विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मृतसमुद्र - पॅलेस्टाईनप्रांतांतील सरोवरासारखा समुद्र. हल्लीं या समुद्राची लांबी ४७ मैल असून क्षेत्रफळ ३४० चौरस मैल आहे. भूमध्यसमुद्राच्या पाण्याच्या सपाटीपेक्षां हा १२८९-१३०० फूट खालीं आहे. या समुद्राला जॉर्डन, एन-एस-सुवेमेह, वाडिस् गुवेर, मोजिब, वाडिस् मुहावट, सेयाल इत्यादि नद्या मिळतात. समुद्राच्या पाण्याचें वि. गुरूत्व १.६६ आहे. याचें पाणी विषारी असल्यामुळें त्यामध्यें जलचर प्राणी जिवंत रहात नाहींत. या पाण्यांत तरणधर्म जास्त आहे, त्यामुळें या पाण्यांत सहज पोहतां येतें. बायबलमध्यें या समुद्राला ‘साल्ट सी’ ( खारा समुद्र ), सी ऑफ आराबाह, ईस्टसी ( पूर्वसमुद्र ) इत्यादि नांवें आहेत. याचीं हल्लींचीं नांवें सी ऑफ लॉट, डेड ( मृत ) सी हीं आहेत.