विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यवन - एका जातीचे लोक. यवनांनां म्लेच्छ असेंहि म्हणतात. बृहत्संहितेंत यवनांचा उल्लेख आहे. अल्बेरूणी म्हणतो ‘यवन म्हणजे ग्रीक लोक’ होत. यवन या शब्दाच्या व्युत्पत्तीचें स्पष्टीकरण करतांना मॅकक्रिंडल म्हणतो कीं, अयोनियन लोकांचा संस्थापक आयन या नांवाचें हिब्रूंत यवन असें रूप होतें व याच नांवानें बायबलमध्यें ग्रीस देशाला संबोधिलें आहे. जवनचें संस्कृत रूप यवन असें आहे. हिंदु ग्रंथांत यवन हें नांव अयोनियन लोक व विशेषत: परकी लोक यांनां लावलें आहे. अशोकाच्य तेराव्या शतकांत ‘योन’ असा यवनांचा उल्लेख आहे; व सीरियाच्या दुसर्या अँटिओकसला योन म्हणजे यवन राजा म्हटलें आहे. नाशिकच्या एका शिलालेखांत यवन लोकांचा उल्लेख आहे; व रुद्रदामनच्या जुनागड येथील लेखांत तुषस्फ नांवाच्या राजाचें अशोकाचा समकालीन म्हणून वर्णन आहे.