विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोटार - मोटार हें एक वाहन असून त्यास पेट्रोल एंजिनच्या साहाय्यानें गति दिली जाते. ह्या एंजिनची रचना इतर तैलयंत्रा (एंजिन) च्या सारखीच (एंजिन पहा) असून ह्यामध्यें असणारा दट्ट्या पुढें सरकला म्हणजे वातावरणाच्या दाबाच्या योगानें पंचपत्रावरील पडदा उघडला जाऊन त्यामध्यें कार्ब्युरेटरच्या साहाय्यानें तयार झालेली पेट्रोलची वाफ व हवा यांचें मिश्रण सांचतें. दट्ट्या परत आला म्हणजे हें मिश्रण दबलें जातें व त्याच सुमारास पंचपात्रास जोडलेल्या एका नलिकेचा बाह्यभाग तप्त केल्यामुळें ती उष्णता त्यास पोंचून मिश्रण पेटतें व त्याच्या भडक्यामुळें दट्ट्या पुन्हां पुढें सरकला जातो. ही क्रिया पेट्रोल संपेपर्यंत सारखी चालू रहाते. ह्या एंजिनमधील पहिली सुधारणा म्हणजे एंजिनचा प्रत्येक भाग वजनानें हलका पण टिकाऊपणासाठीं पोलादाचा करणें ही होय. एंजिनमधील पडद्याची उघडझांक यांत्रिकरीत्या केली जाऊन मिश्रणहि विद्युतच्या साहाय्यानें पेटवितात. ही विद्युत् उत्पन्न करण्याकरितां सिम्सबॉश-मॅग्नेंटोचा उपयोग करतात. ह्या यंत्रामध्यें लोहखंड (आर्मेचर) असून तो लोहचुंबकाच्या जुडग्यांतून फिरविल्यामुळें उत्पन्न होणार्या मंदविद्युतप्रवाहाच्या योगानें द्वितीय वेष्टणामध्यें जोराचा प्रवर्तित प्रवाह उत्पन्न होऊन तो पंचपात्रावर असलेल्या विद्युद्वाहक खुंटीस पोंचतो व त्यायोगानें आंतील मिश्रणास उष्णता पोंचून तें पेट घेतें. ह्या मॅग्नेटोचे फायदे म्हणजे विद्युत्प्रवाह उत्पन्न करावयास विद्युत्संचायक लागत नसून एंजिनच्या साहाय्यानें हा लोहचुंबकाच्या जुडग्यांतून अधिक प्रमाणांत फिरवितां येऊन प्रवाहाचा जोर अधिक वाढवितां येतो व मिश्रण लवकर पेटवितां येतें. एंजिनमधील निरनिराळ्या यंत्रांस वंगण देण्याच्या पद्धतींतहि सुधारणा करून त्याची शक्ति वाढविण्यांत आली आहे. एंजिनपासून मिळणार्या शक्तीचें वहन प्रथमत: चाप व दंतुर चक्रें यांच्या साहाय्यानें होऊन शेवटी चाकें फिरविण्यास मात्र अलीकडे सांखळीच्या ऐवजीं स्थिर अक्षावर असलेल्या पंख्याच्या साहाय्यानें त्यांस गति देऊन तीं पुढें ढकललीं जातात. सांप्रत मोटारींतून जीं एंजिनें वापरतात. तीं डीझेल धर्तींचीं असतात. हलकी यंत्ररचना व दर सेकंदास जास्तींत जास्त फेरे यामुळें हीं एंजिनें फार उपयोगांत आणतात.
व्या पा र.-आजकाल मोटार हें सुधारलेलें व अति आवश्यक वाहन होऊन बसलें असल्याकारणानें त्याचा व्यापारहि फार मोठ्या प्रमाणांत चालतो. अमेरिका हा मोटारींचा प्रमुख देश आहे. १९२३ सालीं युनायटेड स्टेट्समध्यें १५०९२१७७ मोटारी होत्या म्हणजे दर सहा माणसांस एक मोटार पडते. इतक्या मोटारी त्या देशांत चालत असल्यामुळें अपघातांची संख्याहि तशीच मोठी (दररोज सुमारें ५२) आहे. अमेरिकेंतील कोट्याधीश जो हेनरी फोर्ड त्याच्या कंपनीच्या मोटारी जगांत सर्वत्र पसरल्या असून सर्वांत जास्त स्वस्त त्याच आहे. १९२४ सालीं या फोर्ड मोटारकंपनीला ३० कोटी रुपये निव्वळ फायदा झाला. हिंदुस्थानांत मोटारींची आयात, शेंकडा ३० टक्के कर असतांहि दिवसानुदिवस वाढत आहे. १९२१-२२ सालीं २८९५; १९२२-२३ सालीं ४३२३ व १९२३-२४ सालीं ७९८४ मोटारी हिंदुस्थानांत आल्या. या मोटारींच्या आयातीमध्यें शें. ४१ कानडाहून, शें. ३६ युना. स्टेट्समधून व शें. १३ युना. किंग्डममधून येतात. या आयातीपैकीं बंगाल शें. ३६, मुंबई शें. २९, मद्रास शें. १४ व ब्रह्मदेश शें. १३ इतका हिस्सा वरील प्रांतांनां मिळतो.