विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोर्ले, जॉन (१८३८-१९२३) एक इंग्लिश मुत्सद्दी व ग्रंथकार. १८५९ सालीं विद्याभ्यास संपल्यानंतर वाङ्मयसेवा करण्याचा यानें निश्चय केला व त्या निमित्तानें तो लंडन येथें आला. तेथें येतांच ‘लिटररी गॅझेट’ च्या संपादकाची जागा त्याला मिळाली. पण लिटररी गॅझेट हें लवकरच बंद पडल्यामुळें त्यानें कांहीं काळपर्यंत निरनिराळ्या वृत्तपत्रांनां व मासिकांनां लेख पाठविण्यास सुरुवात केली. लवकरच उत्तम लेखक, या नात्यानें त्याची प्रसिद्धि झाली. तत्त्वज्ञानाचाहि त्यानें मार्मिक अभ्यास केला होता. तत्त्वज्ञानापैकीं पॉझिटिव्हिझम नांवाच्या पंथाच्या तत्त्वज्ञानाकडे त्याचा अधिक कल होता. १८६८-७० च्या दरम्यान ‘मॉर्निंग स्टार’ नांवाच्या दैनिकाचा तो संपादक होता. याशिवाय १८६७-१८८३ पर्यंत त्यानें ‘फॉर्ट नाइटली रिव्ह्यू’ च्या संपादचाचेंहि काम केलें. मॅकमिलन कंपनीच्या ‘मेन ऑफ लेटर्स सीरिज’ चाहि तो मुख्य संपादक होता व या मालेंतील त्याचें बर्कचें चरित्र फार सुंदर आहे. याशिवाय याच वेळीं तो ‘पालमाल गॅझेट’ चाहि संपादक होताच. पार्लमेंटमध्यें प्रसिद्धीस येण्याला जे वक्तृत्वादि गुण लागतात ते मोर्लेमध्यें नव्हते, तथापि त्याची विद्वत्तापूर्ण व उत्कृष्ट भाषा व विचारसरणी या गुणांमुळें त्यानें पार्लमेंटमध्यें नांव मिळविलें, १८८६ सालीं त्याला आयर्लंडच्या सेक्रेटरीची महत्त्वाची जागा मिळाली. आयरिश होमरूलचळवळीविषयीं त्याला सहनुभूति होती व आयरिश कायदेकौन्सिल ब्रिटिश कायदेकौन्सिलापासून स्वतंत्र करण्यासाठीं त्यानें ग्लॅडस्टनचें मत वळविलें पण पुढें त्याच्या पक्षानें त्याच्यावर वजन पाडून त्याला हें मत बदलण्यास लावलें. १८८६ सालीं ग्लॅडस्टन पक्ष अधिकारच्युत झाल्यानंतर १८९२ सालीं मोर्ले पुन्हां अधिकारारूढ होईपावेतों मध्यंतरीच्या काळांत त्यानें वाङ्मयाकडे लक्ष लाविलें. १८९२ सालीं तो पुन्हां आयर्लंडचा सेक्रेटरी झाला. १८९८ सालीं पुन्हां तो वाङ्मयक्षेत्रांत पडला. यापूर्वी त्यानें वोल्टेयर (१८७२), रूसो (१८७३), डिडरो अँड दि एनसायक्लोपीडिस्ट्स (१८७८), बर्क (१८७९) व वालपोल (१८८९) इत्यादि महत्त्वाचा पुस्तकें लिहिलीं होतीं. १९०० सालीं त्यानें ‘लाईफ ऑफ ऑलीव्हर क्रामवेल’ हा ग्रंथ लिहिला. १८८१ सालीं त्याचा ‘लाईफ ऑफ कॉबडेन’ हा उत्कृष्ट ग्रंथ बाहेर पडला. १९०३ सालीं त्यानें ‘लाईफ ऑफ ग्लॅडस्टन’ हा अतिशय प्रसिद्ध चरित्रविषयक ग्रंथ लिहिला. १९०२ सालीं त्याला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ चा किताब मिळाला, व १९०३ सालीं कार्नेगीनें त्याला लॉर्ड अॅक्टनचा मोठा ग्रंथसंग्रह नजर केला. पुढें मोर्ले यानें हा ग्रंथसंग्रह केंब्रिज विश्वविद्यालयाला अर्पण केला. १९०५ सालीं मोर्ले हा हिंदुस्थानचा स्टेटसेक्रेटरी झाला. या अमदानींत हिंदुस्थानांत अशांतता फारच बोकाळली, तेव्हां व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांच्या मदतीनें त्यानें हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत सुधारणा करून हिंदी राष्ट्रीय चळवळ बंद करण्याचा प्रयत्न केला; पण स्टेटसेक्रेटरी या नात्यानें त्याची कामगिरी हिंदुस्थानांतील जनतेला पसंत पडली नाहीं. १९०८ सालीं त्याला लॉर्ड करण्यांत आलें. १९१० सालानंतर त्यानें राजकारणांतून अंग काढून घेतल्यासारखें केलें तथापि तो प्रधानमंडळामध्यें लॉर्ड प्रेसिडेंटच्या जागेवर होता. जॉर्ज बादशहा हिंदुस्थानामध्यें आले त्यावेळीं त्यांच्या मागें साम्राज्याचीं व्यवस्था पहाण्याकरितां जें मंडळ नेमण्यांत आलें होतें त्यामध्यें हा एक होता. १९१३-१४ सालीं आयरिश होमरूल बिलावरील वादविवादांत यानें प्रामुख्यानें भाग घेतला. महायुद्धाच्या अमदानींत यानें राजकारणांतून एकएकीं आपलें अंग काढून घेतलें. त्यानंतर त्यानें १९१७ मध्यें रिकलेक्शन्स’ या नांवाखालीं आपल्या आठवणीचे दोन खंड प्रसिद्ध केले.