विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेक्सिको - उत्तरअमेरिकेंतील हें एक संयुक्त प्रजासत्ताक संस्थान असून याची मर्यादा अमेरिकेंतील संयुक्त प्रांतापासून दक्षिणेकडे ग्वाटेमाला व ब्रिटिश हाँडुरासपर्यंत आहे. याच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर; पूर्वेस मेक्सिकोची सामुद्रधुनी व कॅरिबियन समुद्र आहे. मेक्सिकोचें क्षेत्रफळ ७६७१९८ चौरस मैल आहे.
लो क.-१९२१ सालच्या खानेसुमारीप्रमाणें मेक्सिकोची एकंदर लोकसंख्या १४२३४७९९ होती; पैकीं शेंकडा १९ गोरे, शेंकडा ३८ इंडियन व शेंकडा ४३ मिश्र लोक आहेत. एतद्देशीय गोरे लोक स्पॅनिश वंशाचे आहेत. इंडियन या नांवाखालीं बर्याच वेगळाल्या जातींचा ( उदा. अझकेट अथवा मेक्सिकन, मिस्टेका-झापोटेका, माया अथवा युकॅटेको, ओटोमी अथवा ओथोमी, टोटोनॅक, पिमा, चोंटल, हुवाव्ही वगैरे ) समावेश होतो. या जातींमध्यें बर्याच भाषा प्रचलित आहेत.
मेक्सिको देशांत मिश्रजातींचें महत्त्व बरेंच वाढत चाललें आहे. शिक्षण, उद्योगधंदे, व्यापार व राजकीय जोखीम यांमुळें या जातींत बरीच सुधारणा होत चालली आहे. पूर्वींचा लुटारूपणाचा धंदा टाकून देऊन हे लोक आतां शांतताप्रिय व देशहितकार्यांस मदत करणारे असे होऊं लागले आहेत. यांपैकीं बरेच सरकारी नोकर्या करून सरकारास मदत करतात. लोकवस्ती बहुतेक देशाच्या दक्षिणार्धांत आहे. कारण हा भाग उत्तरार्धापेक्षां बराच सुपीक आहे.
राज्य घटना.- राजकीय दृष्ट्या मेक्सिको देश २८ प्रांत, एक संयुक्त जिल्हा व दोन अमलाखालील मुलूख यांचा बनलेला आहे. प्रांतांचे अगर संस्थानांचे पोटविभाग केलेले आहेत. प्रत्येक प्रांताचा स्वतंत्र गव्हर्नर, कायदेमंडळ व न्यायखातें असतें. तसेंच प्रत्येकाची स्वतंत्र संघटना व कायदे असतात तथापि सर्व मेक्सिकोची मिळून एक सर्वसाधारण राज्यघटना आहे. वरिष्ठ सरकारचीं कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, व न्याय खातें अशीं तीन खातीं आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह व सीनेट यांच्या हातांत कायदे करण्याची सत्ता असते. मेक्सिकोचा अध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा मुख्य असतो. सार्वत्रिक मतदानपद्धति अंमलांत आहे. प्रतिनिधिमंडळाची दर दोन वर्षांनीं निवडणूक होते. अध्यक्षाची निवडणूक लोकांकडून होते व त्याची मुदत ४ वर्षें असते. कार्यकारी मंडळ राज्यकारभार चालवण्याकरितां निरनिराळ्या खात्यावर निरनिराळे अधिकारी नेमतें.
दळणवळण.- व्यापार व उद्योगधंदे या दृष्टीनें जीं जीं महत्त्वाचीं ठिकाणें आहेत त्यांमध्यें आगगाड्या, तारायंत्रें, टेलिफोन वगैरेंची सोय करण्यांत आली आहे, व त्यामुळें दळणवळण बरेंच सुलभ झालें आहे. दि नॅशनल रेल्वेज ऑफ मेक्सिको, दि मेक्सिकन रेल्वे, दि सदर्न पॅसिफिक रेल्वे इत्यादि प्रमुख रेल्वे आहेत. बहुतेक रेल्वे सरकारच्या ताब्यांत आहेत.
