विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोरोक्को - उत्तर आफ्रिकेंतील एक स्वतंत्र संस्थान.
क्षे त्र फ ळ व लो क सं ख्या.- अगदीं अलीकडच्या खानेसुमारीवरून पहातां मोरोक्कोचें क्षेत्रफळ २३१५०० चौरस मैल होतें. त्यांपैकीं स्पेनच्या ताब्यांतील टापूचें क्षेत्रफळ १८३६० चौरस मैल आहे. १९२१ सालच्या खानेसुमारींत सुमारें ६० लाख लोकसंख्या होती. तींपैकीं फ्रेंच टापूंत ५० लाख व स्पेन व टँजीअरच्या टापूंत ६ लाख होती. त्यांतील टँजीअर हें आरोग्यस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सप्टेंबर व एप्रिल या दोन महिन्यांतच काय तो पाऊस पडतो.
येथील बहुतेक रहिवाशी शेतीचा धंदा करणारे आहेत. मोरोक्कोंत तीन जातींचें वास्तव्य आहे. त्यांपैकीं बर्बर लोकांची जात फार महत्त्वाची होय. हे लोक डोंगराळ प्रदेशांत राहातात. ह्याच लोकांनीं तीनदां स्पेन जिंकला. व मोरोक्कोचें स्वातंत्र्य कायम ठेवण्याचें श्रेय यांनांच आहे. सपाटीचा प्रदेश बहुतेक अरब लोकांनीं व्यापला आहे. हे लोक ११ व्या १२ व्या शतकांत येथें आले. अरब व बर्बर या दोन जातींच्या मिश्रणानें झालेली मूर नांवाची जात याच सपाट प्रदेशांत राहते. या ठिकाणीं वास्तव्य करणारी आणखी एक यहुदी लोकांची जात आहे. यांच्यापैकीं कांहीं लोक बर्बर व कांहीं स्पॅनिश भाषा बोलतात. स्पॅनिश भाषा बोलणारे यहुदी फार पुढें आलेले असून परकीय व्यापाराचा पुष्कळसा भाग त्यांच्याच हातांत आहे. मोरोक्कोंत बर्बर भाषा बोलतात. या भाषेंपासून निघालेल्या अनेक प्रांतिक भाषाहि प्रचारांत आहेत. सपाटीच्या प्रदेशावर व मध्यमोरोक्कोच्या किनार्यावर अरबी भाषेचाहि प्रचार आहे. स्पॅनिश व फ्रेंच याहि भाषा प्रचारांत आहेत.
द ळ ण व ळ ण.-जगांतील मुख्य बंदरांशीं मोरोक्कोचें आगबोटींनीं दळणवळण आहे. शिवाय ग्रेटब्रिटन फ्रान्स, व स्पेन यांनीं अनुक्रमें जिब्राल्टर, ओरॅन व टॅरिफा हीं टेंजीअरला तारायंत्रानें जोडिलीं आहेत. मोरोक्को येथें आगगाडी प्रथम १९०८ सालीं सुरू करण्यांत आली. अलीकडे स्पेन व फ्रान्स सरकारनें मोरोक्कोमध्यें रेल्वे सुरू करण्यासाठीं खटपट चालविली आहे.
व्या पा र - उ द्यो ग धं दे.-या देशांत कातडीं, सतरंज्या, शस्त्रास्त्रें वगैरे तयार करण्याचे कारखाने आहेत. मोरोक्को संस्थानचा व्यापार मुख्यत: ग्रेटब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, यांच्याशीं चालतो. कातडीं, मेंढ्या, बैल, बकरीं, लोंकर, जव, अंडीं इत्यादि वस्तूंचा निर्गत व्यापार असून कापसाचें सामान, साखर, चहा, मेणबत्त्या, लोखंड, इत्यादि वस्तू आयात व्यापाराच्या होत. मोरोक्को हा शेतकीला उत्तम प्रदेश आहे. येथें खनिज संपत्ति विपुल आहे. तांबें, शिसें, लोखंड, गंधक, सोनें, रुपें, पेट्रोलियम, फास्परस इत्यादि खनिज पदार्थ निरनिराळ्या भागांत सांपडतात. पण अद्यापि तिकडे फारसें लक्ष दिल्याचें आढळत नाहीं. १९२३ सालीं मोरोक्कोमधून आयात व निर्गत अनुक्रमें ३११९००२८, व १०८९५३७० पौंडाच्या मालाची झाली.
