विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूर- हल्ली हें नांव स्थूलमानानें मोरोक्कोच्या कोणत्याहि रहिवाशाला लावतात. परंतु वास्तविक रीत्या, फक्त मिश्र वंशाच्या गांवकर्याला तें लावलें जातें. या अर्थी बर्बरी संस्थानांतील इतर मुसुलमान गांवकर्यांसंबंधानेंहि तें उपयोगांत येतें. हिब्रू व फोनिशियन महूर (म्ह. पाश्चात्त्य) या शब्दापासून मूर हें नांव पडलें असावें असें कांहीचें मत आहे. परंतु मानववंशशास्त्रदृष्टया मूर या शब्दाला विशेष महत्त्व नाहीं. मूर ह्या नांवानें रोमन लोकांनां माहीत असलेल्या टोळ्या नि:संशय बर्बर वंशाच्या होत्या. बर्बर टोळ्यांनीं रूपेन देश जिंकल्यानंतर तेथील मुसुलमानांनां ख्रिस्ती लोक मूर असें म्हणूं लागले. त्यांच्यामध्यें अरबी रक्ताचें मिश्रण बरेंच होतें व स्पॅनिश लोकांशीं शरीरसंबंध झाल्यामुळेंहि त्यांच्यांत पुष्कळ फरक पडला. पुढें जेव्हां त्यांनां स्पेनमधून कायमचें हांकलून देण्यांत आलें, तेव्हां मूळच्या बर्बर लोकांपासून ते बहुतेक भिन्न झाले होते. बर्बर लोक त्यांनां अंदलूशियन म्हणत. शुद्ध बर्बर हे मोरोक्कोच्या डोंगराळ भागांत पूर्वीप्रमाणेंच रहात होते व अंदलूशियन मूर लोकांनीं किनार्याच्या गांवीं व मोरोक्कोच्या सपाट प्रदेशांत वस्ती केली. तथापि मोरोक्कोपासून सेनेगॉलपर्यंत व नायगर नदीपर्यंत ( पूर्वेसहि तिंबक्तूपर्यंत ) राहाणार्या आणि अरबी भाषा बोलणार्या लोकांनां अद्याप मूर हें नांव दिलें जातें.
मानववंशशास्त्रदृष्ट्या मूर हेहि मिश्र जातींचे असून त्यांच्यामध्यें बर्बर रक्तापेक्षां अरबी रक्ताची भेसळ जास्त झालेली आहे. सामान्यत: मूर लोक काळे आहेत असा समज असतो; परंतु तो चुकीचा आहे. ते मूळचे गोरे असून उन्हामुळें कधीं कधीं काळवंडलेले दिसतात. परंतु शहरांत रहाणारे मुर व त्यांचीं मुलें थेट यूरोपीयांप्रमाणें दिसतात. मोरोक्कोचे मूर देखणे असून त्यांचे डोळे काळेभोर व केंस रेशमासारखे आणि काळेकुळकुळीत असतात. ते दाढी वाढवितात व त्यांची बोलण्याचालण्याची ढब ऐटदार असते. मूर लोकांनां लठ्ठ ( मेदोवृद्धि असलेल्या ) बायका आवडतात. ते बुद्धिमान व सभ्य, परंतु क्रूर व सूड घेणारे आहेत. भूमध्यसमुद्रांत चांचेगिरी करणार्या लोकांत मूर लोकांइतके वाईट दुसरे कोणतेच नव्हते. मूर लोक इतके धर्मवेडे आहेत कीं ते आपल्या मशिदीजवळ परधर्मीयांस मुळींच येऊं देत नाहींत. त्यांच्यातील सर्वसामान्य दुर्गुण म्हणजे भयंकर विषयासक्ति होय. खाऊ घालून लठ्ठ झालेल्या अथवा पोसलेल्या गुलामांपेक्षां बायकांची स्थिति फारशी बरी नसते. ते अशिक्षित, आळशी व व्यसनी आहेत. त्यांच्यांत गुलामगिरी भरभराटींत असून गुराढोरांच्या बाजारांप्रमाणें गुलामांचे बाजार भरत असत; परंतु यूरोपीय राष्ट्रांच्या वजनामुळें १८५० सालच्या सुमारास किनार्यालगतच्या गांवीं गुलामांचे सार्वजनिक बाजार भरविण्याची बंदी करण्यांत आली.