विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यज्ञ - भारतीयांच्या यज्ञसंस्थेचा इतिहास व तत्संबंधीं विस्तृत विवेचन वेदविद्या या प्रस्तावनाखंडाच्या दुसर्या विभागांत केलेंच आहे. येथें फक्त भारतीयेतर देशांतील यज्ञासारखे जे विधी असतात त्यांची माहिती दिली आहे.
इंग्रजीमध्यें या शब्दास सॅक्रिफिस असा शब्द आहे व तो ‘पवित्र करणें’ या अर्थाच्या एका लॅटिन धातूपासून निघालेला आहे. व त्यांची यज्ञकल्पना म्हणजे एखादी अपवित्र वस्तु पवित्र करून घेण्याकरितां एखाद्या प्राण्याचें, विधियुक्त वध करून देवतार्पण करणें ही होय. टायलर याची कल्पना प्रथम यज्ञ म्हणजे देवतेस अर्पण केलेली देणगी अशी होती. पण रॉबर्टसन स्मिथ यानें यज्ञाचा देवकसंप्रदायाशीं संबंध आहे असें दाखविलें. वेस्टरमार्कच्या मतें यज्ञ म्हणजे आपल्यावरील सकंट टाळण्याकरितां आपला प्रतिनिधि देवतेस बळी देणें होय.
यज्ञाचें वर्गीकरण विशिष्ट प्रसंग, अंतिम हेतु, यज्ञियवस्तु, पद्धति यांस अनुसरून करतां येईल. त्याप्रमाणें पुढें कांहीं भारतीयेतर यज्ञांचे प्रकार दाखविले आहे:-
प रि शो ध क य ज्ञ.-(कॅथार्टिक)यजनीय वस्तूचा अपवित्रपणा काढून ती सामान्य उपयोगासाठीं तयार करणें; तसेंच पवित्रपणा काढून घेऊन वरील प्रमाणेंच ती मनुष्याच्या उपयोगासाठीं किंवा त्याच्या दळणवळणाच्या सोयीसाठीं बेतशीर तयार करणें हा या यज्ञांतील हेतु आहे.
सं यो ग य ज्ञ.-(कम्युनल) वध्य प्राण्यांच्या ठायीं असलेली पवित्रता किंवा ईश्वरी अंश आपल्या ठिकाणीं यावा ही इच्छा या यज्ञाला कारणीभूत झाली असेल.
ई श्व र तु ल्य का री य ज्ञ.-(डीइफिकेटरी) कांहीं यज्ञांचा हेतु घर, शहर किंवा सरहद्द यांनां रक्षकदेवता नेमून देण्याचा असतो.
प्र ति ष्ठा सू च क य ज्ञ.-(ऑनोरीफिक) या यज्ञांची उत्पत्ति कशीहि असो, पण ते देणगीदाखल असतात अशी त्यांची उपपत्ति लावितां येते. प्रतिष्ठासूचक यज्ञ प्राधान्येंकरून अनुकूलता मिळविण्याकरितां आहे. कांहीं अंशीं हा यज्ञ प्रायश्चित्तात्मक-स्वरूपाचा आह; तरी तो त्यापासून बराच भिन्नहि आहे.
मृ ता सं बं धीं य ज्ञ.-विशेषत:मनुष्ययज्ञ. एखाद्याच्या मुत्यूनंतर किंवा बरेच मागाहून करण्यांत येतात. त्यांचा हेतु पुढीलपैकीं एखादा असावा: (अ) परलोकाकरितां वाटाड्या बरोबर देणें; (आ) मृताच्या दर्जाप्रमाणें चाकर माणसें पुरविणें; ( इ) या लोकीं घडलेल्या गोष्टींची माहिती मृतास करून देण्यासाठीं दूत पाठविणें; (ई) एखाद्या जिवंत प्राण्याच्या रक्तानें किंवा जीवितानें मृतांनां सशक्त करणें. वरील कारणासाठींच अन्नदान किंवा रुधिरसंस्कार मृताच्या आप्तांनां करावे लागतात.
प्रा य श्चि त्ता त्म क य ज्ञ.-प्रतिष्ठासूचक यज्ञांत देव देणगीचा स्वीकार करतो तर प्रायश्चित्तात्मक यज्ञांत तो जीव मागतो.
म नु ष्य य ज्ञ.-‘ नरमेध’ पहा.
प्रत्येक देशांतील यज्ञसंस्थेची माहिती देणें अशक्य असल्यानें कांहीं प्रमुख भागांतील माहिती फक्त पुढें दिली आहे.
भा र ती य य ज्ञ सं स्था.-वेदविद्या विभाग, प्र. ४, १०, १३ व १५; शिवाय परिशिष्ट ई, उ व ऋ पहा.
