विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मूळव्याध - गुदद्वाराच्या भोंवतालीं बाहेरून अगर आंतून लहान गांठीं उद्भवतात त्यांनां मूळव्याध म्हणतात. त्यांमध्यें शिरा असून त्यांतून रक्तस्त्राव सहज होण्यासारखी त्यांची रचना असते. उष्ण पदार्थांची मसालेदार, चमचमीत जेवणें, बद्धकोष्ठता, यकृत व हृदयरोग यामुळें हा रोग होण्याची प्रवृत्ति असते. परंतु त्यास कांहीं निमित्त लागतें तें असे:-लघवी अगर शौचाच्या वेळेस अति कुंथण्याची संवय (कांहीं रोगामुळें), कटिरप्रदेशांत उत्पन्न झालेली गर्भाशयग्रंथि, गरोदरपणचें गर्भाशय, अगर फुगलेले महांत्र अगर दुसर्या प्रकारच्या अशा गांठींचा दाव पडणें, गुदमार्ग चिंचोळा होणें, रेचक म्हणून कोरफडीचा फार वेळा उपयोग करणें वगैरें.
स्व रू प.-नवीन मूळव्याध म्हणजे फक्त शिरा फुगणें होय. त्यानंतर ती जुनाट झाल्यास शिरा जाड होऊन आंतील रक्त गोंठून तें स्त्रवणारी गांठ अगर गांठी ( मोड ) बनतात. त्याचे प्रकार बाहेरचे मोड, आंतील मोड, मिश्र प्रकारचे मोड, रक्तस्त्रावक मोड, व सुजलेले मोड. हे मोड निळसर रंगाचे मऊ असतात; अगर जाड व सुरकतलेली त्वचा होऊन त्याचे बनतात.
ल क्ष णें.-बाहेरील मोड असले म्हणजे तेथें कंड सुटून त्या ठिकाणीं कसेसेंच वाटण्यापेक्षां त्रास होत नाहीं; पण हे मोड सुजले म्हणजे निजतां, बसतां, उठतां व चालतांना फार वेदना होतात व भोंवतालचा भाग दुखतो. नंतर सूज कमी झाल्यावर पुन्हां पुन्हां ती उलटण्याची प्रवृत्ति असते. आंतील मोडांचा त्रास याहून फार असतो. कारण ते सुजले म्हणजे रक्तस्त्राव होतो व ते गुदद्वारांत वारंवार अडकल्यामुळें त्यांची वेदना असह्य होते. चिकट स्त्राव व रक्तस्त्रावामुळें पांडुरता फार वाढून अशक्तता येते. रक्त कधीं थोडें पडतें व कधीं फार पडतें, व तें मळास लागलेलें असतें. शौचाच्या वेळीं प्रथम मोड गुदद्वारांतून बाहेर येतो व प्रक्षालनानंतर बोटानें तो परत ढकलला नाहीं तर सुजतो. नंतर गुदद्वारच मोठें होऊन मलशुद्धीव्यतिरिक्तकाळींहि मोड बाहेर येतो व त्याभोंवतालचें गुदांगहि बाहेर येतें. यामुळें पंडुरोग, दम लागणें, चक्कर, भोंवळ, घेरी, मस्तकशूळ इत्यादि लक्षणें होऊन अंड, मूत्राशय, गर्भाशय, मूत्रपिंडादि इंद्रियांत वेदना भासते.
उ प चा र.-तात्पुरते व रोग फक्त वाढूं न देणारे शामक उपचार-सोनामुखी, त्रिफळा, कासकारा इत्यादि सौम्य ढाळकें देऊन बद्धकोष्ठता सुधारावी म्हणजे कुंथणें बंद होतें. उष्ण पदार्थ व मद्य सेवन करूं नये, व्यायाम केल्यानें यकृतव्यापार सुरळीत चालून शिरा फुगत नाहींत. रक्तस्त्राव होऊं लागल्यास हामेपेलिसचा अर्क पोटांत घेणें उपयोगी असून तो बाहेरूनहि लावावा. अगर नाना प्रकारचीं शामक मलमें व धावनें योजावीं. अगर धावनाची पिचकारी मारावी. थंड पाण्यानें गुदद्वार स्वच्छ धुवावें. सुजलेल्या मोडास अंथरुणांत निजून रहावें व ढुंगणाखालीं उशी ठेवावी, व मोडावर बर्फाची पिशवी ठेवावी अगर ते शेकावे. गुदद्वारांत मार्फियाची वेदनाशामक सोंगटी ठेवावी. अगर मोड चिरून आंतील गोठलेलें रक्त बाहेर काढून टाकावें. सौम्य व शामक उपचारांनीं मोडांचें शमन न झाल्यास अगर ते वरचेवर सूजूं व ठणकूं लागल्यास रक्तस्त्रावामुळें रोगी खंगत जाऊन अशक्तता आल्यास, अगर मोड सदा गुदद्वाराबाहेर असल्यास शस्त्रक्रिया करून ते मोड कापून अगर इतर तर्हेनें काढून टाकावे. मात्र जेव्हां गुदमार्गाचा क्यान्सररोग, प्रोस्टेट पिंडवृद्धीमुळें मूत्रमार्गसंकोच, अगर गर्भाशय, मूत्राशय व यकृताच्या रोगामुळें मूळव्याध उद्भवली असली तर शस्त्रक्रियेच्या अगोदर या मूळ कारणावर औषधयोजना अगर शस्त्रोपचार करावे म्हणजे रोगाचें मूळ नाहींसें होईल. शस्त्रक्रियेच्या पुर्वदिवशीं रेचक देऊन व त्या दिवशीं सकाळी बस्ती देऊन गुदमार्ग स्वच्छ करावा. बाहेरचे मोड फक्त कातरून टाकावे. आंतील मोड काढण्याचे अगोदर क्लोरोफार्मनें गुंगी आणावी. व गुदद्वाराचें छिद्र बळें सैल करावें; म्हणजे मोड काढीपर्यंत छिद्र तसेंच सैल राहून आंतील मोड दिसतात.
