प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

यहुदी - या लोकांच्या धार्मिक इतिहासाची व जुन्या वाङ्‌मयाची माहिती “इस्त्रायल राष्ट्रधर्म” (ज्ञा. को. वि. ८) व “सेमेटिक संस्कृतीची जगव्द्यापकता” (ज्ञानकोश. वि. ४) या लेखांत दिली असून, हिंदुस्थानांत रहाणार्‍या या जातीला बेनेइस्त्रायल हें नांव असल्यानें त्या जातीबद्दलची सर्वसामान्य माहिती “बेनेइस्त्रायल” या नांवाखालीं दिली आहे (ज्ञा. को. वि. १८). येथें फक्त यांचा थोडक्यांत राजकीय इतिहास व भूप्रदेशावरील प्रसार सांगावयाचा आहे.

यांची जगांतील एकंदर लोकसंख्या १२२०५००० आहे. पृथ्वीवरील निरनिराळ्या देशांत ही संख्या कसकशी विभागली आहे तें वि. ४ च्या परिशिष्टांत दिलें आहे. यांनां ज्यू (यहुदी), हिब्रू व इस्त्रायल अशीं नांवें असून हे प्राचीन काळीं पॅलेस्टाइनमध्यें रहात असत. हा देश त्यावेळीं व्यापारासाठीं व कृषीसाठीं प्रसिद्ध असल्यानें निरनिराळ्या जातींचे लोक निरनिराळ्या वेळीं तेथें येऊन स्थाईक झालेल्या लोकांच्या मिश्रणापासून या लोकांची उत्पत्ति झाली असें म्हणतात. त्याकाळीं जो लष्करी सरदार शूर असेल त्यास ते राजा निवडीत; अशा राजांपैकीं गिडीयन याचा उल्लेख प्रथम आढळतो. ज्यूडा प्रांतांतील रहाणारे म्हणून यांनां ज्यू म्हणतात. हे लोक जेकब (इस्त्रायल) च्या मुलापासून उत्पन्न झाले. यांच्या देवाचें नांव याहवे. ख्रिस्तपूर्व. ११ व्या शतकाच्या अखेरीस यांच्या निरनिराळ्या जातींचा एक गट निर्माण झाला. यहुद्यांची संस्कृति फार प्राचीन काळापासून पुढें आली होती. परंतु पुढें हॅड्रियननें जेरुसलेम उध्वस्त केलें, तेव्हां या लोकांच्या संस्कृतीचा संकोच झाला. या संस्कृतीस दंतकथा व अनुभव यांचा मुख्य आधार आहे, आणि त्यामुळें हे लोक भविष्यकाळच्या आशेनें व भूतकाळच्या आठवणीनें सहनशील बनले आहेत.

