विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

मेन - पंजाबांतील एक जात. लोकसंख्या (१९११) २४१७३. यांनां मेऊन असेंहि म्हणतात. म्हणून मेऊन व मेओ (मेकानी) यांचा घोंटाळा झाला आहे. मेन हे सर्व मुसुलमान आहेत. मेन हा शब्द जरी मीन (मासा) या संस्कृत शब्दा पासून निघालेला आहे आणि हा जरी धंदेवाचक शब्द आहे तरी मेन ही एक निराळी जात असून तिचा मच्छी व मेओ या जातींशीं कांहीं एक संबंध नाहीं. त्यांच्यांत झुलक्याची विचित्र चाल आहे (झुलका = लग्नाच्यावेळेस पेटवावयाचा अग्नि; हा जांवयानें पेटविला पाहिजे). त्यांच्यांत दहीं दूध यांच्या उपयोगासंबंधानें बरेच निर्बंध आहेत. मेन हे बहुतकरून नदीच्या किनार्‍यावर राहून मासे धरतात. ते आजकाल दुसरेहि धंदे करूं लागले आहेत. [ से. रि. (पंजाब) ]