विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
याज्ञवल्क्य - एक प्रसिद्ध ऋषि व स्मृतिकार. याच्या स्वत:च्या संबंधीची माहिती फारच थोडी मिळते. हा वाजसनेयी शाखेचा प्रवर्तक असून अत्यंत विद्वान होता. बृहदारण्यकोपनिषद्, शतपथ ब्राह्मण, शुक्ल यजुर्वेद, योगसूत्रें, याज्ञवल्क्यस्मृति इत्यादि ग्रंथांचें कर्तृत्व याच्याकडे देण्यांत येतें. तथापि स्मृति ग्रंथ अत्यंत अर्वाचीन आहे आणि वरील इतर ग्रंथांतील सर्वच भाग याज्ञवल्क्यानें रचिला असावा असें दिसत नाहीं. बृहदारण्यकोपनिषदांतील त्याच्या स्तुतिपर असलेलें याज्ञवल्क्यकांड वगळतां बाकी सर्व उपनिषद् त्यानेंच रचिलें असावें असें दिसतें. शुक्लयजुर्वेद हा यानेंच रचिला असावा असें पुष्कळांचें मत आहे. शतपथ ब्राह्मणांतील बर्याच भागाचें कर्तृत्व याजकडे देण्यास हरकत नाहीं. याज्ञवल्क्य हा जनक राजाच्या दरबारीं होता असें शतपथ ब्राह्मणावरून दिसतें. याज्ञवल्क्य व जनक यांच्यामध्यें ब्रह्मज्ञानावर बरेच वादविवाद होत असत (ज्ञा. को. वि. ३ पृ. ४४८ पहा). याज्ञवल्क्याला कात्यायनी व मैत्रेयी अशा दोन बायका होत्या. त्यांपैकीं मैत्रेयी ही उत्तम विदुषी होती. बृहदारण्यकोपनिषदांत तिचा व याज्ञवल्क्याचा संवाद झालेला आढळतो (वेदविद्या, पृष्ठ १७४ पहा). याज्ञवल्क्य हा शीघ्रकोपी होता असें दिसतें. तो आपल्या गुरूबरोबर (वैशंपायनाबरोबर) भांडला व त्यानें आपला स्वतंत्र शुक्लयजुर्वेद प्रणीत केला अशी आख्यायिका आहे. तथापि त्याच्या दांडगाईच्या मुळाशीं स्वतंत्र विचार होता असें दिसतें. त्यानें रागाच्या भरांत एका ब्राह्मणाची हत्या केली असतां पुढें ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलें त्यामुळें तो मोक्षाचा अधिकारी झाला असें विद्यारण्यानें म्हटलें आहे.
या ज्ञ व ल्क्य स्मृ ति.-याज्ञवल्क्यस्मृति ही मनुस्मृतीच्या खालोखाल प्रमाणभूत मानली जाते. याज्ञवल्क्यासारख्या महापंडित अशा ऋषीच्या नांवावर ही मोडत असल्यामुळें हिला उच्च स्थान मिळालें असें दिसतें. या स्मृतीचा कर्ता याज्ञवल्क्य नसून त्याच्या शुक्लयजुर्वेदी शाखेच्या एका पंडितानें याज्ञवल्क्यानंतर अनेक शतकांनीं ही रचिली असावी असें या. स्मृतीच्या आरंभींच्या श्लोकांवरून दिसतें. ‘याज्ञवल्क्यशिष्य: कश्चित्प्रश्नोत्तररूपं याज्ञवल्क्यप्रणीतं धर्मशास्त्रं संक्षिप्य कथयामास यथा मनुनोक्तं भृगु:’ असें विज्ञानेश्वरानें मिताक्षरा टीकेंत म्हटलें आहे. मनुस्मृतीच्या मुळाशीं ज्याप्रमाणें मानवधर्मसूत्रासारखें एखादे धर्मसूत्र असावें असें विद्वानांनीं ठरविलें आहे त्याचप्रमाणें याहि स्मृतीचें मूळ याज्ञवल्क्य-धर्मसूत्र असण्याचा बराच संभव आहे. याज्ञवल्क्यस्मृतीची बृहदयाज्ञवल्क्यस्मृति म्हणून सुधारून वाढविलेली स्मृति उपलब्ध आहे. तथापि तीवर पुष्कळांचा हात फिरल्यासारखा दिसतो. हल्लीं जी याज्ञवल्क्यस्मृति उपलब्ध आहे तिचे आचार, व्यवहार व प्रायश्चित्त असे तीन अध्याय असून या तिन्ही अध्यायांची मिळून श्लोकसंख्या १००९ आहे. कांहीं प्रतींत ही संख्या १११० आढळते ही स्मृति ख्रिस्ती शकाच्या अकराव्या शतकांत रचिली गेली असावी असें विद्वानांचें मत आहे. तथापि या काळाच्याहि पूर्वीं ती झाली असणें शक्य नाहीं.
हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व भागांत याज्ञवल्क्यस्मृति प्रमाण मानली जाते. याज्ञवल्क्मृतीवर विज्ञानेश्वराची ऋजुमिताक्षरा शिवाय अपरार्क, वीरमित्रोदय (मित्रमिश्रकृत), दीपकलिका इत्यादि प्रसिद्ध टीका आहेत. त्यांतल्या त्यांत मिताक्षरा ही अत्यंत सुंदर व प्रसिद्ध टीका आहे.