मोझेसनें या लोकांचें एकीकरण केलें व र्इजिप्तमधील गुलामगिरींतून याहवेनें या जातीची सुटका केली. याहवे म्हणजे सतत टिकणारा. यहुद्यांत जे प्रेषित पुढें निपजले ते स्वदेशाभिमानी व याहवेबद्दल निष्ठावान होते; आठव्या शतकांत त्यांनां फार मान होता. हद्दपारीनंतर यहुद्यांनां फार त्रास सोसावा लागला, त्यामुळें त्यांनां जगाचा बराच अनुभवहि आला. त्यांनीं आपले आचारविचार परदेशांतहि कडकपणें राखले त्यामुळें पुन्हां जेरुसलेम येथें जेव्हां ते परत आले तेव्हां त्यांच्यांत फाटाफूट झालेली दिसून आली नाहीं. अलेक्झांडरनें आशियाखंड पादाक्रांत केल्यापासून रोमन साम्राज्यानें जेरुसलेम उध्वस्त करीपर्यंतच्या (इ. स. ७०) चारशें वर्षांच्या काळांत यहुद्यांचा ग्रीकांशीं सहवास होऊन ग्रीकसंस्कृतीचा त्यांच्यावर बराच पगडा बसला. टॉलेमीच्या (ख्रि. पू. ३०१) काळीं पॅलेस्टाईन त्याच्या अंमलाखालीं असल्यानें यहुदी हे ईजिप्त व सीरिया यांमधील लढायांत भाग घेत असत. कर्मठ लोकांनां टॉलेमीचा अंमल पसंत होता, पण बाकीच्यांनां सेल्युसिडची सत्ता आवडली. धर्मच्छळामुळें पळालेल्या लोकांचा पुढारी जुडास मॅकाबी म्हणून होता. त्याच्यावेळीं जुडिया प्रांतांत यहुदीसंस्कृति पसरली व यहुद्यांनां सरदार्‍या वगैरे मिळाल्या. जुडासनंतर त्याचा भाऊ सायमन हा यहुद्यांचा पुढारी झाला; त्याचा पुत्र जॉन हैर्कनस यानें जेरुसलेम, अलेक्झांड्रिया, ईजिप्त व सायप्रस या ठिकाणच्या यहुद्यांनां सुस्थितीस आणलें. हेरॉड दि ग्रेटच्या वेळीं यहुदी लोक रोमच्या सत्तेखालीं आले (ख्रि. पू. ४). पुढें हेरॉडचें राज्य त्याच्या मुलांमध्यें वांटलें गेलें; परंतु त्यांच्यांत भांडणें लागल्यानें रोमच्या आगस्टसनें त्यांच्या राज्यावर आपला एक प्रतिनिधि नेमला. रोमन कायद्याप्रमाणें यहुद्यांची खानेसुमारी झाली परंतु त्यामुळें त्यांनीं बंड केलें; कारण यहुदी कायदा खानेसुमारीच्या विरुद्ध होता. बंडांत यहुद्यांचा पराभव होऊन जेरुसलेम रोमनांच्या हातीं गेलें. मात्र रोमन बादशहा क्लॉडियस यानें यहुद्यांनां नागरिकत्वाचे हक्क दिले; तरी पण यहुदी व रोमन या दोघांत वैर माजून बराच रक्तपात झाला आणि यहुद्यांचा पुष्कळ छळ झाला. पुढें व्हेसपेशियन यानें यहुद्यांचीं सर्व पवित्र ठिकाणें काबीज करून देवळें उध्वस्त केलीं, त्यामुळें उपाध्यायवर्गहि रोडावला. इ. स. १३२ मध्यें पॅलेस्टाईनच्या यहुद्यांनीं पुन्हां बंड केलें, तेव्हां हॅड्रियननें बंड मोडून जेरुसलेमच्या जागीं एलियाकॅपिटोलिना गांव वसवून याहवेच्या देवळाच्या जागीं ज्युपिटरचें देऊळ बांधून यहुद्यांनां तेथें येण्याची बंदी केली (जेरुसलेम व पॅलेस्टाईन पहा). यहुद्यांत मिसळण्याची ख्रिस्ती लोकांनां बंदी असे. यानंतर अ‍ॅन्टोनियस पायस यानें यहुद्यांनां पुष्कळ सवलती दिल्या व जस्टिनियन (५२७-६५) यानें त्यांच्या धर्मसंस्थांकडे बरेंच लक्ष्य पुरविलें. यावेळीं बाबिलोनियांतील यहुद्यांनां पुष्कळ बाबतींत स्वातंत्र्य मिळालें होतें. आठव्या शतकापासून स्पेनमधील यहुद्यांनांहि मोठ्या हुद्दयाच्या जागा मिळाल्या.

धर्मयुद्धामुळें यूरोप व आशिया यांतील दळणवळण वाढल्यानें यहुद्यांचा तिकडील व्यापार बसला, कारण ख्रिस्ती व्यापारी तेव्हांपासून पूर्वेकडे व्यापार करूं लागले. या काळीं यहुद्यांनां यूरोपांत पुन्हां गुलामाप्रमाणें मानण्यांत येऊं लागलें. स्पेनमधून त्यांची १४९२ च्या सुमारास हकालपट्टी झाली तर फ्रान्सनें त्यांनां १३०६ सालीं हुसकावून दिलें आणि इंग्लंडनेंहि त्यांनां थारा दिला नाहीं. नॉर्मन लोकांच्या स्वारीच्या वेळीं यहुदी लोक इंग्लंडमध्यें शिरले होते; पुढें त्यांच्यासंबंधीं एक स्वतंत्र कोर्ट स्थापन होऊन त्यांनां जमिनी विकत घेण्याची परवानगीहि दिली होती (१२७५) परंतु पुढें त्यांनां धुडकावून देण्यांत आलें. आस्ट्रियानें यांनां प्रथम १६७० सालीं घालवून दिलें पण त्यामुळें व्यापारास धक्का बसतो असें पाहून त्यांनां रहाण्याची परवानगी देऊन व्यापारविषयक कांहीं सवलतीहि दिल्या आणि दुसर्‍या जोसेफच्या वेळीं (१७८०-९०) तर त्यांच्यावरील सर्व बंधनें काढून टाकण्यांत आलीं. व्यापार व सावकारी यामुळें या लोकांनीं आपल्यावरील सार्वत्रिक बहिष्कार पुष्कळ अंशीं कमी केला. १७ व्या शतकांत यांचें महत्त्व बरेंच वाढलें आणि त्यामुळें त्यांनां आपलीं धार्मिक कृत्यें उघडपणें करतां येऊं लागलीं.