व्या पा र.-मेक्सिको देशाचा परदेशांशीं बराच व्यापार चालतो. दर्याव्यापार सर्व परकीयांच्या हातीं आहे. किनार्यालगतचा व्यापार सरकारी सत्तेखालीं आहे. व्यापाराच्या दृष्टीनें महत्त्वाचीं अशीं बंदरें म्हणजे व्हेराक्रुझ, टॅम्पिको, कार्मेन, लापेझ, मझटलान, सानब्लास वगैरे आहेत. १९२३ सालीं. मेक्सिकोची आयात व निर्गत अनुक्रमें ३०९१२४३६३ व २४७६७६०७० इतक्या पेसोंच्या किमतीची होती. आयात बहुधां यंत्रें, कापूस, सूत, रेशमी कापड, मखमल, लोखंडी सामान, गहूं व इतर धान्यें, कागद, दारू, रासायनिक द्रव्यें वगैरेंची असून निर्गत सोनें, रुपें, तांबें व इतर धातू, कॉफी, रबर, कातडीं, साखर, तंबाखू वगैरे मालाची आहे. देशांतील उद्योगधंद्यांच्या संरक्षणार्थ सरकारनें परकीय मालावर कर लादले आहेत.
शे त की.-देशाचा बहुतेक भाग रखरखीत व जलशून्य असा आहे, व त्यामुळें धान्यवाढीला प्रोत्साहन देणें फारसें शक्य नाहीं. तरीपण गहूं, जवस, इंडियन कार्न ( एक प्रकारचें धान्य ) वगैरेंची लागवड कांहीं भागांत होते. गेल्या शतकांतील औद्योगिक वाढीचा परिणाम असा झाला आहे कीं, शेतकीकडे लोकांचें लक्ष वेधल्यामुळें कॉफी, ऊंस, रबर वगैरेंची लागवड देशांत जास्त प्रमाणांत होऊं लागली आहे. याशिवाय कांहीं भागांत तंबाखू, नीळ, तांदूळ, कॅको, बीनस् वगैरेंची लागवड होते. सर्व प्रकारचीं फळें देशांत पिकतात व त्यांची लागवडहि अलीकडे बर्याच प्रमाणांत होऊं लागली आहे. १९२३ सालीं ३००२७५०० एकर जमीन लागवडीखालीं होतीं.
ख नि ज सं प त्ति.-मेक्सिको देशांत खनिज द्रव्यें बरींच सांपडत असल्यामुळें खाणीच्या धंद्याला येथें फार महत्त्व आहे. अदमासें २४ प्रांतांत अगर संस्थानांत खाणी असून त्यांपैकीं बर्याच खाणींतून रुपें सांपडतें. शिवाय इतर महत्त्वाचीं खनिज द्रव्यें म्हणजे सोनें, तांबें, शिसें, लोखंड वगैरें होत. कांहीं भागांत कोळशाच्या खाणी आढळतात. कांहीं ठिकाणीं पेट्रोलियमचे झरे आढळतात. औद्योगिक बाबींत अलीकडे मेक्सिको बरेंच पुढें आलें आहे. तर्हतर्हचें कापड, मलमल, साबण, कातडी सामान, सिगारेट, चिरूट, कागद, चाकोलेट, वगैरे सर्व तर्हेचा माल देशांत मोठ्या प्रमाणांत तयार होतो. लोखंड, पोलाद व शिसें ओतण्याच्या कारखान्यांनांहि अलीकडे बरेंच महत्त्व येऊं लागलें आहे.
शि क्ष ण.-शिक्षणाच्या बाबतींतहि हा देश बराच पुढें आला आहे. शाळा, कॉलेजें, युनिव्हर्सिट्या अगर विश्वविद्यालयें बरींच स्थापिलीं असून त्यांतून सर्व तर्हेचें उपयुक्त शिक्षण देण्यांत येतें. यासंबंधीं मेक्सिको (शहर) येथील विश्वविद्यालय नमूद करण्यासारखें आहे. या देशांत सक्तीचें व मोफत प्राथमिक शिक्षण देण्यांत येतें. बहुतेक लोक रोमन कॅथोलिकपंथी आहेत.
