प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

युद्ध, व्यु त्प त्ति व व्या ख्या:- हा शब्द युध् = लढणें ह्या धातूपासून झालेला आहे. शस्त्रास्त्रांनीं युक्त अशा दोन राष्ट्रांतील कलहास युद्ध ही संज्ञा आहे. युद्धामध्यें प्रत्येक पक्ष आपल्या शक्तीच्या जोरावर व शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानें आपली इच्छा दुसर्‍यावर लादूं पाहतो. युद्ध चालू असणें ही शांततेच्या उलट असणारी स्थिति होय. युद्ध हें एक शास्त्र व तसेंच कलाहि आहे.

सामान्यतत्त्वें
अ र्वा ची न स्थि ति.-आधुनिक काळामध्यें युद्धकलेमध्यें विलक्षण क्रांति घडून आली आहे पण ही क्रांति घडून येण्यास औद्योगिक प्रगतिं. विद्येचा प्रसार. यांत्रिक कलेंतील शोध वगैरेंपैकीं कोणतें कारण प्रमुखत्वानें आहे हें सांगणें थोडें कठिणच आहे. सैन्याची हालचाल हें लढाईचें मुख्य अंग होय; ह्यास्तव हल्लींच्या काळीं चांगल्या सडका, आगगाड्यांचे रस्ते व घोडे, बैल वगैरे वाहतुकीचीं जनावरें जमविण्याच्या कामांत आलेली सुलभता, यामुळें कल्पनातींत फरक पडला आहे. सैन्याच्या हालचालीशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे अन्नसामुग्रीचा पुरवठा ही होय. या बाबतींत लागवड केलेल्या क्षेत्राची विस्तृतता, भक्ष्य प्राण्यांची वाढ, भक्ष्य पदार्थांच्या व्यापाराची वाढ, ह्यामुळें लढाई बरेच दिवस चालली असतांना उत्पन्न होणार्‍या अडचणी बर्‍याच कमी झालेल्या आहेत. युद्धांतली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यसंहारकारक साधनें ही होय. याहि बाबतींत अर्वाचीन शस्त्रास्त्रांत विलक्षण सामर्थ्य येत असून बंदुकीच्या दारूच्या ऐवजीं इतर विनाशक द्रव्यांचा उपयोग होऊं लागल्यापासून लढाईंत मनुष्यसंहार फारच भयंकर प्रमाणांत होऊं लागला आहे. युद्धासंबंधीं चवथीहि गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हल्लींच्या व पूर्वींच्या युद्धांत एक मोठाच फरक आहे. हल्लींचीं युद्धें एखाद्या विशिष्ट मनुष्याच्या लहरीकरतां होत नसून किंवा दोन राजे व त्यांचे अनुयायी यांच्यामध्यें होत नसून दोन सुसंघटित राष्ट्रांच्या लोकांमध्यें विशिष्ट उद्देशानें व राष्ट्रांतल्या सर्वात्कृष्ट सेनानायकाच्या सल्ल्यानें होत असतात. पण दुसरीहि एक गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे, ती ही कीं, हल्लीं लढणार्‍या लोकांची संख्या लाखांनीं मोजण्यासारखी असते. अशा वेळीं सर्व सैन्यास जर एखादा निरोप कळवावयाचा असेल तर प्रत्येक सैन्यामध्यें दळणवळणाचे मार्ग, त्याचप्रमाणें तारायंत्र, टेलिफोन, विमानें, फार दूरवर असलेल्या वस्तू दाखविणार्‍या दुर्बिणी वगैरे सामुग्री भरपूर पाहिजे. हीं साधनें प्रत्येक राष्ट्रामध्यें भरपूर असल्यामुळें अर्वाचीन काळीं युद्धकलेमध्यें फारच प्रगति झालेली आहे. सैन्याच्या हालचाली, त्यांनां रसद पुरविणें, त्यांनां निरोप कळविणें ह्या गोष्टी अलीकडे बर्‍याच सुलभतेनें होऊं शकतात.पण इतर बाबतींत सुलभतेमुळेंच युद्ध चालविणें हें अवघड होऊन बसलें आहे. हल्लींचीं शस्त्रें जरी जास्त सुधारेललीं व जास्त प्राणघातक आहेत तरी पण तीं कुशल व सशक्त माणसांनीं वापरलीं तर त्यांचा लढाईच्या कामीं चांगला उपयोग होतो. पण तींच माणसें जर अडाणी असलीं तर तींच शस्त्रें निरुपयोगी ठरतात. हल्लींचें युद्धशास्त्र इतक्या परिणतावस्थेला गेलेलें आहे कीं, एखाद्या नवशिक्या सेनापतीनें जर आरंभीं थोडी चूक केली तर तिचा परिणाम सर्व सैन्यास भयंकर रीतीनें भोगावा लागतो. सैन्याची तयारी उत्तम ठेवणें ही एक वर्तमानकाळीं मोठीच कला होऊन बसली आहे. व ती मुत्सद्दी व सेनानायक ह्या दोघांसहि सारखीच शिकावी लागते. १८७० सालच्या पूर्वी असें एकच राष्ट्र यूरोपखंडांत होतें कीं ज्या ठिकाणीं युद्धाच्या वेळीं ताकद व धैर्य ह्यापेक्षां बुद्धि व शिक्षण ह्यांचाच उपयोग होतो हें तत्त्व पूर्णपणें समजलें होतें. तें राष्ट्र म्हणजे प्रशिया हें होय. नेपोलियन बोनापार्टनें येना येथें प्रशियाचा जो मोठा पराभव केला त्यामुळें प्रशिया देशाला मानहानी वाटून असा प्रसंग पुन्हां आपल्या देशावर निष्कारक येऊं नये म्हणून त्यानें आपल्या सैन्याची नवीन तर्‍हेनें रचना केली. ही रचना लष्करी दृष्टीनें, आर्थिक दृष्टीनें व राजकीय दृष्टीनें इतकी उत्तम ठरली कीं तिचेंच अनुकरण यूरोपांतील इतर राष्ट्रें करूं लागलीं. ह्या नवीन तर्‍हेच्या रचनेची गुरुकिल्ली अशी आहे कीं, सेनाध्यक्षाच्या दिमतीस राष्ट्रांतील सर्व प्रकारच्या बुद्धिवान माणसांनीं आपली बुद्धिमत्ता द्यावी, त्यामुळें हल्लीं असा प्रकार घडूं लागला आहे कीं, लायक माणसांशिवाय इतर कोणालाच सैन्यांतील अधिकार मिळत नाहीं व प्रत्येक लष्करी कामगाराला एखादा डॉक्टर किंवा वकील ह्याप्रमाणें आपल्या धंद्याचें संपूर्ण ज्ञान संपादावें लागते. कोणत्याहि काळाचा इतिहास वाचला असतां युद्धामध्यें यशाची गुरुकिल्ली धैर्य या गुणामध्यें नसून ती बुद्धिमत्तेंतच आहे हें स्पष्ट होतें. प्राचीन काळचे शूर योद्धे हॅनिबाल, शिकंदर किंवा ज्युलियस सीझर, किंवा अर्वाचीन काळचे श्रीशिवाजीमहाराज, नेपोलियन, ड्यूक ऑफ वेलिंग्टन हे जर नुसते धीट असते किंवा अनुभविक असते तर त्यांनां एवढे जय मिळाले असते किंवा नाहीं ह्याबद्दल वानवाच आहे. पण त्यांची बुद्धिमत्ता अलोट होती म्हणूनच रणधुरंधर म्हणून त्यांचीं नांवें इतिहासपटावर कायमची लिहीलीं गेलीं आहेत.

पण लढाईंत बुद्धिमत्तेचा उपयोग फार होतो ही गोष्ट प्रमुखपणें १८६६ व १८७० ह्या सालींच जगाच्या निदर्शनास प्रशिया राष्ट्रानें आणून दिली. १८६६ सालापूर्वी ज्या लढाया झाल्या त्यांवरून लोकांस एकच गोष्ट ठाऊक होती; ती ही कीं लढाईंत जर जय संपादन करावयाचा असेल तर सेनापति युद्धकलाविशारद व सुशिक्षित असलाच पाहिजे. पण १८६६ व १८७० ह्या वर्षीं जीं युद्धें झालीं त्यांत ही गोष्ट सिद्ध झाली कीं, युद्धाच्या वेळीं नुसता सेनापतीच युद्धकुशल असून भागत नाहीं तर सैन्यांतील प्रत्येक शिपाई सुद्धा शिकलेला असला पाहिजे. मोल्टके हा पूर्वीं होऊन गेलेल्या योद्धयांपेक्षां कोणत्याहि तर्‍हेनें हीन नव्हता पण त्याच्यांत व पूर्वींच्या सेनापतींत हा विशेष फरक होता कीं, त्यानें जितके शिकलेले दुय्यम सेनापती आपल्या सैन्यांत जमविले होते तितके कोणत्याहि पूर्वीच्या सेनापतीनें गोळा केले नव्हते. ह्या दोन वर्षांच्या लढायांसंबंधानें दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे ती हीं कीं, या लढायांत जितक्या कमी चुका झाल्या तितक्या कमी चुका पूर्वींच्या कोणत्याहि लढाईंत झाल्या नसतील. ह्याचा परिणाम असा झाला कीं, जर्मनीला ह्या लढाईंत केवळ सात आटवड्यांतच दोन विलक्षण जय मिळवतां आले. फ्रेंच किंवा आस्ट्रियन लोक जर्मन लोकांपेक्षां कोणत्याहि तर्‍हेनें कमी दर्जाचे होते असें कोणासहि म्हणतां यावयाचें नाहीं. मग फ्रेंच लोकांचा एवढा मोठा पराभव होण्याचें कारण काय ? तर फ्रान्समध्यें लष्करी शिक्षणाचा अभाव हें होय.

मु त्स द्दी व यु द्ध.-लोकांची युद्धाबद्दलची कल्पना अशी आहे कीं युद्धांमध्यें ज्या पक्षाकडे जास्त संख्याबल असतें व जास्त बाहुबल असतें तोच पक्ष विजयी होतो. पण ही कल्पना चुकीची आहे. त्याचप्रमाणें लढाई म्हणजे नुसतें राजकारण नव्हे. युद्ध हें राजकारणांतील एक भाग असून त्याचे परिणाम फार दूरवर पोंचलेले असतात. म्हणून युद्धकलेचा व राजकारणाचा अभ्यास काळजीपूर्वक करावयास पाहिजे. पण नुसता तात्त्विक दृष्टीनें केलेला युद्धकलेचा अभ्यास फारसा उपयोगी पडत नाहीं. त्या अभ्यासाला अनुभवाचीहि जोड असावी लागते. तेव्हां युद्धकलेचा अभ्यास जर सुव्यवस्थितपणें मुत्सद्दयांनीं केला तर सुव्यवस्थित घटना, लष्करी शिक्षण, कवाईत, तत्परता ह्यांचें महत्त्व त्यांनां चांगलें कळेल. युद्धकाळीं जर सेनापतीनीं चुका केल्या तर त्याबद्दल ते त्यांनां कधींहि क्षमा करणार नाहींत व स्वत: त्यांनां लढाईंचें सम्यक् ज्ञान असल्यामुळें सैन्यांतील प्रत्येक शिपायानें नेमून दिलेल्या कामांत प्रावीण्य मिळवावें असा आग्रह ते धरतील. इतकेंच नव्हे तर कोणत्या गोष्टींत लढाईच्या बाबतींत आपण सेनाध्यक्षांस सल्ला द्यावा व कोणत्या गोष्टींत मौन स्वीकारावें ह्याबद्दलहि मुत्सद्दी विचार करतील व एकंदर सर्व राष्ट्रांचें कल्याण होईल. मुत्सद्दयांनीं जर युद्धशास्त्राचा अभ्यास केला तर युद्धाच्या वेळीं आपल्या राष्ट्राचें रक्षण करण्यास रस्ते मुबलक असणें, आगगाड्या, दारुगोळ्याचीं कोठारें, गोद्या, दुर्ग वगैरे असणें किती अगत्याचें आहे व त्यांकडे वारंवार लक्ष पुरविणें किती जरूरीचें आहे हें त्यांच्या चटकन ध्यानांत येईल. त्याचप्रमाणें परराष्ट्रकारण म्हणजे निरनिराळ्या राष्ट्रांशीं आपल्या राष्ट्रास हितावह अशीं खलबतें व योजना करणें हीहि गोष्ट तितक्याच महत्त्वाची आहे हेंहि त्यांनां समजून येईल.

प्रत्येक गोष्ट सांप्रतकाळीं विशेष महत्त्वाची गणली आहे. १८ व्या शतकांत इंग्लिश मुत्सद्दी व डच मुत्सद्दी हे युद्धांत व्यूहरचना करीत पण तीमुळें त्यांच्या राष्ट्रावर फारशी आपत्ति आली नाहीं. त्याचप्रमाणें १७९२-१७९५ सालीं आस्ट्रियानें जीं युद्धें केलीं त्यांमध्यें फ्रान्सच्या सैन्याविरुद्ध त्या राष्ट्रावर चांगले जय मिळाले. त्याचप्रमाणें १८५४ व १८५९ ह्या सालीं न्यूकॅसल व तिसरा नेपोलियन ह्यांनां चांगले जय मिळाले; पण आपण ही गोष्ट ध्यानांत धरली पाहिजे कीं, त्या त्या वेळीं दोन्ही पक्ष लष्करी ज्ञानाच्या बाबतींत तुल्यबल होते. पण त्याच आस्ट्रियाचे व फ्रान्सचे जेव्हां जर्मन राष्ट्राशीं दोन हात झाले त्यावेळीं जर्मनीचें लष्करी ज्ञानबल अधिक असल्यामुळें त्या दोन्ही राष्ट्रांनां दातीं तृण धरूण शरण यावें लागलें. १८९९ सालीं बोअर युद्धाच्या वेळीं बोअरसैन्यामध्यें जर चांगले शिकलेले व्यूहरचनाकुशल असते तर इंग्रज सरकारला बोअर लोकांनां जिंकणें अशक्यच होऊन बसलें असतें. कोठलेंहि युद्ध चालवितांना मुख्य गोष्ट जी ध्यानांत धरावयाची ती ही कीं, प्रत्येक सेनापतीनें युद्धाच्या वेळीं फारच थोड्या चुका केल्या पाहिजेत. ह्या चुका जर जास्त झाल्या तर व शत्रु जर कुशल असेल तर त्यापासून भयंकर आपत्ति येण्याचा संभव असतो.

र क्ष णा र्थ त या री.-प्रत्येक राष्ट्रानें आपल्या देशाचें संरक्षण कसें करावें ह्याबद्दल इतिहासांत बरीच माहिती मिळते. ह्यासंबंधानें इतिहासांतील ठळक उदाहरण म्हणजे फ्रान्सच्या रक्षणार्थ व्हाबननें बांधिलेले किल्ले होत. ह्या किल्ल्यांचें महत्त्व चवदाव्या लुईला चांगलें समजलें होतें. ह्यावरूनच तो हीन दर्जाचा मुत्सद्दी नव्हता ही गोष्ट आपोआप सिद्ध होते. त्यानंतरचें दुसरें ठळक उदाहरण म्हणजे ड्यूक ऑफ वेलिंग्टन ह्यानें पोर्तुगाल देशांत नेपोलियनच्या सैन्याशीं लढण्याकरितां बांधिलेले किल्ले हें होय. ह्या किल्ल्यांमुळें वेलिंग्टनला वाटेल त्या ठिकाणीं शत्रूशीं लढतां येत असे. त्याचप्रमाणें लांबर्डि व रुमीलिया ह्या देशांत आस्ट्रिया व तुर्कस्तान ह्या राष्ट्रांनीं बांधिलेले प्रसिद्ध किल्ले त्या त्या देशांचें फार उत्कृष्टपणें संरक्षण करीत आहेत. किल्ल्यांच्या खालोखाल राष्ट्ररक्षणाच्या कामीं आगगाड्यांची फार चांगली मदत होते व ह्याच आगगाड्यांच्या जोरावर जर्मनीला आस्ट्रिया व फ्रान्स ह्या राष्ट्रांचा पराभव करतां आला. शिवाय फ्रान्सच्या सरकारनें मेट्झ व स्ट्रासबर्ग ह्या किल्ल्यांची तटबंदी बरोबर न केल्यामुळें त्या किल्ल्यांचा सैन्यरचनेच्या बाबतींत फारसा उपयोग होऊं शकला नाहीं. इतकेंच नव्हे तर ह्या किल्ल्यांचें संरक्षण करण्याकरतांच फ्रेंच सरकारास बरेंच सैन्य डांबून ठेवावें लागलें. ह्याचा एकंदर परिणाम म्हटला म्हणजे फ्रान्सदेशाचा भयंकर पराजय हा होय. स. १८७० च्या फान्सच्या पराजयानें यूरोपखंडाला एक नवीनच धडा शिकविला. त्यानंतर यूरोपमधील प्रत्येक राष्ट्र पुढील युद्धाची तयारी चांगल्या तर्‍हेनें करीत होतें व ही तयारी करणें आपलें आद्य कर्तव्य आहे अशी प्रत्येक राष्ट्राच्या सरकारची ठाम समजूत झालेली होती. यूरोपांतील प्रत्येक राष्ट्राच्या सरहद्दीवर हल्लीं दुर्गमाला असते व प्रत्येक दुर्गाभोंवतीं खंदक असतात व प्रसंग आला असतां त्या खंदकाचें व दुर्गाचें रक्षण करण्यास योग्य अशी फौज असते. रेल्वे बांधतांना ती रेल्वे व्यापारी दृष्टीनें व लष्करी दृष्टीनें सोयीची होईल हाहि विचार त्या त्या देशांतील सरकार करीत असतें.

प र रा ष्ट्र का र ण व यु द्ध यो ज ना ह्यां म धी ल सं बं ध.-ह्या दोहोंत फार निकट संबध आहे. यूरोपखंडांत ह्या दोहोंचां संबंध राहूं शकतो; कारण तेथें रणक्षेत्र प्रत्येक राष्ट्राच्या आटोक्यांत असतें. पण ज्यावेळीं मध्यें समुद्र आल्यामुळें दोन युद्धमान राष्ट्रांमध्यें बरेंच अतंर असतें त्यावेळीं खरी अडचण दृग्गोचर होऊं लागते व शत्रूला निर्वाणीचा खलिता पाठवून ताबडतोब सैन्य पाठवून लढाई पुकारणें ह्या गोष्टी अशक्य होऊन बसतात. अर्वाचीन काळीं सुधारलेल्या युगामध्यें शत्रूस बिलकुल खबर न देतां मोठें सैन्य किंवा आरमार सरहद्दीवर जमविणें ही गोष्ट जवळ जवळ अशक्यकोटीतील आहे. म्हणून लढाई पुकारणें व सैन्याची जुळवाजुळव करून लढाईस प्रत्यक्ष आरंभ करणें ह्यामध्यें थोडा तरी काळ लोटणें अपरिहार्य आहे. पण ह्यावरून जर कोणी असें अनुमान काढलें कीं प्रत्येक राष्ट्रानें निर्वाणीचा खलिता पाठविल्यावर सैन्याचा जमाव करण्याची तयारी करावी किंवा सरहद्दीवरील किल्ल्यांची डागडुजी व तटबंदी करण्यास आरंभ करावा तर तें अनुमान किती बरें चुकीचें होईल ? १८९९ सालीं इंग्रज सरकारचा दक्षिण आफिकेंत जो मुलुख होता त्याचा बंदोबस्त बरोबर नसल्यामुळेंच बोअर लोकांनां इंग्रज सैन्यास जोराचे तडाखे देतां आले. तेव्हां ही गोष्ट सिद्ध झाली कीं, आपली सरहद्द आणि आपलें सैन्य व आरमार हें प्रत्येक राष्ट्रानें मजबूत व सज्ज ठेवलीं पाहिजेत आणि हीं करणें अगदीं शक्य आहे. कांहीं कांहीं प्रसंगीं लढाईला प्रारंभ होतांच आपला सरहद्दीवरील मुलुख सोडणें आवश्यक होऊन बसतें. ह्याला उत्कृष्ट उदाहरण म्हणजे फ्रँको-जर्मन युद्धांतील एक प्रसंग हें होय. मोल्टकेचा मूळ उद्देश म्हटला तर आपलें सैन्य पश्चिमसरहद्दीवर जमविणें हा होय. कारण त्याला असें वाटलें कीं, फ्रेंच लोकसंख्येनें कमी असल्यामुळें ते आपलें सैन्य मोसेल नदीपर्यंत मागच्या बाजूस जमवितील. पण ही मोल्टकेची अटकळ चुकली व फ्रेंच लोकांनीं आपलें सैन्य सार नदीकांठीं जमविण्यास सुरवात केली. ताबडतोब जर्मनीमध्यें मोठी गडबड होवून जो तो मोल्टकेला नांवें ठेवूं लागला. र्‍हाईन व सार ह्या दोन नद्यांमधल्या सुपीक प्रांतांचें रक्षण करण्यास ताबडतोब सैन्य पाठवावें अशी मागणी राष्ट्राकडून होऊं लागली पण मोल्टके हा खंबीर मनाचा असल्यामुळें त्यानें ह्या ओरडीकडे बिलकुल लक्ष दिलें नाहीं व आपलें धोरण कायम ठेऊन ठराविक कार्यक्रम पार पाडला.

प्रत्येक राष्ट्रानें बळकट मार्‍याच्या जागा बांधणें, दळणवळणाचे मार्ग ताब्यांत ठेवणें व दारूचीं कोठारें व वाहतूकीची जहाजें तयार ठेवणें ह्या गोष्टी केल्या पाहिजेंत व उद्यां लढाई होईल अशा बुद्धीनेंच त्या केल्या पाहिजेत व त्या करतांना गुप्तपणाहि राखिला पाहिजे; तरच परराष्ट्रकारण व सैन्यरचना ह्यांचा निकट संबंध राहील.

यु द्ध खा त्या च्या प्र धा ना चीं क र्त व्यें.-ज्याचा सर्व जन्म मुलखी खात्यांत गेला अशा माणसानें किती जरी युद्धशास्त्राचा व्यासंग केला तरी सैन्यरचनेसंबंधींचे सर्व प्रश्न त्यानें सोडवणें हें अशक्यच आहे. युद्धशास्त्राच्या केवळ तात्त्विक अभ्यासाच्या जोरावर शिबंदी कोठें व किती ठेवावी, तटबंदीचे किल्ले कोठें किती असावे, लष्करी दृष्ट्या रस्त्यांची बांधणी कोठें सुरू करावी वगैरे प्रश्न त्याच्या हातून सुटणें शक्य नाहीं. त्यानें हे सोडविण्याचें काम सेनापतीवरच सोंपवावें हें बरें, तरी पण युद्धखात्याच्या प्रधानाला लढाईचीं सूत्रें हलविण्याची जबाबदारी अजिबात टाळतां येत नाहीं. लढाईचे नकाशे तयार करणें, कोठल्याहि वेळीं कसलीहि अडचण आली असतांना त्याबद्दल तिची अटकळ करून तिजबद्दल तरतूद करणें, या गोष्टी त्यानें शांततेच्या वेळीं करावयास पाहिजेत. त्याचप्रमाणें आपणांस जो लष्करी सल्ला मिळत आहे तो विश्वसनीय माणसाकडून मिळत आहे ह्याबद्दल त्यानें खातरी करून घेतली पाहिजे. त्याप्रमाणें लष्करी तज्ज्ञांनीं केलेली लढाईची व्यवस्था, नकाशे वगैरे बरोबर आहेत किंवा नाहींत, कोणत्या जागेवर कोणास नेमावें, वगैरे बाबतींत त्याला स्वतंत्रपणें मत बनवितां आलें पाहिजे.