सां प्र त चा य हु दी स मा ज.-गेल्या अर्धशतकांत जगांतील यहुद्यांची संख्या वाढत आहे. गेल्या महायुद्धामध्यें या समाजांत क्रांति झाली आहे कांहीं जातींनां व देशांनां त्यांच्याबद्दल सहानूभूति वाटूं लागली आहे, तर कांहींनां (ज्याचें यहुद्यांमुळें व्यापारविषयक व सांपत्तिकदृष्ट्या नुकसान होतें) त्यांच्याबद्दल द्वेष वाटूं लागला. सांप्रत इंग्लंडांत यांच्याबद्दल मत्सर उत्पन्न करणारीं कांहीं वर्तमानपत्रें आहेत. मात्र या मतप्रसारास एक प्रकारें तेथील बेकारी हेंहि कारण झालें आहे. अजाण लोकांची समजूत तर अशी आहे कीं, महायुद्ध या यहुद्यांनींच उत्पन्न केलें. स. १९२०-२२ मध्यें इंग्लंडांत यांच्याविरुद्ध जोराची चळवळ चालू होती. फ्रान्सनें मात्र रूमानियांतून पळून आलेल्या यहुद्यांनां आश्रय देऊन उद्योगधंद्यांत व शेतकीकामांत त्यांनां मदत केली. हंगेरींत अजूनहि यांनां त्रास होतो. तेथील शिक्षणविषयक (१९२० च्या) कायद्यांत, शाळेंत ठराविक संख्येपेक्षां जास्त यहुदी मुलें घेऊं नयेत असें एक कलम आहे आणि त्याबद्दल यहुद्यांनीं राष्ट्रसंघाकडे तक्रार चालविली आहे. रूमानियांत यांची स्थिति असमाधानकारक असून, पोलंडने तर एक प्रकारें यांच्यापर व्यापारी बहिष्कार टाकला आहे; म्हणजे जे यहुदी व्यापारधंदे करीत असत त्यांतल्या कांहीं फायदेशीर व्यापारधंद्यांचा मक्ताच सरकारनें आपल्याकडे घेतला आहे. रशियांत त्यांनां विशेषसा विरोध नसल्यानें या लोकांनीं तेथें शेती सुधारण्याची चळवळ चालविली आहे. त्यांनां “अमेरिकेत ज्युईश जाइंट अ‍ॅग्रिकल्चरल कॉर्पोरेशन” या संस्थेनें आतांपर्यंत ८०००० डॉलराची मदत केली. ही संस्था पॅलेस्टाईनमध्यें वसाहत करूं जाणार्‍या यहुद्यांनां पैशाचें साहाय्य देत असते. पॅलेस्टाईनमध्यें वर्तमानपत्रविषयक चळवळ वाढत आहे. “ह्यापोऐल हजाइर” हें यहुदी मजूरपक्षीय हिब्रू साप्ताहिक आज १८ वर्षें सतत चालू आहे. जरुसलेम येथें एक हिब्रू दैनिक “डोअर हैयोम” (डेलीमेल) नांवाचें असून त्याचा संपादक पॅलेस्टाईनचा रहिवाशी व हिब्रू भाषा बोलणारा आहे. झायॉनिस्ट चळवळींत रशियन व जर्मन यहुद्यांनीं प्रामुख्यानें भाग घेणें हें या पत्रास पसंत नाहीं. जाफा येथें दोन दैनिक पत्रें असून, इतरत्र ८ साप्ताहिकें, २ पाक्षिकें व ६ मासिकें (२ वाङ्‌मयी, १ ऐतिहासिक, १ शेतकी व २ वैद्यकी) आहेत; सात वर्षांपूर्वीं पॅलेस्टाईनमध्यें एकहि दैनिक नव्हतें.

व सा ह ती.-हद्दपारीच्या पूर्वींपासून व स्वदेशागमनानंतरहि यहुदी हे परदेशीं वसाहत करण्यास जाऊं लागले होते. असीरिया, ईजिप्त, हमथ, भूमध्यसमुद्राचा किनारा, इराण, हिंदुस्थान, चीन वगैरे देशांत यांनीं वसाहती केल्या. त्यांनां साधलें तेथें त्यांनीं आपला व्यापार वाढविला व देवळें बांधिलीं.

