विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोझँबिक - पूर्व आफ्रिकेच्या गोवाप्रांतांत हें एक पोर्तुगीजांचें शहर आहे. हें मोसोरिल उपसागराच्या मुखाशीं असणार्या एका प्रवाळबेटावर वसलें आहे. येथें असलेल्या तीन किल्ल्यांपैकीं सेन्ट सबॅशियन नांवाचा मुख्य किल्ला १५१० सालीं बांधला गेला. येथील बंदर लहान आहे. याची लोकसंख्या सुमारें ७००० असून तींत बहुतेक मुसुलमान व निग्रो यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले आहेत. पारशी, बनिया, गोआनी लोक व अरब व्यापारी येथें आहेत. कापूस, रंगीबेरंगी शालजोड्या आणि धातूचें सामान ग्रेटब्रिटन आणि हिंदुस्थानांतून येथें येतें. भुइमूग, तीळ, रबर आणि एबनी नांवाचें लांकूड येथून परदेशांत जातें; यापैकीं बराच माल जर्मनींत जातो. १४९८ सालीं वास्को द गामानें हें शोधलें. त्यावेळेस बेटावर असलेल्या अरब शहराचा सांप्रत मुळीच मागमूस नाहीं.