विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यशवंतराव होळकर - इंदूर संस्थानचा यशवंतराव होळकर (पहिला) याची १८०१ पर्यंतची माहिती ‘इंदूर’ या लेखामध्यें (ज्ञा. को. वि. ८) आली आहे. त्या पुढची हकीकत या ठिकाणीं देण्यांत येत आहे. यशवंतराव हा खानदेशांत तळोदें तालुक्यांतील कुकुरमुंडें गांवच्या भिल्लराजाच्या आश्रयास असतां, त्याला विठोजीच्या वधाची हकीकत समजली. त्याचा गुरु जवळच रहात होता, त्यानें यशवंतरावास लंका नांवाची घोडी दिली. ही यशवंतरावाची फार आवडती होती. मध्यंतरीं यशवंतरावानें गुरूच्या सांगण्यावरून संधि साधून इंदूर गांठलें व डुडरनेकच्या मदतीनें गादी मिळविली. प्रथम पुतण्या खंडेराव याच्या नांवानें कारभार करून, शेवटीं कांहीं दिवसांनीं त्यानें स्वत:च सर्व सत्ता बळकाविली. नंतर थोड्याच दिवसांनीं फौजेला पगार देण्यास पैका नसल्यानें यानें शिंदे व पेशवे यांच्या प्रांतांत लुटालूट सुरू केली. शिंद्याचा सेनापति हेसिंग याचा उज्जनीस यशवंतरावानें पराभव केला; परंतु दौलतरावानें इंदुरावर स्वारी करून तेथें यशवंतरावाला नामोहरम केलें. तेव्हां त्यानें राजपुतान्यांत जाऊन व तो लुटून खानदेशांत जाळपोळ केली व पुणें गांठलें. पुण्यास शिंद्याचा सेनापति सदाशिव भाऊ याचा यशवंतरावानें २५ आक्टोबर १८०२ रोजीं पराभव केल्यानें पेशवे इंग्रजांकडे निघून गेले व त्यांनीं वसईचा नामुष्कीचा तह केला. इकडे यशवंतरावानें पुणें जाळून व लुटून फस्त केलें व भावाचा सूड उगविला. पुढें शिंदे-इंग्रज यांचें युद्ध झालें, त्यांत यशवंतराव जर स्वस्थ न बसता व शिंद्यास मिळता तर इतिहास निराळा बनला असता. परंतु तो अखेरपर्यंत स्वस्थ बसला. एवढेंच नव्हे तर शिंदे भोंसल्यांनां आपण मदत करू असें वचन देऊनहि तें त्यानें पाळलें नाहीं (१८०३). शिंदा हतप्रभ झाल्यावर मग यशवंतरावाचे डोळे उघडले व त्यानें इंग्रजांशीं लढण्यास प्रारंभ केला. तो स्वत: उत्तम सेनापति असून मोठा धाडसी होता. प्रथम तर त्यानें कर्नल मॉनसन याचा पराभव करून त्यास पळावयास लाविलें. परंतु पुढें त्याच्यानें इंग्रजांपुढें टिकाव धरवला नाहीं व इतर मराठे सरदारांनीं त्याला मदत केली नाहीं. फत्तेगड, डीग वगैरे लढायांत त्याची पिच्छेहाट झाल्यानें तो भरतपूरच्या जाटाकडे गेला. त्या दोघांनीं इंग्रजांनां पिटाळून लावलें. परंतु इंग्रजांनीं जाटास फोडलें, तेव्हां यशवंतराव पंजाबांत रणजितसिंगाकडे गेला.यावेळीं त्यानें शिंदे, भोंसले वगैरे मराठे सरदारांनां पुन्हां मराठी साम्राज्यासाठीं एक होऊन इंग्रजांविरुद्ध उभे राहण्यासाठीं पूर्वीप्रमाणें पत्रें लिहिलीं, परंतु त्यांचा आतां कांहीं उपयोग नव्हता. त्याच्यामागें लॉर्ड लेक हा सारखा लागला. तेव्हां अखेरीस यशवंतराव त्याच्या स्वाधीन झाला. इंग्रजांनीं यशवंतरावाच्या हवालीं इंदूरचें राज्य करून कांहीं प्रांत खालसा केला. इंदुरास आल्यावर यशवंतरावानें सैन्याची सुधारणा केली. तींत निरुपयोगी फौज काढून टाकल्यानें तिनें खंडेरावास पुढें करून बंड केलें, तें यानें मोडून ११ वर्षांच्या खंडेरावास विष देऊन ठार केलें. त्यानंतर काशीराव व त्याची गरोदर बायको या दोघांनांहि विषप्रयोग केला. पुढें त्यानें युद्धसामुग्रीची तयारी जारीनें चालविली. तो स्वत:तोफा ओतवीत असे; यावेळीं त्याला अति श्रमामुळें दारूचें व्यसन लागलें. त्यांत त्याच्या तापट स्वभावामुळें त्याचा बुद्धिभ्रंशु होत होत त्यास पुरें वेड लागलें (१८०८). या वेडावर पुष्कळ उपचार केले परंतु कांहीं उपयोग न होतां अखेरीस बंबुरा गांवीं त्याचा अंत झाला (२० आक्टो. १८११). त्याच्या तुळसाबाई नांवाच्या नाटकशाळेनें त्याच्या वेडांत व पुढें बरेच दिवस राज्य चालविलें.
ग्रँटडफनें प्रत्यक्ष पाहून यशवंतरावाचें वर्णन पुढीलप्रमाणें दिलें आहे:-बांधा मध्यम परंतु बळकट व चपळ, एका डोळ्यानें अंध परंतु पाणीदार चेहेरा, विलक्षण हिंमतवान व धाडशी, कसल्याहि पराजयानें धैर्य न खचणारा, विद्वान, मराठी व फारशी वाचणारा व लिहिणारा, विनोदी, उधळ्या, क्रूर, निर्दय व जुलमी. [ डफ; गोडबोल-एतद्देशीय संस्थानें; पेशव्यांची बखर ].