मुसुलमानी राज्यांत प्रथम खलिफ उमरनें (६३४-४४) यहुद्यांविरुद्ध शस्त्र उचललें. उमरच्या वेळीं इराण, ईजिप्त, व सीरिया या देशांवर अरबी संस्कृतीची छाप बसली होती. त्या देशांत यहुद्यांची वस्ती बरीच असल्यानें त्यांनां मुसुलमानी धर्मापासून व कायद्यांपासून उपसर्ग पोहोंचला. नवीं प्रार्थनामंदिरें न बांधणें, जुन्यांचीं दुरुस्ती न करणें, मोठ्यानें प्रार्थना न करणें, जबरदस्त कर देणें, सरकारी मोठमोठ्या जागा न मिळणें, घोड्यावर न बसणें, एक प्रकारचा ठराविक पोषाख करणें, वगैरे जुलमी गोष्टी कायद्यानें त्यांच्यावर लादण्यांत आल्या. असें म्हणतात कीं, मुसुलमानी राज्यांत कांहीं ठिकाणीं अद्यापीहि हे कायदे अस्तित्वांत आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी तितकीशी होत नाहीं उमरनें पुष्कळ यहुद्यांनां अरबस्तानांतून हद्दपार केलें होतें. पुढें पर्शियन अंमलांत अरबस्तानाखेरीज इतर मुसुलमानी देशांत मुसुलमानांनीं यहुद्यांनां फारसा त्रास दिला नाहीं. अरबस्तानांत गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत यहुद्यांनां वरीलप्रमाणें अपमानकारक नियम पाळावे लागत. सांप्रत अरबस्तानांत यांची संख्या २५००० पर्यंत असून ते मुख्यत: व्यापारधंदा करून आहेत.

ज्या वेळीं अरबांनीं इराण घेतला त्या वेळेपासून यहुद्यांचा प्रवेश त्या देशांत झाला. मुसुलमानांच्या जुलुमानें येथेंहि त्यांची स्थिति त्यावेळेपासून आजतागाइत कींव येण्यासारखीच आहे. सांप्रत इराणांत ३०००० यहुदी आहेत. त्यांत हमदान, इस्पहान, किरमानशहा, शिराझ, तेहरान या शहरांत त्यांची वस्ती जास्त आहे. त्यांची राहण्याची जागा एका निराळ्या पेठेंत असते. त्यांच्याबद्दल एक चमत्कारिक चाल इराणांत आहे. एखादा यहुदी जर बाटून मुसुलमान झाला तर त्याच्या सर्व आप्तेष्टांच्या इष्टेटींचा तो वारस होऊं शकतो. येथें यहुद्यांनीं इ. स. १८६० सालीं एक “अलायन्स इझरायेलिट युनिव्हर्सल” नांवाची संस्था स्वत:च्या जातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठीं स्थापिलेली अद्यापपर्यंत अस्तित्वांत आहे.

ईजिप्तमध्यें हल्लीं ५०००० यहुदी आहेत. अरबांनीं हा देश घेण्यापूर्वींच त्यांची वस्ती तेथें होती. कांहीं काळ सोडल्यास बाकीच्या काळांत यहुद्यांनां या देशांत फारसा त्रास झाला नाहीं, उलट त्यांची स्थिति भरभराटीची व समाधानकारक होती. अल् हकीम (९९६-१०२०) या खलिफानें मात्र उमरचे जुलमी कायदे प्रचारांत आणले त्यावेळीं यहुद्यांनां वाजविण्याच्या घंटा व वांसराच्या लांकडी प्रतिमा सक्तीनें स्वत:बरोबर बाळगाव्या लागत. हुकूम तोडण्याच्या सबबीवर हकीमनें यहुद्यांची सर्व पेठच्यापेठ जाळून टाकिली. याच्याशिवाय बाकीच्या खलिफांच्या अंमलांत यहुद्यांनां त्रास झाला नाहीं. त्यांनां मोठमोठ्या सरकारी जागा मिळत; मैमोनिद यहुदी तर राजवैद्य असत. १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत यहुदी जातीवर एक नागीद नांवाचा जो गव्हर्नरसारखा अधिकारी असे तो यहुदी जातीचाच नेमला जाई. त्याला आपल्या जातीपुरते दिवाणी, फौजदारी वगैरे सर्व अधिकार असत.

