विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेरिडिथ, जॉर्ज (१८२८-१९०९) - एक आंग्ल कवि व कादंबरीकार. १८५१ सालीं त्याचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. याशिवाय दि शेव्हिंग ऑफ ड्रॉगपट (१८५६), फरीना (१८५७); दि ऑर्डिअल ऑफ रिचर्ड फेवरेल (१८५९), इव्हॅन हॅरींग्टन (१८६१), व्हिट्टेरिया (१८६६) इत्यादि बर्याच कादंबर्या त्यानें लिहून प्रसिद्ध केल्या. १८६६ सालीं तो ‘मॉर्निंग पोस्ट’ पत्राचा बातमीदार झाला. यापूर्वीं त्यानें बरींच काव्येंहि लिहिलीं होतीं; व त्यांत ‘मॉडर्न लव्ह अँड पोएम्स ऑफ दि इंग्लिश रोडसाइड’ हा त्याचा उत्कृष्ट काव्यसंग्रहहि १८६६ पूर्वींच बाहेर पडला होता. १८६६ नंतर ‘दि अॅडव्हेंचर्स ऑफ हॅरी रिचमंड’, ‘ब्युचँपस कंरीअर’ (१८७५), ‘दि एगोइस्ट’ (१८७९), ‘दि ट्रॅजिक कॉमेडियन्स’ (१८८०); ‘डायाना ऑफ दि क्रॅसवेज’ या कादंबर्या व ‘पोएम्स अँड लिरिक्स ऑफ जॉय अँड अर्थ’ (१८८३), ‘बॅलड्स अँड पोएम्स ऑफ ट्रॅजिक लाइफ (१८८७), इत्यादि काव्यें लिहिलीं. १८९१ सालीं ‘वन ऑफ अवर काँकरर्स’ व १८९५ सालीं ‘दि अमेझिंग मॅरेज’ या त्याच्या कादंबर्या बाहेर आल्या व त्याचप्रमाणें ‘दि एम्प्टी पर्स अँड जंपड ग्लोरीजेन’ हें काव्यहि प्रसिद्ध झालें. १९०५ सालीं ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ चा किताब त्याला मिळाला. मेरिडिथच्या कादंबर्या कधींहि लोकप्रिय झाल्या नाहींत. याचें कारण लोकांचें मनोरंजन करण्याच्या उद्देशानें त्यानें त्या कधींच लिहिल्या नाहींत. त्याच्या कादंबर्या विचारोद्दीपक असत, व त्यांतील शब्दरचना विक्षिप्त असे. तथापि विनोद, सूक्ष्म निरीक्षण, स्वभावपरिपोष, शब्दनिर्मिति इत्यादि बाबतींत त्याचें प्रभूत्व दिसून येतें.