विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यादवाड - मुंबई इलाखा, बेळगांव जिल्हा. गोकाकच्या पूर्वेस २५ मैलांवर हा एक गांव आहे. सावनूरच्या नबाबानें यादवाड मराठ्यांच्या स्वाधीन केलें. १७६४ सालीं यादवाड प्रांत हा पेशव्यांनीं मिरजकर पटवर्धनास दिलेल्या सरंजामांत मोडत होता. १७९० सालीं मराठी दफ्तरांत यादवाड गांव तोरगळ सरकारांतील एका परगण्याचें मुख्य ठिकाण असून त्याचा सालीना वसूल ४६००० रुपये होता. १८४९ सालीं तासगांवचे परशुरामभाऊ निपुत्रिक वारल्यामुळें यादवाड ब्रिटिश मुलखांत आलें.