उत्तर आफ्रिकेंतील इतर प्रांतांतून यहुद्यांची पूर्वस्थिति साधारणपणें वरीलप्रमाणेंच होती. मुसुलमानी अंमलांत मधून मधून त्यांचा जरी छळ होई तरी एकंदरींत त्यांनां सुखासमाधानानें राहतां येई. डायसपोरच्या नंतर पुष्कळ शतकें यहुद्यांच्या टोळ्या उत्तरआफ्रिकेंतून मध्यआफ्रिकेंत वसाहती करण्यास जात असत व अद्यापीहि जात असतात. ट्यूनिस प्रांतांत १८ व्या शतकाच्या अखेरीस इमाम इद्रिस यानें यहुद्यांनां बराच त्रास दिला व अलमोहद राजवंशानेंहि तोच क्रम चालू ठेविला. त्या वंशांतील अब्दुलमोमीन यानें तर अनेक यहुद्यांनां जुलमानें बाटविलें. या बाट्यांची संख्या उत्तरोत्तर इतकी वाढली कीं, खर्‍या यहुद्यांनां स्वत:साठीं एक स्वतंत्र पोषाख बनवावा लागला. पुढें (१२३६) हफशिट राजवंशांत यांची स्थिति बरीच सुधारली. त्यांनां सरकारी मोठमोठया जागा मिळूं लागल्या. ईजिप्तमधील नागीदसारखा काईद नांवाचा अधिकारी त्यांच्यांतून निवडीत. १८५५ मध्यें त्यांच्याबद्दलचे बरेचसे अपमानकारक कायदे रद्द केले. परंतु त्यांनां खरें आचारविचारस्वातंत्र्य महंमद बे यानें दिलें. ट्यूनिस हा देश १८८१ पासून फ्रान्सच्या अमलाखालीं गेला. आज तेथें ६६००० यहुदी आहेत. अल्जीरिया प्रांतांत अलमोहद राजवंशाच्या अखेरीपर्यंत ट्यूनिससारखीच जुलमी परिस्थिति होती. पुढें तुर्कांच्या अंमलांत त्यांची स्थिति सुधारली. ती इतकी कीं, शेजारच्या ख्रिस्ती राष्ट्रांच्या ताब्यांत असलेल्या देशांतील यहुद्यांनांसुद्धां या यहुद्यांबद्दल हेवा वाटूं लागला. तूर्कांनीं त्यांनां स्वराज्याचे पुष्कळसे हक्क देऊन त्यांच्यावर मुकद्दम (गव्हर्नर) नांवाचा त्यांच्यापैकींच अधिकारी नेमला.

मोरोक्कोमध्यें यहुदी लोकांची संख्या ११०००० आहे. बगदादच्या अंमलाखालून या प्रांताची सुटका होईपर्यंत (७८८) येथील यहुद्यांची स्थिति शेजारच्या इतर मुसुलमानी देशांप्रमाणेंच होती. इद्रिस यानें यांच्या साहाय्यानें हा प्रांत जिंकून घेतल्यावर कांहीं काळानें त्यांच्यावरच जुलूम सुरू केला. ही स्थिति साधारणपणें अडीच शतकें चालू होती. अलमोहद राजवंशानें ह्यांनां बाटविण्याचा सपाटा ११४६ पासून आरंभिला. या बाटलेल्या लोकांनांहि बराच त्रास होत असे. पुढें सतराव्या शतकापर्यंत यांची स्थिति वाईटच होती. त्या सुमारास मुलई अरशिद व मुलई इस्माईल यांनीं तर यांचा पुष्कळ छळ केला. देशांत यादवी सुरू झाल्यास दोन्ही पक्षांकडून यहुद्यांनांच त्रास होई. लूट जाळपोळ वगैरे प्रकार होत. क्वचित एखाद्या यहुद्यास सुलतानाचें मंत्रिपद मिळे, पण सबंध जातीला विशेष हक्क किंवा अधिकाराच्या जागा मिळत नसत. त्यामुळें चालू राज्यकर्त्यांच्या विरुद्ध पक्षासच बहुधां हे लोक मदत करीत. फ्रेंचांनी मोरोक्को आपल्या अधिराज्याखालीं घेतल्यावर यांच्या छळाचा शेवट झाला.

स्पेनमधील व्हिसिगॉथिक वंशाच्या जुलमानें ८ व्या शतकांत यहुदी इतके गांजले कीं, त्यांनीं मूर लोकांच्या आगमनास एक प्रकारें उत्तेजन दिलें. मूर लोकांच्या अंमलांत प्रथम यहुद्यांची स्थिति साधारण बरी होती. मात्र पुढें (१०६६) मुसुलमानांनीं ग्रानडा येथील १५०० यहुदी कुटुंबांची कत्तल करून त्यांच्या छळास सुरुवात केली. त्यानंतर दोन शतकांनीं अलमोराविद आणि अहमोहद यांच्या राजवटींत त्यांची स्थिति फारच हलाखीची झाली.