ह्या वर सांगितलेल्या गोष्टींचें ज्ञान इंग्लंडमधील मुत्सद्दी थोरला पिट ह्यास होतें म्हणूनच सप्तवार्षिक युद्धामध्यें त्याला फ्रेंच लोकांवर चांगले जय मिळवितां आले. त्याचप्रमाणें युद्धयोजनाशास्त्राला राजनीतिशास्त्र व राष्ट्रांतील संपत्ति ह्यांनां अगदींच धाब्यावर बसवितां येत नाहीं; व नेहमींच सेनापतीची दृष्टि व मुत्सद्दयाची दृष्टि एक राहील अशांतला भाग नाहीं. पण राष्ट्ररक्षणाच्या कामीं संपत्तीचा विचार बाजूला ठेवून केवळ लष्करी दृष्टया राष्ट्र कसें सुरक्षित राहील हा विचार करावा लागतो. एखाद्या वेळीं राष्ट्राची राजकीय परिस्थिति नाजूक व चिंताग्रस्त झाली असतांना एखादा जर चांगला जय मिळाला तर ती स्थिति ताबडतोब सुधारते व ह्याच्या उलट लागोपाठ दोन तीन पराजय होत गेले तर चांगली असलेली परिस्थिति तत्काल बिघडून जाते. अशा वेळीं सेनापंति व मुत्सद्दी ह्यांनां जर सुशिक्षित जनसमाजाचें पाठबळ असलें तर सैन्यांतली बिघडलेली परिस्थिति ताबडतोब सुधारून पुन्हां तेंच सैन्य विजयशाली होतें. ह्याचें उदाहरण म्हणजे १८६८ सालीं अमेरिकन संयुक्त संस्थानांतील वर्तमानपत्रकारांचें होय. अमेरिकेंतील प्रमुख सरदार लीव जॉन्स्टन याला कांहीं कारणामुळें माघार घ्याव लागत असतांना दक्षिण संस्थानांतील वर्तमानपत्रकारांनीं लोकांचा बिलकुल धीर खचूं दिला नाहीं कारण त्यांनां ठाऊक होतें कीं प्रसंगविशेषीं जरी थोडी माघार घ्यावी लागली किंवा कांहीं मुलुख सोडावा लागला तरी सर्व सैन्याचा नाश होण्यापेक्षां अशा तर्‍हेची पिछेहाट अंतिम फलदायी असते. अशा तर्‍हेचें पाठबळ सेनापति व मुत्सद्दी ह्यांनां मिळण्यास लोक व सरकार यांच्यामध्यें सलोखा असावा लागतो. १८६६ व १८७० सालीं जर्मनीस आस्ट्रिया व फ्रान्स या राष्ट्रांवर जे जय मिळवितां आले याचें असें एक कारण होतें कीं जर्मनीमधील वर्तमानपत्रें सरकारी धोरण निमूटपणें संभाळीत असत, व प्रशियाचा राजा युद्धकलावि शारद होता तरी तो मोल्टके याची थोर योग्यता जाणून त्याच्याच तंत्रानें वागत असे. अशा प्रकारें सरकार व लष्करी खातें ह्यांत जर ऐक्य नांदत असेल तर यशाची गुरुकिल्लीच हातीं आली म्हणून समजावें. सध्या या कामाकरितां प्रसिद्धि खातें म्हणून एक स्वतंत्रच खातें असतें.

दा रु गो ळ्या चा नै ति क प रि णा म.-अर्वाचीन काळीं युद्धाच्या आयुर्मर्यादेवर नवीन तर्‍हेच्या बंदुका व तोफा यांचा बराच परिणाम झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळीं ज्यावेळीं लढाई हातघाईवर येत नसे त्यावेळीं रणक्षेत्रावर फारशी प्राणहानि होत नसे. कारण लढाईंत प्रत्यक्ष भाग घेणार्‍या सैन्याच्या फारच थोड्या भागावर बराच वेळ शत्रूचा अग्निवर्षाव होत असे. पण हल्लीं ही स्थिति पार पालटून गेली आहे. एकदां जर सैन्यांतील शिपायांस आपण शत्रुसैन्यांतील शिपायांपेक्षां कमी दर्जाचे आहोंत असें वाटूं लागलें तर त्यांचा लढण्याचा उत्साह ताबडतोब मावळून ते कुचकामाचे ठरतात. केवळ लढण्यानें आपलें नुकसान होईल ह्या कल्पनेनेंच ते गलितधैर्य होऊन बसतात. अशा वेळीं शिपाई लोकांमध्यें जर कडक शिस्त, राष्ट्राभिमान वगैरे गुण नसतील तर त्यांच्यामध्यें भीतीचें साम्राज्य पसरून ते ताबडतोब शत्रूच्या स्वाधीन होऊं लागतील. ही स्थिति कॅप्टन होएनिग यानें वर्णन केलेल्या ३८ साव्या प्रशियन तुकडीची झाली होती अशा वेळीं एखादी तुकडीच काय पण सर्व सैन्यच शत्रूस शरण जातें. तेव्हां सेनापतीनें असले प्रसंग जर टाळावयाचे असतील तर त्यानें लढाई चालवितांना यत्किंचित चुकी, किंवा चुकीचा हुकूम किंवा विशिष्ट प्रसंगीं सैन्य पाठविण्यास दिरंगाई वगैरे प्रमाद कधींहि करतां कामा नयेत.

आ र मा री व ल ष्क री ब ल-प्रत्येक सरकारनें परराष्ट्रकारण व कायदेकानू यांकडे जितकें लक्ष पुरविलें पाहिजे तितकेंच किंबहुना जास्त लक्ष आपलें सैन्य व आरमार यांकडे सुद्धा पुरविलें पाहिजे ही गोष्ट जितकी जर्मनी वगैरे देशांनां उमजली आहे तितकी इतर देशांनां समजली नाहीं, कारण ह्या देशांची सरहद्द इतर देशांच्या सरहद्दीला नेहमीं भिडलेली असते व त्यांची राजकीय परिस्थितीच अशी आहे कीं, त्यांनां आत्मरक्षणाच्या बाबतींत नेहमीं दक्ष रहावें लागतें. इंग्लंडसारख्या देशांत अशी एक सामान्य समजूत आहे कीं, आपलें आरमार मजबूत असलें म्हणजे कोणत्याहि गोष्टीची फिकीर करण्याचें कारण नाहीं. पण ही समजूत किती भ्रामक आहे हें हल्लींच्या युद्धावरून इंग्लंडच्या मुत्सद्दयांच्या ध्यानांत आलेलेंच आहे. नुसत्या आरमारानें फार तर किनार्‍याचेंच रक्षण होईल; पण हरप्रयत्‍नानें शत्रूचें सैन्य जर किनार्‍यावर उतरलें किंवा देशांतच जर मोठें बंड झालें तर नुसत्या आरमारी बलानें शत्रूच्या मुलुखांत जाऊन त्याच्या सैन्याचा नाश करणें केव्हांहि शक्य नसतें व शत्रूला दमांत उखडून टाकणें हें जें युद्धांतलें एक ध्येय असतें तें सैन्याच्या मदतीनें साध्य होण्यासारखें आहे. एखादें राष्ट्र जर युद्धाच्या वेळीं नुसत्या आरमारावरच भिस्त ठेवील तर त्याला कुचंबणीच्या युद्धांवरच भिस्त ठेवावी लागेल व अशी कुचंबणा सुधारलेल्या राष्ट्रांनां कधींहि आवडत नाहीं. कारण हल्लीं सर्व राष्ट्रच युद्ध करीत असतें व जोंपर्यंत युद्ध चालू असतें तोंपर्यंत व्यापार व वसूल यांची राष्ट्रांत चांगली वाढ होत नसते, त्यामुळें साहजिकच लढाई जितकी लवकर संपेल तितकें चांगलें अशी राष्ट्रांतल्या लोकांची इच्छा असते. शिवाय आपल्या मनगटांत जोर असतांना नुसतें आत्मरक्षणाचें धोरण परचक्र आलें असतांना चालू ठेवणें हें इंग्लंड काय किंवा अमेरिका काय कोणत्याहि राष्ट्राला आवडणार नाहीं. दुसरी अशीहि गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे कीं, ज्या राष्ट्राला आरमारी सामर्थ्याची चांगली मदत आहे त्या राष्ट्राला सैन्याची विशेष जरूरहि नसते व त्या राष्ट्राचें सैन्य नि:संशय अजिंक्य होऊन बसतें. इंग्लंडच्या इतिहासावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. इंग्लंडचें सर्व राष्ट्रीय व व्यापारी जीवित आसपासच्या समुद्रावर आहे ही गोष्ट त्या देशाला फार दिवसांपासून कळून आल्यामुळें इंग्लंडनें आपल्या ताब्यांत जिब्राल्टर, माल्टा, एडन, सेंट लुसिया, ईजिप्त, सायप्रस वगैरे ठाणीं ठेविली आहेत. अँटवर्पची अशीच गोष्ट आहे. जोंपर्यंत अँटवर्प शहर इंग्लंडच्या शत्रूच्या ताब्यांत नाहीं तोंपर्यंत इंग्लंडला शत्रूपासून बिलकुल भय नाहीं. कारण ह्या शहराचें महत्त्वच तसें आहे. शेल्ट नदी ही अनेक बाबतींत थेम्स नदीच्या तोडीची आहे. ही नदी ज्या भागांतून वहात जाते ते भाग इंग्लंडच्या मध्यभागांतल्या परगण्यांहून जास्त सुपीक आहेत; त्याचप्रमाणें तिच्या दोन्ही तीरांवरील शहरें यूरोपमधल्या कोठल्याहि शहरांहून कमी प्रतीचीं नाहींत. अशा प्रकारच्या नदीच्या तीरावर अँटवर्प शहर वसलेलें आहे व हें शहर आरमारी शस्त्रागाराचें ठिकाण होण्यास सर्वथैव योग्य आहे. हें शहर ज्या देशाच्या ताब्यांत असेल त्या देशापासून आसपासच्या इतर राष्ट्रांनां बराच धोका आहे व इंग्लंडच्या शत्रूच्या ताब्यांत जर कां हें शहर गेलें तर इंग्लंडच्या जीवितास नि:संशय धोका असतो म्हणूनच बेल्जम राष्ट्र नेहमीं तटस्थ रहावें असा इंग्लंडचा आग्रह असतो ही गोष्ट इंग्लंडच्या इतिहासावरून स्पष्टपणें दिसून येईल. तथापि गेल्या महायुद्धांत जर्मनीनें अँटपर्व शहर सहज हस्तगत केलें परंतु इंग्लंडच्या आरमारी सामर्थ्यापुढें जर्मनीचें कांहीं चाललें नाहीं.

आ र मा री व ल ष्क री हा ल चा लीं चे प र स्प र सं बं ध.-इंग्लंड व फ्रान्स ह्यांमध्यें १७९३-१८१५ ह्या कालांत जीं युद्धें झालीं त्यांमध्यें इंग्लंडला जमिनीपेक्षां दर्यावरच जास्त जय मिळाले व त्यामुळें फ्रान्सचें आरमारी बल नाहींसें होऊन शेवटीं त्यास इंग्लंडपुढें कायमची हार खावी लागली. १८०९ सालीं इंग्लंडनें वाल्चेरन बेटावर सैन्य उतरविलें असते तर फार बरें झालें असतें. हें वाल्वेरन बेट नेदरलंडमध्यें फ्लशिंगजवळ आहे. ह्या बेटावर इंग्लंडनें सैन्य उतरविण्याचें कारण बेलजम देश व आसपासचा मुलुख व समुद्र फ्रान्सच्या ताब्यांत होता व त्याचें संरक्षण फ्रान्स देश आपलीं बरींच जहाजें ठेवून करीत असे. ह्या जहाजांचा नाश करावा व बेलजम देश घेऊन फ्रान्सचें समुद्रावरील वर्चस्व आपल्या आरमारी बलानें व सैन्यबलानें नाहींसें करावें म्हणून वालचेरनवर इंग्लंडनें आपलें सैन्य उतरविलें असतें व नेटानें मोहीम सुरू केली असती तर नेपोलियनचा चांगला पराजय होऊन त्यानें जीं जहाजें लढाईकरितां जमा केलीं होतीं त्यांचा नायनाट झाला असता व अशा रीतीनें अँटवर्पचा नाश झाल्यावर बरींच इंग्लिश जहाजें मोकळीं होऊन त्यांच्या योगानें इंग्रजी व्यापाराचें संरक्षण झालें असतें व १८१३ सालीं स्पेन देशांत लढत असतांना आपल्याला इंग्लंडच्या समुद्राच्या वर्चस्वाचा फायदा घेतां न आल्यामुळें आपलें सैन्य सुरक्षित नाहीं अशी तक्रार करण्यास वेलिंग्टनास जागा राहिली नसती. पण ह्या स्वारीमुळें एक फायदा असा झाला कीं, फ्रान्सचें आरमार नष्ट झालें. इंग्लंडनें वेलिंग्टनच्या मदतीनें स्पेन व बेलजम ह्या देशांत जी लष्करी कामगिरी केली तीमुळें इंग्लंडच्या बाबतींत तरी सैन्याचा उपयोग आरमाराला पोषक असा असावा व शत्रूचें आरमार उद्धस्त केल्यावरच सैन्याचा उपयोग शत्रूच्या मुलुखावर स्वारी करण्यांत व दोस्तराष्ट्रांनां मदत करण्यांत करावा ह्या सुंदर तत्त्वांची ओळख लोक विसरूं लागले होते; पण महायुद्धाचा शेवट झाल्यावर इंग्लंडला जो एकंदरींत फायदा झाला त्यामुळें वर सांगितलेलींच तत्त्वें बरोबर आहेत हें सिद्ध होतें. ह्या तत्त्वांचें अनुकरण केल्यामुळेंच इंग्लंडला फ्रान्सच्या वसाहती काबीज करतां आल्या, त्यांचीं बंदरें हस्तगत करतां आलीं व इतर परराष्ट्रानां, जलमार्गानें जात असतां वाटेंतलीं महत्त्वाचीं ठाणीं घेतल्यामुळें समुद्रावर वर्चस्व पूर्णपणें प्रस्थापित करतां आलें व त्यामुळें इंग्लंडच्या व्यापाराची कल्पनातीत वाढ झाली.

इंग्लंड व नेपोलियन ह्यांच्यामध्यें जें सारखें २५ वर्षें युद्ध चाललें होतें त्याचें मुख्य कारण म्हणजे हिंदुस्थानदेश कोणाच्या ताब्यांत असावा हा प्रश्न होय. फ्रान्सच्या गादीवर येण्याच्या अगोदरच नेपोलियनला हिंदुस्थानचें महत्त्व पूर्णपणें समजलें होतें. जो कोणी हिंदुस्थानच्या तख्तावर बसेल त्याला पूर्वेकडील देशांमधल्या व्यापाराचें स्वामित्व व पाश्चात्त्य देशांत उत्पन्न होणार्‍या मालाचा खप होणारी व्यापारी पेठ व ह्या दोन फायद्यांच्या अनुषंगानें प्राप्त होणारी पृथ्वीच्या अर्ध्या भागावरील सत्ता हीं मिळतील ही गोष्ट अवगत होती. पण नेपोलियनची सत्ता हिंदुस्थानांत प्रस्थापित होण्याच्या अगोदरच इंग्लिश लोकांचे पाय येथें चांगलेच रोंवले गेले होते, व हिंदुस्थानांतील आपली सत्ता कायम राहण्यास माल्टा व ईजिप्त हे देश आपल्या ताब्यांत पूर्णपणें असले पाहिजेत व ते जर नेपोलियनच्या ताब्यांत गेले तर तो मुसुलमान लोकांच्या मदतीनें थेट सिंधु नदीपर्यंत चाल करण्यास चुकणार नाहीं ह्या गोष्टी इंग्रज लोकांस पूर्णपणें ठाऊक होत्या; ही आपत्ति टळावी, आपलें हिंदुस्थानांतलें साम्राज्य कायमचें टिकावें म्हणूनच इंग्लंडनें नेपोलियनला रसातळास नेण्याचा एवढा अट्टाहास धरला व आटोकाट प्रयत्‍न केले. पण हा हेतु सिद्धीस नेतांना इंग्लंडला जितकी आरमाराची मदत झाली तितकीच सैन्याची मदत झाली ही गोष्ट आपण विसरतां कामा नये.

पण दयावर्दी राष्ट्राला शत्रूचे किल्ले काबीज करणें किंवा वसाहती हिरावून घेणें एवढींच कामें आपल्या सैन्याच्या जोरावर करतां येतात असें समजणें चुकीचें होईल. एखाद्या विवक्षित स्थळीं शत्रूच्या सैन्याला डांबून धरून त्याला त्या सैन्याचा इतरत्र उपयोग करून देणें ही महत्त्वाची कामगिरी करून आपल्याबरोबर लढणार्‍या इतर दोस्तराष्ट्रांनां सुद्धां दयावर्दी राष्ट्राला महत्त्वाची मदत करतां येते; स्पेनमधलें इतिहासप्रसिद्ध ‘पेनिन्शुलर वार’ नांवाचें युद्ध वेलिंगटन चालवीत असतांना नेपोलियनला १८०००० सैन्य तेथें अडकून ठेवावें लागलें. हें सैन्य अप्रतिम लढवय्यें होतें. पण त्या सैन्याला वेलिंगटनच्या सैन्याशीं लढावयाचें असल्यामुळें नेपोलियनला ड्रेस्डनसारख्या ठिकाणीं झालेल्या युद्धांत त्या सैन्याचा बिलकूल उपयोग करून घेतां येईना व त्यामुळें शेवटीं त्याचा नाश झाला. ह्या गोष्टीवरून वर सांगितलेल्या विधानाची सत्यता स्पष्टपणें दिसून येते.

ज्या राष्ट्राच्या संरक्षणाचा आधार सागर असून त्याची बहुतेक भिस्त आरमारावर आहे अशा राष्ट्राचें सैन्य जरी लहान असल्यामुळें डोळ्यांत भरण्यासारखें नसलें तरी तें उपेक्षणीय मानणें चुकीचें होईल. १८१५ त नेपोलियनविरुद्ध लढणार्‍या दोस्तांच्या सैन्यापैकीं इंग्रजांचें सैन्य सारें ३०००० होतें पण या सैन्यानें जी कामगिरी केली ती वाखाणण्यासारखी होती. तसेंच इतर वेळीं आणिबाणीचा प्रसंग येऊन ठेपला असतांना केवळ इंग्लंडदेश मध्यें पडल्यामुळें रशियासारख्या देशाला तुर्क लोकांची राजधानी कान्स्टान्टिनोपल ही अगदीं आटोक्यांत आली असतांना आपलें चंबूगवाळें आटोपून लढाई आवरावी लागली, अशासारख्या ऐतिहासिक प्रसंगावरून हीच गोष्ट सिद्ध होते. १८०७ सालीं हीच गोष्ट जर ब्रिटिश प्रधानमंडळाला कळली असती तर नेपोलियनचा पराभव ‘इलौ’ ह्याच ठिकाणीं पूर्णपणें होऊन पुढें झालेल्या लढायांची आपत्ति त्या प्रधानमंडळाला टाळतां आली असती. हें साधें तत्त्व त्यावेळच्या अधिकारीवर्गाला न कळल्यामुळें विनाकारण अनेक युद्धें नेपोलियनशीं करावीं लागलीं. दोस्तराष्ट्रांनीं पॅरिस शहर १७९३ सालीं काबीज करणें ही गोष्ट जर ब्रिटिश प्रधानमंडळानें आपलें लहानसेंच सैन्य कां होईना तेंच जर त्यांच्या मदतीला पाठविलें असतें तर फार सुलभ झाली असती. पण त्यावेळीं प्रधानमंडळाचा असा ग्रह होऊन बसला कीं दोस्तराष्ट्रांनां आपली मदत पाठविण्यापेक्षां आपलें सैन्य डन्कर्क शहर काबीज करण्यांत गुंतविणें अधिक बरें; त्यामुळें सर्व मसलत बिघडून गेली. त्याचप्रमाणें सर थॉमस मूरला स्पॅनिश लोकांच्या मदतीनें फ्रेंच लोकांनां स्पेनमधून हांकून देण्याची कामगिरी बरोबर बजावतां न आल्यामुळें निराश झालेल्या त्यावेळच्या प्रधानमंडळानें यूरोपमध्यें खुद्द नेपोलियनशीं चाललेल्या युद्धामध्यें आपलें सैन्य पाठविण्याचें नाकारलें. पण तें सैन्य त्याचवेळीं दोस्तराष्ट्रांच्या मदतीला गेलें असतें तर नेपोलियनची इतिश्री १८०७ सालींच झाली असती. आतां कोणी असें म्हणेल कीं, ज्यावेळीं इतर दोस्तराष्ट्रांच्या सैन्यांतील शिपायांची संख्या दशलक्षांनीं मोजण्यासारखी असते त्यावेळीं इंग्लंडच्या देशाच्या एखाद्या लाख सैन्याची ‘दर्यामे खसखस’ ह्या न्यायाने विशेष मातब्बरी ती काय ? गेल्या जगडव्याळ युद्धामध्यें इंग्लंडला सक्तीचा कायदा करून आपलें सैन्य ३५-४० लाखांपर्यंत वाढवावें लागलेंच कीं नाहीं ? या म्हणण्यांत तथ्य बिलकुल नाहीं असें नाहीं. तरी पण लहान सैन्याचा बिलकूल उपयोग होत नाहीं असें म्हणणें धाडसाचें होईल. कारण आधुनिक काळीं जशी सैन्याची संख्या कल्पनातीत वाढली आहे तशींच त्याची कामगिरीहि भयंकर वाढली आहे. व हल्लींचें रणक्षेत्रहि हजारों मैलांवर पसरलें असतें. त्याचप्रमाणें रेल्वेमुळें अलीकडे दळणवळणाचे मार्ग अनेक झाले आहेत. त्यांचें रक्षण करण्यांत बर्‍याच सैन्याचा व्यय होतो. ही कामगिरी जर ह्या लहान सैन्यावर सोंपविली किंवा सर्व सैन्याच्या हालचाली ज्यावेळीं विस्तृत प्रमाणावर व विस्तृत रणक्षेत्रावर चालतात त्यावेळीं एखाद्या विवक्षित मार्‍याच्या ठिकाणीं जर ह्या लहान सैन्यास कांहीं महत्त्वाची कामगिरी सांगितली तर ती कामगिरी बजावण्याच्या कामीं त्या सैन्याचा चांगलाच उपयोग होईल हें उघड आहे.

सं यु क्त रा ष्ट्रां च्या सै न्यां ती ल दो ष.- पण अशातर्‍हेनें लहान व मोठ्या सैन्याची सरभेसळ करण्यासंबंधानें कांहीं लष्करी तज्ज्ञ हरकती घेत असतात. पहिली हरकत अशी कीं, ज्या राष्ट्रांचें सैन्य मोठें असतें त्या राष्ट्राची लहान सैन्य असलेल्या राष्ट्राशीं कुरबुर सुरू होते. दुसरी हरकत अशी कीं, रसद कशी व किती पुरवावी ह्या बाबतींत नसते तंटे सुरू होतात. तरी पण सैन्याची कामगिरी पुष्कळ वेळां वाखाणण्यासारखी असते ह्याबद्दल दोन मतें असणें शक्य नाहीं. दर्यावर्दी राष्ट्राला आपल्या समुद्राचा फायदा घेऊन जर स्वतंत्रपणें इतर दोस्तराष्ट्रें अन्य ठिकाणीं लढत असतांना एखाद्या ठिकाणीं चांगली कामगिरी आपल्या लहान सैन्याच्या जोरावर करतां आली तर ती कांहीं टाकाऊ नसते. १९ व्या शतकाच्या आरंभीं ब्रिटिश प्रधानमंडळाला हें तत्त्व समजलें होतें व या तत्त्वानुसार शत्रूच्या राष्ट्रांतील लोकांनीं जर शत्रूविरुद्ध बंड केलें तर त्या लोकांनां आपलें सैन्य पाठवून तें प्रधानमंडळ मदत करीत असे. अशी मदत मिळाल्यामुळें बंडखोर लोकांनां चांगला जोर येऊन शत्रूला आपल्या सैन्याच्या कांहीं भागाचा उपयोग ह्या बंडखोरांचा पराजय करण्याच्या कामीं करावा लागे व त्यामुळें तेवढें सैन्य इतरत्र लढण्याच्या कामीं निरुपयोगी ठरे. पण इंग्लंडची ही कामगिरी फारशी महत्त्वाची मानतां येत नाहीं. १८१३ सालापर्यंत ब्रिटिश प्रधानमंडळ आपल्या सैन्याचा शत्रूच्या मर्मस्थानीं घाव घालण्याच्या कामीं व आपलें सर्व सैन्य एकवटून शत्रूला भय उत्पन्न होईल अशा रीतीनें एखाद्या ठिकाणीं लढाई सुरू करण्याच्या कामीं कधींहि उपयोग करीत नसे. पण जी गोष्ट ब्रिटिश प्रधानमंडळाला समजली नव्हती तीच वेलिंग्टनला पूर्णपणें समजली होती व म्हणून त्यानें पोर्तुगाल ताब्यांत घेऊन तेथें त्यानें ब्रिटिश सैन्य उतरविलें. कारण त्याला ही गोष्ट ठाऊक होती कीं, फ्रान्सच्या दक्षिण सरहद्दीवर पोर्तुगालमध्यें ब्रिटिश सैन्य असणें म्हणजे आपल्या छातीवर लटकलेली ही नेहमींचीच तरवार आहे हे नेपोलियन कधींहि विसरणार नाहीं. पण हें ब्रिटिश सैन्य उतरवितांनां त्याला ब्रिटिश प्रधानमंडळाची किती मनधरणी करावी लागली हें सर्वांस महशूरच आहे.

