विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
युगांडा - पूर्व आफ्रिका. एक ब्रिटिश संरक्षित संस्थान. क्षेत्रफळ ११०३०० चौरस मैल. पैकीं १६१६९ चौ. मैलांचा प्रदेश पाण्यानें व्यापिला आहे. मर्यादा:-उत्तरेस युगांडासुदन सरहद्द; पूर्वेस रुडाल्फ सरोवराच्या मध्यापासून खालीं केनिया वसाहतीच्या पश्चिम सरहद्दीवरून व व्हिक्टोरिया सरोवराच्या पूर्व किनार्यानें जाणारी रेषा; दक्षिणेस टँगानिका मुलूख व पश्चिमेस बेल्जियन काँगोची पूर्व सरहद्द. हा प्रदेश उंच उंच डोंगरपठारांनीं, हिमाच्छादित पर्वतांनीं, विस्तृत अशा दलदलीच्या भूभागांनीं, घनदाट अरण्यांनीं, व निर्जन व रुक्ष अशा विभागांनीं आच्छादिलेला आहे. येथील हवामानांतहि अशा प्रकारचा अनेकविधपणा दृष्टोत्पत्तीस येतो. येथील कित्येक जिल्ह्यांत तर दोन वर्षेंपर्यंत पावसाचें नांव नसतें. पूर्व प्रांतांत मात्र व्हिक्टोरियानिआंझाजवळ मुबलक पाऊस पडतो.
ख नि ज व व न स्प ती.-येथें अशुद्ध लोखंड विपुल आहे. रुडाल्फ सरोवराच्या वायव्येकडील भागांत सोनें सांपडतें. बुसोगा येथें तांबें, व युनयोरो येथें सोनें सांपडण्याचा बराच संभव आहे. लोखंड जवळ जवळ सर्वत्रच सांपडतें. रुडाल्फ प्रांत खेरीज करून वनस्पती सर्वत्र स्वैर वाढतात. पूर्व प्रांत व नाईल यांच्या लगतच्या दलदलीच्या भागांत गवत, ‘बोय’ व इतर झुडुपांची वाढ फार होते.
लो क सं ख्या.-१९२३ सालीं युगांडामध्यें ३१२७४५५ वस्ती होती. पैकीं एतद्देशीय ३११९६४५, आशियाटिक ६५२१ व यूरोपियन १२८९ होते. तद्देशीय लोक मुख्यत: निग्रो वर्गांतील आहेत. या एतद्देशीय लोकांपैकीं सुमारें ६ १/२ लाख लोक बगंडा जातीचे असून बहुतेक सर्व ख्रिस्ती झालेले आहेत. युगांडा संस्थानांत पुढील भाषा प्रचलित आहेत:- (१) हॅमिटिक, (२) मसाइ, (३) माडी व (४) बांटु. सुमारें १७ लाख लोक बांटु भाषा बोलतात.
शे ती व व्या पा र.-शेतीचा धंदा बहुतेक एतद्देशीयांच्याच हातीं आहे. बगांडा लोक कापूस, रबर व कोको या पदार्थांची लागवड करतात. त्यांतल्यात्यांत कापसाचें पीक फार मोठें आहे. १९२३ सालीं ४१८६०० एकर जमीनींत कापूस लाविला होता. व्यापारहि बहुतेक तद्देशीयांच्याच हातांत आहे. कापूस, कॉफी, मिरची, हस्तिदंत, रबर व कातडीं हीं बाहेरदेशीं पाठविलीं जातात. यंत्रसामुग्री, लोखंडी सामान व कापसाचें सामान इत्यादि वस्तू परदेशाहून येतात. आगगाड्या, आगबोटी, तारायंत्रें उत्तम रस्ते इत्यादि दळणवळणाचीं साधनें आहेत.
शा स न स त्ता.-संस्थानचे राज्यकारभाराच्या दृष्टीनें पांच प्रांत केले आहेत ते:- (१) रुडाल्फ प्रांत; (२) पूर्व प्रांत (३) पश्चिम प्रांत, (४) उत्तर प्रांत; व (५) बुगांडा. या प्रांतांचे पुन: जिल्हे पाडले आहेत. बुगांडा प्रांताचा राज्यकारभार तद्देशीय लोकांकडेच सोंपविला असून ते तो उत्तम रीतीनें करतात. संस्थानच्या राज्यकारभाराचे शिरोभागी गव्हर्नर व सेनापति असून वसाहत-कचेरी त्यांचें धोरण निश्चित करते. ब्रिटिश राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण एन्टेब्बे असून बुगांडाची एतद्देशीय राजधानी मेंगो (कंपाल) येथें आहे. बुगांडाच्या राजाला कांहीं विशिष्ट व जास्त अधिकार दिलेले आहेत. तेथें तद्देशीय लोकसभा (कुंकिको) असून तिला कांहीं मर्यादेपर्यंत अधिकार दिलेले आहेत. राजाला ‘हिज हायनेस’ अशी पदवी असून त्याला ११ तोफांची सलामी आहे. एतद्देशीयांचें शिक्षण मिशनर्यांच्या हातांत आहे. औद्योगिक धंदेशिक्षण व उच्च शिक्षणहि देण्यांत येतें. १९२३ सालीं मिशनरी शाळांतून १२१००० विद्यार्थी व ७९००० विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. युगांडाचें उत्पन्न सरासरी १० लाख पौंड आहे. सरकारी उत्पन्नाच्या मुख्य बाबी म्हटल्या म्हणजे झोंपड्यावरील कर, डोईपट्टी व जकाती ह्या होत.