शा स न प द्ध ति.-मोरोक्को येथें सुलतानशाही शासनपद्धति अस्तित्वांत आहे. ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही सत्ता सुलतानामध्यें एकवटल्या आहेत. फ्रेंचांनीं मोरोक्को हें संरक्षित संस्थान या नात्यानें आपल्या देखरेखेखालीं आणल्यामुळें ही सुलतानशाही बरीच नियंत्रित झाली आहे. सुलतानाला प्रत्येक बाबतींत फ्रेंच रेसिडेंट जनरलचा सल्ला घ्यावा लागतो परराष्ट्रमंत्र्याचें खातें या रेसिडेंटच्या ताब्यांत असतें व अंतर्गत कारभार याच्या सल्ल्यानें निरनिराळ्या वझिरांच्या कडून चालविला जातो. सैन्याचा अधिपती मात्र रेसिडेंटच असतो.
न्या य व ज मा बं दी.-मोरोक्कोमध्यें युरोपियनांसाठीं स्वतंत्र कायदा लागू आहे. फ्रेंच कोर्टें स्थापन करण्यांत आलीं असून न्यायखात्यावर गव्हर्नरचा व काजींचा अधिकार असतो. खालच्या कोर्टामध्यें काजी हे न्यायाधीश असतात. १९२३ सालीं फ्रेंचांच्या ताब्यांतील मोरोक्कोचें जमाबंदीचें उत्पन्न २९९९१०७०० फ्रँक व २९९८१२६६५ फँक खर्च होता, व कर्ज ७०५६२४००० फ्रँक होतें.
शि क्ष ण.-येथील लोक फारसे शिकलेले नसतात. फक्त कुराण वाचण्यापुरतें शिक्षण पुरषांनां असतें. कित्येक तरुण लोक फेज येथील विद्यालयांत जाऊन मुसुलमानी धर्मशास्त्र, न्याय, व तर्क इत्यादि शास्त्रांचा अभ्यास करतात. या ठिकाणी १८८३ मध्यें छापखाने स्थापण्यांत आले.
अलीकडे फ्रेंचांनीं आपल्या ताब्यांतील टांपूत शिक्षणाच्या बर्याच शाळा काढल्या आहेत, रबट व फेज येथें दोन मुसुलमानी कॉलेजें असून १९२० सालीं अरबी भाषांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठीं एक नवीन कॉलेज निघालें आहे.
इ ति हा स.-जुन्या ग्रंथांवरून असें कळतें कीं, अत्यन्त प्राचीनकाळीं मोरोक्कोच्या किनार्यावर कार्थेंजिअन वसाहतवाले रहात असत. इ. स. नंतर पांचव्या शतकांत हा देश व्हँडॉल लोकांच्या ताब्यांत गेला. व ६१८ च्या सुमारास गॉथ लोकांनीं तो काबीज केला. ६८२ या वर्षीं अरबांनीं या देशावर स्वारी केली. ७१० त त्यांनी टँजीअर काबीज केलें. पण मोरोक्को येथील बर्बरांनीं अरबसत्तेविरुद्ध बंड करून ७३९ त मैसारा याला आपला राजा नेमिलें. मोरोक्कोचा खरा इतिहास ७८८ या वर्षापासून सुरू होतो. या वेळीं इद्रिस (हा महंमदाच्या वंशजापैकीं एक होता) व त्याचा मुलगा दुसरा इद्रिस यांनीं फेज शहर वसवून इस्लामचा प्रसार या भागांत केला व बर्बरांनां एकत्र करून राज्य स्थापिलें. यांच्या नंतर मिकनाझा व मध्रावा हे वंश या ठिकाणीं राज्य करूं लागले. १०६१ त मुराबटी वंशानें त्यांची जागा घेतली. ११४९ मध्यें अबरल मुमीन या धार्मिक पुढार्यानें या वंशाचा उच्छेद करून मुबाहादीं वंशाची स्थापना केली. १२१७ आणि १२६९ सालीं ह्या वंशाचा र्हास होऊन बेनी मारीन वंशानें मोरोक्कोवर आपलें राज्य स्थापिलें. या वंशांतील नांव घेण्यासारखा राजा म्हणजे दुसरा याकूब हा होय. १४७१ सालीं तिसरा सैय्यद यानें या वंशापासून राज्य हिसकावून घेतलें व वात्तासी वंशाची स्थापना केली. याचा मुलगा आठवा महंमद याच्यापासून पोर्तुगीजांनीं बराच मुलूख काबीज केला. १५५० पर्यंत या वंशानें कसें तरी राज्य चालविलें.
