विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेयो, लॉर्ड (१८६९-७२) - एक हिंदुस्थानचा गव्हर्नरजनरल. हा आयरिश होता. हा प्रथम आयर्लंडचा मुख्य सेक्रेटरी होता. पुढें १८६९ त हिंदुस्थानच्या गव्हर्नर जनरलच्या जागीं ४७ व्या वर्षीं त्याची नेमणूक झाली (१८६९). हिंदुस्थानची सरहद्द बळकट करण्याचा त्यानें प्रयत्न केला. व रशियाचें अफगाणिस्तानावरील वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न केले. यानें निरनिराळ्या खात्यांत पुष्कळ सुधारणा केल्या. शेतीसुधारणेचें नवीन खातें काढिलें, देशांत सडका, सरकारी आगगाडीचे रस्ते आणि कालवे बांधिले व कांहीं नवीन कर बसवून व काटकसर करून त्यानें हिंदुस्थानचा जमाखर्च आटोक्यांत आणला. प्रत्येक इलाख्याच्या गव्हर्नराकडे जमेच्या व खर्चाच्या कांहीं बाबी मुखत्यारीनें सोंपवून देण्याची पद्धत यानेंच सुरू केली. हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांच्या अंतर्गत कारभारांत त्यानें फारसा हात घातला नाहीं. तसे दोन प्रसंग आले असतां त्यानें ते युक्तीनें पार पाडले. अजमेर येथें राजपुत्रांसाठीं यानें मेयो कॉलेज स्थापिलें व लाहोर आणि राजकोट येथेंहि अशींच कॉलेजें स्थापिलीं. १८७२ सालीं तो अंदमान बेटांत कैद्यांच्या वसाहतीची सुधारणा करण्याकरितां गेला असतां, तेथें एका कैद्यानें त्याचा खून केला.