ग्री स व रो म म धी ल य ज्ञ सं स्था.-ग्रीस देश व त्याच्या वसाहती यांतून अनिष्ट गोष्टी दूर करण्याकरितां मनुष्ययज्ञ करण्याची वहिवाट असे. यासंबंधीं ‘नरमेध’ पहा.
ग्रीक यज्ञांतील महत्त्वाचीं अंगें म्हणजे वध्यप्राण्याला पुष्प हार व लोंकरीच्या तुकड्यांनीं शृंगारावयाचें, त्याच्या शिंगांनां सोनेरी मुलामा द्यावयाचा. अध्वर्यूला शुद्ध करणें व हजर असलेल्या मंडळींनां पवित्र पाण्यानें प्रोक्षण करणें. जर वध्यपशु नाखूष दिसला तर तें अमंगळ समजत व जर त्यानें मानेनें होकार दिला तर वरील सर्व ठाकठीक होईल अशी समजूत असे. बार्ली धान्य त्याच्या मानेवर टाकीत व त्याच्या कपाळावरचा एक केंसांचा झुपका कापून जाळीत. नंतर त्या प्राण्याला काट्यांनीं मारीत, व त्याचा गळा कापून त्याच्या रक्तानें वेदीवर प्रोक्षण करीत. शेवटी, त्याला सोलून कापीत व देवाच्या भागाच्या वेदीवरील अग्नींत आहुती देत.
रोममध्यें बकरा कधीं मारला गेला नाहीं; पण सॅटर्न्यालियाच्या सणांत ख्रिस्ती शकाच्या चवथ्या शतकापर्यंत एका मनुष्याच बळी देत होतेसें दिसतें. तेथें पशुयज्ञाचे पुष्कळ प्रकार होते; ग्रीक यज्ञाच्या इतिहासाप्रमाणेंच बहुतेक याचा इतिहास आहे.
ई जि प्त म धी ल य ज्ञ.-ईजिप्तमधील आचारपद्धतीची जी कांहीं थोडी माहिती मिळते ती चित्रांवरून. डीर एल बहरींत मुसुलमानपद्धतीप्रमाणेंच पशूला कापीत. त्याला कुशीवर निजवीत व त्याचे पाय एकत्र बांधीत. अग्निमुखयज्ञ बहुधां त्यांनां माहीत नव्हता.
आ फ्रि कें ती ल य ज्ञ.-विशेषत: पश्चिम आफ्रिकेमध्यें यज्ञाचे पुष्कळ प्रकार आढळून आले आहेत. डहोमेंतील सांवत्सरिक चालींतून शेंकडों मनुष्यें बळी पडत. हल्लीं पशुयज्ञ मात्र होतात; वध्यपशूला जाळतात किंवा पाण्यांत बुडवितात. जमीनींत पुरतात किंवा फक्त उघड्यावर टाकतात. कधीकधीं प्राण्याला मारण्यापूर्वीं यजमान आपले हात त्याच्या अंगावर ठेवतो, किंवा रक्तानें त्याचें अंग माखण्यांत येतें. कांहीं वेळां दाराच्या खांबांनां रक्त लावितात किंवा यजमानाच्या प्रत्येक अवयवाला वध्यप्राण्याच्या देहाचा स्पर्श करवितात.
अ मे रि कें ती ल य ज्ञ.-इतर लोकांशीं तुलना करितां रेड इंडियन लोकांत, यज्ञ कमी होत असत व त्यांची यज्ञसंस्था सुधारलेली नव्हती. पॉनी लोकांत एक मोठा विधि होत असे व त्यांत शुक्राला (सकाळच्या वेळच्या) एक मनुष्य बळी देत; त्याचें रक्त शेतांत शिंपडीत. इरॉक्वॉ लोकांतील पांढर्या कुत्र्याचा यज्ञ पुढील काळांत बोकडाच्या सणाप्रमाणेंच होऊं लागला. त्या प्राण्यांनां पांढर्या मण्यांनीं सुशोभित करीत व गळा दाबून मारीत व नंतर लोकांचीं पापें त्यांच्या माथीं मारीत; मग त्यांनां जाळून त्यांची राख खेड्यांतून प्रत्येक घरापुढें टाकीत. मेक्सिकोमध्यें मनुष्ययज्ञाचा प्रचार फार असे, अगदीं कमी प्रमाण घेतलें तरी दर वर्षाला २०००० यज्ञ होत. वध्यप्राण्याला वर्षभर चांगलें खाऊं घालीत व देवाप्रमाणें पूज्य मानीत, त्याचें हृदय देवाला समर्पण करीत, धड ऋत्विज व मोठे लोक खात व मुंडकें पूर्वींच्या वध्यप्राण्यांच्या मुंडक्यांबरोबर राखून ठेवीत.