खरोखर १८१३ सालीं जें इंग्रजी प्रधानमंडळ इंग्लंडला लाभलें त्यासारखें, लढाईच्या दृष्टीनें नादान प्रधान मंडळ कधींहि इंग्लंडच्या वांट्याला आलेलें नसेल; कारण ज्यावेळीं वेलिंग्टन फ्रान्सच्या सैन्याला स्पेनच्या भागांतून हुसकावून लावण्याचे डावपेंच लढवीत होता व आपल्या अंगीकृत कार्यांत यश यावें म्हणून अधिक माणसें व अधिक पैसा यांची मागणी करीत होता त्याच वेळीं इटलीच्या दक्षिण भागांत बंड उभारण्याच्या काल्पनिक आशेनें हें प्रधानमंडळ बरेंच मोंठें सैन्य स्पेनमधून काढून इटलीकडे पाठविण्याच्या विचारांत होतें. अलीकडे वाहतुकीच्या मार्गांत चांगलीच सुधारणा झाल्यामुळें व सैन्यबलहि बेसुमार वाढल्यामुळें दुसर्‍याच ठिकाणीं लढाई उपस्थित करून शत्रूला जेरीस आणणें कितपत शक्य आहे हें सांगणें कठिण आहे. कारण रेल्वे वगैरेंची चांगली सोय असल्यामुळें व सैन्यहि मुबलख असल्यामुळें ज्या ठिकाणीं लढाई आपणांस प्रतिकूल होत आहे असें शत्रूला समजून येईल त्या ठिकाणीं जास्त सैन्याची भरती करून आपली बाजू चांगली सावरतां येते. शिवाय जें लहान सैन्य शत्रूच्या मुलुखांत पाठववयाचें तें शत्रूच्या सैन्याकडून वेढलें जावयाचें असतें. तेव्हां हें जें सैन्य पाठवावयाचें तें फारच लहान असतां कामां नये; व तें अशा वेळीं पाठविलें पाहिजे कीं, शत्रूची स्थिति आणीबाणीची झाली असतांना त्याला इतर ठिकाणचें सैन्य त्या ठिकाणीं पाठवितां येऊं नये. तेव्हां काळ व वेळ पाहूनच ह्या गोष्टी करावयाच्या असतात. कांहीं कांहीं प्रसंगीं आपलें प्रतिस्पर्धी राष्ट्र आपल्या देशाच्या बंदरावर केव्हांहि चांगलें तयार असलेलेंच सैन्य उतरवील ही शत्रूच्या मनांत असलेली भीतीच आपल्या उपयोगी पडते; कारण त्यामुळें शत्रूला बरेंच सैन्य निष्कारण अडकवून ठेवावें लागतें व त्यामुळें आपलें आयतेंच काम होतें. हें सैन्य जर एकवटलें तर आपल्या सैन्याहून खास भारी असतें पण तें चोहोंकडे पसरलें असल्यामुळें त्याची शक्ति कमी होते. एखाद्यावेळीं रणक्षेत्राच्या सभोंवतालीं जर लोकसंख्या थोडी असेल किंवा अर्धवट सुधारलेली असेल तर एखादें लहानसें सैन्य जर जहाजांतून उतरविलें तर त्याचा परिणाम फार चांगला होतो. उदाहरणार्थ रशिया बल्गेरियांतून चाल करून जात असतांना तुर्की सैन्यानें प्लेव्हना शहर ताब्यांत घेतल्यावर ताबडतोब तुर्कस्तानावरचा दाब कमी झाला. त्यावेळीं जो घोंटाळा माजला त्यावरून आपणांस बराच बोध घेतां येण्यासारखा आहे. आपण अशी कल्पना करूं कीं, ह्या चाल करून जाणार्‍या सैन्याला रेल्वे हा दळणवळणाचा मार्ग असता व प्लेव्हना शहर समुद्रकांठाजवळ असतें, तर काय बरें झालें असतें. तुर्कस्तानला हवें तेवढें सैन्य पाठविण्याची सोय झाल्यामुळें त्याचे किल्ले दुर्भेद्य झाले असते व हे किल्ले जर देशाच्या अंतर्भागांत असते तर रशियाची बाल्कनप्रांत ओलांडण्याची छातीच झाली नसती.

रे ल्वे.-लढाईच्या वेळीं रेल्वेवर आपली जर हुकमत असली तर त्याचा चांगलाच उपयोग आपणांस होतो; पण आपण जर त्यांच्यावर सर्वस्वीं अवलंबून राहिलों तर त्या धोका देण्यास कधींहि चुकणार नाहींत. दोन गाड्यांच्या मदतीनें एक लक्ष लोकांच्या नित्यांतल्या गरजा सहज भागवितां येतात पण त्यामुळें रस्त्यांची बहुत खराबी होते. रसीद सुरक्षितपणें पोंचविणार्‍या सैन्यवाहतुकीची गैरव्यवस्था होऊन बसते, व नेहमींचा व्यापार बंद पडतो. म्हणून ज्यावेळीं सैन्याला आगगाड्यांवरच अवलंबून रहावें लागतें त्यावेळीं विशेष प्रमाणावर चढाई करणें अशक्य होऊन बसतें. सेनापतीचें सर्व लक्ष आपल्याला नित्य वस्तूंचा पुरवठा कसा करतां येईल ह्या गोष्टीकडे असते व शत्रूच्या हालचालींमुळें जर त्याला बचावाचें धोरण स्वीकारावें लागलें नाहीं तरी त्याच्या हालचालींनां बराच प्रतिबंध होतो. दळणवळणाचे अनेक मार्ग आहेत. अशा मार्गांपैकीं नदीच्या प्रवाहाचा मार्ग हा एकच उत्तमांपैकीं आहे. गंगा किंवा नाईल नदी, मिसिसिपि किंवा डान्यूब ह्या नद्यांचा मार्ग आगगाडीपेक्षां अधिक चांगला असतो. पण एकाच भागांत व सर्व देशांत रेल्वेंचें सर्व जाळें पसरून त्यांचा उपयोग लष्करी दृष्टीनें जसा हवा तसा करून घेतां येतो तसा उपयोग नद्यांचा होऊं शकत नाहीं. पण रेल्वे काय किंवा नद्या काय ह्या दोन्ही समुद्रापुढें एकदम फिक्या पडतात. १८७० सालाच्या युद्धापूर्वीं फ्रेंच रेल्वेचा जर्मन सेनाध्यक्ष मोल्टके ह्यानें चांगला अभ्यास केल्यामुळें तिसर्‍या नेपोलियनचा हल्ला कोणत्या बाजूनें होईल व तो आपली सैन्यरचना कोणत्या तर्‍हेनें करील व त्याचें सैन्य किती मैलांच्या रणक्षेत्रावर पसरलें जाईल ह्या सर्व बाबी त्याला सांगतां आल्या. पण हेंच सैन्य जर नेपोलियननें समुद्रावरून नेलें असतें तर मोल्टकेला त्याच्या सैन्याच्या बाबतींत बिनचूक अंदाज कधींहि करतां आला नसता. कारण जहाजांतून जाणार्‍या सैन्याच्या हालचाली कळणें दुरापास्त असतें. एखाद्या देशाला आपल्या आरमारी साहाय्याच्या योगानें सैन्य कोठेंहि बिनबोभाट उतरवितां येतें व एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं शत्रूची नजर चुकवून तें सैन्य सहज नेतां येतें व शत्रूला हुलकावण्या दाखवून त्याचें बरेंच सैन्य गुंतवून ठेवतां येते. तेव्हां गुप्तपणा व हालचालीची पूर्ण मोकळीक ह्या दोन फायद्यांमुळें दर्यावर्दी राष्ट्राला शत्रूवर मात करतां येते. ह्याचें उत्कृष्ट उदाहरण म्हटलें म्हणजें १८६२ सालचें अमेरिकेंतील यादवीचें युद्ध होय.

भू मि व ज ल ह्यां च्या व री ल स त्ता.-लढाईमध्यें अनपेक्षित असा हल्ला करणें ह्याला फार चातुर्य लागतें. भूत, वर्तमान व भविष्य कालीं शत्रूला अवचित गांठणें हें युद्धनैपुण्याचें दर्शक मानलें जाणार ह्यांत शंका नाहीं. इंग्लंडचा प्रसिद्ध योद्धा मार्लबरो हा डॉन्यूब नदी व ब्लेनहिम ह्या ठिकाणीं चाल करून जाईल असें त्या काळीं कोणास तरी शक्य वाटलें होतें काय? तसेंच मेरेंगोच्या युद्धाच्या वेळीं नेपोलियन आल्पस् पर्वत ओलांडून येईल किंवा येनाच्या लढाईच्या वेळीं फ्रेंच लोक बव्हेरियाच्या सरहद्दीपासून उत्तरेकडे कूच करतील असें कोणच्या तरी लष्करी तज्ज्ञांच्या डोक्यांत आलें असेल काय ? त्याचप्रमाणें नेपोलियन आपल्या १३०००० सैन्यानिशीं दोन लाख सैन्याचे दोन सेनापती वेलिंग्टन व ब्लुचर यांसारखे झुंजण्यास तयार असतांना बेलजमवर स्वारी करील हें कोणाच्या तरी ध्यानीं किंवा मनीं आलें असेल काय ? पण जी गोष्ट सामान्य माणसांस अशक्य वाटते तीच गोष्ट नेपोलियनसारखीं माणसें करून दाखवितात म्हणूनच त्यांनां परिणामकारक जय मिळतो. तेव्हां ह्यावरून आपणांस जर कांहीं बोध घ्यावयाचा असेल तर तो हा कीं, राष्ट्ररक्षणाच्या कामीं कितीहि आटोकाट तयारी केली तरी ती अपुरीच पडते. जितकें जितकें उत्तम शिकलेलें, शस्त्रास्त्रांनीं सज्ज असलेलें सैन्य असेल तितकें जास्त जास्त सुरक्षित राष्ट्र असतें. पण आपल्या सर्व शत्रूंवर खुष्कीवरून व दर्यावरून संख्याधिक्यानें मात करणें नेहमींच शक्य नसतें. अशा वेळीं एकच उत्तम उपाय म्हणजे ज्या ज्या ठिकाणांवर शत्रूच्या सैन्याचा मारा होण्याचा थोडासा तरी संबंध असेल त्या ठिकाणीं कडेकोट बंदोबस्त व तरतूद करून ठेवणें हा होय.

व्यू ह र च ने चें म ह त्त्व.- व्यूहरचनाकोविदांची बुद्धिमत्ता व धाडस हीं वगळलीं तर युद्धाच्या वेळीं ज्याला आपण फार भ्यालें पाहिजे अशी गोष्ट म्हणजे युद्धकलानिष्णात अशा लष्करी कामगार लोकांच्या वर्गाचे लष्करी डावपेंच ही होय. सामान्य माणसांनां संकटाचें फारसें भय जरी वाटत नसलें तरी त्यांनां संकटांतून कसें पार पडावें ह्याबद्दल मोठा विचार येऊन पडतो; व ज्या लष्करी डावपेंचामध्यें धोका असून अनेक अडचणी असतात त्या डावपेंचाला ते खुशाल नांवें ठेवतात. पण जे खरे व्यूहरचनाकोबिद असतात ते ह्याच डावपेंचांनां यशस्वी करून दाखवितात. ‘साहसे श्री: प्रतिवसति’ हें तत्त्व त्यांस ठाऊक असल्यामुळें ते जाणूनबुजूनच साहसाचा अंगीकार करतात. ज्या अडचणी सामान्य लोकांनां अडचणी अशा वाटतात त्यांचा ते आपल्या फायद्याकडे उपयोग करून घेतात व ज्याप्रमाणें हॉनिबॉल व नेपोलियन ह्यांनीं आल्पस् पर्वताचा आपल्या कामांत उपयोग करून घेतला त्याप्रमाणें अचाट धाडसाचीं कामें करून आपलें सामान्य लोकांवर वर्चस्व प्रस्थापित करतात. अलीकडे बातमी पोंचविण्याचीं साधनें विपुल असल्यामुळें कोठल्याहि सेनापतीला आश्चर्यानें थक्क करून सोडणारी कामगिरी करून दाखविणें फारसें शक्य नाहीं तरीपण हेंहि खरें आहे कीं, हल्लीं आगगाड्या, मोटारी वगैरे साधनें विपुल असल्यामुळें एखाद्या सेनापतीला आपलें सैन्य किंवा आरमार विवक्षित ठिकाणीं फार थोड्या काळांत एकवटतां येतें; त्याचप्रमाणें शत्रूला हुलकावणी दाखविण्याकरितां जाणूनबुजून खोटी बातमी पसरविणें फार सुलभ झालें आहे. अशा प्रकारच्या अनेक सोयी हल्लीं उपलब्ध झाल्यामुळें एखाद्या व्युहरचनाकोबिदाला आपलें बुद्धिसर्वस्व एकवटून शत्रूचा नि:पात करणारी विलक्षण कामगिरी अजूनहि करतां येईल.

हल्लीं ज्या राष्ट्राला इतर राष्ट्रांवर स्वामित्व मिळवावयाचें आहे त्यानें समुद्रावरील आपलें वर्चस्व अबाधित राखिलें पाहिजे. नेपोलियनच्या वेळेला समुद्रसत्ता इंग्लंडच्या हातीं असणें जितकें अवश्य होतें त्याहून जास्त प्रमाणांत हल्लींच्या काळी इंग्लंडला आवश्यक आहे. हल्लीं व्यापाराची वाढ अतोनात झालेली आहे व त्याची मर्यादा खुष्कीपुरतीच असते. प्रत्येक देशाचा व्यापार हल्लीं जलमार्गानें अतोनात वाढला आहे. पन्नास वर्षांपूर्वीं ज्या देशांचें दर्यावर नांवहि ऐकू येत नव्हतें त्याच देशांचीं जहाजें आतां हजारांनीं मोजण्याइतकीं आहेत; व जीं राष्ट्रें पन्नास वर्षांपूर्वीं स्वावलंबी होतीं त्याच राष्ट्रांनां त्यांची भरभराट कायम ठेवण्याकरितां आज इतर राष्ट्रांशीं संबंध ठेवणें अत्यावश्यक होऊन बसलें आहे. हल्लीं असें एकहि राष्ट्र नाहीं कीं ज्या राष्ट्राचा जलर्मानें चालणारा व्यापार जर एकदम बंद झाला तर त्या राष्ट्राला धक्का बसणार नाहीं. इंग्लंड देशाला तर हें भय फारच आहे. इंग्लंडचें सर्व जीवित व्यापारावर आहे व स्वत:च्या अन्नवस्त्राकरितां त्याला दुसर्‍या देशावर स्वाभाविक परिस्थितीमुळें अवलंबून रहावें लागतें तेव्हां इंग्लंडच्या ताब्यांत जितकीं जास्त व्यापारी बंदरें किंवा वसाहती, किंवा गोद्या किंवा कोळसा घेण्याचीं ठिकाणें असतील तितकें इंग्लंडला इष्टच आहे. इंग्लंडची इतर राष्ट्राशीं जितकी, जास्त व्यापारी स्पर्धा वाढत जाईल व जितकें इतर राष्ट्रांचें आरमारी बल जास्त वाढत जाईल तितकें इंग्लंडला जास्त दक्ष राहिलें पाहिजे.

स्वयंसैनिकांचें महत्त्व:-हल्लींच्या काळीं स्थूलमानानें सैन्याचे दोन भाग करतां येतील: खडें सैन्य व स्वयंसैनिकांचें सैन्य. खुषीची लष्करी नोकरी अमेरिका व इंग्लंड ह्या देशांत आहे व ज्या वेळीं मोठ्या प्रमाणांत युद्ध चालेल त्या वेळीं ह्या राष्ट्रांनां स्वयंसैनिकांवरच भिस्त ठेवावी लागेल. हा अनुभव गेल्या महायुद्धांत आलाच आहे. नैतिक किंवा तात्त्विक दृष्ट्या स्वयंसैनिक असणें हें इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे हा प्रश्न बाजूला ठेवला तर प्रत्येक स्वयंसैनिकाला आपल्या शिक्षणावर अवलंबून रहावें लागेल. पण ज्यावेळीं सर्वच सैन्य स्वयंसैनिकांचें असतें त्यावेळीं लष्करी अधिकारी जर चांगले असले तरच स्वयंसैनिकांच्या सैन्यावर भिस्त ठेवतां येईल व त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतां येईल. ह्या स्वयंसैनिकांत जर कांहीं व्यंग असेल तर त्यांनां लष्करी शिस्त कमी असते हें होय. लढाईच्या प्रारंभीं ते लवकर घाबरण्याचा संभव असतो, शत्रूवर स्वारी करण्याचें त्यांनां एकदम धाडस होत नाहीं व जर लढाई अंगावर आली किंवा दीर्घकालपर्यंत कष्ट सोसण्याची पाळी आली तर हे सैनिक दम धरूं शकत नाहींत. ह्या सर्व गोष्टी खर्‍या आहेत. म्हणूनच युद्धाला तोंड लागलें असतांना ह्या सर्व सैनिकांनां कसलीहि कामगिरी न सांगितलेली बरी; नाहीं तर हेंच सैनिक इतर खड्या सैन्यांतल्या लोकांनां एक गळ्यांतील लोढणें होऊन बसावयाचे. पण ह्या सर्व सैनिकांच्या मदतीला जर अनुभविक व धंदेवाल्या शिपायांचें सैन्य असलें तर हेच लोक नि:संशय चांगली कामगिरी करून दाखवितील. फक्त ह्या शिपायांत देशाभिमान व त्यांचे अधिकारी चांगले प्रवीण ह्या दोन गोष्टी जरूर असल्या पाहिजेत.

यु द्धा च्या वे ळीं पा ळ ण्या चे का य दे.-युद्धाच्या वेळीं पाळावयाचे कायदे हे ज्या ज्या वेळीं दोन्ही बाजू शस्त्रास्त्रांनीं लढतात त्या त्या सर्व वेळींच पाळावयाचे नसतात, तर ज्याला राष्ट्रांकडून युद्ध हें नांव दिलें जातें त्याच युद्धाच्या वेळीं पाळावयाचे असतात. आतां प्रश्न असा उद्भवतो कीं, युद्ध ह्या शब्दाची व्याख्या काय ? युद्ध हें ज्या वेळीं दोन राष्ट्रांचीं सैन्यें एकमेकांशीं झुंजतात त्यावेळीं होत असतें. त्याचप्रमाणें एकाच राष्ट्रांतले असंतुष्ट लोक चांगली तयारी करून आपल्या अस्तित्वांत असलेल्या सरकारच्या सैन्याशीं लढत असतात त्यावेळीं त्या लढण्यालाहि युद्ध ही संज्ञा देतां येईल. पण ज्यावेळीं ह्या लढणार्‍या लोकांची संख्या सरकारच्या सैन्याच्या मानानें अल्प असते त्यावेळीं त्या लढण्याला युद्ध हें नांव न देतां बंड हें नांव देण्यांत येतें. यादवी युद्धाच्या वेळीं दोन्ही पक्षांच्या सैनिकांनां युद्धाच्या वेळच्या कायद्यांचा फायदा भागण्याचा पूर्व. अधिकार आहे. राजरक्षणबाह्य अशा बंडखोरांनां कसलेच हक्क नसतात. दक्षिणआफ्रिकेंतल्या युद्धामध्यें ज्या अर्थी बोअर लोकांचें सैन्य इंग्रज सैन्याच्या मानानें फारच कमी होतें व ब्रिटिश सरकारनें बोअर लोकांचीं सर्व राजधानीचीं ठिकाणें काबीज केलीं होतीं, व बोअर लोकांचा सर्व मुलुख काबीज केला होता त्याअर्थी लढाई संपली कीं नाहीं व पुढें लढणारे बोअर लोक ह्यांनां बंडखोर म्हणतां येईल कीं नाही हा प्रश्न उद्भवला होता. त्यावेळीं इंग्रज सेनापतींनीं जो निकाल दिला तो पुढच्या लोकांस उदाहरण म्हणून ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. त्यांनीं असें मत दिलें कीं, बोअर सैनिक अल्पंसख्याक असले तरी ज्याअर्थी व्यवस्थित रीतीनें ते लढत होते त्याअर्थी त्यांनां युद्धाच्या वेळच्या कायद्यांचा फायदा मिळणें योग्य आहे. तरी पण आपण ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, अशा तर्‍हेचा सार्वराष्ट्रीय परिपाठ पडण्याचें कारण केवळ तात्त्विक विचार हें नसून जशास तसें ही विचारपद्धति शत्रु स्वीकारील ही भीति हें होय.

युद्धाचें वर्गीकरण अनेक प्रकारें करतां येईल. मध्यस्थीमुळें उपस्थित होणारीं युद्धें, देश जिंकण्याकरितां सुरू केलेलीं युद्धें, आत्मसंरक्षणार्थ सुरू केलेलीं युद्धें, स्वातंत्र्यार्थ युद्धें, सत्पक्षाचीं युद्धें, असत्पक्षाचीं युद्धें अशा तर्‍हेचे युद्धाचे वर्ग करतां येतील, पण युद्धें कशाहि प्रकारचीं असोत त्यांत पडणार्‍या सैन्यांनां युद्धाच्या वेळच्या कायद्यांचा फायदा मिळालाच पाहिजे. सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्राचें कृत्य न्यायाचें आहे किंवा अन्यायाचें आहे, याबद्दल आपणच निकाल देत नाहीं, तर सर्व राष्ट्रें आपापले हितसंबंध संभाळून युद्ध ही प्रत्यक्ष घडणारी गोष्ट असें मानून त्याबद्दल विचार करीत असतात. अलीकडे सर्व राष्ट्रांचे परस्पर संबंध निगडित झाल्यामुळें तटस्थ राष्ट्रें सुद्धा युद्धाच्या वेळीं आपल्या हितसंबंधांत दोन राष्ट्रांच्या युद्धामुळें कांहीं बाध येतो कीं काय, ह्याबद्दल नेहमीं दक्ष असतात, व ह्या धोरणावरच तीं राष्ट्रे युद्धयमान राष्ट्रांशीं आपलें वर्तन ठरवीत असतात. जपान व चीन देश ह्यांमध्यें ज्या वेळीं युद्ध सुरू झालें (१८९४-९५) त्यावेळीं जपानी मुत्सद्दयांपुढें असा प्रश्न उपस्थित झाला कीं, चिनी सैनिकांनां यूरोपांत चालू असलेल्या युद्धाच्या कायद्याप्रमाणें वागवावें किंवा नाहीं. कारण चीन देशानें १८८६ व १८८७ या सालीं जिनिव्हा व पॅरिस ह्या ठिकाणीं पास झालेल्या युद्धाच्या कायद्यांनां आपली संमति दिलेली नव्हती. पण जपानी मुत्सद्दयांनीं पोक्तपणें ह्या प्रश्नाचा विचार करून असा निकाल दिला कीं, चीन देशाचें जपानी शिपायांशीं जरी रानटीपणाचें वर्तनें युद्धाच्या प्रसंगीं होतें तरी यूरोपमधील सुधारलेल्या राष्ट्रांनां संमत असलेल्या कायद्यांप्रमाणेंच चीन देशाला वागवावें.