महंमदाच्या ‘सादी’ नांवाच्या वंशजांनीं वात्तासी घराण्यापैकीं आठव्या महंमदाच्या वंशजांचा पराभव केला. आणि सादी घराण्यांतील एका सरदाराचा मुलगा नववा महंमद यानें आपल्या बळावर मोरोक्कोचें सम्राज्य जिंकलें व सादी वंशाची स्थापना केली. नवव्या महंमदाच्या मरणानंतर गादीचा वारसा त्याच्या भावाचा मुलगा चवथा अबद्दला याच्याकडे गेला. १५७८ सालीं चवथा महंमद हा गादीवर बसला. यानें आपण खलीफ आहोंत असें जाहीर केलें. इलिझाबेथ राणीशीं व इतर यूरोपीय राजांशीं यानें भित्रत्वाचें नातें ठेवलें होतें. कांहीं काळानंतर फिलाली वंशाच्या ताब्यांत मोरोक्कोचें राज्य आलें. १८३० सालीं अलजीरियाच्या फाळणी संबंधानें मोरोक्को व फ्रान्स यांमध्यें युद्ध उपस्थित झालें व त्यामुळें मूर लोकांनां ट्रेमसेनवरील सर्व हक्क सोडून देणें भाग पडलें. १८४४ सालीं फ्रान्सशीं पुन्हां युद्ध झालें. १८५१ सालीं फ्रान्सनें सॅलीवर तोफा डागल्या व आपल्या मताप्रमाणें युद्धाचा निकाल लावून घेतला. १८५९ सालीं स्पेननें टेटुआन हें शहर आपल्या ताब्यांत घेतलें. १९०४ सालीं अबदुल अझीझच्या कारकीर्दींत इग्लंड व फ्रान्स यांचा करार होऊन ज्या सुधारणा अबदुल अझीझनें आपल्या राज्यांत घडवून आणाव्यांत अशा सुधारणांची यादी ठरविण्यांत आली. पण १९०६ सालीं जर्मनीच्या आग्रहामुळें तींत बर्याच सुधारणा करण्यांत आल्या व तो करार सुलताननें मान्य केला.
कॅसाब्लँका येथील बंदर सुधारून बांधण्याचें काम याच वेळीं जोमांत आलें होतें. या जागेजवळच मुसुलमानांचें एक कबरस्थान होतें. हें कबरस्थान दूषित करण्याची यूरोपीयनांची इच्छा आहे अशी येथील शाविया लोकांची समजूत होऊन त्यांनीं यूरोपियन मजूर कापून काढण्यास सुरुवात केली. ही बातमी फ्रेंच सरकारच्या कानीं जातांच फ्रेंच सैन्यानें कॅसाब्लँकावर तोफा डागल्या व तें शहर काबीज केलें. १९०८ सालीं अझीझला पदच्युत करण्यांत येऊन मुलाई हफीदला राज्यपद देण्यांत आलें. मुलाईनें अलजीसीराज येथील करार पाळण्याचें कबूल केल्यानंतर स्पेन व फ्रान्सनें त्याच्या राजेपणाला मान्यता दिली. १९०९ सालीं फ्रान्स व जर्मनी यांच्यांत करारमदार होऊन मोरोक्कोमधील जर्मनीच्या आर्थिक हिताच्या आड फ्रान्सनें येऊं नये व फ्रान्सच्या त्याच देशांतील राजकीय हितसंरक्षणाच्या आड जर्मनीनें येऊं नये असें उभयपक्षीं ठरलें. तथापि त्याच वर्षीं रीफ जातीच्या लोकांनीं मेलिला येथील स्पेनच्या किल्ल्यानजीकचे कांहीं यूरोपियन मजूर ठार केले. याचा सूड उगविण्याकरितां स्पेननें ५०००० सैन्य पाठवून रीफांचा मोड केला.
