विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोर्स, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ (१७९१-१८७२) एक विद्युततारायंत्राचा शोधक. याचा जन्म अमेरिकेंतील मॅसॅच्युसेट्स परगण्यांतील चार्लस्टाऊन या शहरीं झाला. तो १८१० सालीं यूल कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडला. कॉलेजमध्यें असतांनाच त्याचा कल विद्युच्छास्त्राकडे विशेष होता. १८११ सालीं तो इंग्लंडास गेल्यावर कांहीं दिवस चितार्याचा धंदा करीत होता पण १८२९ सालीं पुन्हां विद्युच्छास्त्राचा अभ्यास करण्यास परत येत असतांना सुली नांवाच्या जहाजावर एक तारायंत्र तयार करून त्याच्या साहाय्यानें दूर अंतरावर संदेश पाठवितां येतात हें त्यानें दाखविलें. याच यंत्रांत त्यानें सुधारणा करून १८३७ च्या सुमारास तें बरेंच पूर्णत्वास नेलें. ह्या शोधाचें पेटंट त्यास लवकर मिळालें नाहीं. मात्र १८४३ सालीं एक ठराव पास होऊन बोल्टिमोर त वॉशिंग्टनपर्यंत एक तारायंत्र उभारलें जाऊन त्याचा उपयोग प्रथमत: २४ मे १८४४ रोजीं केला गेला. पुढें या यंत्राचा प्रसार सर्व देशांतून होऊन निरनिराळ्या देशांच्या प्रतिनिधींकडून ह्या त्याच्या युक्तीच्या उपयोगाचा मोबदला म्हणून चार लक्ष फ्रँक रक्कम त्यास मिळाली.