प्र स्था पि त झा ले ल्या स र का र वि रु द्ध उ ठ णा र्‍या लो कां शीं त ट स्थ रा ष्ट्रां चें व र्त न.-अशा प्रकारच्या लोकांशीं तटस्थ राष्ट्रांचें वर्तन कसें असावें हा एक मोठा प्रश्नच आहे. आपणांविरुद्ध लढणार्‍या ह्या लोकांनां त्यांच्या सरकारनें युद्धयमान असें जर मानलें नाहीं तर ते लोक तटस्थ राष्ट्रांशीं जे अत्याचार करतील त्यांबद्दल तें सरकार जबाबदारी स्वीकारतें. तटस्थ राष्ट्रें सुद्धा त्या लोकांच्या सरकारनें स्वीकारलेली जबाबदारी कबूल करतात किंवा त्या लोकांनां युद्धयमान असें समजतात. पण जर तटस्थ राष्ट्रांनीं ह्या लोकांनां युद्धयमान असें गणलें नाहीं तर त्या लोकांनां तटस्थ राष्ट्रांच्या मालमत्तेची विल्हेवाट युद्धाच्या कायद्यानुसार लावतां येत नाहीं. कारण तसे ते जर करतील तर त्यांनां राजरक्षणबाह्य व लुटारू असें मानण्यांत येईल. १९०२ सालीं अशा प्रकारची एक गोष्ट झाली. हायटीमध्यें एक मोठी राज्याची उलथापालथ होणार होती त्यावेळीं पॅन्थर नांवाच्या एका जर्मन क्रूझरनें हायटीच्या सरकारच्या विरुद्ध बंड करणार्‍या क्रेटी-आ-पीरट नांवाच्या तोफा असलेल्या जहाजाला चांच्यांचें जहाज म्हणून लेखून त्याला बुडविलें व बुडविण्याचें कारण असें सांगितलें कीं, ज्याअर्थी ह्या क्रेटी-आ-पीरट नांवाच्या जहाजानें मार्कोंमानिया नांवाच्या जहाजावर सांपडलेलीं शस्त्रास्त्रें व दारूगोळा हीं हायटीच्या सरकारच्या सैन्याकरितां पुरविलीं जाणार अतएव जप्त करण्यास योग्य म्हणून जप्त केलीं, त्याअर्थी तें जहाज बुडविण्यास योग्य होतें. हें क्रेटी-आ-पीटर जहाज कांहीं वर्षेंपर्यंत हायटीच्या सरकारच्या आरमारापैकीं होतें व जहाजावर त्या आरमारावरचा मुख्य अधिकारी अ‍ॅडमिरल किलिक हाच मुख्य होता व हे बंडखोर लोक आपल्या सरकारविरुद्ध लढाई पुकारून युद्ध करीत होते असेंहि सिद्ध झालें नाहीं. पण ज्याअर्थी जर्मन सरकारच्या ह्या वर्तनाबद्दल कोणत्याहि राष्ट्रानें गवगवा केला नहीं त्याअर्थी हें त्या सरकारचें कृत्य सर्व राष्ट्रांनां संमत होतें असें सिद्ध होतें.

दुसरीहि अशीच एक गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. उत्तर अमेरिकाखंडामध्यें जें मोठें यादवी युद्ध झालें त्यावेळीं इंग्लंड या तटस्थ राष्ट्रानें-संयुक्त संघाच्या सैन्यास अमेरिकेच्या सरकारच्या विरुद्ध लढणारे असें लेखिलें व त्याचें कारण असें सांगितलें कीं, दक्षिणेकडील संस्थानाच्या बंदरांचा कोंडमारा केल्यामुळें ब्रिटिश व्यापाराचें फार नुकसान होत होतें. पण हल्लीं सर्वानुमतें असें ठरलें आहे कीं, ज्या वेळीं एका राष्ट्रामध्यें प्रचलित सरकारविरुद्ध बंड झालें असेल व शेजारच्या तटस्थ राष्ट्रांचें नुकसान होत नसेल त्यावेळीं त्या राष्ट्रांनीं विनाकारण त्या राष्ट्राच्या तंट्यांत ढवळाढवळ करूं नये, व प्रचलित सरकारच्या विरुद्ध लढणार्‍या पक्षास युद्धयमान असें मानूं नये.

पण अशा रीतीनें जरी त्या पक्षास तटस्थ राष्ट्रांनीं युध्यमान म्हणून मानलें तरी तो पक्ष त्या राष्ट्राचें सार्वभौम सरकार आहे असें कोणीहि मानीत नाहीं. तो पक्ष युद्धयमान आहे म्हणून त्या पक्षाच्या सैनिकांस राजरोस लढणारे-लुटारू, नव्हेत-असें मानतां येईल व त्या पक्षाचीं जहाजेंहि चांच्यांचीं जहाजें असें कोणीहि मानणार नाहीं; तीं जहाजें जर लुटतांना पकडलीं गेलीं तर लष्करी व आरमारी कायद्यानें योग्य ती व्यवस्था करण्यांत येईल; व त्या पक्षानें जर स्वत:च्या सरकारविरुद्ध लढतांना त्या सरकारच्या बंदरांचा जरूर तेवढीं जहाजें ठेवून कोंडमारा केला तर तो कोंडमारा इतर तटस्थ राष्ट्रें फार तर कबूल करतील पण त्या युद्धयमान पक्षाला सरकार समजून कोणतेंहि राष्ट्र पूर्वीचें सरकार हयात असेपर्यंत त्या पक्षाशीं तहनामें करणार नाहीं किंवा आपले प्रतिनिधी तेथें ठेवणार नाहीं. अशाच धोरणाचें वर्तन अमेरिकेंतलें यादवीयुद्ध चालू असतांना संयुक्तसंघाशीं इंग्लंड व फ्रान्स ह्या दोन राष्ट्रांचें होतें.

ज्यावेळीं एखादें अंकित संस्थान किंवा एखादी वसाहत सार्वभौम सरकारच्या इच्छेविरुद्ध परराष्ट्राशीं युद्ध सुरू करते त्यावेळीं तर फारच भानगडीचे प्रश्न उद्भवतात.

सै न्य श ब्दा ची व्या ख्या.-हल्लीं सुधारलेली लढाई जोंपर्यंत शत्रूंचें सैन्य दमून लढाईस असमर्थ होत नाहीं तोंपर्यंतच चाललेली असते, नाहीं तर दोन पक्षांपैकीं एक पक्ष नामशेष होईपर्यंतच ती विनाकारण चालावयाची. व्हॅटेल म्हणतो ही जी चाल आहे तिचें रूढींत जें रूपांतर झालें आहे तें सकारणच आहे. विशेषत: ही रूढी यूरोपमधल्या राष्ट्रामध्यें विशेषत: ज्या राष्ट्रामध्यें खडें सैन्य किंवा लढाईच्या वेळीं बोलवावयाचें सैन्यच लढण्याकरितां ठेवलें असतें त्या राष्ट्रामध्येंच दिसून येतें. फक्त सैन्येंच हल्लीं युद्ध करतात व राष्ट्रांतले बाकीचे लोक स्वस्थ असतात. पण हल्लीं देशाभिमानाच्या ज्या कल्पना लोकांमध्यें रूढ आहेत त्यांवरून असें उघड दिसतें कीं, हे जे राष्ट्रांतले इतर लोक युद्धांत भाग घेत नाहींत त्यामुळें राष्ट्राचें नुकसान होतें. हेंच मत हेग येथें पास झालेल्या युद्धाच्या नियमामध्यें नमूद केलेलें आहे.

पहिला नियम:-लढाईसंबंधीं कर्तव्यें, लढाईचे हक्क व कायदे हे फक्त सैन्यालाच लागू असतात असें नाहीं तर पुढें दिलेल्या अटींप्रमाणें वागणार्‍या स्वयंसैनिकांनां व युद्धाच्या वेळींच बोलाविले जाणार्‍या लोकांनां सुद्धां ते कायदे वगैरे लागू असतात. त्या अटी अशा:- (अ) प्रत्येक युयुत्सु माणसानें आपल्या हाताखालीं असलेल्या माणसांबद्दल जबाबदार अशा माणसाची सत्ता कबूल केली पाहिजे. (आ) दुरूनहि ओळखतां येईल असें ठराविक चिन्ह त्यानें धारण केलें पाहिजे. (इ) त्यानें राजरोसपणें हत्यारें वापरलीं पाहिजेत. (ई) लढाईच्या वेळीं लढाईचे जे कायदे ठरलेले आहेत त्या कायद्यांन्वयें लढाई केली पाहिजे. ज्या देशामध्यें स्वयंसैनिक व लढाईच्या वेळीं आव्हान करावयाचे लोक आहेत व ज्यांची गणना ‘सैन्यांत’ केलेली आहे त्यांनांहि सैन्य हें नांव दिलें जाईल.

दुसरा नियम:-ताब्यांत नसलेल्या मुलुखांत असलेली प्रजा शत्रूचें सैन्य जवळ आलें असतांना जर त्या सैन्याचा प्रतिकार करण्यास्तव स्वयंस्फूर्तीनें पहिल्या नियमाप्रमाणें वेळ थोडा असल्यामुळें सैनिक न बनतां शस्त्र घेऊन लढूं लागली तर त्या प्रजेलाहि, ती जर उघडपणें शस्त्रें वापरूं लागली व जर ती युद्धाचे नियम पाळूं लागली तर युद्धाचे कायदे व हक्क लागू करण्यांत येतील. (‘उघडपणें शस्त्रें वापरूं लागली व जर ती’ हे शब्द १९०७ सालीं सुधारून प्रसिद्ध केलेल्या कन्व्हेन्शननें घातले आहेत).

ह्या नियमांन्वयें, ज्या तात्पुरत्या सैनिकांनां संयुक्त संस्थानच्या सरकारनें अमेरिकेंतल्या यादवी युद्धामध्यें व जर्मन सरकारनें फ्रँकोजर्मन युद्धामध्यें कायदेशीर लढाणारे म्हणून मानण्याचें नाकारलें, त्या तात्पुरत्या सैनिकांनां कायदेशीर युध्यमान शिपाई मानण्यांत येतें.

स्वारी केलेल्या मुलुखांतील शत्रूची मालमत्ता.- युद्धकालीं खाजगी माणसांच्या दर्जाच्या प्रश्नाबरोबरच स्वारी केलेल्या मुलुखांतील त्यांच्या मालमत्तेच्या प्रश्नाचीहि सांगड आहे. ह्या प्रश्नाबद्दल लोकांमध्यें बरेंच अज्ञान आहे. ही खाजगी लोकांची मालमत्ता शत्रूनें काबीज करूं नये अशाबद्दल ज्या गोष्टी पुढें आलेल्या आहेत त्या खर्‍या नाहींत व त्यांनां इतिहास व तत्कालीन वहिवाट ह्यांचा बिलकुल आघार नाहीं. तथापि रानटी काळांत शत्रूचें सैन्य खाजगी म्हणजे लढाईंत न पडलेल्या लोकांनां ज्या तर्‍हेनें वागवी ती तर्‍हा व हल्लींची सुधारलेली तर्‍हा ह्यांमध्यें बराच फरक पडला आहे. कांहीं शतकांपूर्वीं सैन्य दुसर्‍याच्या मुलुखांत शिरल्याबरोबर तें लूट करण्यास आरंभ करी; किंबहुना आपणास लूट करण्यास सांपडेल ह्या आशेनेंच पुष्कळ लोक व अधिकारी सैन्यांत शिरून परमुलुखावर स्वारी करीत. पण अर्वाचीन काळीं खडें सैन्य व तात्पुरतें सैन्य असा फरक पडल्यापासून ही चाल नाहींशी होत चालली आहे व हल्लीं लष्करी शिपाई व सामान्य मनुष्य हा फरक पाळण्यांत येऊं लागला आहे. हल्लीं शत्रूचें सैन्य दुसर्‍याच्या मुलुखांत शिरलें असतांना लुटालूट फारशी होऊं देत नाहींत तर दाणागोटा, धान्य वगैरे जिनसा किंवा खंडणी ह्यांची मागणी सेनाध्यक्षाकडून लोकांकडे होत असते किंवा सबंध राष्ट्रावरच लढाईची नुकसानभरपाई लादण्यांत येते. ह्या प्रकारांचा अवलंब केल्यामुळें ज्या देशावर शत्रूची स्वारी होते त्या देशांतल्या युद्धांत भाग न घेणार्‍या लोकांचे त्यांच्या मालमत्तेच्या बाबतींत वगैरे बरेच हाल कमी झालेले आहेत. ह्या प्रकारांचा हेतु इतकाच आहे कीं, लढाईच्या वेळीं खाजगी व्यक्तींचें व्यक्तिश: नुकसान होऊं नये म्हणून सर्व राष्ट्रानें मिळून नुकसान सोसावें. ह्यावरून हें स्पष्ट आहे कीं, लढाईच्या वेळीं जमिनीवरील खाजगी मालमत्ता ही शत्रूच्या जप्तीपासून अजिबात मुक्त नाही व हेंच तत्त्व ज्या हेग-युद्धपरिषेदेमध्यें ५२ व्या नियमांत नमूद आहे. तो असा-धान्य वगैरे रूपानें कोठल्याहि जिनसा किंवा चाकरी ह्यांची मागणी शत्रूसैन्यानें व्यापिलेल्या मुलुखांतल्या लोकांपासून सैन्याच्या गरजा भागविण्याव्यतिरिक्त करूं नये.” ही जी गरजा भागविण्याकरितां मागणी करावयाची ती त्या देशाच्या शक्तीच्या बाहेर नसावी व ती अशा स्वरूपाची असावी कीं त्या देशांतल्या लोकांनां त्या मागणीमुळें आपल्या देशाविरुद्ध चाललेल्या लढाईंत प्रत्यक्ष भाग घेण्याचा प्रसंग येऊं नये. ही मागणी सैन्याच्या मुख्याकडूनच झाली पाहिजे. आणि लोकांकडून जर कांहीं जिनसा सैन्यांतील लोकांनीं घेतल्या असल्या तर त्याबद्दल ताबडतोब रोख पैसे दिले पाहिजेत व तसे जर ताबडतोब न दिले तर त्या जिनसा घेतल्याबद्दलची पावती त्या लोकांस देऊन ती पावती त्या लोकांनीं दाखविल्यावर तीप्रमाणें शक्य तितक्या लवकर पैसे चुकते केले पाहिजेत.

दुसर्‍या एका नियमांत खाजगी लोकांच्या मिळकतीचा उपयोग करण्यास परवानगी दिलेली आहे तो नियम असा कीं, एखाद्या सैन्यानें दुसर्‍याच्या मुलखांत जर प्रवेश केला व तो आपल्या ताब्यांत घेतला तर तेथील सरकारची रोकड, इतर फंड, सैन्याला लागणार्‍या पण सरकारच्या ताब्यांत असलेल्या आवश्यक वस्तू, शस्त्रागारें, दारूगोळा, दाणागोटा, वहनाचीं साधनें आणि लष्करी कामास उपयोगी पडणारी इतर सर्व संस्थानमधील जंगम मिळकत ह्या सर्व त्या सैन्यानें आपल्या ताब्यांत घ्याव्यात. त्याचप्रमाणें जमिनीवरील, समुद्रावरील व आकाशांतील बातमी पोंचविण्याचीं साधनें, आरमारी कायद्यानें वगळलेलीं माणसें व जिनसा नेण्याचीं साधनें, शस्त्रागारें व लढाईंत उपयोगी पडणारा सर्व प्रकारचा दारूगोळा हीं सर्व जरी खाजगी गृहस्थांच्या ताब्यांत असलीं तरी तीं जप्त करावीं व तह झाल्यावर तीं परत करावींत किंवा त्यांची नुकसानभरपाई करावी. तटस्थ राष्ट्रांच्या ताब्यांतले आगगाडीचे डबे सुद्धां ह्या जप्तींतून सुटलेले नाहींत पण तटस्थ राष्ट्रांतील लोकांच्या व जमिनीवरील युद्धांतील माणसांच्या हक्कांसंबंधीं व कर्तव्यासंबंधीं असलेल्या १९ व्या नियमानें एवढीच तरतूद केलेली आहे कीं, तटस्थ राष्ट्रांतून येणारे आगगाडीचे डबे व इतर सामान ह्यांवर त्या राष्ट्रांची सत्ता असो किंवा कंपन्यांची असो किंवा खासगी व्यक्तींची असो ते डबे किंवा तें सामान तटस्थ राष्ट्राचें असें ओळखतां येईल तर शक्य तितक्या लवकर मूळच्या राष्ट्राकडे परत पाठवावे.

समुद्रावर मिळालेल्या मालावर शत्रूची सत्ता.- जमिनीवर सांपडलेल्या शत्रूच्या मालासंबंधीं नियम समुद्रावर जप्त केलेल्या मालाला लागूं नाहींत. एकदां लढाई सुरू झाल्यावर शत्रूचा माल कोठेंहि सांपडो तो समुद्रावर कोठेंहि जप्त करतां येतो. हा नियम बदलला जावा म्हणून अमेरिकेचे भगीरथ प्रयत्न झालेले आहेत व हा नियम बदलला तरच पॅरिस येथें पास झालेल्या नियमावर आपण सही करूं असें अमेरिकेनें म्हटलें होतें. पण तो नियम बदलण्यास कोणीहि कबूल नाहीं. हेग-परिषदेच्या वेळीं पुन्हां हा प्रश्न अमेरिकेनें उपस्थित केलेला होता पण त्यांत त्या राष्ट्राला यश आलें नाहीं. जमिनीवर शत्रूच्या राष्ट्रांतील बिनलष्करी लोकांची मालमत्ता सांपडली असतां ती जप्त करण्याच्या वेळीं जे विचार एखाद्या राष्ट्राच्या सरकारच्या मनांत येतात व त्यामुळें जी एक पद्धति ठरून गेली आहे तेच विचार समुद्रावर शत्रूच्या मुलुखांतील बिनलष्करी लोकांची मालमत्ता सांपडली असतां त्या सरकारच्या मनांत उद्भवत नाहींत, कारण ह्या ठिकाणीं बिनलष्करी लोकांचीं जनावरें किंवा बिछाना, किंवा धान्य किंवा भांडीं हीं जप्त करण्याचा प्रश्न नसतो. जर एखादें जहाज किंवा त्यांतील माल पकडला गेला तर त्यामुळें एखाद्या व्यापार्‍याचें नुकसान होईल पण अशा तर्‍हेनें माल जप्त केला तरी त्या व्यापार्‍याला नित्याच्या लागणार्‍या वस्तू त्याला मिळणार नाहींत असें होऊं शकत नाहीं. तरी पण हल्लीं समुद्रावरील माल जप्त करण्याच्या बाबतींत बिनलष्करी लोकांचे बरेच हाल कमी झालेले आहेत व त्या बाबतींत बर्‍याच चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, लढाई पुकारण्याच्या वेळीं जीं शत्रूचीं व्यापारी जहाजें आपल्या राष्ट्राच्या बंदरांपैकीं जवळ असलेल्या एका बंदराकडे जावयास निघालीं असतील त्या जहाजांवरील माल युद्धयमान राष्ट्रें जप्त करीत नाहींत. त्याचप्रमाणें जीं शत्रूचीं व्यापारी जहाजें लढाई पुकारण्याच्या वेळीं आपल्या बंदरांत असतील त्यांनां स्वदेशीं जाण्यास युद्धयमान राष्ट्रें मुभा देतात व ही गोष्ट १९०७ सालीं हेग-परिषदेनेंसुद्धां मान्य केलेली आहे. त्याचप्रमाणें लढाई पुकारण्याच्या वेळीं शत्रूच्या लष्करी जहाजांबरोबर जीं तटस्थ राष्ट्रांतलीं व्यापारी जहाजें असतील त्यांचा पाठलाग न करण्याबद्दलहि असाच नियम आहे व तो हेग-परिषदेलाहि मान्य आहे (कलम १६ पहा). तसेंच किनार्‍याजवळ असलेल्या मच्छीमारी बोटींनां त्यांचा उपयोग जर लढाईच्या कामाकरितां होत नसेल तर जप्त करण्यांत येऊं नये अशींहि वहिवाट पडत चालली आहे. हे जे नवीन नियम झालेले आहेत त्यांचा उद्देश एवढाच आहे कीं, लढाईमधील हालचाली व्यवस्थित पद्धतीनें व्हाव्या, व बिनलष्करी लोकांनां आपलें नुकसान किती होईल ह्याचा अंदाज करतां यावा व आपला माल जप्त न व्हावा अशाबद्दल त्यांनां आगाऊ काळजी घेतां यावी व एकंदरींत लढाईचा शेवट लवकर करतां यावा. आपण वर पाहिलेंच आहे कीं, बिनलष्करी लोकांच्या मालमत्तेला जी कांहीं जप्तीची माफी थोडीबहुत आहे ती समुद्रावरच मर्यादित स्वरूपाची आहे. लढाईचें स्वरूपच असें असतें कीं, युद्धयमान राष्ट्रांनां अशा तर्‍हेची माफी देऊं नये असेंच स्वाभाविकपणें वाटत असतें. जमिनीवर जेव्हां युद्ध चाललें असतें तेव्हां त्यावेळीं स्वाभाविक प्रवृत्ति अशी होते कीं, लढाईचे परिणाम सर्व समाजाला सारखे भोगावयास लागावे व बिनलष्करी लोकांच्या मालांची जी जप्ती झाली असेल किंवा जो माल शत्रूच्या सैन्यानें आपल्या उपयोगार्थ घेतला असेल किंवा जें कांहीं अन्यरूपानें बिनलष्करी लोकांनीं शत्रूच्या सैन्याला दिलें असेल त्याची नोंद दोन्ही बाजूंच्या सैन्यांनीं ठेवावी. यापलीकडे त्या लोकांचें रक्षण करणें शक्य नसतें व त्याला कारणहि तसेंच सबळ आहे. युद्धाच्या वेळीं युद्धयमान राष्ट्रांचा असा हेतु असतो कीं शत्रूचें बल कमी होऊन त्यानें लवकर तहाची याचना करावी. पण हा हेतु साध्य होण्यास शत्रूचा पराभव केवळ रणांगणावरच होऊन भागत नाहीं, तर त्याचें मनुष्य व दारूगोळा यांच्या संहाररूपानें जें नुकसान झालें असेल तें त्याला पुन्हां भरून काढतां येऊं नये ही गोष्ट सुद्धां साध्य झाली पाहिजे. ही गोष्ट साध्य होण्यास त्याच्या व्यापाराचें व त्याच्या राष्ट्रांत तयार होऊन विकावयास काढलेल्या मालाचें नुकसान होणें आवश्यक असतें. म्हणून समुद्रावर शत्रूच्या राष्ट्रांतील कच्चा माल जर त्याच्या राष्ट्रांतील व्यापारी जहाजांवर सांपडला किंवा जो माल त्या राष्ट्रांत गेल्यामुळें त्या राष्ट्राची आर्थिक शक्ति वाढेल असा माल तीं व्यापारी जहाजें नेतांना आढळलें तर तीं जहाजें आपल्या ताब्यांत घेणें याला कोणीहि क्रूरपणाचें कृत्य असें मानूं नये. अशा तर्‍हेनें जर जहाजें जप्त केलीं तर शत्रूला त्या जहाजांचा लष्करी मालाची ने-आण करण्याच्या कामीं उपयोग करतां येत नाहीं व त्या जहाजांवरील खलाशांचा लष्करी जहाजांवर ते कैदी होऊन बसल्यामुळें लढण्याच्या कामीं उपयोग होऊं शकत नाहीं.

समुद्रावर सांपडलेल्या मालांची जप्ती करण्याच्या बाबींत सुधारणा करावी किंवा नाहीं यासंबंधानें निरनिराळ्या राष्ट्रांची निरनिराळीं मतें आहेत. या बाबतींत अमेरिकेचें निष्कारण नुकसान होत असल्यामुळें अमेरिकेंतील सरकारचें असें मत आहे कीं, अमेरिकेचें रक्षण करण्यास लहानसें आरमार पुरें असल्यामुळें अमेरिकेचीं व्यापारी जहाजें व त्यांवरील माल ह्यांची जप्ती होऊं नये, व हेंच मत इटलीच्या सरकारचें असल्यामुळें १८७१ सालीं दोन्हीं राष्ट्रांनीं असें ठरविलें आहे कीं, लढाईच्या वेळीं एकमेकांनीं एकमेकांचीं व्यापारी जहाजें जप्त करूं नये; १८६६ सालीं प्रशियाचें ऑस्ट्रियाशीं जें युद्ध झालें त्या युद्धांत दोन्ही पक्षांनीं ह्याच मताचा स्वीकार केला होता व जर्मनीनें १८७० सालीं पुन्हां याच मताचा अनुवाद केला होता पण पुढें याच राष्ट्रानें हें मत झुगारून दिलें हें आश्चर्य होय. इंग्लंडमध्यें ही जप्तीची माफी असावी अशाबद्दल जोराची चळवळ सुरू आहे पण हल्लींच्या प्रसंगीं हें मत इंग्लिश सरकार स्वीकारील किंवा नाहीं हा वादग्रस्त प्रश्न आहे. हेंच इंग्लंड जर अमेरिकेशीं युद्ध पुकारील तर त्याचें जें वर्तन राहील तेंच वर्तन जर्मनी किंवा फ्रान्स ह्या राष्ट्रांशीं युद्ध पुकारतांना इंग्लंड ठेवील किंवा नाहीं हें सांगणें कठिण आहे. कारण अमेरिकेशीं लढतांना दोन्हीं पक्षांनां लढाईंचें क्षेत्र संकुचित करणें व कदाचित तटस्थ राष्ट्रांचीं जहाजें अटलांटिक महासागरांत न येऊं देण्याकरितां आपआपल्या देशांतील व्यापारी जहाजांनां होतांहोईल तों त्रास न देणेंच हितकर होईल. पण हेंच युद्ध इंग्लंडनें जर्मनी किंवा फ्रान्स या देशांशीं सुरू केलें तर त्या देशांच्या व्यापारी जहाजांनां मालाची नेआण करण्यास प्रतिबंध करणें इंग्लंडला जास्त फायदेशीर होईल.

