विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेणबत्ती - मेणबत्ती म्हणजे मेणासारख्या दिसणार्या पदार्थापासून केलेली बत्ती अथवा दिवा होय. ज्याप्रमाणें साध्या तेलाच्या दिव्यास वात लागते त्याप्रमाणेंच मेणबत्तींतहि वात असतेच. मात्र ही वात कापसाची साधी नसून तिच्यासंबंधीं लहान मोठ्या बर्याच गोष्टींकडे लक्ष द्यावें लागतें. मेणबत्तीची मूळ कल्पना तेलाच्या दिव्यापासून निघालेली आहे. इ. स. च्या १३ व्या शतकापर्यंत मेणबत्तीचा उपयोग चर्च व राजवाड्यांत रोषणाई करण्यापुरताच होता. १३ व्या शतकापासून मेणबत्तीचा उपयोग वाढत चालला व या कामीं बरेंच मेण खर्च होऊं लागलें. तरी पण १९ व्या शतकापर्यंत मेणबत्ती ही वस्तु मध्यम लोकांच्या उपयोगांत क्वचितच येत असे. नंतर जेव्हां १९ व्या शतकांत मेणाच्या ऐवजीं इतर स्वस्त पदार्थांचा उपयोग होऊं लागला तेव्हांपासून मेणबत्ती हा जिन्नस मध्यमवर्गास माहीत होऊं लागला. आज तर मेणबत्तींत मेणास अजिबात उच्चाटण मिळाल्यासारखेंच आहे व मेणाऐवजीं ‘स्टिअरीन,” “पॅराफीन,” “सेरेसीन”, चरबी, जपानी मेण इत्यादि जिन्नस शेंकडा ९०-९५ प्रमाणांत वापरण्यांत येतात.
मे ण ब त्ती त या र क र ण्या ची कृ ति.-या कृतींत पुढील चार प्रयोग आहेत. (१) मेणपदार्थमिश्रण तयार करणें; (२) वात तयार करणें; (३) मेणबत्तीचा आकार करणें व (४) मेणबत्तीच्या कृतींतील शेवटचीं पूर्णतेचीं कामे.
(१) मेणपदार्थांत पुढील गुण प्रामुख्यानें असावेत. (अ) मेण वितळण्याचें उष्णमान फार मोठें तसेंच फार लहान नसावें. (आ) वितळलेलें मेण इतकें पातळ असलें पाहिजे कीं ते वातीकडे सहज आकर्षिलें जावें. (इ) मेण जळतांना शक्य तेवढा जास्त उजेड पडावा व तें जळत असतां त्यापासून कोणत्याहि प्रकारचा दुर्गंध येऊं नये व जळल्यानंतर मागें राख बिलकुल राहूं नये. (ई) तें संथपणें जळणारें असावें. मेणपदार्थामध्यें मेणाच्या जातींतील (उदा. मधमाशांचें मेण इ.) घट्ट तेलाच्या अथवा त्यांतील अम्लाच्या जातींतील (उदा. स्टिअरीन अथवा पाल्मीटिक व स्टिअरीक अॅसिड्स इ.) पॅराफीन व सेरेसीन इत्यादि जातींतील द्रव्यांची गणना होते. या कामीं मुख्यत: उपयोगांत येणारे पदार्थ म्हणजे मधमाशांचें मेण, वॉलरॅट वनस्पतिज मेणें, चरबी, स्टिअरीन, पॅराफीन, सेरेसीन, मोन्टानवॅक्स व हायड्रॉजिनेशनच्या प्रयोगानें कठिण केलेलीं उद्भिज व वनस्पतीज तेलें वगैरे होत.
(२) वात :- वातीचा आकार व विशषत: जाडपणा अथवा बारीकपणा हा मुख्यत: उपयोगांत येणार्या मेणपदार्थावर अवलंबून असतो. तसेंच तो मेणबत्तीच्या आकारावरहि अवलंबून असतो.
रासायनिक द्रव्यांत बोरीकाम्ल, गंधकाम्ल, फॉस्फोरिक अम्ल तसेंच अमोनियन-सल्फेट, पोटॅशियम नायट्रोजन, वुल्फ्रॅम द्रव्यें, वाटरग्लास व अमोनियम क्लोराईड इत्यादींचा उपयोग केला जातो.
(३) मेणबत्तीचा आकार :-यांत पांच निरनिराळे प्रकार आहेत: (अ) लाटून तयार अरणें, (आ) सांच्यांतून दाबून तयार करणें, (इ) भिजवून अथवा बोळून काढून तयार करणें, (ई) वातीवर वितळलेला मेणाचा रस ओतून तयार करणें; व (उ) लांकडी सांच्यांत रस ओतून आकार देणें. यांत पांचव्या प्रकाराचा सर्वांत जास्त उपयोग केला जातो. मेणपदार्थाचें मिश्रण तयार झाल्यानंतर तें वितळविण्यांत येतें व पातळ झाल्यानंतर ज्यामध्यें वात अगोदरच नीट ठेवलेली असते अशा मेणबत्तीच्या सांच्यांत तो रस ओतण्यांत येतो. थंड झाल्यानंतर मेणबत्तीचा रस पुन्हां थिजून पूर्ववत् कठिण झाला म्हणजे ती बाहेर काढून पुढील कामास घेण्यांत येते.
(४) पूर्णतेचीं कामें:-हीं कामें म्हणजे (अ) मेणबत्ती वी बाहेरील बाजू सूर्यकिरणांनीं सफेत करणें, (आ) तिची लांबी सारखी करणें, (इ) दोन्ही टोंकें नीट करणें, (ई) बाहेरील अंगास पॉलिश देऊन तकतकित करणें, व (उ) नांब-ट्रेडमार्क वगैरे छापणें; इत्यादि.
मेणबत्तीचा व्यापार बराच मोठा आहे व जरी पृथ्वीवर सर्व भागांत मेणबत्ती तयार होत असते तरी यूरोपनें जणूं काय मेणबत्तीचा पुरवठा करण्याचा मक्ताच घेतलेला आहे. त्यांच्यांतहि इंग्लंड, फ्रान्स, बेल्जम व हॉलंड यांचा नंबर पहिला येतो हिंदुस्थानांत दरवर्षीं ३५-४० लक्ष मेणबत्ती आयात होते व तिची किंमत म्हणून १०-१२ लक्ष रुपये जातात. हिंदुस्थानांत हल्लीं एकंदर मेणबत्तीचे ४ कारखाने आहेत व त्या सर्वांत मिळून दरवर्षीं ६०-७० लक्ष रत्तल मेणबत्ती तयार होते. व त्यांची किंमत ११२००० पासून १६०००० पौंडांपर्यंत असते म्हणजे इंग्लिश मेणबत्तीपेक्षां ही मेणबत्ती किंमतींत कमी ठरते [हेफ्टर-टेग्नोलोगी डर फेटे ऊंड ड्युले, पु. ३; ल्युकोविच-टेक्नॉलॉजी ऑफ ऑईल्स, फॅट्स अँड ब्रॅक्सीस, पु. ३; इ. ] [ लेखक वा. द्वा. कोरडे ]