विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोह - हें झाड हिंदुस्थानांत बहुतेक ठिकाणीं होतें. याला संकृत नांव ‘मधुक’ असें आहे. याचीं फुलें व बिया दोन्हीं उपयोगी आहेत. एका झाडाला दोन ते चार मण फुलें येतात. ताजीं फुलें तशींच व वाळलेलीं शिजवून इतर खाण्याच्या पदार्थांबरोबर खातात. वाळलेल्या फुलांचें पीठ करून त्याची भाकरी करतात. फुलांची साखर व दारू करतात. या दारूला उंदरासारखी घाण येते. एक हंड्रेडवेट फुलांपासून ७.६ ग्यालन दारू होते. बियांचें तेल काढतात. तें थिजलें म्हणजे लोण्यासारखा गोळा तयार होतो. तो खाण्याला चांगला लागतो. त्याची तुपांत भेसळ करतात. साबण करण्याच्या कामीहि त्याचा उपयोग होतो. अलीकडे परदेशांत याची निर्गत बरीच होऊं लागली आहे.