श त्रू च्या मु लु खां ती ल लो क व त्यां ची यु ध्य मा न रा ष्ट्रां त मा ल म त्ता.-युद्ध चालू असतां शत्रूच्या राज्यांतील लोक जर एखाद्या युध्यमान राष्ट्रांत रहात असले तर त्यांनां कसें वागवावें ह्याबद्दल निर्णय हेग-परिषदेंत झालेला नाहीं. इंग्लंडदेशांत ह्या बाबतींत मॅग्नाचार्टाच्या काळापासून बिनलष्करी पण शत्रूच्या मुलुखांतल्या अशा लोकांनां सौम्यपणें वागविण्याची वहिवाट असून ती अद्यापहि तशीच चालू आहे. पण यूरोपखंडामध्यें परिस्थितीप्रमाणें निरनिराळी वहिवाट चालू आहे व इंग्लंडचें त्या राष्ट्रांशीं युद्ध सुरू झालें असतां इंग्लंडला सुद्धां आपली वहिवाट बदलावी लागते.

ल ढा ईं ती ल कै दी.-हेगपरिषदेमध्यें ह्या प्रश्नाबद्दल बरीच चर्चा झालेली आहे व ह्या चर्चेंमुळें पूर्वीपासून चालत आलेल्या वहिवाटींत जरी फारशी भर पडलेली नाहीं तरी त्या परिषदेनें केलेले नियम त्या परिषदेच्या ठरावांवर सह्या करणार्‍या सर्व राष्ट्रांनीं पाळिलेच पाहिजेत अशी व्यवस्था झालेली आहे. ते नियम असे:-लढाईंत केलेले कैदी हे ज्या सैन्यानें कैद केलेले असतील त्या सैन्याच्या ताब्यांत आहेत असें न समजतां तें सैन्य ज्या सरकारच्या वतीनें लढत असेल त्या सरकारच्या ते ताब्यांत आहेत असें समजलें जावें. त्यांनां दयार्द्रबुद्धीनें वागविण्यांत यावें. त्यांचीं शस्त्रें, घोडीं व लष्करी कागदपत्रें हीं वगळून बाकी ज्या जिनसा त्या कैद्यांच्याजवळ असतील त्या त्यांची स्वत:ची मिळकत म्हणून समजल्या जाव्यात. लष्करी कैद्यांनां एखाद्या शहरांत, किल्ल्यांत किंवा छावणींत किंवा इतरत्र कोठेंहि अडकून ठेवण्यांत यावें व त्या कैद्यांनीं ठरवून दिलेल्या हद्दीच्या पलीकडे जातां कामा नये. पण त्या कैद्यांनां केवळ युध्यमान राष्ट्राच्या आत्मरक्षणार्थ व जरूर तेवढ्याच मुदतीपर्यंत अडकून ठेवावें. ज्या राष्ट्रानें हे कैदी पकडले असतील त्या राष्ट्राला कैद केलेले लष्करी कामगार वगळून बाकीच्या कैद्यांकडून त्यांच्या आवडीप्रमाणें व त्यांच्या दर्जास शोभेल असें काम करून घेण्याचा अधिकार आहे. पण त्या राष्ट्रानें त्या कैद्यांस काम फार सांगतां कामा नये व त्यांचा उपयोग लष्करी कामाकडे करूं नये. कैद्यांनां सरकारची नोकरी म्हणून किंवा खाजगी लोकांची नोकरी म्हणून किंवा स्वत: करितां म्हणून काम करण्याचा अधिकार असावा. हे कैदी जें काम करतील, त्याबद्दल तें जर सरकारचें काम असेल तर, राष्ट्रांतील शिपायांनीं तेंच काम केलें असतां त्यांनां जें वेतन मिळालें असतें तेंच वेतन मिळावें आणि ह्या वेतनाबद्दल जर अगोदर सरकारचे दर ठरले नसतील तर सरकारनें त्या कामास शोभेल असेंच वेतन ठरवून तें वेतन त्या कैद्यांस दिलें जावें. ज्यावेळीं हे कैदी सरकारी नोकरीच्या इतर शाखांत नोकरी करतील किंवा खाजगी लोकांची नोकरी करतील त्यावेळीं त्यांच्या कामाच्या शर्ती त्या राष्ट्रांतील सरकारानें लष्करी अधिकार्‍यांच्या सल्ल्यानें निश्चित कराव्यात. हे कैदी जो पगार मिळवितील त्या पगाराचा विनियोग त्यांचा दर्जा वाढविण्याकडे व्हावा व त्यांची जी बाकी राहिली असेल ती त्यांच्याप्रीत्यर्थ झालेला खाण्याचा खर्च वजा करून त्यांनां मुक्त केल्यावर परत करावी (कलम ६). ज्या सरकारानें कैदी पकडले असतील त्या सरकारावर त्यांनां पोसण्याची सर्व जबाबदारी आहे. युध्यमान राष्ट्रांत निराळा ठराव झाला नसेल तर लढाईंत सांपडलेल्या कैद्यांनां त्यांचें अन्नवस्त्र व राहण्याची जागा ह्या बांबतींत त्या त्या राष्ट्रांतल्या कैद्यांप्रमाणेंच वागविलें पाहिजे. जर या कैद्यांनीं उद्दामपणाचें वर्तन केलें तर योग्य ते कडक उपाय अमलांत आणण्याचा त्या सरकारास अधिकार आहे जे कैदी पळून जातील व आपल्या सैन्यांत पुन्हां प्रविष्ट होण्यापूर्वींच किंवा व्यापलेल्या मुलुखांतून निघून जाण्यापूर्वींच पकडले जातील तर त्यांनां शिस्त राखण्याकरितां जे नियम अवश्य असतात त्या नियमांप्रमाणें वागविण्यांत येईल. पण पळून गेलेले कैदी पूर्णपणें सुटले असतील व पुन्हां लढाईंत कैद केले गेले असतील तर त्यांनां पूर्वी पळून गेल्याबद्दल शिक्षा होतां कामा नये (कलम ८). प्रत्येक लढाईंत सांपडलेल्या कैद्यानें विचारपूस झाल्यावर आपलें नांव, गांव खरें तेंच सांगितलें पाहिजे व जर त्यानें हा नियम मोडला तर त्याला त्याच्याच बरोबरीच्या कैद्यांनां ज्या सवलती मिळतील त्या मिळणार नाहींत (कलम ९). लढाईंत पकडलेल्या कैद्यांनां त्यांच्या देशांत शपथेवर मोकळे करणें जर कायदेशीर मानीत असतील तर व जर ते पळून न जाण्याची शपथ घेतील तर त्यांनां-मोकळें करण्यास हरकत नाहीं; पण त्यांनीं, आपल्या सरकारातर्फें जें सरकार त्यांनां स्वतंत्र करणार त्या सरकारशीं जे करारमदार होतील ते वचनबद्ध झाल्यामुळें जरूर पाळले पाहिजेत. अशा प्रसंगीं त्यांच्या स्वत:च्या सरकारनें त्यांच्यापासून कबूल केल्याप्रमाणेंच नोकरी करून घेतली पाहिजे (कलम १०). लष्करी कैद्याला शपथ घेऊन आपली सुटका करून घेण्यास कोणत्याहि सरकारनें भाग पाडतां कामा नये, त्याचप्रमाणें कोठल्याहि कैद्याला हक्कानें मला शपथेवर सोडून द्या अशी मागणी करतां येत नाहीं (कलम ११). शपथ घेतलेल्या कैद्याला एकदां मोकळें केल्यावर तो जर पळून गेला व ज्या सरकारशीं शपथ घेतली असेल त्याच्याविरुद्ध किंवा त्या सरकारच्या दोस्तांविरुद्ध जर त्यानें शस्त्र उचललें व तो पुन्हां पकडला गेला तर त्याला लष्करी कैद्याप्रमाणें न वागवितां त्याची कोर्टासमोर चवकशी करावी (कलम १२).

व र्त मा न प त्रां चे बा त मी दा र.-हेग येथें पास झालेल्या नियमांत वर्तमानपत्रांचे बातमीदार, रिपोर्टर, सैन्याला किरकोळ जिनसा पुरविणारे लोक व ठेकेदार ह्यांसारख्या लोकांकरितां एक मजेदार नियम केलेला आहे. हे लोक जर लढाईंत पकडले गेले तर त्यांचा दर्जा, आपण बिनलढणारे लोक आहोंत असा दाखला दाखविल्यास इतर लष्करी कैद्यांप्रमाणेंच असावा असें त्या नियमांत ठरलें आहे.

कै द्यां सं बं धीं बा त मी पु र वि णा रें खा तें:-हें नवीन निर्माण झालें आहे. हें खातें प्रत्येक युद्धयमान राष्ट्रांत किंवा जरूर असेल तर तटस्थ राष्ट्रांत लढाईचें शिंग पुकारतांच उघडलें गेलें पाहिजे. या खात्याचा उपयोग असा आहे कीं, या खात्यानें लढाईच्या कैद्यांविषयीं सर्व माहिती पुरवावी. ह्या खात्याला प्रत्येक कैद्याबद्दल सर्व माहिती असणें जरूर आहे, म्हणून इतर सर्व खात्यांनीं जरूर ती माहिती या खात्यास पुरविली पाहिजे. ह्या खात्याला कोणा कैद्याला अटक झाली आहे, कोणाला शपथेवर मोकळें केलें आहे, कोणीं नियम मोडले आहेत व पळून गेले आहेत, व कोण दवाखान्यांत मरण पावलें आहेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती सरकारानें पुरविली पाहिजे. तसेंच लढाईच्या ठिकाणीं सैनिकांच्या अंगावर ज्या मौल्यवान जिनसा, पत्रें वगैरे सांपडल्या असतील किंवा कैदी झालेल्या सैनिक लोकांनीं मरावयाच्या वेळीं दवाखाना किंवा अँब्युलन्स वगैरे ठिकाणीं वस्तू ठेवल्या असतील त्या गोळाकरून त्या कैद्यांच्या किंवा मयतांच्या आप्तांकडे पाठवून देणें हेंहि काम ह्या खात्याकडे सोपविलें असतें लष्करी कैद्याकडे पाठविण्याचीं पत्रें, मनीआर्डरी, किंवा व्ही. पी. व पार्सलें ह्या जिनसा दोन्ही सरकारांनीं पोस्टाची फी न घेतां रवाना केल्या पाहिजेत, त्याचप्रमाणें कैद्यांनां देणग्या किंवा इतर मदत ही सुद्धां सरकारतर्फें मोफतच गेली पाहिजे.

दु:खनिवारक संस्था.- त्याचप्रमाणें कैदी व जखमी झालेल्या लोकांकरितां ज्या कांहीं दु:खनिवारक संस्था काढलेल्या असतात त्यांनां देशांतले सरकारचे नियम संभाळून लष्करी खात्याच्या हितसंबंधास बाध न येतां शक्य तेवढी मदत सरकारनें केली पाहिजे. ह्या संस्थांच्या प्रतिनिधींनां, कैद्यांनां अटक केलेल्या ठिकाणीं व स्वदेशीं जाण्यास परवानगी मिळाल्यामुळें, निघालेल्या कैद्यांनां ते जेथें जेथें वाटेंत मुक्काम करतील तेथें तेथें भेटून मदत करण्याची पूर्ण मुभा असली पाहिजे. मात्र ह्या प्रतिनिधींनीं एक अट मान्य केली पाहिजे. ती ही कीं, त्यांच्याजवळ लष्करी अधिकार्‍यांचा परवाना पाहिजे व शांतता राखण्याकरितां जे नियम केलेले आहेत ते आपण पाळूं अशी त्यांनीं लेखी हमी दिली पाहिजे.

रोगी व जखमी लोक:-या लोकांशीं युद्धयमान राष्ट्रांतील सरकारचें वर्तन कसें असावें ह्याबद्दलचे नियम १९०६ च्या जुलैच्या ६ व्या तारिखेला जिनिव्हा परिषदेनें केले आहेत व तेच हल्लीं प्रचारांत आहेत. ह्या नियमान्वयें हल्लीं असें ठरलें आहे कीं, लष्करी दवाखानें व अ‍ॅब्युलन्स ह्या संस्था, त्याचप्रमाणें त्यांमधील डॉक्टर व इतर नोकर, तसेंच लष्कराकडील उपाध्याय ह्या लोकांचें कोठल्याहि प्रसंगीं रक्षण झालें पाहिजे व त्यांचा मान राहिला पाहिजे व ह्या लोकांनीं आपल्या जवळ खुणेचें निशाण ठेवून तांबडा क्रूस असलेली पट्टी दंडावर बांधली पाहिजे. शांततापरिषदांच्या वेळीं भरलेल्या सभेनें जिनिव्हा सभेचे नियम जलयुद्धाच्या वेळी सुद्धां लावण्यांत यावेत असें ठरविलें आहे. ह्या नवीन कन्व्हेन्शनचे नियम पुढें दिल्याप्रमाणें आहेत:-

लष्करी इस्पितळी जहाजें म्हणजे ज्यांचा उपयोग केवळ जखमी झालेल्या, अजारी पडलेल्या व जहाज फुटल्यामुळें पाण्यांत बुडूं लागणार्‍या लोकांनांच नेण्याकरितां व्हावा म्हणून बांधिलेलीं जहाजें. व ज्यांचीं नांवें युद्धाच्या सुरवातीच्या वेळीं किंवा युद्ध चालू असतांना तीं उपयोगांत आणण्याच्या पूर्वीं युद्धयमान राष्ट्रांनीं कळविलीं आहेत तीं जहाजें ह्यांनां कधींहि त्रास देऊं नये व युद्ध चालू असेपर्यंत तीं जप्त केलीं जाऊं नयेत.

त्याचप्रमाणें जीं इस्पितळी जहाजें खाजगी व्यक्तींनीं बांधलीं असतील किंवा सरकारनें कबूल केलेल्या दु:खनिवारक संस्थांनीं बांधलेलीं असतील, त्या जहाजांनांहि त्रास देऊं नये व जर युध्यमान राष्ट्रें किंवा तटस्थ राष्ट्रें ह्यांनीं युद्धांच्या आरंभीं किंवा युद्ध चालू असतांना अशा जहाजांनां रोगी व जखमी शिपायांनां मदत करण्याचें काम सांगितलें असेल व त्यांचीं नांवें तीं उपयोगांत आणण्यापूर्वीं शत्रूला कळविलीं असतील तर तीं जहाजें जप्त करण्यांत येऊं नयेत. युध्यमान राष्ट्रांनां ह्या जहाजांवर आपला अधिकार चालविण्याचा व त्यांची तपासणी करण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणें अशा प्रकारच्या जहाजांनां मदत करण्याचा किंवा त्यांनां हांकून देण्याचा किंवा विशिष्ट मार्गानेंच जावयास सांगण्याचा व त्या जहाजांवर आपला अधिकारी ठेवण्याचा, फार काय पण तशी जरूरीच असेल तर त्यांनां प्रतिबंध करण्याचा सुद्धां हक्क आहे. कोठल्याहि जप्त केलेल्या जहाजावर जर कोणी उपाध्याय किंवा डॉक्टर व त्यांनां मदत करणारी मंडळी सांपडलीं तर त्यांनां केव्हांहि कैद करतां कामा नये. तसेंच तटस्थ राष्ट्रांतील व्यापारी जहाजें किंवा इतर प्रकारचीं जहाजें हीं जर युध्यमान राष्ट्राचीं जखमी, आजारी व जहाज बुडविल्यामुळें बुडूं लागलेलीं अशीं माणसें घेऊं लागलीं तर त्या जहाजांनां कैद करूं नये. अँब्युलन्स व रेडक्रास सोसायटी याविषयीं या लेखाशेवटीं पहा.

शत्रूचें नुकसान करण्याचीं साधनें आहेत त्यासंबंधानें हेग-परिषदेनें पुढें दिलेले बंधनकारक नियम केले आहेत:- (१) विष किंवा विषारी शस्त्रें ह्यांचा उपयोग करणें. (२) विश्वासघातानें शत्रूच्या राष्ट्रांतील किंवा सैन्यांतील शिपायांनां व लोकांनां ठार मारणें. (३) शत्रूच्या सैन्यांतील लोक शरण येऊन त्यांनीं शस्त्रें खालीं ठेविलीं असतांना व त्यांनां इतर कसलेंहि आत्मरक्षणाचें साधन नसतांनां त्यांनां जखमी किंवा ठार करणें. (४) शत्रूकडील शरण आलेले लोक आश्रय मागावयास आले असतांना त्यांनां तो नाकारणें. (५) ज्यायोगें अनवश्यक अशी शरीरास पीडा होईल अशीं हत्यारें, गोळ्या किंवा इतर पदार्थ ह्यांचा उपयोग करणें. (६) लढाईची तहकुबी दर्शविणारें निशाण, राष्ट्रीय निशाण व इतर लष्करी चिन्हें, शत्रूचा लष्करी पोषाक व जिनिव्हा परिषदेनें ठरविलेलीं विशिष्ट चिन्हें ह्यांचा अयोग्य रीतीनें उपयोग करणें. (७) कांहीं एक जरूरी नसतांना शत्रूची मालमत्ता जप्त करणें किंवा तिचा नाश करणें, त्याचप्रमाणें ज्याचें रक्षण केलें जात नाहीं अशीं शहरें, खेडीं, वस्तीचीं ठिकाणें व इमारती ह्यांच्यावर हल्ला करणें. (८) एखादें शहर किंवा ठिकाण हल्ला करून घेतलें असतांना त्याचा विध्वंस करणें. (९) लढाईंतल्या युक्त्या व शत्रूच्या सैन्यांतील व देशाकडील बातमी काढण्याकरतां योजिलेले उपाय-मग ते कसेहि असोत-ते निषिद्ध मानलेले नाहींत.

हे र.-हेग परिषदेनें २९ व्या कलमान्वयें हेराची अशी व्याख्या केली आहे कीं, जो मनुष्य गुप्तपणें किंवा खोट्या सोंगाची बतावणी करून प्रतिपक्षाला बातमी पुरविण्याकरितां युध्यमान राष्ट्राच्या सैन्याच्या लष्करी हालचालींच्या क्षेत्रामध्यें बातमी मिळवितो किंवा मिळविण्याची खटपट करतो तो मनुष्य हेर होय. ह्या व्याख्येप्रमाणें बातमी मिळविण्याकरितां शत्रूच्या गोटांत शिरणारे पण उघड पोषाखांत जाणारे सैनिक यांना हेर म्हणतां येत नाहीं. त्याचप्रमाणें लष्करी किंवा मुलकी लोक स्वत:च्या देशाच्या किंवा शत्रूच्या सैन्याकरतां कागदपत्र पोंचविण्याची कामगिरी सोंपविलेले व ती कामगिरी राजरोसपणें बजाविणारे ह्यांनांहि गुप्तहेर म्हणतां येत नाहीं. त्याचप्रमाणें कागदपत्र पोंचविण्याकरितां व सैन्याचे व देशाचे जे निरनिराळे भाग असतील त्या भागांत दळणवळण कायम राखण्याकरितां म्हणून कागदपत्रें पोंचविण्यास विमानांतून पाठविलेले लोक ह्यांनांहि गुप्तहेर म्हणणें शक्य नाहीं. एखादा गुप्तहेर आपली कामगिरी बजावीत असतांना जर पकडला गेला तर त्याची अगोदर चवकशी केल्याशिवाय त्याला शिक्षा होतां कामा नये. तसेंच आपली कामगिरी करून एखादा गुप्तहेर जर आपल्या सैन्यांत जाऊन मिळाला आणि नंतर त्याला जर शत्रूकडून पकडण्यांत आलें तर त्याला कैद्याप्रमाणें वागविलें पाहिजे, त्याला त्याच्या मागच्या गुप्तहेराच्या कामगिरीबद्दल शिक्षा होतां कामा नये.

एखाद्या शहरावर हल्ला चढवावयाचा असेल किंवा त्याच्यावर तोफांचा मारा करावयाचा असेल तर शहरांतील धार्मिक कलाकौशल्याचें, शास्त्रीय व धर्मादाय इमारती, दवाखाने व रुग्णालयें ह्यांचें संरक्षण-त्यांचा उपयोग त्यावेळीं जर लष्करी कामाकडे होत नसेल तर-करण्याकरतां शक्य तेवढे उपाय योजावेत. पण ह्या इमारती वगैरेंची माहिती वेढा दिलेल्या लोकांनीं त्या इमारतींवर शत्रूस दिसेल अशा विशिष्ट खुणांनीं किंवा अन्य तर्‍हेनें कळविली पाहिजे.

१९०७ सालीं हेग येथें पुन्हां भरलेल्या सभेनें, आरमारी फौजेनें भडिमार कसा करावा याबद्दल कांहीं नियम केले आहेत. त्या नियमान्वयें असें ठरलें आहे कीं, आरमारांतल्या जहाजांनां तात्कालिक उपयोगाकरतां लागणारी अन्नसामुग्री व इतर जिन्नस स्थानिक अधिकार्‍यांनीं पुरविण्याचें नाकारल्याशिवाय कोठल्याहि अरक्षित बंदरावर, शहरावर, खेडेगांवावर किंवा वस्तीच्या ठिकाणावर किंवा इमारतीवर आरमारानें भडिमार करूं नये. पण स्थानिक अधिकार्‍यांनीं जर मागितलेली खंडणी देण्याचें नाकारलें तर तेवढ्याचकरतां त्या ठिकाणावर तोफांचा भडिमार होतां कामा नये. उलट पक्षीं एखाद्या बंदरांत जर लष्करी जहाजें असलीं किंवा एखाद्या इमारतींत जर शस्त्रें असलीं किंवा एखाद्या ठिकाणीं लष्करी किल्ले असले तर त्यांवर बेलाशक भडिमार करावा.