इ ति हा स.-सुमारें ३ किंवा ४ हजार वर्षांपूर्वीं या संस्थानांत समाविष्ट केलेल्या प्रदेशावर हॅमिटिक जातींनीं स्वारी केली. पुढें हे लोक येथील मूळच्या रहिवाशांत मिसळून गेले. कांहीं काल लोटल्यावर बुगांडा, उनयोरो व अँकोल या ठिकाणीं बलिष्ठ राज्यें अस्तित्वांत आलीं.
१९ व्या शतकांत व्हिक्टोरिया नँझाच्या आसमन्तांतील भागावर बुगांडाचें वर्चस्व होतें. १८७४ त जनरल गॉर्डन यानें बुगांडा व उनयोरो येथील राज्यें खालसा करून ईजिप्शियन अंमलाखालीं आणण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिश सरकारची या गोष्टीस अनुमति नसल्यामुळें तो सफळ झाला नाहीं. १८५७ च्या पूर्वीं बुगांडा येथें सुना नांवाचा राजा राज्य करीत होता. १८५७ त त्याचा प्रसिद्ध मुलगा मुतेसा हा गादीवर आला. त्यानें प्रथम यूरोपियनांनां आपल्या राज्यांत चांगला आश्रय दिला. अरबांनींहि मुतेसाकडे येऊन इस्लामी धर्म तेथें स्थापण्याचा प्रयत्न केला. निरनिराळ्या यूरोपियन मिशनर्यांनींहि ख्रिस्ती धर्माचा पगडा बसविण्याची खटपट चालू केली. याप्रमाणें १८७९ सालापासून बुगांडा येथें अँग्लिकन, रोमनकॅथोलिक व इस्लाम या पंथांतील चुरशीच्या तिरंगी सामन्यास सुरवात झाली. या सामन्यांत प्रथम इस्लामच विजयी झाला. १८८४ मध्यें मुतेसा मरण पावला व म्वांगा गादीवर आला. आपले हजारों प्रजानन मिशनर्यांच्या धर्मांत गेलेले पाहून त्यानें आपल्या राज्यांतून ख्रिस्ति धर्माचा समूळ उच्छेद करण्याचें ठरविलें. शिवाय ब्रिटनच्या मुलुखगिरीच्या लाटाहि यावेळीं जोरानें उसळ्या मारीत होत्या व युगांडाचें राज्य त्यांच्या खालीं बुडून जातें कीं काय अशी म्वांगाला भीति वाटूं लागली. यामुळें तर ख्रिस्त्यांविरुद्ध त्याचा क्रोध अनावर झाला. ख्रिस्ती प्रजाजनांनां जिवंत जाळण्यांत येऊं लागलें. या छळामुळें म्वांगाविरुद्ध पद्धतशीर व जोराचा विरोध होऊन लवकरच त्याला पदच्युत करण्यांत आलें व त्याचा वडील भाऊ किवेवा याला राज्यावर बसविण्यांत आलें. किवेवाला आपल्या धर्माची दीक्षा देण्याबद्दल इस्लामानुयायी व ख्रिस्तानुयायी यांच्यांत आतां जोराची चुरस सुरू झाली. ख्रिस्ती पुढार्यांनां कापून काढून अरबांनीं त्यांचा विरोध निष्फळ केला व किवेवा सुंता करून घेण्यास कबूल होईना म्हणून त्याला पदच्युत करून त्याचा भाऊ कालेमा याला त्यांनीं राज्याभिषेक केला. यावेळीं युगांडा घशांत घालण्यासाठीं फ्रेंच व इंग्रज हे दोघेहि टपून बसले होते. डॉ. कार्ल पेटर्स या नांवाच्या जर्मनानें १८०० सालीं गुप्तपणें म्वांगाशीं तह केला. याच वर्षीं कालेमा हा मरण पावला व बोगो हा गादीवर आला. जॅक्सननें (हाच पुढें ब्रिटिश ईस्ट आफ्रिकेचा ले. गव्हर्नर झाला) म्वांगापुढें नवीन तहनामा सादर केला पण त्यांतील अटी फ्रेंचांनां मान्य नसल्यामुळें त्यानें तो परत घेतला. युगांडामध्यें