इ ति हा स.-टेक्सकोको सरोवरांतील बेटावर अॅझटेक लोक आले ( १३२५-२७ ) त्या वेळेपासून मेक्सिको शहर अस्तित्वांत आहे. सध्याचें मेक्सिको नांव अॅझटेक लोकांच्या रणदेवतेच्या नांवावरून पडलें आहे. हे लोक येण्याच्या अगोदर त्या बेटावर सुधारलेले लोक होते. त्यांच्या सुधारणेचा फायदा घेऊन ह्या लोकांनीं आपली बरीच प्रगति करून घेतली. १५१९ मध्यें स्पॅनिश लोक येथें आले त्यावेळीं हें शहर सुधारणेच्या बर्याच उच्च पायरीला पोंचलें होतें. मेक्सिकोवर स्पॅनिश लोकांनीं सुमारें तीन शतकें सत्ता गाजविली. या अवधींत सुमारें ६४ व्हाईसरायांनीं मेक्सिकोवर राज्य केलें. स्पॅनिश लोक मेक्सिकोवर फार जुलूम करीत असत त्यामुळें त्यांच्याविषयीं मेक्सिकोमध्यें फारच असंतोष माजला होता. त्यामुळें १८१० सालीं मोठें बंड होऊन मिग्यूएल हिडाल्गो नांवाच्या एका धर्मगुरूनें मेक्सिकोचें स्वातंत्र्य जाहीर केलें. १८२२ सालीं जनरल ऑगस्टिन हतुरनिडे यानें आपण मेक्सिकोचा बादशहा झाल्याचें जाहीर केलें पण लवकरच त्याला पळून जावें लागून मेक्सिकोनें रिपब्लिक स्थापन केलें. १८२४-२८ सालपर्यंत फेलिक्स फनँडेझ व्हिक्टोरिया हा अध्यक्ष होता व १८६४ सालपर्यंत निरनिराळ्या अध्यक्षांनीं मेक्सिकोवर सत्ता गाजविली. मध्यंतरीं १८४७ मध्यें संयुक्त संस्थानें आणि मेक्सिको यांत युद्ध झालें, त्यांत संयुक्त संस्थानांनां विजय मिळून १८४८ पर्यंत तें त्यांच्या ताब्यांत होतें. पण पुन्हां मेक्सिको हें स्वतंत्र झालें. १८६१ मध्यें फ्रेन्च लोकांनीं हें शहर ताब्यांत घेतलें. १८६४ सालीं मॅक्सिमिलन, ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक ह्याला मेक्सिकोचा बादशहा करण्यांत आलें, परंतु त्याचा थोडक्याच दिवसांत खून होऊन बेनीटो जुआरेझ हा मेक्सिकोचा अध्यक्ष झाला. शेवटीं १८७६ सालीं सेनापति पॉरफीरियो डियाझ यानें मेक्सिको आपल्या ताब्यांत घेतलें. सन १८७६ पासून मधलीं चार वर्षें सोडून १९११ पर्यंत हाच मेक्सिकोचा अध्यक्ष होता. तथापि याच्या एकतंत्री राज्यकारभारामुळें मेक्सिकोमध्यें असंतोष माजला.
डियाझच्या कारभारावर टीका होण्यास सुरवात झाली. माडेरो हा या टीकाकारांचा पुढारी होता. सॅन अंटोनियो तेक्स येथें त्याच्या पक्षाची सभा भरून तींत सार्वत्रिक मतदान, एकदां निवडून आलेल्या अध्यक्षाची पुन्हा निवड न होणें, डियाझ सरकारला मान्यता न देणें इत्यादि बाबींबद्दल चळवळ करावयाचें ठरविण्यांत आलें. व ठिकठिकाणीं बंडाळी माजविण्याचें ठरलें. त्याप्रमाणें मेक्सिकोच्या निरनिराळ्या भागांत बंडें सुरू झालीं. माडेरोच्या पक्षाच्या सैनिकांनीं बंड करून किडदाद जुआरेझ हा प्रांत आपल्या ताब्यांत घेतला. या प्रांताचें अध्यक्षपद माडेरोनें आपल्याकडे घेतलें. यानंतर इतर प्रांतांतहि माडेरोच्या चिथावणीनें बंडाळी होऊं लागल्यामुळें डियाझनें आपण राजीनामा द्यावयास कबूल आहों या अटीवर समेटाची भाषा सुरू केली. समेटांत डे ल बारा यानें अध्यक्ष व्हावें असें ठरलें व त्याप्रमाणें डे ल बारा हा अध्यक्ष झाला. पण खरीं राज्यसूत्रें माडेरोच्याच हातांत होतीं. १९१६ मधील निवडणुकींत माडेरो बहुमतानें अध्यक्ष निवडून आला. पण त्याची लोकप्रियता फार दिवस टिकली नाहीं. माडेरोनें