एखाद्या समुद्रांत पाणसुरुंग पेरण्यासंबंधानें कांहीं नियम हेग-परिषदेनें केले आहेत ते असे:- (१) पाणसुरुंग पेरणार्‍या मनुष्याचा त्या सुरुंगांशीं संबंध सुटल्यावर निदान एक तास तरी ते पाणसुरुंग निरुपद्रवी होतील अशा रीतीचे ते असल्याशिवाय नांगरलेले सुरुंग पसरणें निषिद्ध आहे. (२) ज्या ठिकाणीं सुरुंग पेरले असतील त्या ठिकाणापासून निघाल्यानंतर तत्क्षणींच जे निरुपद्रवी होत नाहींत असे सुरुंग पेरणें निषिद्ध आहे. (३) ज्या जहाजाला पाणतीर मारावयाचा तें जहाज निसटल्यावर तो पाणतीर जर निरुपद्रवी होत नसेल तर तसल्या प्रकारचा पाणतीर वापरणें निषिद्ध आहे. व्यापारी जहाजांना केवळ त्रास देण्याकरतां शत्रूच्या बंदरापासून किंवा समुद्राच्या किनार्‍यापासून दूर अंतरावर पाणसुरुंग पेरणें निषिद्ध आहे (नियम २). ज्यावेळीं तरते पाणसुरुंग पेरले असतील त्यावेळीं युद्धांत भाग न घेणार्‍या जहाजांच्या संरक्षणाबद्दल शक्य तेवढी काळजी घेतली पाहिजे. युध्यमान राष्ट्रांनीं ठराविक मुदतीच्या आंत हे सुरुंग निरुपद्रवी करण्याची पराकाष्ठा करावी व ह्या सुरुंगांवर नजर ठेवण्याची कामगिरी तीं राष्ट्रें जर न करूं लागली तर लष्करी दृष्ट्या शक्य असेल तेव्हां त्या राष्ट्रांनीं जहाजाच्या मालकांनां व परराष्ट्रीय खात्यामार्फत त्या त्या देशांच्या सरकारांनां धोक्याचीं ठिकाणें कळविणें जरूर आहे (नियम ३). जीं तटस्थ राष्ट्रें आपल्या देशांच्या किनार्‍याजवळ पाणसुरुंग पेरतील त्यांनीं युध्यमान राष्ट्रांनां लागू असलेले नियम पाळले पाहिजेत व तजबिजी केल्या पाहिजेत. तसेंच तटस्थ राष्ट्रांनीं आपण पाणसुरुंग पेरल्याची सूचना व्यापारी जहाजांच्या मालकांस दिली पाहिजे व परराष्ट्रीय खात्यामार्फत तद्देशीय सरकारांस ही गोष्ट कळविली पाहिजे (नियम ४). लढाई संपल्यानंतर युध्यमान राष्ट्रांनीं आपण पसरलेले पाणसुरुंग काढून टाकले पाहिजेत. प्रत्येक राष्ट्रानें आपण पसरलेले पाणसुरुंग काढले पाहिजेत. त्याचप्रमाणें एका युध्यमान राष्ट्रानें दुसर्‍या राष्ट्राच्या समुद्रकिनार्‍यावर जर सुरुंग पेरले असतील तर ते कोठें पेरले आहेत ह्याची माहिती सुरुंग पेरणार्‍या राष्ट्रानें त्या राष्ट्रास कळविली पाहिजे व प्रत्येक राष्ट्रानें आपल्या समुद्रकिनार्‍याजवळचे सुरुंग ताबडतोब काढून टाकिलें पाहिजेत (नियम ५).

हेग कन्व्हेन्शनचा नियम मान्य करणार्‍या ज्या राष्ट्रांजवळ कन्व्हेन्शननें पास केलेल्या प्रकारचे सुरुंग नसतील व त्यामुळें ज्या राष्ट्रांनां कलम एक व तीन ह्यांत दिलेले नियम पाळतां येत नाहींत त्यांनीं होतांहोईल तितक्या लवकर आपले सुरुंग वर सांगितल्याप्रमाणें बनवावे.

श त्रू च्या मु लु खा चा ता बा.-शत्रूचा अधिकार प्रत्यक्षपणें जोंपर्यंत एखाद्या मुलुखावर चालतो तोंपर्यंत तो मुलुख शत्रूनें व्यापिला असें समजावें व अशा प्रसंगीं व्यापिलेल्या मुलुखांत शांतता राखणें व लोकांच्या मालमत्तेची काळजी घेणें त्या शत्रूचें कर्तव्य आहे. व्यापिलेल्या मुलुखांतील लोकांनां लष्करी नोकरी करण्यास भाग पाडणें किंवा आम्हांस तुमच्या देशाच्या लष्करी हालचालींची खबर द्या किंवा आम्हांस राजनिष्ठ रहा अशी बळजबरी शत्रूनें त्या लोकांवर करूं नये. लष्करी दृष्ट्या आवश्यक नसेल तर लोकांच्या खाजगी मालमत्तेचा अभिलाष शत्रूनें धरतां कामा नये. खाजगी मालमत्तेंत धार्मिक संस्था, शिक्षणसंस्था, शास्त्रीय संस्था वगैरे जरी त्या सरकारी असल्या तरी-ह्यांचा अंतर्भाव होतो. म्हणून ह्यांची नासधूस किंवा नाश, तसेंच ऐतिहासिक स्मारकांचा नाश करणें निषिद्ध मानलें आहे.

ल ढा ई पु का र णें.-याबद्दल अद्याप निश्चित अशी वहिवाट नाहीं. १८७० सालीं झालेल्या फ्रँको-प्रशियन युद्धामध्यें लढाई पुकारण्याच्या अगोदर ती बातमी जाणूनबुजून एकमेकांस कळविली गेली होती. पण जपान व चीन ह्या देशांमध्यें झालेल्या युद्धांत असा प्रकार झाला नव्हता. लढाई सुरू करण्याच्या अगोदर निर्वाणीचे संदेश भावी युध्यमान राष्ट्रें एकमेकांस पाठवितात व आपल्या अटी मान्य करण्यास कांहीं मुदत देतात व तेवढ्या मुदतींत तात्पुरतें युद्ध सुरू करतात व तेवढ्या मुदतींत जर त्या अटी मान्य झाल्या नाहींत तर खर्‍याखुर्‍या युद्धास सुरवात होते. उदाहरणार्थ, अमेरिकेनें स्पेनला १८९८ च्या एप्रिल महिन्याच्या वीस तारखेला क्यूबामधून आपलें सर्व खुष्कीवरलें व आरमारी बल काढून न्यावें असा निर्वाणीचा संदेश पाठविला व तीन दिवसांचीं मुदत दिली. पुढें बाविसाव्या तारखेस सायंकाळीं अमेरिकेनें स्पेनचीं कित्येक जहाजें काबीज केलीं व अशा रीतीनें लढाईस सुरुवात झाली. ट्रान्सव्हालयुद्धाच्या वेळीं हीच स्थिति झाली. १९०७ सालीं भरलेल्या हेग-परिषदेनें असा ठराव केलेला आहे कीं सयुक्तिक कारणें सांगून युद्ध पुकारल्याशिवाय किंवा आमच्या अटी मान्य न कराल तर लढाईस प्रारंभ होईल असा निर्वाणीचा खलिता गेल्याशिवाय लढाईस प्रत्यक्ष तोंड लागतां कामा नये. त्याचप्रमाणें असेंहि ठरलें आहे. कीं, दोन राष्ट्रांमध्यें लढाई सुरू झाली आहे असें तटस्थ राष्ट्रांस कळलें गेलें पाहिजे व तसें तारेनें कळविल्याशिवाय त्या राष्ट्रांनां युद्धाचे नियम लागूं नसावेत. पण ह्या नियमांत एक गोम आहे ती अशी कीं, तटस्थ राष्ट्रांनां युद्ध सुरू झालें आहे असें स्वतंत्रपणें कळलें होतें असें जर युध्यमान राष्ट्रांनीं सिद्ध केलें तर आपणांस युद्ध सुरू झालें अशी सूचना युद्धयमान राष्ट्रांनीं दिली नाहीं अशी तक्रार त्या तटस्थ राष्ट्रांनां करतां येणार नाहीं.

ल ढा ई चे भा वी का य दे.-हेग परिषदेनें पास केलेल्या वरील कायद्यावर फारशी भिस्त ठेवणें शहाणपणाचें होणार नाहीं. लष्करी गरजा, लढाईच्या वेळची मन:स्थिति वगैरेंमुळें तुम्हीं कितीहि अकलेनें कायदे करा आयत्या वेळीं युध्यमान राष्ट्रें हे कायदे धाब्यावर बसविणारच असा ताजा अनुभव आहे. तरी पण सुधारलेल्या राष्ट्रांनीं हे कायदे केल्यामुळें स्वाभाविकच ते पाळण्याची प्रवृत्ति यूरोपीय राष्ट्रांत होत आहे व सध्यांचा राष्ट्रसंघहि हीच दिशा दाखवीत आहे.

वर भाकीत केल्याप्रमाणें हेगच्या तहाच्या अटी महायुद्धांत (१९१४-१९१८) मोडल्या जाऊन युद्धशास्त्रांतहि क्रांति घडून आली. या क्रांतीचा याठिकाणीं थोडक्यांत विचार केलेला आहे.

गे ल्या म हा यु द्धां ती ल श स्त्रा स्त्रें व डा व पें च.-फ्रँको-जर्मन युद्धानंतरहि राष्ट्रशक्तिसमता राखण्याचा अखिल यूरोपचा प्रयत्‍न चालला होता, तरी प्रत्येक राष्ट्र आपलें बळ वाढविण्याच्या तयारीस लागलें होतें. ‘कॉनस्क्रिपशन’ म्हणजे प्रजाजनास सक्तीची लष्करी नोकरी करण्यास भाग पाडण्याचें तत्त्व सर्रहा मान्य झालें होतें. मागें मोठ्या यूरोपियन राष्ट्राचेंहि खडे सैन्य २ लाखांवर नसे तें यावेळीं सात ते दहा लाखांपर्यंत वाढलें. युद्धाचीं नवीन शस्त्रास्त्रें निर्माण करण्यांत शास्त्रज्ञांचीं डोकीं चालूं लागलीं व या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष युद्धांत फारच आश्चर्यकारक व भेसूर रीतीनें दिसून आला.

नवीन शस्त्रास्त्रांच्या योगानें लढाईचे जुने डावपेंच साहजिकच समूळ बदलले. किल्ल्यांचें महत्त्व राहिलें नाहीं. अँटवर्पसारखा दुर्भेद्य किल्ला लांब पल्ल्याच्या तोफांमुळें अवघ्या सहा दिवसांत पडला. तेव्हां आतां तटबंदीच्या शास्त्रांत बदल करण्याची वेळ आली आहे असें सर्वांच्या लक्षांत आलें. हवित्झर तोफांनीं लांबवरच्या प्रदेशावर अचुक व यशस्वी मारा करण्याची युक्ति फारच क्रांतिकारक म्हणतां येईल. पाणबुड्यांच्या (सबमरीन) अप्रतिहत संचारामुळें व मत्स्यास्त्रांच्या (टार्पेडो) मार्‍यामुळें आरमारी ताफ्यांनां धोका पोंहोचूं लागून राष्ट्राचें तें अंग पूर्वींसारखें कार्यक्षम राहिलें नाहीं. कपटी डावपेंच किंवा गनिमी कावा रानटी, अतएव त्याज्य म्हणून जो ठरविण्यांत आला होता त्याचा आश्रय जर्मनांचें नांव पुढें करून दोस्तराष्ट्रांनांहि घ्यावा लागला. तेव्हां मराठ्यांनां हंसण्याचें कारण उरलें नाहीं. उलट कांहीं युद्धकलाविशारद त्यांची आतां पाठच थोपटीत आहेत. विषारी धूर सोडण्याची क्लृप्ती धर्मयुद्धाच्या नियमांत येऊं शकत नसली तरी आणीबाणीच्या वेळीं तिचा अंगिकार करण्यास धर्मयुद्धाचे पुरस्कर्तेहि मागेंपुढें पहात नाहींत हें सिद्ध झालें. वैमानिक दळ ठेवण्याचें प्रत्येक राष्ट्राला या महायुद्धांत भाग पडलें व या दळाचा केवढा उपयोग झाला हें सर्वांनां ठाऊकच आहे. शत्रूच्या अगदीं डोक्यावर जाऊन त्याच्या छावणीवर बांबगोळे टाकणें, हस्तपत्रकें वाटणें, शत्रूचीं शहरें वरून उध्वस्त करणें यांसारखे प्रकार या युद्धांत नवीनच होते. झेपेलिनच्या मार्‍याच्या भीतीनें रणांगणावर नसलेलें सैन्य भुयारामध्यें चर (ट्रेंच) खणून त्यामध्यें सुरक्षित राहून सर्व व्यवहार करी. टँक नांवाची जी सशस्त्र मोटार निघाली होतीं तिच्या द्वारें शत्रूचा मारा न लागतां उलट शत्रूवर बेधडक तोफा डागण्यांत येत असत. बिनतारी संदेशाच्या शोधानें मदतीकरितां केलेलें आव्हान ताबडतोब पोंचून मदत मिळूं लागली व वेळेवर मदतीच्या अभावीं संकटाची विनाकारण येणारी आपत्ति टाळतां येऊं लागली.

लगट करून लढाई करण्याचे हे दिवस नाहींत; त्यामुळें सैन्याच्या तुकड्या खूप लांबवर पसरलेल्या ठेवून त्या हळू हळू पुढें सरकवितात. तेव्हां लढाईचें क्षेत्र पांचपंचवीस मैलांचें व मोहिमेचें क्षेत्र शेंदीडशें मैलांचें सहज असूं शकतें. पूर्वीं एखादी चकमक अगर लढाई कांहीं दिवसांच्या अंतरानें होई, आतां चरांत असलेले सैनिक व यांत्रिक तोफा यांची सारखी गोळागोळी अनेक दिवस चालू असते. घोडदळाचा सध्यांच्या लढाईत फारसा उपयोग होत नसून त्यांचा केवळ अघाडीस जाऊन बातमी आणण्याकडे, पाठीमागची सैन्यरचना शत्रूच्या दृष्टीआड करण्याकडे व क्वचित तोफा काबीज करण्याकडे होतो. डोंगर, झाडें वगैरेंचा आश्रय करून हळू हळू पुढें पाऊल टाकणार्‍या पायदळ पलटणी शत्रूच्या सहज नजरेस येऊं नयेत व त्यांतील एकेक शिपाई अचुक उडवितां येऊं नये म्हणून सैन्याचा पोषाख खाकी ठेवावा लागला. यामुळें पूर्वींचे भपकेबाज पोषाख कुचकामी ठरले. मैदानांतून चाल करून जातांना दर पल्ल्यास शिपाई ३।४ फूट खोल खंदक खणून त्यांतील माती पुढें रचितात व या खंदकाच्या आंत निजून शत्रूवर बंदुकीचा मारा करतात. पुष्कळ सैन्य एकत्र जवळ जवळ उभें करून शत्रूच्या तोंडावर हल्ला करणें ही युक्ति आज निष्फळ ठरल्यामुळें शत्रूच्या पिछाडीवर चाल करून जाण्याचा डावपेंच परिणामकारक समजतात. यावेळीं शहाणा सेनानी पिछेहाट पत्करितो पण तें पराभवाचें लक्षण समजलें जात नाहीं. याप्रमाणें पूर्वींच्या व आतांच्या डावपेंचांत झालेले बदल दाखवितां येतील. यापुढें होणार्‍या युद्धांत आणखी नवीनच युक्त्या निघून आजचेहि नियम त्याज्य ठरण्याचा संभव आहे.

भारतीय युद्धकला.

वे द का ली न.-भरतखंडांत पंजाब, सिंध व राजपुताना या भागांत वास करणारे अनार्य लोक सहज नमण्यासारखे नसल्यानें, नवीन आलेल्या आर्यांनां त्यांच्याशीं मोठ्या निकरानें लढावें लागें (ऋग्वेद १. ५४, ४ व १. ११७, ३ पहा). आर्यांच्या निरनिराळ्या तुकड्या त्यांच्या सेनानींच्या नेतृत्वाखालीं शत्रूंवर चाल करून जात (ऋ. १. ५१. ६); प्रत्येक तुकडीचें स्वतंत्र निशाण (केतु) असे (१. १०३, १) सैनिक आपल्या पूर्वजांचें यश गात, व इंद्र किंवा बृहस्पति यांनीं केलेल्या मदतीबद्दल त्यांची स्तुति करीत, व रणगर्जना करीत लढाईस जात असत (१. ११२, १). गाईच्या कातड्यांनीं आच्छादिलेल्या रथांत बसून सेनानी प्रयाण करीत (६. ४७, २६); कोणी धनुष्यबाण वापरीत, तर कोणी भाले वापरीत, तर कोणीं दुसरींच अस्त्रें योजीत (ऋ. ६. ७५, या सूक्तांत बरींच आयुधें आलीं आहेत). बाणांचीं टोकें हरणाच्या शिंगांचीं किंवा लोखंडाचीं असत; कांहींनां विष लाविलेलें असे (६. ७५, १५). घोडदळ व पायदळ असे सैन्याचे भाग असत (१. ६५, ३; १. ७३, ९). कधीं कधीं सेनानी एखाद्या नगरावर हल्ला करून तें लुटीत असे. काबीज केलेल्या नगरांत आर्यांच्या संस्था स्थापीत व आर्य देवांची उपासना रूढ करीत; अनार्य लोकांनां पादक्रांत करण्याचा हेतु आर्यधर्म प्रसाराचा असे (१. ५१, ८-९). तेव्हां प्रचारक सेनानी अनार्यांवर चाल करून त्यांचा मुलुख आपल्या ताब्यांत घेत; व अशा रीतीनें पुष्कळसे स्वतंत्र आर्य दास व दस्यू यांच्याशीं टक्करा देत राज्य करीत. जेव्हां कोणी आर्य वीर आपल्या शत्रूंचें प्रचंड सामर्थ्य पाहून व पुष्कळ वेळां पराभव पावून उदास होत, तेव्हां त्यांचे भाट त्यांच्या पूर्वजांनीं शत्रूंवर केलेले पराक्रम वीरकाव्यांच्या द्वारें त्यांच्या कानांवर घालून त्यांनां उत्तेजित करीत व आर्यशत्रु जो शुष्ण त्याचा पराभव कसा केला याचें मोठें चटकदार वर्णन करीत. जेव्हां शत्रू पराभूत होत तेव्हां त्यांच्या सुपीक जमिनी खालसा करून आपल्या अनुयायांस देत व त्यांनां डोंगरांत पिटाळून लावण्यांत येई; कधीं कधीं त्यांनां नौकांतून दूर पाठवीत (१. ९७, ८). पुष्कळ वेळां आर्यांआर्यांमध्यें लढाया होत. याचें कारण मत्सर किंवा महत्त्वाकांक्षा असे. दाशराज्ञयुद्ध हें वेदकालीन सर्वांत मोठें असें आर्याआर्यामधील युद्ध होय (याचें वर्णन तिसर्‍या विभागांत आलें आहे) [ कुंटे-व्हिसिसिट्यूड्स ऑफ आर्यन सिव्हिलिझेशन इन् इंडिया; दाते-वेदकालीन युद्धकला (लोकमान्याचा महाराष्ट्र अंक १९२५) ].

म हा भा र त का ली न.-महाभारत हें केवळ भारतीय युद्धवर्णनार्थ निर्माण झालें असल्यानें यांत युद्धकलेचें विस्तारपूर्वक विवेचन सांपडणार आहे. भारतकालीन युद्धें आर्यांतच आपापसांत होत, तेव्हां त्यांचे प्रकार जास्त सुधारलेले व धर्मास अनुसरून असत हें निर्विवाद होय. धर्मयुद्धाचे नियम न पाळणारा तो रानटी व हीन प्रतीचा योद्धा होय असा सार्वत्रिक समज असे. तथापि पुष्कळ वेळां शत्रूचा पाडाव करण्यास कपटाचरण करावें लागे व त्याला राजनीति समजत. ही कुटिल राजनीति ग्रीकांपासून आर्यांनीं उचलली असा तर्क लढविणें कितपत बरोबर होईल याची शंका आहे.

त्या काळीं सर्वत्र फौज ठेवण्याची वहिवाट असे. सैन्याचे मुख्य चार विभाग पडत; पदाति, अश्व, गज आणि रथ. ही चतुरंगदल सेना हल्लीं त्रिदल बनली आहे. याचें कारण हल्लीं लढाईंत गजांनां मज्जाव आहे. पूर्वीं हत्तींचा लढाईंत अतिशय उपयोग होत असे. तैमूरलंगापर्यंत फौजेंत हत्तींची तुकडी ठेवीत. हत्तींच्या सोंडांनां व पायांनां चिलखत घातल्यावर त्यांनां वार लागण्याची भीति नसे व त्यामुळें ते शत्रूंचा मोठा फडशा उडवून विजयश्री घेऊन येत. पण एकदां कां या गजसैन्याचा पराभव होऊन तें परतलें म्हणजे मात्र तें स्वपक्षाचाच नाश करीं. भीमासारखे मल्ल हत्तींनां बुक्क्यांनीं जेरीस आणीत (द्रोणपर्व अ. २६). फौज संतुष्ट राखण्यांत राष्ट्राचें कल्याण असतें हें आजपर्यंत पुष्कळदां अनुभवास आलेलें आहे. तिचा पगार थकला कीं यजमानावर संकट ओढवलेंच म्हणून समजावें. नारदानें युधिष्ठिर यास “कच्चिब्दलस्य भक्तं च वेतनं च यथांचितम् | संप्राप्तकाले दातव्यं ददासि न विकर्षसि ।।” (सभापर्व अ. ५) असा उपदेश केला आहे. प्राचीन काळीं सैनिकांस वेळच्या वेळीं कांहीं धान्याच्या रूपांत पगार मिळे. धान्य सरकारी कोठींतून दिलें जात असे. रणांत पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबाचें राजाकडून पोषण होई.

वर सांगितलेल्या सैन्याच्या चार अंगांत प्रत्येक दहा असामींवर एक, शंभरांवर एक व हजारांवर एक असे अधिकारी नेमिले असत (शांतिपर्व अ. १००). हजारांवरचा अधिकारी वरच्या दर्जाचा असून, राजपूज्य असा असे. प्रत्येक अंगावर अश्वाधिपति, गजाधिपति, राजाधिपति असे श्रेष्ठ अधिकारी नेमिले असून सर्व फौजेवर एक सेनापति असे. शांतिपर्वांत उत्तम सेनापति कोण याचें विवेचन आहे (शांतिपर्व अ. ८५-१३). पदाति, अश्व, गज आणि रथ या चतुरंगांशिवाय आणखी फौजेचीं चार अंगें असत; तीं विष्टि, नौका, हेर आणि देशिक ही होत. विष्टि म्हणजे वाहतुकीचें खातें; लढाईची सामुग्री वाहून नेण्याची याकडे व्यवस्था असे. नद्या उतरण्यास व लढाईच्या कामीं नौकांची जरूरी असे; नौकांतूनहि लढाया होत. हेरांचा उपयोग सांगावयास नकोच. देशिक म्हणजे वाटाडे किंवा स्काउट्स असावेत. याप्रमाणें, “रथा नागा हयाश्चैव पादाताश्चैव पांडव । विष्टिर्नावश्चराश्चैव देशिका इति चाष्टम: ।।” (शांतिपर्व अध्याय ५९) हीं फौजेचीं आठ अंगें झालीं. पदातीजवळ ढाल, तलवार, प्रास, परशु, भिंडिपाल, तोमर, ऋष्टि, शुक्ल इत्यादि हत्यारें असत. घोडेस्वाराजवळ तलवार व भाला असे. गजारूढ योध्दयाच्या अंगांत कवच (चिलखत) असे. कांहीं राष्ट्रें अश्वयुद्धप्रवीण तर कांहीं मातंग (गज) युद्धप्रवीण असत. रथीयोद्धे अजिंक्य होत, कारण त्यांनां रथाच्या योगानें वाटेल तिकडे झपाट्यानें जातां येई व पुष्कळशी युद्धसामुग्री रथांत मावत असे. रथी धनुष्यबाणांचा उपयोग करी.

प्राचीन काळीं युद्धांत अस्त्रांचा उपयोग बहुधां रथी करीत. कांहीं दैविक मंत्र बाणांवर योजून त्यांचीं अग्न्यस्त्रें, वाय्वस्त्रें वगैरे बनवीत. बाणांखेरीज इतर पदार्थांवरहि मंत्र योजून त्यांचीं अस्त्रें करीत. अस्त्रविद्या ही गुरूकडून मंत्र शिकून ताबडतोब मिळवितां येई; पण धर्नुविद्येंत प्रावीण्य मिळविण्यस साधकास बरेच श्रम करावे लागत.

धर्मयुद्धाच्या नियमांत विषदिग्वबाण उपयोगांत आणूं नये, तसेंच उलटीं टोंकें असलेले कर्णीबाण घेऊं नयेत असें सांगितलें आहे. धर्मयुद्धांत रथीनें रथीवर, हत्तीनें हत्तीवर जावें, योद्धयांचीं शस्त्रें सारखीं असावींत, पराजित किंवा भयभीत झालेल्यावर शस्त्र उचलूं नये वगैरे नियम आहेत. पुढें कूटयुद्धें सुरू झाल्यावर या नियमांकडे दुर्लक्ष होऊं लागलें. शांतिपर्वाच्या ६९ व्या अध्यायांत लढाईच्या प्रसंगीं राजानें आपल्या मुख्य दुर्गाचा आश्रय करावा, गौळवाडा रस्त्यावर आणून ठेवावा, देश उध्वस्त करावा, पिकें जाळून टाकावीं वगैरे गोष्टी स्वराज्यसंरक्षणार्थ सांगितल्या आहेत; त्याप्रमाणें शत्रूचें राज्य उध्वस्त करण्याच्याहि भयंकर रीती सांगितल्या आहेत. हे नियम धर्मयुद्धनियमांच्या अगदीं उलट असून त्यांचा प्रचार ग्रीक स्वारीपासून झाला असावा असें कांहीं विद्वान म्हणतात.