याप्रमाणें परिस्थिति असतां १८९० च्या जुलैमध्यें तिकडे इंग्लंड व जर्मनी यांचा तह होऊन त्या तहान्वयें युगांडा ग्रेटब्रिटनच्या स्वाधीन करण्यांत आला व कॅप्टन एफ. डी. लुगार्ड याला तो तह अंमलांत आणण्याकरतां पाठविण्यांत आलें. या तहाची माहिती होतांच फ्रेंच लोकांत मोठी गडबड उडाली. पण लुगार्डनें फ्रेंच व ब्रिटिश या दोन धर्मसंघांनां एक करण्याविषयीं प्रयत्न केले व या प्रयत्नांमुळें फ्रेंच व ब्रिटिश तात्पुरते कां होईना एक झाले. या एकीच्या बळावर त्यानें मुसुलमानांचा पराभव केला. वर उल्लेखिलेली फ्रेंच तटामधील एकी केवळ तकलबी होती. कँपाला शहरानजीकच्या ब्रिटिश छावणीवर फ्रेंचांनीं छापा घातला, परंतु त्यांचा पराभव होऊन ते सेसी बेटाकडे पळून गेले. १८९२ मध्यें, फरारी झालेला म्वांगा मेंगो येथें येऊन दाखल झाला. ब्रिटिश सरकारनें तह केला व ब्रिटिश झेंडा बुगांडाच्या राजधानीवर फडकूं लागला. बुट्टु प्रांत फ्रेंचांनां देण्यांत येऊन त्यांचें समाधान करण्यांत आलें. मुसुलमान व त्यांचा राजा बोगोला ह्यांनां युगांडामधील तीन लहान प्रांत देण्यांत आल्यामुळें तेहि स्वस्थ बसले. १८९४ च्या जूनमध्यें युगांडा (बुगांडाचें राज्य) ब्रिटिश संरक्षित संस्थान म्हणून पुकारण्यांत आलें. १८९६ मध्यें उनयोरो व बुसोगा हीं राज्येंहि ब्रिटिश संरक्षणाखालीं घेण्यांत आलीं. पुढें म्वागानें बंड केलें पण तें मोडण्यांत आलें.
१९०० सालीं मेंगोच्या तहानें म्वांगाचा मुलगा दौदीच्वा या तरुण राजाला ‘हिज हायनेस (राजा) काबाआ’ ही पदवी अर्पण करण्यांत आली. १९०६ सालीं हेनरी हेस्केथ बेल हा युगांडाचा पहिला गव्हर्नर झाला. १९१० सालानंतर युगांडाच्या अंतर्गत कारभारांत बर्याच सुधारणा घडून आल्या व या सुधारणा घडवून आणण्याच्या कामीं मिशनर्यांनीं बरेच प्रयत्न केले. १९१४-१८ कालांतील महायुद्धामुळें फारशी प्रगति घडून आली नाहीं. १९११-१७ पर्यंत जॅक्सन हा युगांडाचा गव्हर्नर होता; व त्याच्या कारकीर्दींत युगांडाच्या नैर्ऋत्य व पश्चिम सरहद्दी बेल्जम व जर्मनी यांच्याशीं वाटाघाट करून निश्चित करण्यांत आल्या. जर्मन ईस्ट ऑफ्रिकेंतील जर्मनीच्या ताब्यांत असलेला कीगेझीचा मुलूख (क्षेत्रफळ २०५६ चौरस मैल) युगांडामध्यें समाविष्ट करण्यांत आला. १९१४ सालच्या नवीन झालेल्या प्रादेशिक फेरफारामुळें युगांडामधील कांहीं प्रदेश सूदनसरकारला देण्यांत आला व त्याबद्दल युगांडाला नाईलच्या पश्चिमेकडील व आल्बर्ट नियांझाच्या उत्तरेकडील मुलूख मिळाला. जॅक्सनच्यानंतर कोरिडन हा युगांडाचा गव्हर्नर झाला. याच्या कारकीर्दींत युगांडाच्या राज्यकारभारासाठीं एक नवीन कायदेमंडळ स्थापन करण्यांत आलें पण ब्रिटिशांच्या वसाहतविषयक धोरणामुळें युगांडांतील हिंदी लोकांनां चीड आल्यामुळें त्यांनीं आपला प्रतिनिधि कायदेमंडळामध्यें निवडून दिला नाहीं.