यूरोपांतील तुर्कस्तानांत मात्र यहुद्यांनां विशेष चांगल्या तर्‍हेनें वागविलें जात असे. बायझन्टाईन साम्राज्य नाहींसें होऊन तुर्कांची सत्ता स्थापित झाल्याबरोबर यहुद्यांनां सुखाचे दिवस लाभले. त्यांच्यावरील जुलूम बंद झाले. कोणत्याहि ख्रिस्तधर्मी राष्ट्रांत त्यावेळीं त्यांनां सुख लाभलें नाहीं इतकें सुख तुर्कांच्या अमदानींत त्यांनीं भोगलें. राहणें, फिरणें धंदा करणें, पोषाक करणें, सैन्यांत शिरणें, सुलतानाच्या प्रधानकीच्या जागा मिळविणें वगैरे गोष्टींत त्यांनां कसलाहि अडथळा राहिला नाहीं. एवढेंच नव्हे तर जगांत गांजलेल्या कोणत्याहि यहुद्याला तुर्कस्तानांत आश्रयार्थ स्थान मिळूं लागलें. १५ व्या शतकांत जर्मनी व हंगेरींतील जुलुमाखालीं चिरडलेल्या लोकांनां तुर्कस्तानांत मुद्दाम बोलावण्यांत आलें. पुढें स्पेनमधील हद्दपार झालेले असंख्य यहुदीहि तुर्कस्तानांत आले. या सर्वांनां तुर्की सरकार व लोक यांनीं सर्व बाजूंनीं मदत केली. या लोकांमुळें तुर्कस्तानांत बरेच नवीन उद्योगधंदे निर्माण झाले. त्यांनीं मोठमोठ्या शहरांतून आपली वस्ती केली. सालोनिका बंदरांत तेव्हांपासून यांची संख्या जास्त असून व्यापार वगैरे कामांत यांचीच छाप विशेष आहे. हाकाम बाशी नांवाचा ईजिप्तमधील नागीद सारखा यहुद्यांचा सर्वाधिकारी तुर्कस्तानांत असे, हा अधिकारी महंमद (१४५१-८१) च्या वेळीं नेमला गेला. तिसर्‍या मुरादच्या कारकीर्दींत मात्र यहुद्यांचा पुष्कळ छळ झाला. आणि १८ व्या शतकांतहि तो सुरूच होता. १९ व्या शतकापासून पुन्हां त्यांनां सुस्थिति लाभली. सामाजिक व औद्योगिक बाबींमुळें (राजकीय नव्हे) यांनां त्रास होई. १९०८ च्या बंडानें मुसुलमान व यहुदी यांचा सामाजिक दर्जा सारखाच ठरला गेला. १९११-१२ सालीं यूरोपीय तुर्कस्तानांत १८०००० यहुदी असून त्यांतील ६५००० लोक कान्स्टान्टिनोपलमध्यें होते आणि अरबस्तान सोडून बाकीच्या आशियांतील तुर्कस्तानांत २५०००० यहुदी होते.

