच नसतें अशा वेळीं फक्त बोरीकच्या पाण्यानें मूत्राशय धूत जावा म्हणजे रोग्यास बरें वाटतें. एकंदरींत हा रोग असाध्यच आहे.
मू त्रा श या चें स्थू ली भ व न.- मूत्रकृच्छ्र इत्यादि कारणांनीं मूत्रमार्गांत दीर्घ काळपर्यंत अडथळा उत्पन्न होऊन बसल्यास, अगर प्रोस्टेडपिंडवृद्धीनेंहि लघवी अति वेळ सांचल्यानें मूत्राशयाचे स्नायू व पडदे जाड व पुष्ट होतात. हीच स्थिति बराच वेळ टिकून मूत्रोत्सर्जनाची अडचण दीर्घकाल टिकली म्ळणजे या पुष्टतेऐवजी तेच स्नायू व पडदे अति श्रम पडून झिजून पातळ होतात. या उलट अवस्थेस मूत्राशयविरलता किंवा क्षणता असें म्हणतात.
मूत्राशय स्तंभ.- दुखापत होऊन पृष्ठरज्जु दुखावली अगर दबली गेली असतां मूत्र कोंडणें अगर नकळत लघवीं होणें हीं लक्षणें या व्याधींत होतात. कारण पृष्ठरज्जूच्या कमरेंतील गात्रामध्यें मूत्रोत्सर्जननियामक मज्जास्थान असतें त्याचे व्यापार बंद पडतात. अशा अर्धवट स्थितीस मूत्राशयदुर्बलता म्हणतात. दोन्ही व्याधींस उपाय म्हणजे इतकाच कीं मूत्राशय मूत्रानें फुगण्याच्या अगोदरच वेळेवर शलाकेनें लघवी काढणें व ज्या मेंदूच्या वगैरे व्याधींमुळें अशी अवस्था झाली आहे त्या व्याधीवर योग्य इलाज करणें.