विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोलीयर (१६२२-१६७३)-एक सुप्रसिद्ध फ्रेंच नाटककार याचें मूळचें नांव ज्यें बॅप्टिस्ट पोकेलिन असें असून मोलीयर हें याचें टोपण नांव आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यानें कायद्याचा अभ्यास केला. पुढें तो नाटकाच्या धंद्यांत शिरला. त्यानें ‘ला इलस्त्रॅतिएत्र’ नांवाची एक स्वत:ची नाटककंपनी काढली. तो खर्चिक असल्यानें त्याला बरेंच कर्ज झालें होतें व कर्जाची फेड करतां येईना. म्हणून त्याला कांहीं दिवस तुरुंगवास भोगावा लागला. पुढें तुरुंगांतून सुटून आल्यावर वयाच्या छत्तिसाव्या वर्षांपर्यंत मोलियर आपल्या नाटकमंडळीबरोबर फिरत राहिला. तो स्वत:चीं नाटकें या नाटककंपनीसाठीं लिहीत असे व त्यांत स्वत: कामहि करीत असे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यानें आपली कंपनी उत्कृष्ट नांवारूपास आणिली व राजाश्रयहि मिळविला. त्यानें निकोमेद,ल प्रेशियस रिडिक्यूल,ल मिसँथ्रोप, मेडियन मालग्रालुइ,ल मारिआज फोर्स, तार्तूफ, इत्यादि अनेक नाटकें व फार्स लिहिले. सामाजिक विषयांवर हृदयंगम अशीं विनोदी नाटकें लिहिण्यांत तो श्रेष्ठ आहे. त्याचा विनोद फारच बहारीचा असतो. त्याचें निरीक्षण फार सूक्ष्म होतें. फ्रान्समध्यें त्याच्या योग्यतेचा विनोदी नाटककार अद्यापपर्यंत झाला नाहीं म्हटलें तरी चालेल व सार्या यूरोपमध्यें देखील शेक्सपीयरच्या खालोखाल याचाच नंबर लागतो.