अयुध्यमानस्य वधो दारामर्ष: कृतघ्नता ।
ब्रह्मवित्तस्य चादानं नि:शेषकरणं तथा ।।
स्त्रियामोष: पतिस्थानं दस्युष्वेतद्विगर्हितम् ।
संश्लेषंच परस्त्रीभिर्दस्युरेतानि वर्जयेत् ।। (शां. १३४-१७)

यांत वर्णिलेले प्रकार दस्यूंनींहि करूं नयेत अशी अपेक्षा जी केलेली आहे तिचें कारण ते धर्मयुद्धनियमांत येत नाहींत हें होय.

विमानांत बसून शत्रूवर हल्ला करण्याची कला त्यावेळीं अस्तित्वांत असल्याचें दिसतें. शाल्वानें द्वारकेवर विमानांत बसून स्वारी केल्याचा उल्लेख आहे. तेव्हां आकाशांतील लढाया त्यावेळीं असल्यास नवल नाहीं.

हल्लीं ज्याप्रमाणें सैन्याची तुकडी या परिमाणानें मोजणी करतात, त्याप्रमाणें भारतकालीं अक्षौहिणींनीं सैन्यें मोजीत. एका अक्षौहिणींत २१८७० रथ; तितकेच हत्ती; १०९३५० पायदळ व ६५६१० घोडे येत असत. सैन्य कसें उभें करावें हें शांतिपर्वाच्या ९९ व्या अध्यायांत दिलें आहे. क्रौंचव्यूह, गरुडव्यूह, अर्धचंद्रव्यूह, चक्रव्यूह वगैरेंनीं सैन्यरचना करून, शत्रूस भारी पडून विजय मिळविण्याची कला त्या काळीं योद्धयांनां चांगली अवगत होती. या व्यूहांचा कितपत उपयोग होई अशी एक शंका साहजिक उत्पन्न होते; पण सैन्यविभाग निरनिराळ्या रीतींनीं करून बराच वेळ टिकाव धरण्याची त्यांतील मूळ कल्पना नि:संशय चांगली होती हें निर्विवाद आहे.

द्वंद्वयुद्धांप्रमाणें संकुलयुद्धांचींहि महाभारतांत वर्णनें आहेत. हीं संकुलयुद्धें हल्लींच्या युद्धांसारखीं दिसतात. यंत रथीनें रथीवरच चालून जावयाचें हा परिपाठ सोडून वाटेल त्यानें वाटेल त्यावर हल्ला करावा व शत्रुपक्षाचा नाश करावा अशी वहिवाट होतीसें दिसते.

सैन्याबरोबर “सामानाचे खटारे, व्यापारी, वेश्या, त्यांचीं वाहनें, हत्ती, घोडे, स्त्रिया, पंगु वगैरे फालतु लोक” (उद्योगपर्व) इत्यादि बाजारबुणगे असत. मुसुलमानांच्या छावणींतहि या सर्व गोष्टी असल्याचें फिरंगी वर्णन करतात. तेव्हां प्राचीन काळापासूनच सैन्याबरोबर शहरच्या सर्व गोष्टी घेऊन छावणीचें नगर बनविण्याची तर्‍हा चालत आलेली आहे असें दिसतें.

चं द्र गु प्त का ली न.-सैन्य बाळगण्याची एद्धत फार प्राचीन काळापासूनची आहे. चंद्रगुप्ताच्या काळींहि ही अस्तित्वांत होती. चंद्रगुप्ताच्या कारभारांतील एक प्रधान अंग म्हणजे खडी फौज. त्याचें सिंहासन व साम्राज्य केवळ तिच्यावर अवलंबून होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं.

शेवटच्या नंद राजानें आपल्यामागें २००००० पायदळ, ८०००० घोडदळ, ८००० रथ आणि ६००० हत्ती इतकें प्रचंड सैन्य ठेविलें होतें. पुढें चंद्रगुप्तानें हें सैन्य आणखी वाढवून त्याच्या बळावर सेल्युकसला जिंकून, सबंध उत्तरहिंदुस्थान पादाक्रांत केलें. त्यानें आपल्यांतले ५०० हत्ती सेल्युकसला दिल्याचा उल्लेख आहे. सैन्याच्या तुकड्या पाडून त्यांची व्यवस्था ठेवण्याची पद्धत फार पुरातनची आहे. सैन्यांत अधिकारी नेमण्याची रीत खडी फौज ठेवावयास लागल्यापासूनची आहे. चंद्रगुप्ताच्या वेळेस आनुवंशिक सैन्य, भाडोत्रीं सैन्य, मित्रसैन्य, सैनिकसंघ इत्यादि सैन्याचे निरनिराळे प्रकार असत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्याहि तुकड्या असत. सैन्याच्या प्रत्येक अंगावर अधिकारी असत. प्रत्येक अंगांतींल प्रत्येक दहा माणसांवर एक पदिक नावांचा अधिकारी असे, दहा पदिकांवर एक सेनापति व दहा सेनापतींवर एक नायक असे आणि या सर्वांवर एक सेनाध्यक्ष असे. राजाची नेहेमीं सैन्यावर प्रत्यक्ष देखरेख असे. हजीरी ठेवण्याची पद्धत प्रचलित होती. अश्वरथगजपदाति यांच्या अध्यक्षांकडे आपआपल्या खात्यांत सैन्यभरती करणें, शिक्षण देणें, हजीरी ठेवणें हीं कामें सोंपविलेलीं असत.

सेनाध्यक्षाचा दर्जा युवराज, राजमाता, राजपत्‍नी, प्रधान व ऋत्विज यांच्या बरोबरीचा असे. कारण या सर्वांनां ४८००० पण (एक नाणें) वर्षासन असे. इतर अधिकार्‍यांनां वर्षास २४००० पण मिळत. गजरथाश्वाध्यक्षांनां प्रत्येकीं ८००० पण मिळत. सैन्याच्या वैद्याला व शिक्षकाला २००० व चांगल्या सैनिकाला दरवर्षीं ५०० पण देण्यांत येत. सैन्यांत असतांना मृत्यु पावलेल्यांच्या बायकांमुलांनां सरकारांतून वेतन मिळे. जेव्हां पगाराकरितां खजिन्यांत पैसा नसे तेव्हां जमिनी, गुरें वगैरे बदला देण्यांत येत.

युद्धखात्याची चंद्रगुप्तानें ठेविलेली उत्तम व्यवस्था पाहून मेगॅस्थेनीससारख्या परक्या पनुष्याला सुद्धां आश्चर्य वाटून व त्यानें त्याचें नीट निरीक्षण करून सुंदर वर्णन लिहून ठेविलें आहे. राज्यांतील सैन्यासंबंधीची पहाणी व कारभार ३० अधिकार्‍यांच्या एका संघाकडे असून, ५ अधिकार्‍यांचें एक मंडळ अशीं त्या संघाचीं सहा मंडळें केलेलीं असत. एकाचें काम आरमारावरील अधिकार्‍याशीं, व दुसर्‍याचें लढाउसामानाची वहातुक करणार्‍या बैलगाड्यांवरील अधिकार्‍यांशीं सहकार्य करण्याचें असें. तिसर्‍या मंडळाकडे पायदळ, चवथ्याकडे घोडदळ, पांचव्याकडे रथ व सहाव्याकडे गज यांची व्यवस्था पाहण्याचें काम असें. चंद्रगुप्तानें पूर्वींच्या चतुरंगदल सैन्यांत आरमारी व मोदी खातें घालून त्याची सुधारणा केली. याखेरीज मोठी अश्वशाला व गजशाला स्थापिली व दारूगोळा तयार करण्याचा कारखाना काढिला. या शस्त्रागारावर एक अधिकारी असे.

युद्धखात्याच्या रचनेसंबंधानें एक विशेष गोष्ट म्हणजे युद्धांत हत्तींचें असलेले मोठें महत्त्व होय. अति प्राचीन काळापासून भारतीय सैन्यव्यवस्थेंतील हें एक प्रमुख अंग होतें. शासनसत्तेची हत्ती बाळगण्याबाबत इतकी दक्षता असे कीं, कोणाहि खासगी व्यक्तीला हत्ती बाळगतां येत नसे.

किल्ल्यांनांहि त्या काळीं पुष्कळ महत्त्व असे. संरक्षक तटबंदीकडे सर्वत्र सरकारचें विशेष लक्ष असे. राज्यांतील सर्व बाजूंस निरनिराळ्या प्रकारची तटबंदी असे; उदाहरणार्थ पाण्याची, पर्वताची, मरुस्थलाची व अरण्याची तटबंदी किल्ले कसे बांधावे हेंहि अर्थशास्त्रांत उत्तम सांगितलें आहे.

सैन्यरचनेचे मुख्य प्रकार म्हणजे: (१) भोग (सर्प) व्यूह; (२) दंडव्यूह; (३) मंडलव्यूह; (४) असंहतव्यूह; (५) गरुडव्यूह; (६) सर्वतोभद्रव्यूह; (७) असह्यव्यूह; (८) विजयव्यूह. वेळ पडेल त्याप्रमाणें योग्य व्यूह रचून आपल्या सैन्याचें बळ वाढविण्याची कला त्यावेळीं राजांनां अवगत होती.

लढाऊ कारभाराला कीर्तिप्रद गोष्ट म्हणजे त्याचे सन्मान्य व दयाशील युद्धाचे नियम ही होय. यांतील सर्वांत श्रेष्ठ नियम म्हणजे केवळ देश जिंकण्यासाठीं कधींहि लढाई करूं नये हा होय. या नियमावरूनच, चंद्रगुप्तानें आपल्याजवळ अजिंक्य सैन्य असतांना व सभोंवतालीं सेल्युसिदसारखे प्रदेश जीर्ण स्थितींत असतांना, हिंदुकूशपलीकडे आपलें राज्य वाढविण्याची कां इच्छा केली नाहीं याची उपपत्ति लागते. सैन्यांत नोकरी व इतर सरकारी काम करण्यापासून शेतकरी विमुक्त होई इतकेंच नव्हे तर लढाईपासून त्याचें संरक्षण केलें जाई, हें पाहून मेगॅस्थिनीसला फार बरें वाटलें. या वर्गांतील लोक जनहितकारी म्हणून समजले जात व ते सर्वकाळ निर्विघ्नपणें जमिनीची मशागत करून लोकांनां आवश्यक वस्तू पुरवीत. शेतकीप्रधान अशा हिंदुस्थानदेशाला हा युद्धनियम फार उपयुक्त होता यांत संशय नाहीं. याखेरीज इतर धर्मयुद्धाचे नियम पाळण्यांत येत. विशस्त्र, शरणागत, सुप्त, अवीर, बाल, स्त्री इत्यादिकांनां सशस्त्र सैनिकानें मारूं नये; योद्धयांनीं विनाकारण रक्तपात करूं नये इत्यादि नियम चोख रीतीनें पाळण्यांत येत असल्याकारणानें, इसवी सनापूर्वीं तिसर्‍या-चवथ्या शतकांतहि युद्धें फारशीं निष्ठुर वाटत नसत. [ एरियन; कौटिलीय अर्थशास्त्र. ]

ह र्ष का ली न.-या काळीं सैन्याचीं तीनच मुख्य अंगें होतीं: पायदळ, घोडेस्वार आणि हत्ती. पैकीं रथांग वहिवाटींत नव्हतेंसें दिसतें. सैन्यांतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे हत्तींचें पथक. या पथकाला त्यावेळीं परकीय लोक फार घाबरत; कारण हत्तींशीं टकरा देण्याचें सामर्थ्य दुसर्‍या कोणत्याहि सैन्यांतील भागांत नसे. हत्तींनां पकडून त्यांनां युद्धोपयोगी शिक्षण देण्यांत येत असे. या पथकाचें पोषण करण्यास अतिशय खर्च येई. हर्षचरिताच्या ६ व्या उच्छवासांत बाणानें हर्षाच्या गजशाळेचें जें वर्णन दिलें आहे त्यावरून त्या काळीं हत्तींची किती बरदास्त राखीत हें चांगलें दिसून येतें. हत्तींच्या खालोखाल घोडेस्वारांनां महत्त्व असे. वनायुज, आरट्टज, काम्बोज, भारद्वाज, सिंधुदेशज आणि पारसीक असे सहा देशांचे घोडे हर्षाच्या मंदुरेंत (अश्वशाळेंत) होते. हत्तींप्रमाणें घोड्यांनांहि शिक्षण देण्यांत येत असे. शालिहोत्र ग्रंथांत ज्या अश्वासंबंधीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांवरून अश्वविद्या किती परिणतावस्थेस पोंचली होती हें दिसून येतें. घोड्यांचे मोतद्दार सर्व चांडाळ असत ही लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. पायदळाची त्याकाळीं फारशी किंमत नसे. शिपायाजवळ ढाल व तलवार असे. हत्तीवरील योद्धा धनुष्यबाणांचा उपयोग करी.

हर्षाच्या सैन्यांत भाडोत्री सैनिक नसत; तर राजाचे आप्त (कुलपुत्र), मांडलिक, प्रजेपैकीं कनिष्ठ दर्जाचे लोक यांचेंच बहुधां सैन्य बनलेलें असे. सैन्याच्या प्रत्येक अंगावर एकेक अधिकारी असून त्या सर्वांवर एक मुख्य सेनापति नेमला जाई. राजाच्या खाजगी उत्पन्नांतून सैन्याचा खर्च चाले. शिपायांचा पगार वार्षिक असून तो धान्य व नगदी रूपांत मिळे. [ मध्ययुगीन भारत. ]

ह्युएनत्संगानें या काळच्या हिंदी सैन्यासंबंधीं असें लिहून ठेवलें आहे कीं, “राष्ट्रीय सैनिक निवडक असे योद्धे असत. त्यांची क्षात्रवृत्ति आनुवंशिक असल्यामुळें युद्धकलेमध्यें ते पूर्ण निष्णात असत. शांततेच्या काळीं ते राजधानीचें रक्षण करीत, व युद्ध उद्भवलें कीं, त्याची अघाडी संभाळीत. सैन्याची गज, रथ, अश्व आणि पदाति अशीं चार अंगें असत. लढाऊ हत्तींच्या अंगावर एक प्रकारचें चिलखत घालून त्यांच्या सुळ्यांवर लोखंडी टोपणाचे कांटे बसवीत. अशा हत्तीवर सेनापति बसे व त्याच्या दोहों बाजूंनां त्याला आवरण्यास एकेक शिपाई असे. त्याच्या रथाला चार घोडे असून दोन्हीं बाजूंस संरक्षणार्थ पायदळ चाले. पायदळांतील लोक फार शूर असत व ते निर्भयपणें लढाईस तोंड देत. त्यांच्याजवळ एक मोठी ढाल व लांब भाला असे. कांहींजवळ तलवार असून ते आघाडीवर तुटून पडत. अनेक पिढ्यांच्या सरावामुळें सर्व शस्त्रांचा उपयोग करण्यांत ते पारंगत असत.”

मों ग ल का ली न.-तत्कालीन रजपुतांत युद्धकलेचें ज्ञान परिपूर्ण नसल्यानें शस्त्रास्त्रांच्या व युद्धकौशल्याच्या बाबतींत ते मुसुलमानांच्या फार मागें असत; युक्तीचा किंवा कपटाचा ते मुळींच आश्रय करीत नसत. परकीयांशीं युद्ध कसें करावें याचें ज्ञान त्यांनां चांगलें नव्हतें असें म्हटल्यावांचून राहावत नाहीं. संरक्षणात्मक व अभिघातात्मक या दोन युद्धांगांपैकीं फक्त पहिल्या अंगाचाच ते आश्रय करीत. पण मुसुलमानाचें तसें नव्हतें. ते आपला शेद सोडून हिंदुस्थानांत राज्यस्थापनेस येत, व यदाकदाचित् पराभव झाला तरी त्यांचा स्वदेश सुरक्षित राही.

मोंगल राज्यव्यवस्थेचें मूळच मुळीं लष्करी होतें. त्यांतील प्रत्येक अधिकार्‍याचें नांव लष्करीपटांत दाखल केलेलें असे; व त्याला अमुक एक घोड्यांचें आधिपत्य म्हणजे मनसबी देण्यांत येई; तीवरून त्याचा पगार व दर्जा ठरे मुलकी नोकर, न्यायाधीश, टपाल, अबकारी, जकात वगैरे खात्यांवर अधिपती, आणि वरिष्ठ दर्जाचे कारकून व हिशेबनवीस सुद्धां मनसबदार (सैन्यांतील घटक) म्हणून गणले जात. सैन्यपटांत दर्जानुसार त्यांचीं नांवें घालून बक्षी (सैन्याचा पगार देणारा अधिकारी) त्यांनां पगार देत. त्यांचा पगार वाढविण्याच्या वेळीं त्यांच्या नांवाला असलेलें अधिपत्यहि वाढवावें लागे. यावरून राज्यांत खर्चिक खातें फक्त लष्करी होतें हें उघड दिसतें. सर्व अधिकार्‍यांचा पगारी तक्ता बक्षीकडून तयार करून घेत. जसजसें साम्राज्य वाढत चाललें तसतशीं बक्षींची संख्याहि वाढत गेली. शेवटीं औरंझेबाच्या कारकीर्दीच्या अखेरीस एक मुख्य बक्षी, “मीरबक्षी” नेमून त्याच्या हाताखालीं तीन दुय्यम बक्षी दिले गेले.

अकबराची लष्करी व्यवस्था चांगली असे. त्याच्या वेळीं रजपुतांस लष्करांत मोठमोठ्या जागा देण्यांत येत. पांच हजारांवर फौज बाळगणार्‍या सरदारास अमीर व त्याहून कमी फौज बाळगणार्‍यास मनसबदार म्हणत. यांशिवाय खालच्या दर्जाचे लहान लहान असामदार पुष्कळ असत, अहदी नांवाचे एकएकटेच चाकरीस राहाणारे लोकहि बरेच होते. अमीराची जागा शहाजाद्याशिवाय दुसर्‍याला क्वचित मिळे. मनसबदाराचा पगार दीडशेंपासून सातशें रु. पर्यंत असे. हिंदुस्थानांतील मुसुलमानांस लष्करांत वरिष्ठ प्रतीच्या जागा फारशा मिळत नसत; कारण त्यांची लायकी कमी असे. अंमलदारांनां खर्चासाठीं जहागिरी देण्याऐवजीं, अकबरानें त्यांनां रोकड नेमणुकी बांधून दिल्या. सैनिकांचीं हजिरीपत्रकें ठेवण्याची वहिवाट घालून दिली. त्यामुळें अंमलदारांनां फारशी लबाडी करतां येईनाशी झाली. मुसुलमानी अंमलदारांच्या जहागिरी वंशपरंपरेनें सरकार चालवीत नसे. अस्सल मोंगलांस बादशहा वरिष्ठ प्रतीच्या जागा देई. मोंगलसंज्ञक लोक वर्णानें गोरे असून परदेशांतून आलेले असत. वर्णाखेरीज त्यांच्यांत इतर वैशिष्ट्य कांहीं नसे. तेव्हां गोरा तो मोंगल असें समजून इराणी, तुर्क, अरब वगैरे कोणत्याहि जातीस वरिष्ठ जागा मिळत पण एक दोन पिढ्यांत त्यांचा वर्ण काळसर झाल्यावर त्यांच्या वंशजांस पूर्वींच्या जागा मिळत नसत; तेव्हां साहाजिकच त्यांस हलक्या जागा पत्करून रहावें लागे. रजपुतांच्या नोकरीबद्दल मात्र त्यांस वंशपरंपरा चालणार्‍या जहागिरी नेमून दिलेल्या असत.

ज्या प्रांतांतून फौजेचें कूच होई तो प्रांत उध्वस्त होत असल्याकारणानें शेतकर्‍यांचें जें कांहीं नुकसान होईं तें भरून देण्याविषयीं अकबराची ताकीद असे. या फौजेच्या अंतर्व्यवस्थेंत औरंगझेबानें फारसे फेरफार केले नाहींत. बारा हजार स्वारांची नेमणूक असलेले पंचवीस तीस अमीर बादशहाजवळ होते असें बर्नियर म्हणतो. प्रत्येक स्वाराचा पगार सुमारें २५ रुपये होता. अधिकार्‍यांच्या नेमणुका वंशपरंपरेच्या नव्हत्या. बर्नियरच्या मतें घोडेस्वारांची संख्या दोन लाख होती. पायदळाला फारसा मान नसे. त्यांतील लोकांस बंदूक वापरण्याची भीति वाटे. ते खालीं लांकडी घोडा ठेवून त्यावर बंदुक धरीत व मग सोडीत. फौजेंत बाजारबुणग्यांची संख्या मोठी असे. एक लहानसा तोफखानाहि असे; त्यावरच्या अधिकार्‍याला मीरअतीश किंवा दरोघा-इ-तोफखाना म्हणत. यूरोपांतील तुर्कांचा तोफखाना मोंगल बादशहांच्या तोफखान्यापेक्षां जास्त सुधारलेला व कार्यक्षम असल्यानें तुर्की किंवा इराणी साम्राज्यांतील एखादा चांगला अधिकारी, आपला मीरअतीश करण्याची मोंगल बादशहा खटपट करीत; अशा रीतीनें तोफखान्यांत तुर्की किंवा फिरंगी गोलंदाज आणि बंदुकवाल्यांत हिंदु जातीचे लोक भरलेले असत. या एकंदर विवेचनावरून असें दिसून येईल कीं युद्धकला मुसुलमानांनीं कांहींशी ऊर्जितावस्थेस आणिली. लाखों लोकांची फौज बाळगून तिची व्यवस्था व तीवर हुकमत चालविण्यांत मोंगल बादशहांनीं चांगली नायकगिरी दाखविली. त्यावेळीं लष्कराच्या सोयीचे रस्ते त्यांनीं सर्व देशभर बांधिले; मोठमोठ्या शहरांनां तटबंद्या केल्या व घोडेस्वारांचीं अजिंक्य पथकें तयार केलीं. [ जदुनाथ सरकार; मु. रि. ].

शि व का ली न.-शिवाजीच्या पायदळांत दोन प्रकारचे लोक असत: एक घाटमाथ्यावरचे मावळे व दुसरे घाटाखालील कोंकणांतींल हेटकरी. या प्रत्येकाजवळ ढाल, तलवार, व बंदूक असे. हत्यारें शिपायांचीं स्वत:चीं असत व दारूगोळा सरकारांतून मिळे. पायदळांत दहा माणसांचा एक दाहिजा, पैकीं नऊ पाईक व एक नाईक असे. पांच दाहिज्यांवर किंवा नाइकांवर एक हवालदार; दोन हयालदारांवर एक जुमलेदार व दहा जुमलेदारांवर एक हजारी अशी व्यवस्था असे. हजारी व पंचहजारी सरदारांवर एक सरनोबत नेमलेला असे शिपायांस व नायकांस दरमहा एकपासून तीन होनपर्यंत पगार असे. जुमलेदारास वर्षास शंभर होन व हजारी सरदारांस पांचशें दोन मिळत.

घोडदळांत बारगीर व शिलेदार असे दोन प्रकार असत. पहिल्यास पागा असें म्हणत. त्याची व्यवस्था सरकारकडून होई. शिलेदारानें स्वत:चें घोडें बाळगून त्याचा खर्च पदरचा करावयाचा असे. त्याला सरकारांतून याबद्दल जादा वेतन मिळे. हें शिलेदारांचें घोडदळ पागेप्रमाणें सरकारच्या पूर्णपणें ताब्यांत नसे. त्यामुळें असें पथक फार मोठें बाळगावें अशीं साहजिकच इच्छा होत नसे. पण त्या काळीं शिलेदारांची संख्या फार असल्याकारणानें सैन्यभरतीकरितां त्यांनां कांहीं अटींवर ठेवणें प्राप्त होई. सरकारी घोड्यांवर खुणेकरितां शिक्के मारीत. घोडेस्वाराजवळ भाला व बंदुक असे. पंचवीस बारगीर किंवा शिलेदार यांवर एक हवालदार, पांच हवालदारांवर एक जुमलेदार, पांच जुमलेदारांवर एक सुभेदार व दहा सुभेदारांवर एक पंचहजारी असे. या सर्वांवर एक सरनोबत (घोडदळाचा) नेमलेला असे. पंचवीस घोड्यांस एक पखाली व नालबंद असे. घोडदळांतील बारगिरास दोनपासून पांच होनपर्यंत पगार असे; शिलेदारास सहापासून बारापर्यंत, जुमलेदारास वीस होन, सुभेदारास वर्षास एक हजार तैनात व पालखी असे आणि पंचहजारीस वर्षाची दोन हजार होन तैनात, शिवाय पालखी व अबदागीर यांची नेमणूक असे. शिलेदारांचे सुभेदार निराळे व बारगिरांचे निराळें असत.

