विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
म्लेच्छ-किंवा म्लेंछ. प्राचीन भारतवर्षांत पश्चिम विभागांतील पुंडांची अथवा नैतिक बंधनें नसलेल्या लोकांची एक जात. यवनांनांहि म्लेच्छ म्हटलें आहे कर्न (बृहत्संहितेच्या प्रतींत) म्लेच्छ शब्दाचें भाषांतर एकदां परकी लोक व एकदां रानटी लोक असें करतो. अल्बेरूणी ‘म्लेच्छ’ म्हणजे ‘अरब लोक’ असें म्हणतो. विष्णुपुराणांत असा उल्लेख आहे कीं, सगरानें यवनांनां आपल्या सर्व डोक्याची व शकांनां डोक्याच्या वरच्या भागाची हजामत करावयास लावलें; या राजाच्या आज्ञेवरून पारद लोक आपले केंस लांब ठेवीत व पहलव लोक आपल्या दाढ्या वाढवीत असत. त्यानें यांचें व इतर क्षत्रिय जातींचें वेदाध्ययन व अग्नीला हवि देणें या ठराविक गोष्टी बंद केल्या; व येणेंप्रमाणें धार्मिक संस्कारांपासून विभक्त केल्यामुळें व ब्राह्मणांनीं त्याग केल्यामुळें या निरनिराळ्या जाती म्लेच्छ झाल्या. (विष्णु पु. अंश ४ अ. ३). स्कंदगुप्ताच्या जुनागढ येथील शिलालेखांत म्लेच्छांचा निर्देश केलेला आहे.
बायबलांत मोलोकिअन म्हणून एका जातीच्या लोकांचें नांव येतें, तेच हे म्लेच्छ असावेत आणि म्लेच्छ हे असुरांपैकीं असावेत असें कांहीं संशोधक समजतात.