हिंदुस्थानांत मलबार किनार्‍यावरील कँगानोर गांवाशीं यहुद्यांचा फार प्राचीनकाळापासून संबंध येतो. हे लोक येथें केव्हां आले तें नक्की समजत नाहीं. मात्र प्राचीन काळापासून पॅलेस्टाईनचा व मलबारचा व्यापारामुळें संबंध येत असे हें बायबलांतील कांहीं मालाच्या व गांवांच्या नांवांवरून दिसतें. मलबारांतील यहुद्यांची समजूत, टायटसनें जेरुसलेमचा नाश केल्यानंतर (इ. स. ७०) आपण इकडे आलीं अशी आहे. इ. सनाच्या आठव्या शतकांतील एका ताम्रपटांत मलबारच्या हिंदुराजानें जोसेफ रबन नांवाच्या एका यहुद्यास बरीचशी जमीन बक्षीस दिली हा यांच्याबद्दलचा पहिलाच ऐतिहासिक उल्लेख होय. त्यानंतर ८०० वर्षें या लोकांची इकडील माहिती आढळत नाहीं. १५२४ सालीं झामोरीन राजानें कँगानोरवर स्वारी केली तींत आणि पुन्हां १५६५ सालीं हल्ला केला त्यांत त्यानें यहुद्यांचीं घरेंदारें जाळून त्यांची कत्तल केली व त्यांनां तेथून हुसकावून दिलें. तेव्हां ते लोक कोचीन प्रांतांत गेले व तिकडे त्यांनीं ज्यूजटाऊन नांवाचें एक गांव वसविलें. कँगानोरच्या आसपासच्या कांही गांवींहि सांप्रत यांची वस्ती आहे. या प्रांतांतील यहुद्यांत गोरे यहुदी व काळे यहुदी असे दोन भेद आहेत. काळे यहुदी हे आपण हिंदुस्थानांत प्रथम आलों असें समजतात व गोर्‍या यहुद्यांचें म्हणणें कीं, आपण प्रथम आलों आहोंत. तसेंच, काळ्या यहुद्यांच्या मूळ पुरूषांनीं इकडील कुणबिणीं (दासीं) शीं संबंध ठेवून वंश वाढविल्यानें त्यांच्या सांप्रतच्या वंशजांचा रंग काळा झाला. काळ्या यहुद्यांचें म्हणणें कीं गोरे यहुदी हे कोचीनमध्यें १५११ च्या सुमारास आमच्या मागून पोतुर्गाल व स्पेनमधून आले. आज या दोघांचें प्रमाण गोरा एक तर काळे ८ असें आहे. गोरे यहुदी आपणास उच्च मानून काळ्यांशीं शरीरसंबंध करीत नाहींत. पिंवळे यहुदी म्हणून तिसरा एक वर्ग कांहीं मंडळींनीं निर्माण केला आहे. या लोकांनीं आपल्या धार्मिक संस्कारांनां जेरुसलेमच्या मुख्य रॅबीची (त्यांचा शंकराचार्य) व अलेक्झांड्रियाच्या महारिकष रॅबीची मान्यता मिळविली (१६१०). या लोकांनी कांहीं हिंदूंनां पूर्वीं बाटविलें होते त्यामुळें हल्लीं मूळचे खरे यहुदी कोणते व बाटून झालेले यहुदी कोणते हें समजण्यास मोठी अडचण पडते. सांप्रत गोर्‍या यहुद्यांनां कागदोपत्रीं व प्रचारांत परदेशी म्हणतात; त्यावरून ते मागून आलेले असावेत असें दिसतें. कांहीं वर्षांपूर्वीं हळळेगू येथील गोर्‍या यहुद्यांच्या मुख्य घराण्यास मुदलियार म्हणत असत. सांप्रत या जातीची लोकसंख्या कमी होत चालली आहे. १९११ मध्यें यांची एकूण संख्या १२४८ असून त्यांत १०५६ काळे व बाकीचे गोरे होते. कोचीन, ज्यूजटाऊन, एर्नाकुलम, चेन्नमंगलम्, माळ, परूर, चिचूर वगैरे गांवीं यांची वस्ती आहे. हे लोक तांदुळ, मासे, कोंबड्या वगैरेंचा व्यापार करतात. यांच्यापैकीं १/४ लोक साक्षर आहेत. हे कारागिरीचें व कारकुनीचें काम अलीकडे करूं लागले आहेत. हे मलयालम् व तिच्या उपभाषा बोलतात आणि हिब्रू भाषा थोडी फार जाणतात. मुंबई इलाख्यांतील बेनेइस्त्रायलांशीं ते कोणताहि संबंध ठेवीत नाहींत. एडन सुद्धा सर्व हिंदुस्थानांत यहुद्यांची संख्या (१९२१) २१७७८ आहे. बेनेइस्त्रायल, कोचीन यहुदी व मलबारयहुदी यांशिवाय बगदादी यहुदी म्हणून यांचा एक चवथा वर्ग आहे. हे लोक हिंदुस्थांनात १७७७ च्या सुमारास व्यापाराच्या निमित्तानें आले. हिंदुस्थानांतील यहुदी हे जगांतील यहुद्यांप्रमाणें सावकारीचा धंदा प्रामुख्यानें करीत नाहींत. मुंबईचें सासून घराणें हें या बगदादी शाखेपैकींच आहे. पुण्याचें “लाल देऊळ” या नांवाचें चर्च या सासून घराण्यानेंच बांधलें. बगदादी यहुदी हे आपआपसांत अरबी व इतरत्र हिंदुस्थानी भाषा बोलतात.

