विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेरगुइ, जि ल्हा.- ब्रह्मदेशामधील तेनासरिम विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ९७८९ चौरस मैल. या जिल्ह्याचा उत्तरभाग डोंगराळ आहे. या जिल्ह्यांतून तेनासरिम व दुसर्या दोन तीन लहान नद्या वहातात. या जिल्ह्याची हवा निरोगी आहे. यात सरासरी १०३ इंच पाऊस पडतो.
इतिहास:-पूर्वीं हा जिल्हा सयामच्या राज्यांत मोडत असे. त्यावेळीं हा त्या राज्याचा एक प्रांत असून याची राजधानी तेनासरिम येथें होती व याच्या पूर्वेकडील देशांत ज्या मार्गानें व्यापारी माल नेत असत त्या मार्गाचें तेनासरिम हें मुख्य द्वार असून येथें हिंदुस्थानांतून व त्याच्या पश्चिमेकडील इतर देशांतून व्यापारी माल समुद्रमार्गानें येत असे. इ. स. १६८३ मध्यें सयामच्या राजानें ईस्ट इंडिया कंपनीच्या रिचर्ड बर्नबीनामक माणसास मेरगुइ येथें आपला प्रतिनिधि नेमलें. तेव्हांपासून येथें इग्लिश, फ्रेंच व डच व्यापारी येऊं लागले. पुढें सयामच्या राज्यांत फ्रेंच लोकांचें वजन वाढलें व त्यांनीं मेरगुइ गांव आपल्यां ताब्यांत घेतलें. परंतु सयामांतील यादवीचा फायदा घेऊन ब्रह्मदेशच्या अलौंगपया नामक राजानें १७५९ सालीं सयामवर स्वारी केली आणि मेरगुइ, तेनासरीम हीं गांवें घेतलीं. तेंव्हांपासून मेरगुई, तेनासेरीम व त्यांच्या आसपासचा मुलुख १८२४ सालपर्यंत ब्रह्मदेशाच्या राजांच्याच ताब्यांत होता. शेवटीं तो मुलुख १८२४ सालीं इंग्रजांच्या ताब्यांत आला.
जिल्ह्याची लो. सं. (१९२१) १११४२४. शेंकडा ८७ लोक बौद्ध धर्मीय आहेत. जिल्ह्यांत बहुतेक ब्रह्मी भाषा बोलली जाते, तरी याच्या दक्षिणभागीं सयामी, चिनी व मलायी या भाषा वापरण्यांत येतात. यांतील जवळ जवळ दोन तृतीयांश लोकसंख्या शेतकीवर आपली उपजीविका करते. शेतकींत मुख्यत्वेंकरून भाताचें पीक असतें तरी कांहीं जमिनींत फळफळावळ व दनिपाम नांवाचीं झाडें होतात. या झाडांपासून ताडी व साखर तयार करतात. जिल्ह्यांत मच्छीमारीचा धंदा मोठ्याप्रमाणावर चालतो. या जिल्ह्याच्या आसपास समुद्रांत मोत्यें सांपडतात.
कथील, मीठ, कोळसा, सोनें, चांदीमिश्रित शिसें व संगमरवरी दगड हे खनिज पदार्थ सांपडतात. मेरगुइ हें येथील व्यापाराचें मुख्य बंदर आहे. तसेंच पलॉ व व्हिक्टोरिया पॉइंट हींहि दोन व्यापारी बंदरें आहेत. ब्रह्मदेशांतील इतर जिल्ह्यांच्या मानानें हा जिल्हा विद्येंत मागासलेला आहे. शेंकडा २० लोक साक्षर आहेत.
त ह शी ल.-क्षेत्रफळ १३७७ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ५३४६६. यांत मेरगुइ-द्वीपसमुहांतील मुख्य मुख्य बेटांचा समावेश होत असून हींत एकंदर ५८ खेडीं व मेरगुइ नांवाचें एक गांव आहे.
गां व.-जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारें १५ हजार. हें गांव तेनासरीमच्या किनार्यावर वसलें असून, व्यापाराचें मुख्य बंदर आहे. येथून खारे मासे व मोत्यांचे शिंपले बाहेर रवाना होतात.