विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मूर, थॉमस ( १७७९-१८५२ )- एक आयरिश कवि व ग्रंथकार, हा डब्लिन येथें जन्मला. ट्रिनिटी कॉलेजांत याचें शिक्षण झालें व नंतर त्यानें कायद्याची परिक्षा दिली. १८०३ सालीं बर्म्यूडा येथें आरमारीखात्यांत त्याला नोकरी मिळाली. १८०६ सालीं त्यानें आपला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. १८०७ सालीं त्यानें ‘आयरिश मेलडीज’ नांवाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला व तो अत्यंत लोकप्रिय झाला. १८१५ सालीं ‘नॅशनल एअर्स’ म्हणून आणखी एक काव्यसंग्रह त्यानें प्रसिद्ध केला. तथापि ‘आयरिश मेलडीज’ इतका तो लोकप्रिय झाला नाहीं. ‘दि टू पेनी पोस्ट बॅग’ या काव्यांत त्यानें आपल्या काळच्या प्रसिद्ध व्यक्तींवर व महत्त्वाच्या विषयांवर कविता रचिल्या आहेत. ‘लालारूख’ हेंहि त्याचें काव्य अतिशय लोकप्रिय झालें. त्याशिवाय त्यानें ‘लाईफ ऑफ बायरन’ ‘लाईफ ऑफ शेरिडन’, ‘लाइफ ऑफ फिट्जीराल्ड’, ‘हिस्टरी ऑफ आयर्लंड’ इत्यादि गद्यग्रंथ लिहिले. मूरइतकी दुसर्या कोणत्याहि कवीनें आपल्या हयातींत लोकप्रियता संपादन केली नाहीं. त्याचा मित्रवर्ग फार मोठा होता. त्याच्या भाषेंत जाज्वल्य देशाभिमान, औपरोधिकता व मार्मिक विनोद हे गुण दृष्टीस पडतात.