विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोहमंद प्रदेश - वायव्य सरहद्द, पेशावर जिल्ह्याच्या वायव्येकडील प्रदेश. क्षेत्रफळ १२०० चौरस मैल. याच्या पूर्वेस स्वात व उत्तरेस अंभार या नद्या; पश्चिमेस अफगाणिस्तानचा कुन्नर प्रदेश; दक्षिणेस काबूल नदीचीं जलविभाजक क्षेत्रें. या प्रदेशांत मोहमंद नांवाचे लोक रहातात. यांच्यापैकीं जे मोहमंद लोक अफगाणिस्तानच्या पश्चिम सरहद्दीवर राहातात ते अफगाणिस्तानच्या अमीराच्या सत्तेखालीं आहेत. आणि जे अफगाणिस्तान व पेशावरच्या दरम्यानच्या टापूंत रहातात त्यांच्यावर पेशावरच्या जिल्ह्याधिकार्याचा अंमल आहे. या टापूंतील मोहमंड लोकांचें दुसरें नांव डोकरा (ज्यांचीं दोन घरें आहेत असे लोक) हें आहे. या टापूंत उन्हाळ्यांत फार उष्णता असते व त्या दिवसांत हे लोक येथून दुसर्या ठिकाणीं रहावयास जातात म्हणून यांनां डोकरा असें म्हणतात. या प्रदेशांतील उष्ण व रोगट हवामानामुळें येथील लोक शेजारच्या आफ्रिडी व शिनवारी लोकांपेक्षां शारीरिकदृष्ट्या कमी दर्जाचे आहेत. यांचा युसफझाई पठाणांशीं निकट संबंध आहे.
१८ व्या शतकापर्यंत ह्या लोकांवर अकबर, शहाजहान, नादीरशहा व अहंमदशहा दुराणी यांचें वर्चस्व होतें. नंतर इ. स. १७९१ पासून इ. स. १८८० पर्यंतचा यांचा इतिहास यादवी व रक्तपात यानींच भरला आहे. शेवटीं इ. स. १८८० मध्यें इंग्रज लोकांनीं कारभारांत मध्यस्थी करून यांच्यांतील अकबरखान नामक इसमास यांचा अधिपति नेमिलें. पण त्या लोकांवर याचें जितकें वजन राहावें तितकें राहूं न शकल्यामुळें यानें तें अधिकाराचें पद सोडलें व काबूलमध्यें वस्ती केली. तेव्हांपासून हा प्रदेश इंग्रजांच्या अंमलाखालीं आला. यांच्या पहिल्या अमदानींत मोहमंद लोकांनीं या लोकांनां बराच त्रास दिला. पण नंतर लवकरच मोहमंद लोक निवळले. आतां हे लोक सैन्यांत नोकरी करतात.