१९११ सालीं अगदीर प्रकरण उपस्थित झालें. याचें कारण मुख्यत: मुलाई हफीद याचें फ्रेंचांसंबंधीं फाजील परावलंबित्व व एलग्लावी याचा जुलूम हें होतें. त्यामुळें १९१० सालीं फेजच्या आसपासच्या टोळ्यांनीं बंड केलें. पण पुढें फ्रेंच सैन्याच्या मदतीनें तें मोडण्यांत येऊन फ्रेंचांनीं फेज आपल्या ताब्यांत घेतलें. याचा स्पेन व जर्मनी या राष्ट्रांनीं सक्रिय इनकार केला. स्पेननें एल कास्त्र आणि लरैश हे मुलूख ताब्यांत घेतले. जर्मनीनें अगदीर येथें आपण लढाऊ जहाज पाठवणार असल्याचें फ्रेंचांनां कळविलें. त्यामुळें प्रकरण हातघाईवर येऊन लढाई उपस्थित होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. पण इंग्लंडनें मध्यें पडून काँगोचा प्रदेश फ्रान्सनें जर्मनीला द्यावा व जर्मनीनें मोरोक्कोवरील फ्रान्सचें स्वामित्व कबूल करावें असें ठरवून युद्धाचा प्रसंग टाळला. फ्रान्सनें इंग्लंडच्या मध्यस्थीनें स्पेनशींहि तह केला. या तहानें स्पेनला मोरोक्कोमध्यें कांहीं जादा प्रदेश मिळाला. १९११-१२ सालीं निरनिराळ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींचीं खलबतें होऊन टँजीअर प्रदेश सर्वांनां खुला असावा असें ठरविण्यांत आलें. १९१२ सालीं मुलाई हफीदनें फ्रेंचांचें मोरोक्कोवरील स्वामित्व कबूल केलें व अशा रीतीनें मोरोक्को हें फ्रेंचांच्या तब्यांतील संरक्षित संस्थान बनलें. लिओते याला रेसिडेंट जनरल नेमण्यांत आलें. अशा रीनीनें मोरोक्कोमध्यें कशीबशी शांतता प्रस्थापित झाली तथापि मधून मधून दंगेधोपे माजतच होते. १९१२ सालीं एल हिबा नांवाच्या एका बंडखोरानें बंडाचें निशाण उभारलें पण त्याचा लवकरच मोड झाला. त्याच सालीं मुलाईहफीदनें राज्यपदाचा त्याग करून आपला भाऊ मुलाई यूसेफ यास गादीवर बसविलें. पुढें आक्टोबर महिन्यांत लियोतेनें अगदीर काबीज केलें. शिवाय मोरोक्कोमधील संस्थानिकांमध्येंहि झगडे चालले होतेच, पण ते १९१३ सालच्या अखेर पर्यंत मिटवण्यांत आले. पुढें फ्रेंचांनीं अल्जीरियांतील टाझा व झयनच्या मुलुखांतील खेनीफ्लाचा किल्ला हीं महवात्त्वाचीं ठाणीं आपल्या ताब्यांत घेतलीं, पण याच सुमारास महायुद्ध युरू झाल्यामुळें व फ्रेंचांनां मोरोक्कोमधील बरेंच सैन्य काढणें भाग पडल्यामुळें हीं दोन ठाणीं परत मिळविण्याबद्दल तेथील लोकांनीं बंड केलें. पण फ्रेंचांचें जें थोडेसें सैन्य होतें त्यानें हीं ठाणीं हातचीं जाऊं दिलीं नाहींत.
यानंतर १९२० सालापर्यंत अनेक बंडें झालीं पण तीं यशस्वी रीतीनें मोडण्यांत आलीं. बेनी वाघ्रेन व मिडल अटलास हे जिल्हे सोडून इतर सर्व भागांत फ्रेंचांची सत्ता प्रस्थापित झाली. स्पेनच्या ताब्यांत जो मोरक्कोचा मुलूख होता त्यांतहि वरील प्रकारचे दंगेधोपे होते होतेच पण स्पेननेंहि आपल्या सैन्याच्या बळावर ते सर्व मिटवून टाकले. मोरोक्कोंतील एक देशभक्त अबदुल करीम यानें आपला देश स्वतंत्र करण्याकरितां गेल्या सालापासून फ्रान्स व स्पेन या दोन्ही राष्ट्रांशीं युद्ध चालविलें आहे व त्यांनां बहुतेक नामोहरम केलें आहे; पण अद्याप त्याला यश मिळेलसें दिसत नाहीं.