आ यु र्वे दी य.-मूळव्याधीस संस्कृत भाषेंत अर्श म्हणतात. आपापल्या कारणांनीं वाढलेले दोष हे त्वचा, मांस व मेद दुष्ट करून निरनिराळ्या आकाराचे कान, नाक, घसा, शिश्न व विशेषेंकरून गुदद्वार यांच्या ठिकाणीं मोड ( मांसांकुर ) उत्पन्न करतात त्यांस मूळव्याध असें म्हणतात. या मूळव्याधीचे मुख्य दोन भेद आहेत: एक जन्मत:च ( सहज ) असलेली व दुसरी जन्मल्यानंतर झालेली. या दोहोंचेहि पुन्हां कोरडी व ओली असे दोन भेद आहेत; पैकीं कोरडी म्हणजे रक्त न पडणारी व ओली म्हणजे रक्त पडणारी. कोरडी मूळव्याध वातकफानें व ओली ( रक्त पडणारी ) रक्तपित्तानें होते. दोषप्रकोपाचीं कारणें घडलीं असतां त्या प्रकोपानें अग्नि मंद होतो; तसा अग्नि मंद झाला असतां; मलविसर्जन झाल्यामुळें मलाचा पुष्कळ संचय झाला असतां; अपानवायु, लघवी आणि शौच यांचा वेग धारण केला, अथवा त्यांचा मुद्दाम वेग उत्पन्न केला असतां; ताप, गुल्म, अतिसार, आमदोष, संग्रहणी, सूज, पांडुरोग या रोगांनीं आलेल्या कृशतेमुळें; वेडेवाकडें चालणें, उड्या मारणें इत्यादि व्यापारांनीं; बायकांस गर्भपातानें किंवा गर्भवृद्धीमुळें गुदद्वारावर दाब बसल्यानें अपानवायू कुपित होऊन तो दोषांनां गुदद्वाराच्या वळींत आणतो. त्या वळ्या दुष्ट ( सुजल्या ) झाल्या म्हणजे मूळव्याध उत्पन्न होते. वातजन्य, पित्तजन्य व कफजन्य असे मूळव्याधीचे तीन प्रकार असतात. या तिन्ही दोषांनीं होणार्या मूळव्याधींत तिन्ही दोषांचीं लक्षणें असतात. आणखी एक रक्तजन्य मूळव्याध म्हणून प्रकार आहे.
मूळव्याध या रोगावर पोटांत घेण्याचीं व वर लावण्याचीं औषधें आणि शस्त्रक्रिया असे दोन प्रकारचे उपाय आहेत. मोड फार मोठे नसल्यास औषधांनीं बरे होतात; परंतु फार मोठे मोड शस्त्रानें कापून काढून नंतर त्यांवर औषधयोजना केली जाते. रक्त न पडणार्या मूळव्याधीवर बिब्बा, आणि रक्त्या मूळव्याधीवर कुड्याची साल, हीं उत्तम औषधें आहेत. सर्व प्रकारच्या मूळव्याधींत सर्व ऋतूंत देण्याजोगें शक्तिवर्धक व दोषनाशक असें उत्तम औषध म्हणजे ताक मूळव्याधींत अग्नि प्रदीप्त होण्याकरितां तक्रारिष्ट, वैश्वानरचूर्ण, अभयारिष्ट, इत्यादि औषधें घ्यावीं. मोठे मोड अर्शोयंत्रानें बाहेर काढितात व क्षार लावून जाळतात.