विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मेहता, सर फेरोजशहा मेरवानजी (१८४५-१९१५)-एक प्रसिद्ध हिंदी मुत्सद्दी. हा मुंबई येथील एका पारशी सुखवस्तु व्यापार्याचा मुलगा होता. एलफिन्स्टन कॉलेजांतून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतांच त्यानीं ताबडतोब एम. ए. ची परीक्षा दिली. पारशी जातींतील हा पहिलाच एम. ए. झालेला माणूस होय. पुढें त्यानां इंग्लंडला बॅरिस्टरीकरितां पाठविण्यांत आलें. १८६८ सालीं ते बॅरिस्टर झाले. मुंबईस परत आल्यावर त्यानीं वकिलीला सुरवात केली व त्यांत मान व धन या दोहोंची प्राप्ति करून घेतली. वकिलीचा धंदा करीत असतांना मेहता सार्वजनिक कामांतहि बराच भाग घेत असत. १८७० च्या ईस्ट इंडिया बिलाच्या व १८७७ च्या स्वयंसैनिक चळवळीच्या बाबतींत त्यानीं पुढाकार घेतला. पण या सर्वांत त्यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे मुंबई कार्पोरेशनच्या बाबतींतील होय. मुंबईकार्पोरेशनला हल्लींची स्थिति प्राप्त होण्याला फेरोजशहांचे श्रमच मुख्यत: कारणीभूत आहेत. मुंबईकार्पोरेशनचा व त्यांचा मरेतों संबंध होता व चार वेळां ते तिचे अध्यक्ष होते; १८८८ ची मुंबईकार्पोरेशनला मिळालेली स्वातंत्र्यसनद यांच्याच प्रयत्नानें मुख्यत: मिळाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. लिटनशाहींत पास झालेला व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट व इतर जुलमी कायद्यांचा त्यानीं तीव्र निषेध केला. १८८५ सालीं, त्यांच्या प्रयत्नानें बाँबेप्रेसिडेन्सी अॅसोसिएशन नांवाची राजकीय संस्था स्थापन झाली. मेहेता हे तिचे मरेतों अध्यक्ष होते. या संस्थेमार्फत ते आपली राजकीय मतें लोकांपुढें निर्भयरीतीनें मांडीत असत. राष्ट्रीय सभा झाल्यापासून ते तिचे एक आधारस्तंभ होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. १८९० सालीं राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष होण्याचा मान त्यानां मिळाला. १८८६ सालीं त्यांचा मुंबई कायदेकौन्सिसमध्यें प्रवेश झाला. तेथें असतांनाहि बाँबे लँड रेव्हेन्यू बिलासारख्या लोकहिताविरुद्ध बिलाचा इनकार करण्यास त्यानीं कमी केलें नाहीं. वरिष्ठ कौन्सिलाचेहि ते कित्येक वर्षें सभासद होते; तेथेंहि पोलीस बिलासारख्या जुलमी कायद्याला त्यानीं सरकारला भीक न घालतां कसून विरोध केला. मुंबई विश्वविद्यालयाशींहि त्यांचा निकट संबंध होता. कित्येक वर्षें ते सीनेटचे सभासद व्हाईसचॅन्सलरची बहुमानाची जागाहि त्यानां मिळाली होती. तसेंच मुंबईविश्वविद्यालयानें उशीरा कां होईना, त्यानां एल्. एल्. डी. ही पदवी अर्पण केली होती. १८९४ सालीं त्यानां सरकारनें सी. आय. ई. हा किताब दिला व पुढें १९०४ सालीं नाईटहुड उर्फ सर ही पदवी मिलाली. फेरोजशहा सरकारविरुद्ध टीका करण्यास कचरत नसत, तथापि सामान्यत: ते नेमस्त होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. यामुळें जहालांचा पक्ष त्यानां विरोधक झाला. शिवाय मेहतांचा स्वभाव मानी व दुसर्यानें आपल्या तंत्रानें वागावें अशा प्रकारचा असल्यानें इतर पुढार्यांशीं त्यांचें सहसा पटत नसे. सुरतेच्या बखेड्यांत नेमस्त मेहतांची सरशी झाल्यासारखें दिसलें; तरी तेव्हांपासून त्यांच्या पक्षाला ओहोटी लागण्यास खरा आरंभ झाला. सुरत काँग्रेसनंतर पुढें कांहीं वर्षें मेहतानीं राजकारणांत प्रत्यक्ष भाग फारसा घेतला नाहीं म्हटलें तरी चालेल. १९१० सालीं ते इंग्लंडला गेले. इंग्लंडहून आल्यानंतर त्यानीं थोडें फार राजकारणांत मन घालण्यास सुरवात केली. तथापि त्यांत पूर्वींचा उत्साह दिसत नव्हता. त्यांतल्या त्यांत मेहेतांची विशेष महत्त्वाची कामगिरी म्हणजे ‘टाईम्स ऑफ इंडिया’ लो तोड म्हणून ‘क्रॉनिकल’ पत्राची स्थापना ही होय.