चीनचा उल्लेख यहुद्यांच्या धार्मिक पुस्तकांत फार पुरातन कालापासून येतो. कैफुंगफू येथील शिलालेखावरून (१४८९) चीनमध्यें यहुद्यांनीं पहिली वसाहत हान राजवंशाच्या वेळीं (ख्रि. पू. २०६ ते इ. स. २२१) केली असें दिसतें. त्यांतहि या वंशांतील मिंगती (इ. स. ५८-७६) या राजाच्या काळीं वसातीचा उल्लेख स्पष्टच आढळतो. या सुमारासच (७०) रोमन लोकांनीं जेरुसेलमचा पाडाव केला होता. बाबिलोनची (५०००० यहुद्यांची)कत्तल व इराणांतील छळ या गोष्टी सुद्धां या वसाहतीस कारण झाल्या. सांप्रत चीनमधील यहुद्यांच्या चालीरीतींत इराणी यहुद्यांच्या चालीरीतींची छाप दिसून येते. त्यांच्या धार्मिक मंत्रांची भाषा तर फिरदौसीच्या वेळच्या भाषेसारखी दिसते. या वसाहती तेव्हांपासून १० व्या शतकापर्यंत होत होत्या. इराण-खोरासान-चीन व हिंदुस्थान-चीन या देशांचा व्यापार (विशेषत: रेशमाच्या बाबतींत) प्राचीन काळापासून चालू होता; त्यामुळेंहि हे लोक (कांहीं ठिकाणीं ७० कुटुंबें) चीनमध्यें गेले असावेत. मात्र यांचा तेथील मध्ययुगीन इतिहास उपलब्ध नाहीं. ९ व्या शतकापासून यांची माहिती मिळते. मार्कोपोलो व इब्नबतूता हे यांचा उल्लेख करतात. इ. स. १३२९ मध्यें देशाचे कायदे करतांना यांची सल्लामसलत घेतल्याचें आढळून येतें. तेव्हां यहुद्यांची संख्या तेथें १२०००० होती. इ. स. १६४२ च्या सुमारास त्यांनीं आपल्या समाजाची बळकटी केली; पण धार्मिक बाबतींत त्यांची निकृष्टावस्थाच होती. या लोकांच्या बद्दल माहिती मिळविण्याचा व त्यांनां मदत करण्याचा यूरोपांतील यहुद्यांनीं २०० वर्षें (१६१३-१८१५) प्रयत्‍न केला, पण तो व्यर्थ गेला. नानाकिंगच्या तहानें (१८४२) या लोकांनां चीनमधील यहुद्यांशीं प्रत्यक्ष पत्रव्यवहार करतां आला; तरी पण १९०१ पर्यंत खरें कार्य घडलें नाहीं. त्या सुमारास मात्र एक जर्मन यहुद्यानें ( लिबरमन) कैफुंगफू येथें जाऊन चिनी यहुद्यांनां यहुदीधर्माचें शिक्षण दिलें व चिनी सरकारकडून या लोकांनां धार्मिक हक्क मिळवून दिले. तेव्हांपासून यांनां सुस्थिति लाभत चालली. यांचा तेथील धंदा व्यापाराचा आहे.

यूरोपमध्यें ९० लक्ष यहुदी आहेत, त्यांत खुद्द लंडनमध्यें दीड लक्ष आहेत. अमेरिकेंत २५ लक्ष यहुदी असून आशियांत ४६००००, आफ्रिकेंत ३५५०००, आणि आस्ट्रेलियांत १७००० यहुद्दी आहेत. सांप्रत गरीब यहुद्यांनां पॅलेस्टाईनमध्यें वसाहत करण्यासाठीं पाठविलें जातें, आतां (१९२६) पॅलेस्टाईन प्रांत इंग्लंडच्या संरक्षणाखालीं असल्यामुळें या चळवळीस जास्तच स्वरूप आलें आहे. इंग्लंडनें तेथें यहुद्यांसाठीं एक यहुदी युनिव्हर्सिटी स्थापन केली असून, वसाहत करण्यासाठीं येणार्‍या यहुद्यांनां विशेष सवलती देण्यांत येत आहेत, परंतु त्यांस अरब लोकांची मनापासून संमति नाहीं. यहुद्यांनीं यापूर्वीं परदेशांत ठिकठिकाणीं जी झायनिस्ट नांवाची चळवळ सुरू केली होती, ती वरील कारणामुळें सांप्रत संपुष्टांत येण्याचा संभव आहे.

[ ग्रेटझ-हिस्टरी ऑफ दि ज्यूज; लेस्झीन्स्की-डाय जूडेन इन अरेबियन; अ‍ॅडलर-ज्यूज इन मेनी लँड्स; मीकिन-ज्यूज ऑफ मोरोक्को; फ्रँको-इसाई; लॉर्ड-ज्यूज इन इंडिया अँड दि फार ईस्ट; रॅफ्फालोविच-अँटिक्विटीज ऑफ दि ज्यूज इन मलबार; ग्लोव्हर-ज्युईश चायनीज पेपर्स; फिनज्यूज इन चायना. ]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .