विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मैमनसिंग, जि ल्हा.-बंगालमधील डाका विभागांतील उत्तरेकडील जिल्हा. क्षेत्रफळ ६२४९. चौ. मैल. लोकसंख्या (१९२१) ४८३७७३०. याच्या उत्तरेस गारोटेंकड्या; पूर्वेस सिल्हेट; आग्नेयीस टिप्पेरा संस्थान; व दक्षिणेस डाका. येथील ब्रह्मपूत्रा नदीच्या पूर्वेकडील लोकांचें सिल्हेट वगैरेमधील लोकांशीं साम्य आहे व पश्चिमेकडील लोकांचें पबना, डाका, फरीदपूरमधील लोकांशीं साम्य आहे. पूर्वेकडील भागांत दलदलीचे प्रदेश आहेत. मधुपूर जंगलानें या जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. यांत नद्या पुष्कळ असल्यामुळें बोटीनें दळणवळण बरेंच चालतें. येथील उष्णतेचें मान सरासरी ८२० अंशांवर असतें. पाऊस ८६ इंच पडतो.
इतिहास:-प्राचीन काळीं हा भाग प्रागज्योतिष किंवा कामरूप राज्यांत मोडत असे. येथील बलाढ्य राजा भगदत्त यानें कुरुक्षेत्राच्या युद्धांत बराच भाग घेतला होता. त्याची राजधानी गौहत्ती (पहा) येथें होती. जुन्या ब्रह्मपुत्रेचा पश्चिमेकडील भाग कांहीं दिवस बल्लाळसेनाकडे होता. इ. स. ११९९ त मुसुलमानांनीं येथें प्रथम प्रवेश केला. इ. स. १३५१ त हा सर्व प्रांत शमसुद्दीन इलियास शहाच्या सत्तेखालीं होता; व त्यावेळीं सोनारगांव हें मुख्य शहर होतें. महमूदशहाच्या घराण्यानें इ. स. १४८७ पर्यंत येथें राज्य केलें. १६ व्या शतकांत येथें फिरून लहान लहान भुइया राजे होऊन गेले. स. १५८२ त तोडरमल्लानें मैमनसिंग हा प्रांत बाजुहासरकारांत घातला होता. कंपनीला इ. स. १७६५ त दिवाणी मिळाल्यावर हा भाग नियाबतमध्यें मोडूं लागला. इ. स. १७८७ त मैमनसिंग जिल्हा बनविला गेला.
जिल्ह्यांतील ४/५ लोक शेतकीवर उदरर्निवाह करतात. मुख्य पिकें तांदूळ, ताग, गळिताचीं धान्यें, विड्याचीं पानें, गहूं, जव, ऊंस, वगैरें होत. येथें कालव्यांचा थोड्या फार प्रमाणांत उपयोग केला जातो.
व्यापारधंदे:-पूर्वी किशोरगंज व बाजितपूर येथें फारच सुरेख मलमल होत असे. सध्यां येथें चटया व इस्लामपूर व जमालपूर येथें घंटा बनतात. कारगांव येथें चाकूकात्र्यांहि थोड्या प्रमाणांत तयार होतात व वेताचें विणकामहि होतें. व्यापार रेल्वेनें व नदींतून चालतो. ईस्टर्न बंगाल स्टेट रेल्वेची मैमनसिंगशाखा यांतून जाते. सर्वांत मुख्य म्हणजे कलकत्त्याहून काचरपर्यंत दररोज बोटी जातात.
श ह र.-याला नासिराबाद असेंहि नांव आहे. हें जुन्या ब्रह्मपुत्रेच्या पश्चिम किनार्यावर वसलें आहे. लोकसंख्या (१९११) १९८५३. हें ईस्टर्न बंगाल रेल्वेच्या डाका फांट्यावर आहे. येथील तुरुंगांत तेल गाळणें, चटया, वेताच्या खुर्च्या व विटा करणें हीं कामें होतात. येथें बरींच हायस्कुलें व एक कलकत्ता युनिव्हर्सिटीला जोडलेलें कॉलेज आहे.