विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
याकोबी, फ्रेडरिक हेनरिच (१७४३-१८१९) - हा जर्मन तत्त्वेवत्ता डसेल्डॉर्फजवळील एका धनाढ्य व्यापार्याचा मुलगा होता. त्यानें चार्लस बॉनेटचे ग्रंथ व रूसो आणि व्हॉलटेअर यांचीं राजकीय मतें यांचा लक्षपूर्वक अभ्यास केला, व लवकर पिढीजाद व्यापार सोडून ज्युलिच आणि बर्ग या डचींच्या वतीनें जर्मन पार्लमेंटचा तो सभासद झाला. अशा रीतीनें राजकारणांत पडून त्यानें बरींच लोकोपयोगी कृत्यें केलीं. पुढें याकोबी तत्त्वज्ञानी म्हणून प्रसिद्धीस आला. आधुनिक तत्त्वज्ञानांत तो अंधश्रद्धेचा शिरकाव करूं पहात होता असा त्याच्यावर पुष्कळांचा आक्षेप आहे. १८०७ ते १८१२ पर्यंत तो म्युनिक येथील शास्त्राच्या अॅकॅडमीचा अध्यक्ष होता. १८४१ सालीं त्यानें शेलिंगविरुद्ध एक तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिला. वोल्डेपार ही त्याची एक तात्त्विक कादंबरी आहे. मानसशास्त्रांतील अनुभवसिद्धज्ञान (काँग्निशन) या विषयावर त्यानें फार सुंदर लेख लिहिले आहेत.