विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मूर्च्छा ( बेशुद्धि ) -हिचें पुष्कळ वेळ टिकणारी व पूर्णपणें असणारी शुद्धिरहित स्थिति हें लक्षण फार महत्त्वाचें होय. कारण तें नाना प्रकारच्या रोगांचें द्योतक आहे. ही बेशुद्धि इतकी तीव्र असते कीं रोग्यास हलविलें असतां अथवा त्याच्या कानांत ओरडून हांक मारिली असतांहि तो शुद्धीवर येत नाहीं. या लक्षणांतहि सौम्य व तीव्र असे प्रकार आढळून येतातच. सौम्य प्रकारांत थोड्या प्रयासानें हलवून व ओरडून रोगी अंमळ शुद्धीवर येऊन लागलीच पुन्हां बेभान स्थितींत पडून रहातो. तीव्र भेद, मस्तिष्करक्तस्फोट या व कांहीं इतर रोगांत दृष्टीस पडतो. पूर्वी असें कांहीं एक होत नसून एकदम अशी दीर्घकालीन निश्चेष्ट स्थिति प्राप्त होणें यास हें नांव दिलें आहे. यास मौलीमूर्च्छा हें नांव आहे व ती येण्याचीं कारणें पुढील आहेत:- (१) डोक्यास अपघातानें इजा होऊन कवटीचा अस्थिभंग होणें व मेंदूस धक्का, दाब, अगर दुखापत होणें. (२) अपरिमित मद्यसेवनानें अल्कोहोलची किंवा इतर मादक विषबाधा होणें. (३) मस्तिष्करक्तस्फोट, मेंदूत अकस्मात येणारी शोणितगुटिका अथवा शोणितघनीभवनाच्या योगानें मूर्च्छा येणें. दुसरा मूर्च्छेचा जो भेद आहे त्यास गौणीमूर्च्छा असें म्हणतात. ही मूर्च्छा वरील प्रकाराप्रमाणें रोगाच्या अगोदर दिसून येत नाहीं. तर पुढें दिलेल्यापैकीं एखादा रोग रोग्यास प्रथम होऊन त्यांत आगंतुक दुष्परिणाम म्हणून ही मूर्च्छा मागाहून उत्पन्न होते. ते रोग पुढील प्रमाणें आहेत:- मधुमेहमूत्रविषशोषणरोग, मस्तिष्कग्रंथि व तीव्रपीतयकृतसंकोचन. यांपैकीं एखादा रोग झाला असतां, वैद्यास अगोदरच माहीत असतें कीं अशा प्रकारची बेशुद्धि येण्याचा संभव आहे, व ती आली असतां तींतच रोग्याचें देहावसान होण्याचा संभव बहुतकरून असतो. ज्या मानानें बेशुद्धीची तीव्रता असते त्यामानानें तीपासून जीवास होणार्या अपायाच्या संभवाचा अदमास करतां येतो. कनीनिका अथवा पायाचा तळवा यांस स्पर्श केल्यानें अगर गुदगुल्या केल्यानें जो रोग्यानें डोळा घट्ट मिटून घ्यावयाचा अथवा पाय हलवावयाचा तसें हा बेशुद्धींत असलेला रोगी करीत नाहीं. नाडी व श्वास चालत असतो यावरून रोगी जिवंत आहे येवढें समजावयाचें, बाकी सर्व शरीर व हातपाय अगदी निर्जीव असे होऊन अस्ताव्यस्त पडलेले असतात. मेंदूंतील श्वसननियामक स्थान थकत चाललें आहे याचें दर्शक पुढील प्रकारची श्वसनक्रिया सुरू होते: नेहमींप्रमाणें प्रथम श्वास घेणें व त्यापेक्षां किंचित् थोड्या वेळांत टाकलेला उच्छवास हा एरव्हीचा क्रम बदलून श्वास तेवढे दीर्घतर एकसारखे होत जातात. ते इतके कीं पुढें दम छाटत नाहींसें होऊन मेंदूंतील रक्त अशुद्ध होतें. अशुद्ध रक्तानें श्वसननियामक स्थानास जोरानें चालण्यास उत्तेजन मिळतें व थकलेली श्वासनक्रिया पुन्हां चांगली चालू लागून पुन्हां थकून पुन्हां मेंदूंत अशुद्ध रक्तसंचय होणें हा क्रम चालून शेवटीं तें स्थान कायमचें निर्जीव होऊन मृत्यु येतो. चेनस्टोक्स-श्वसनक्रिया असें या विशिष्ट श्वसनलक्षणास नांव आहे. याचें कारण याची उपपत्ति या नांवाच्या शोधकानें लावली असावी.