विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेंडेलिफ ( १८३४-१९०७ )-एक रशियन रसायनशास्त्रज्ञ. याचें शिक्षण सेंटपीटर्सबर्ग येथें पुरें होऊन पदवी घेतल्यानंतर यानें होयाडलबर्ग येथें आपल्या नांवानें प्रयोगशाळा सुरू केली. नंतर १८६३ सालीं तो सेंटपिटर्सबर्ग येथें कांहीं दिवस प्रोफेसर असून पुढें त्याच हुद्दयावर विश्वविद्यालयामध्येंहि त्यानें काम केलें. १८९३ सालीं तो वजनमापन खात्याकडे डायरेक्टर म्हणून राहिला व अखेरपर्यंत तो त्याच हुद्दयावर होता.
रसायनशास्त्रांतील याची मुख्य कामगिरी नियतांतरिकत्वाविषयींची होय. ह्याच्या पूर्वीच्या रसायनशास्त्रज्ञांनीं मूलद्रव्यांचे परमाणुभारांक व त्यांच्या इतर गुणधर्मांमधून दिसून येणारें नियतान्तरिकत्व सिद्ध केलें होतेंच. मेंडेलिफ यानें फक्त हे मागील शोध एकत्र करून त्यांस नियमाचें स्वरूप दिलें. १८७१ सालीं त्यानें ह्या वर्गीकरणांतील राहिलेल्या मोकळ्या जागेंत कोणतीं मूलद्रव्यें असावींत याचा कयास बांधून त्यांचे गुणधर्म काय असावेत हें प्रतिपादिलें, व त्याप्रमाणें हळू हळू त्यांपैकीं ३ धातूंचा शोध लागला. ते ३ धातू म्हणजे गाल्ल, स्कंद व शार्मण्य होत. याच धातूंस मेंडेलिफ यानें, एक-टंक, एक-स्फट व एक-सिक अशीं नावें दिलीं. ह्या वर्गीकरणाचा उपयोग त्यानें मूलद्रव्यांचे परमाणुभारांक पडताळून पाहण्याकडे करून त्याप्रमाणें कांहीं मूलद्रव्यांचे प. भारांक चूक आहेत असें दाखविलें. त्यानंतर त्यानें उज्जाहूनहि कमी प. भारांक असणारीं आणखीं दोन मूलद्रव्यें असून त्यापैकीं अगदीं हलकें जें मूलद्रव्य तें इथ्र असावें, कारण इथ्राप्रमाणेंच हें द्रव्य अचेतन असून सर्वव्यापी व प्रगमनशील असें असावें अशी कल्पना पुढें मांडली. नंतर द्रवरूप पदार्थांचें उष्णतेच्या योगानें होणारें प्रसरण शोधून त्याविषयींचें एक सूत्रहि ( फॉर्म्युला ) त्यानें प्रस्थापित केलें. रसायनशास्त्रावर त्यानें बरींच निरनिराळीं पुस्तकें लिहिलीं आहेत. त्यांत त्याचें ‘प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री’ हें पुस्तक बरेच लोकप्रिय असून त्याचीं निरनिराळ्या भाषांतून भाषांतरेंहि झालेलीं आहेत. त्याच्या नियतान्तरिकत्वाच्या कामगिरीबद्दल त्यास १८८२ सालीं रॉयल सोसायटीनें डेव्ही-पदक दिलें. १९०५ सालीं त्यास कॉप्ले पदक मिळालें.