दडपशाहीस सुरवात केली; तेव्हां हुएर्टा नांवाच्या सरकारी सेनापतीनें विश्वासघात करून माडेरोला कैद केलें, व आपण स्वत:च अध्यक्षपद स्वीकारलें पण हुएर्टाच्या अध्यक्षत्वाला अमेरिकेनें संमति दिली नाहीं. तथापि हुएर्टानें त्याला भीक घातली नाहीं, एवढेंच नव्हे तर मेक्सिकोवर त्यानें सुलतानशाही गाजविण्यास सुरवात केली. अर्थात त्याच्या विरूद्ध लोकमत होणें अपरिहार्यच होतें व या लोकमताला अमेरिकेचीहि सहानुभूति होती. प्लान ड गुआडालूपे नांवाचा एक मोठा पक्ष निर्माण होऊन करंझाच्या नेतृत्वाखालीं त्यानें बंडाचें निशाण उभारलें. अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन यानीं तर हुएर्टाकडे खाजगी प्रतिनिधि पाठवून अध्यक्षपद खालीं करण्याचा सल्ला दिला. या अपमानानें चिडून जाऊन हुएर्टानें अमेरिकेशीं आपला संबंध तोडून टाकला. शेवटीं अर्जेंटिना, ब्राझिल, चिली या राष्ट्रांच्या खटपटीमुळें कशीबशी शांतता होऊन करबजल हा अध्यक्ष निवडण्यांत आला. करंझा हा अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री झाला. पण पुढें या विजयी पक्षामध्येंच बखेडे माजले व मेक्सिकोमध्यें कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं अशी स्थिति झाली. शेवटीं अमेरिका, अर्जंटाइन, पेरू इत्यादि राष्ट्रांनीं मेक्सिकोंतील निरनिराळ्या पक्षांची परिषद भरविली व शेवटीं करंझा हा मेक्सिकोचा अध्यक्ष झाला. पण त्याचा प्रतिस्पर्धी व्हिला हा अद्यापि जोरांतच होता. त्याच्या अनुयायांपैकीं कांहींनीं १८ अमेरिकनांचा खून केल्यामुळें अमेरिकेनें त्याचा पाठलाग करण्यासाठीं सेनापति पर्शिंग याच्या हाताखालीं सैन्य देऊन पाठवलें. अर्थांत परराष्ट्राचें सैन्य बेलाशक आपल्या राष्ट्रांत घुसूं देण्याचें करंझानें नाकारलें. त्यामुळें अमेरिका व मेक्सिकोमध्यें बाचाबाची सुरू झाली. शेवटीं अमेरिकेनें आपलें सैन्य मेक्सिकोंतून काढून घेतलें. यानंतर करंझानें मेक्सिकोची शासनघटना तयार केली. तींत उपाध्यक्षाची जागा कमी करणें, एकाच अध्यक्षाची लागोपाठ पुन्हां निवड न होणें इत्यादि महत्त्वाच्या गोष्टी होत्या. भूपृष्ठाच्या खालीं जें पेट्रोलियम सांपडतें त्याच्यावर सरकारची मालकी कीं ती जमीन ज्याच्या ताब्यांत असेल त्याची मालकी यासंबंधानें सरकार व लोक यांच्यामध्यें भांडण होऊन सरकारचें म्हणणें गैरकायदेशीर आहे असें मेक्सिको कोर्टानें ठरविलें. महायुद्धामध्यें मेक्सिकोनें आपलें ताटस्थ्य राखलें. करंझानें ज्या सुधारणा घडवून आणण्याचें कबूल केलें होतें त्या त्याच्या हातून घडून आल्या नाहींत. त्यामुळें काँग्रेसमधील सभासद त्याच्याविरुद्ध जाऊं लागले. सेनापति ओब्रेगॉन हा त्याचा प्रतिस्पर्धी होता व त्याला लोकमत बरेंच अनुकूल होतें. तथापि ओब्रेगॉन याजवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याला पकडण्याचा करंझानें हुकूम सोडला. करंझाच्या या जुलमी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठीं लिबरल कॉन्स्टिट्यूशन पार्टी स्थापन झाली. पुढें यांच्यामध्यें व सरकारमध्यें गनिमी युद्ध होऊन शेवटीं ओब्रेगॉनचा जय झाला व तो मेक्सिकोचा अध्यक्ष झाला. हल्लीं मेक्सिकोचा अध्यक्ष प्लूटार्को एलियस कॅलेस हा आहे.