या लष्कराशिवाय महाराजांच्या स्वारीबरोबर जिलबीचे पांच हजार लोक असत. या हुजूरपायदळाप्रमाणें एक हुजूरपागाहि असे. तींत पांच हजार घोडीं असत. लष्करांत नवीन नोकरीस लागणार्‍या मनुष्यानें जुन्या शिपायाचें खात्रीपत्र हजर करावयाचें असे. प्रत्येक सुभेदाराच्या व हजारी सरदाराच्या हाताखालीं एक ब्राह्मण सबनीस व प्रभु कारखाननीस किंवा ब्राह्मण मुजुमदार व जाबनीस असे हुद्देदार दिलेले असत. यांशिवाय पंचहजारीस एक दिवाण दिला जाई.

किल्ले हे स्वराज्याचे पंचप्राण असल्याकारणानें त्यांची उत्तम निगा राखण्यांत येई. प्रत्येक किल्ल्यावर चांगला हवालदार नेमून त्याच्या हाताखालीं एक सरनोबत व लागतील तसे तटसरनोबत दिलेले असत. याशिवाय किल्ल्यावर एक सुभेदार, एक सबनीस, एक फडणीस व एक कारखाननीस असे हुद्देदार असत. हवालदार मराठा; सुभेदार, फडणीस व सबनीस ब्राह्मण आणि कारखाननीस प्रभु जातीचा असे. किल्ल्याचा सर्व कारभार हवालदाराच्या नांवानें चाले; किल्ल्याच्या दरवाजांच्या किल्ल्या त्याच्या ताब्यांत असत. सुभेदाराकडे मुलकी काम, सबनिसाकडे दफ्तर, हजीरी वगैरे लिहिण्याचें काम व कारखाननिसाकडे कोठी, दारूगोळा, रोजमुरा वांटणें, किल्ल्याची दुरुस्ती हीं कामें असत.

किल्ल्याखालच्या बंदोबस्तीकरितां मेटकरी, रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे नेमलेले असत. कांहीं कमीजास्त झाल्यास हे लोक किल्लेदारास वर्दी देत. रात्रीच्या वेळीं सर्व अंमलदार किल्ल्याभोंवतीं आळीपाळीनें गस्त घालीत. हवालदार स्वत: एकदोनदां बंदोबस्त आहे कीं नाहीं हें पाहून जाई. रात्रीं कोणी गाफील राहूं नये अशी सक्त ताकीद असे. किल्ल्यावरील लोकास अडिस्त्री, नगदी वगैरें वेतन वेळच्या वेळीं पावतें होण्याची व्यवस्था केली असे. दाणागल्ला, दारूगोळा वगैरेंची बेगमी चार वर्षांची करून ठेवीत. सर्व गडकर्‍यांनां खूष ठेवून किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आपखुषीनें लादण्यांत महाराजांचें मोठें कौशल्य दिसून येई. जुन्या कसलेल्या वृद्ध शिपायांच्या चाकरीबद्दल त्यांनां योग्य बक्षिस म्हणून गडावरची अंमलदारी देत.

तोफखान्याकडे जे कामगार असत त्यांच्या नांवाचा कोठें उल्लेख आढळत नाहीं. किल्ल्यांवर तोफा लावून ठेवीत, तसेंच लष्कराबरोबरच्या तोफांसाठीं मोठमोठे गाडे असत. सुतार, लोहार, चांभार, रस्सीदमार, तलफदार, गोलंदाज वगैरेंचा भरणा असे. जड तोफांनां हत्ती लावीत. तोफेबरोबर गारदी पायदळ असे. परस्थ व्यापार्‍यांकडून किंवा तहांत तोफा मिळवून त्यांचा मोठा संग्रह करण्यांत येई.

जंजिर्‍याच्या शिद्दीच्या आरमाराशीं टक्कर देण्याकरितां म्हणून शिवाजीनें आरमार बांधिलें. या आरमाराची यादी चित्रगुप्तानें दिली आहे ती अशी-थोरगुराबा ३०, गलबतें १००, महागिर्‍या १५०, लहान गुराबा ५०, होड्या १०, लहान होड्या १५०, तारवें ६०, पाल २५, जूग १५, व मचवे ५०. कांहीं इंग्रजांनीं कारवारपाशीं महाराजांचें आरमार पाहिलें, त्यांत एका डोलकाठीचीं तीसपासून एकशें पन्नास टनपर्यंत वजनाचीं ८५ जहाजें व तीन मोठीं जहाजें होतीं. शिद्दीच्या जंजिर्‍यासारखा आपला एक जंजिरा असावा असें वाटून शिवाजीनें मालवणच्या किनार्‍यावर सिंधुदुर्ग नांवाचा भक्कम दुर्ग फार श्रमानें व खर्चानें बांधिला; याशिवाय अंजनवेली, रत्‍नागिरी-पद्मदुर्ग, सरजाकोट, गहनदुर्ग, खाकेरी व राजकोट असे आणखी जंजिरे शिवाजीनें बांधिलें असें म्हणतात. मराठ्यांच्या या आरमाराची शक्ति पाहून पोर्तुगीज, शिद्दी व इंग्रज यांस भीति वाटली. पुढें पोर्तुगीज, व इंग्रज यांच्यांशीं गांठीं पडून त्यांनां मराठा आरमाराचा चांगला प्रभाव दिसून आला. (‘आरमार’ पहा) समुद्रकांठीं राहणारे कोळी, भंडारी वगैरे दर्यावर्दी या आरमारांत असत. “शिवाजी स्वत: खलाशी नव्हता म्हणून बरें झालें; नाहींतर त्यानें जमिनीचा पृष्ठभाग ज्याप्रमाणें साफ (नि:शत्रु) करून टाकिला, त्याप्रमाणें समुद्राचाहि करून टाकिला असता !” हें एका डगलस नांवाच्या इंग्रजानें शिवाजीबद्दल लिहिलें आहे. [ केळूसकर-छत्रपति शिवाजीमहाराज; मराठे व इंग्रज ].

पे श वे का ली न.-पेशव्यांची खडी फौज थोडी असे. माधवराव पेशव्यांच्या वेळीं खुद्द पेशव्यांचें सैन्य चाळीस हजार होतें. लढाईच्या वेळीं पेशव्यांनां एक लाख पर्यंत फौज जमवितां येत असे. तैनाती किंवा सरंजामी फौजच मोठी होती. त्यांची मुख्य फौज म्हणजे हुजरात व खासपागा. त्यांचे सरदार शिंदे, होळकर, भोंसले यांच्याजवळ कायती वीस पंचवीस हजार फौज असून, तीबद्दल त्यांनां एक एक कोटीची जहागीर देण्यांत आली होती. बाकीच्या सरदारांजवळ यापेक्षां कमी फौज असून जहागिरीहि कमी असे. पेशवे स्वत: लढाईवर जात; तेव्हां त्यांचे सर्व मुत्सद्दी व सामान्य लोकहि लढाईस जाण्यास कचरत नसत हें सांगावयास नकोच.

फौजेंत पायदळापेक्षां घोडदळाचा भरणा जास्त असे. सावकाश धिमेपणानें लढत बसण्याची रीत मराठ्यांनां माहीत नसल्यानें, गनिमी काव्याच्या त्यांच्या लढाईंत घोड्यांचा विशेष उपयोग होई. मोंगलांशीं जोंपर्यंत सामना द्यावयाचा होता तोंपर्यंत ही भुरट्या लढाईची पद्धत मराठ्यांनां उपयोगी पडली. पण इंग्रजांशीं संबंध आल्याबरोबर पायदळ व तोफखाना यांची आवश्यकता भासूं लागली. व या अंगाकडे विशेष लक्ष पोंचविण्यांत येऊं लागलें. घोडदळांत शिवाजीच्या वेळेप्रमाणेंच बारगीर व शिलेदार असे दोन भाग असत. याशिवाय लढाईच्या वेळीं पेंढारी येत. हे पेंढारी केवळ पोट भरण्यासाठीं लढाईंत पडत. त्यांनां आपल्या पक्षाचा अभिमान नसे. त्यामुळें यांनां सहसा कोणी बाळगीत नसत. पायदळांत मराठ्यांपेक्षां इतर जातींचा भरणा विशेष असे. मुसुलमान लोकांस सर्रास चाकरींत ठेवण्यांत येत असून, त्यांनां मोठ्या हुद्दयाच्या जागाहि देण्यांत येत. माधवरावाच्या फौजेंत एकंदर ४४९ अधिकार्‍यांपैकीं ९३ ब्राह्मण, ८ रजपूत, ३०८ मराठे आणि ४० मुसुलमान होते. मुसुमानांखेरीज अरब व हिंदुस्थानीहि नोकरींत असत. विश्वासाच्या कामीं व बेगुमानपणें आपल्या मालकाचें रक्षण करण्यांत हे लोक स्वजातीयांपेक्षां जास्त उपयोगी पडत, म्हणून सरदार सावकार लोक आपल्याजवळ अरब बाळगीत. पुढें पुढें तर या अरबांचें फार प्राबल्य वाढून, त्यांचीं वंडें मोडतां मोडतां सरकारास पुरेंवाट होई. गारद्यांतहि पुष्कळ परदेशी असत. कबाइती पायदळाचा व तोफखान्याचा उपयोग भाऊसाहेब पेशव्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर होऊं लागला. इब्राहिमखान गारद्यास सदाशिवरावानें निजामकडून फोडून आपल्या नोकरींत घेतलें व त्याच्याकडे मराठी तोफखाना दिला. कवाइती फौज व तोफखाना यांच्या बळावर पानपतास मराठ्यांनीं मैदानी युद्ध आरंभिलें. गनिमी काव्याचें धोरण याचवेळीं प्रथम बाजूस सारिलें, पण त्यामुळेंच मराठ्यांनां अपयश मिळालें असें म्हणणें बरोबर होणार नाहीं.

यूरोपियनांची कवाइती फौज पाहून महादजी शिंद्याच्या मनांत अशी शिस्तीची फौज तयार करण्याचें आलें. त्यानें फ्रेंच सेनापति डिबॉईन याच्या मदतीनें २० हजार पायदळ, १० हजार नजीब, ३ हजार तुर्कस्वार व मोठा तोफखाना तयार केला. महादजीच्या कारकीर्दींत या फौजेला वेळेवर तनखा मिळत असल्यानें कांहीं त्रास झाला नाहीं. मराठ्यांचें पायदळ जसें वाढूं लागलें तसें त्याला बंदुकांची जास्त जरूरी वाटूं लागली. तेव्हां इंग्रज व इतर परस्थ व्यापार्‍यांकडून त्या विकत घेण्यांत येऊं लागल्या. मराठ्यांनां बंदुका विकूं नयेत असा निर्बंध कंपनी घालणार होती; पण यायोगें मराठे बंदुकांचे कारखाने काढतील व इतर लांचलुचपती होतील असें समजून तो घातला नाहीं. मराठ्यांचे बंदुका, तोफा, दारूगोळा, वगैरे तयार करण्याचे कारखाने असत; पण ते लहान प्रमाणावर असत.
मराठी कवाइती फौजेवरील अधिकार्‍यांनां मोठमोठे तनखे असत. डिबॉईनचें उत्पन्न जहागीरदारासारखें असे; त्याच्या मागून आलेल्या कर्नल पेरनला दरमहा पांच हजार रूपये पगार असे. निजामच्या पदरचा सेनापति मॉ. रेमंड यास सैन्याच्या खर्चाकरितां तीस लाखांची जहागिरी होती. कवाइती फौजांकडे मराठ्यांचें लक्ष वेधल्यावर लष्करांत यूरोपियन घेण्याचा प्रघात सुरू झाला; त्यांनां विशेष सवलतीहि देण्यांत येत. यूरोपियन गारदी ठेवण्याचा प्रघात हैदरानें पाडला. त्यानंतर बहुतेक राजेरजवाड्यांनीं गोरे गारदी पदरीं बाळगले. कवाइतीपद्धत स्वीकारल्यामुळें व गनिमी कावा सोडल्यामुळें मराठ्यांचा नाश झाला असें पुष्कळांचें म्हणणें पडतें. पण या कवाइती पायदळाबरोबर उत्तम घोडदळ, तोफखाना व सरदारांत शिस्त असती तर असें झालें नसतें.

शिवाजीनंतर मराठ्यांच्या आरमारांत कान्होजी आंग्र्यानें पुष्कळ सुधारणा करून, तें अजिंक्य करून सोडलें व मराठ्यांचें दर्याकौशल्य फिरंग्यांस दाखवून त्यांचा पाय कोंकणकिनार्‍यावर लागूं दिला नाहीं. मराठ्यांच्या आरमारांत ४०० टन वजनापर्यंतचीं जहाजें होतीं; त्यांवर मोठमोठ्या तोफा असत. सन १६९० पासून १७५६ पर्यंत मराठ्यांचें आरमार आंग्र्यांच्या हाताखालीं होतें. विजयदुर्ग ही आरमाराची मुख्य जागा होती. आंग्र्यानंतर धुळपांकडे आरमाराचें आधिपत्य गेलें. यांतील आनंदराव धुळप यानें फार शौर्य गाजवून इंग्रज आरमारास पुष्कळदां चीत केलें. धुळपांप्रमाणे विचारे, सुर्वे, कुवेसकर, जावकर वगैरे अनेक सरदारांनीं मराठ्यांच्या आरमारांत मोठाले पराक्रम केले आहेत. पेशव्यांकडून आरमाराच्या सुभ्याकडे दिवाण, फडणवीस, मुजुमदार, हशबनीस वगैरे दरकदार दिलेले असत. नवीन गलबत बांधण्यास खर्च दहापासून चाळीस हजारांपर्यंत येई. मराठ्यांच्या आरमाराचा खर्च दर वर्षीं दीडदोन लाख असे. [ डफ; मराठे व इंग्रज. ]

युद्धाकालीन शुश्रुषेचे प्रकार.
अँब्यूलन्स.-इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत अँब्युलन्स हा शब्द सामान्यत: युद्धांत जखमी झालेल्या शिपायांस अगर अपघातानें दुखापत झालेल्या रोग्यांनां दवाखान्याकडे वाहून नेण्याची गाडी अथवा दुसरें वाहन यास लावण्यांत येत असतो. युद्धविषयक भाषेंत बरोबर बोलावयाचें म्हणजे जखमी शिपायांनां अधिक स्थायिक दवाखान्यांत नेऊन पोहोंचविण्यापूर्वीं त्यांनां रणक्षेत्रावरून आणणें, त्यांच्या औषधपाण्याची व इतर तरतूद करणें यासाठीं सैन्याबरोबरच हिंडणारा तात्पुरता फिरता दवाखाना म्हणजे अँब्युलन्स होय. १९०५-०६ सालीं पूर्वींचे “बेअरर कंपनीज” (वाहकमंडळ) व ‘फील्ड हॉस्पिटल्स’ (रणरूग्णालयें) हे दोन विभाग रद्द करून त्यांच्याऐवजीं ब्रिटिश पद्धतींत “फील्ड अँब्युलन्स” (रणशुश्रुषालय) हा शब्द प्रचारांत आणला गेला. ब्रिटिश पद्धतीचें पुढें दिलेलें वर्णन इ सन १८९९ ते १९०२ पर्यंत झालेल्या दक्षिण आफ्रिकेंतील युद्धानंतरच्या व्यवस्थेस लागू पडतें. त्यानंतर त्यांत जरा फरक झाले आहेत तरी ते फारसे महत्त्वाचे नाहींत.

अँब्युलन्स अथवा रणशुश्रुषालयांची पद्धति थोड्याबहुत फरकानें सर्व सुधारलेल्या राष्ट्रांतून जरी सध्यां प्रचलित असली तरी तिला सुरवात १८ व्या शतकाच्या शेवटच्या दशकांत झालीं त्यापूर्वीं जखमी शिपायांनां त्यांचे सहचर तरी उचलून नेत अगर युद्ध संपेपर्यंत ते तसेच रणक्षेत्रांत पडून असत, युद्धक्षेत्रावर शस्त्रवैद्यांची मदत तह होऊन जाईपर्यंत मिळत नसे. अर्थात् कित्येक जखमी शिपाई अगोदरच मरत असत. १७९२ सालीं फ्रेंच सैन्यांत बॅरन डॅमिनिक जीन लॉरी यानें त्यावेळच्या “फ्लाइंग आर्टिलरी” प्रमाणें इकडून तिकडे जलद जाणार्‍या “ फ्लाइंग फील्ड हॉस्पिटल्स” अथवा अँब्युलन्सेस व्हालेन्ट्सची पद्धत प्रचारांत आणली. जखमी झालेल्यांनां लढाईंतून बाहेर काढणें, त्यांनां जरूर ती शस्त्रक्रिया करणें अशीं दोन्ही कामें ते करीत असत. नेपोलियननें लॉरीस या बाबतींत चांगलें उत्तेजन दिलें व आपल्या “ग्रँड आर्मी” मध्यें ही पद्धत बरीच उच्च दशेस पोंहोचविली. याच सुमारास फ्रेंच सैन्यांतील दुसरा एक प्रसिद्ध शस्त्रवैद्य वॅरन फ्रँकॉइज पर्से यानें एक वाहक पथक तयार केलें. यांत भर युद्धांतून जखमी शिपायांनां उचलून आणून सुरक्षित स्थळीं पोहोंचविण्याचें काम शिकविलेले शिपाई होते. १८६४ त भरलेल्या यूरोपीय राष्ट्रांच्या जिनोव्हा कन्व्हेन्शनमध्येंहि विशिष्ट नियम पाळण्यास जखमी शिपाईच नव्हे तर अँब्युलन्सचें कामगारमंडळ देखील तटस्थ समजलें जाण्याची योजना झाल्यामुळें या बाबतींत एक महत्त्वाची सुधारणा घडून आली. जखमी शिपायांनां युद्धांतील कैदी म्हणून पकडणें किंवा अँब्युलन्सला युद्धांतील लूट समजण्याचें बंद झालें. यामुळें अँब्युलन्समध्यें पुष्कळ सुधारणा करतां आली परंतु सर्वच तलवारबहाद्दरांनां हे नियम एक माहीत तरी नसतात किंवा सर्वजण त्यांचा सारखाच अर्थ करीत नाहींत. यापुढें चालू युद्धांत या बाबतींत वारंवार बरेच प्रमाद घडत असतात.

सध्यांच्या अँब्युलन्स पद्धतीची सुरवात अमेरिकेंतील ‘सिव्हिल वॉर’ पासून झाली. जखमी शिपायांच्या जलद वाहातुकीसाठीं या युद्धांत येथून तेथून रेल्वे हॉस्पिटल सर्व्हिसचा उपयोग करण्यांत आला होता. यानंतर इतर सैन्यांतून शुश्रुषेचें सामान व उपकरणीं यांनीं भरलेल्या इस्पितळी गाड्या उपयोगांत येऊं लागल्या व फ्रँको जर्मन युद्धांत त्यांनीं बरीच कामगिरी बजाविली.

जर्मन पद्धति:- १८७० ते ७१ मधील फ्रँको-जर्मन युद्धप्रसंगीं अस्तित्वांत असलेली जर्मन हॉस्पिटल सर्व्हिस १८७८ सालीं क्रेगस् सॅनिटास ऑर्डनंग यानें व १८८७ मध्यें क्रेगस् इटापेन ऑर्डनंग यानें सुधारून वाढविली. व अनेक लहान लहान ऑफिसें जोडून पूर्ण केली. जर्मन सैन्यांतील अँब्युलन्सच्या घटनेचे मुख्य भाग: (१) सॅनिटरी खातें, (२) फील्ड हॉस्पिटल्स्, (३) फ्लाइंग हॉस्पिटल्स्, (४) हॉस्पिटल रिझर्व डेपोज्, (५) रोग्यांनां बाहेरदेशीं पाठविण्याच्या कमिट्या, (६) इस्पितळी रेल्वे गाड्या, असे पडतात. ग्रँड आर्मीच्या अँब्युलन्सचा रणक्षेत्रावरील सर्व कारभार अँब्युलन्स सॅनिटरी मंडळाच्या मुख्याच्या हातीं असतो, व तो हेडक्वार्टर्समध्यें असतो. त्याच्या खालीं युद्धक्षेत्रांतील सैन्याचा सर्जन जनरल व सैन्याच्या पथकांचा सर्जन जनरल हे असून त्यांच्या खालीं आणखी डिव्हिजनस् व रेजिमेंट्स वगैरे सैन्याच्या लहान लहान भागांवरील “सर्जनस् इन् चीफ” असतात. मोठमोठे डॉक्टर व युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यांनां देखील लहान लहान सैन्यविभागांवर प्रत्यक्ष काम करणार्‍यांनां मधून मधून सल्ला वगैरे देण्याकरितां घेतलेले असतात.
फ्रेंच पद्धति:-१८८४ च्या कायद्यानें फ्रेंच अँब्युलन्स खात्याची रचना जर्मनपद्धतीसच बहुतेक अनुलक्षून झाली. मात्र वर सांगितलेल्या अँब्युलन्सेस व्हालेंटस् हें त्या पद्धतींतील वैशिष्ट्य आहे. अंतररचनेंत जर्मन व फ्रेंच पद्धती ब्रिटिश पद्धतीहून भिन्न नाहींत.

जपानी पद्धति:- जपानी सैन्यांत सॅनिटरी पथकांचें वैशिष्ट्य असून त्यांचें काम म्हणजे सैन्यांत रोगप्रसार होऊं न देणें हें होय. येथें ही पद्धत इतकी पूर्णत्वास गेली आहे कीं, १९०४-०५ च्या रूसो-जपानी युद्धांत सर्व प्रकारच्या रोगप्रतिबंधाच्या बाबतींत तिनें पूर्वींच्या सर्व अनुभवास मागें टाकलें.
ब्रिटिश पद्धति:- ब्रिटिश अँब्युलन्स सर्व्हिसची माहिती देतांना जखमी अगर आजारी मनुष्याची-तो जखमी अगर आजारी झाल्यापासून बरा होऊन पुन्हां कामावर येईपर्यंत अथवा निकामी ठरून घरीं जाईपर्यंत सर्व माहिती पुढें दिली आहे.

(१) रणक्षेत्रावरील प्रथमोपचार:- लढतां लढतां शिपाई जखमी होऊन पडतांच रेजिमेंटल सर्जन व स्ट्रेचर बेअरर हे त्याजपाशीं येतात, आयत्या वेळीं सुचतील ते, रक्तप्रवाह थांबविण्याचे उपाय योजतात व जखम बांधून टाकतात. सामान्य गोळी लागून होणारी जखम बांधण्यापुरतें सामान व एखादें जंतुघ्न औषध असलेली पिशवी प्रत्येक अधिकार्‍याच्या व नोकराच्या कपड्यास कोठें तरी लटकावलेली असते. अलीकडच्या युद्धांतून असें अनुभवास आलें आहे कीं, विशेष घोंटाळ्याच्या जखमा नसल्यास हें पहिलेंच बंधन कायम ठेवणें श्रेयस्कर असतें, कारण अलीकडील साधनांनीं होणार्‍या लहानसान जखमा नुसत्या जपणुकीनें तेव्हांच भरून येतात.

(२) कलेक्टिंग स्टेशन:-नंतर स्ट्रेचरवर घालून वाहक त्यास रणक्षेत्रांतून कलेक्टिग स्टेशनवर वाहून आणतात. तेथून अँब्युलन्स गाडींतून तो “ड्रेसिंग स्टेशन” वर आणला जातो. येथें जरूर पडल्यास त्याची जखम तपासली जाते. कारण प्रथमोपचराच्या वेळीं तेथील अधिकार्‍यानें जखमेचें वर्णन व इतर माहिती लिहिलेलें पत्रक रोग्याबरोबर दिलेलें असतेंच, व रक्तस्त्राव होणें अगर हाड दुखावणें अशा प्रकारचे घोटाळे न उद्भवल्यास ती जखम बहुधां तशीच ठेविली जाते. ताबडतोब केली पाहिजे अशी शस्त्रक्रिया येथें केली जात असून जरूर पडल्यास पोषक पदार्थ व उत्तेजक द्रव्येंहि रोग्यास येथें दिलीं जातात. नंतर रोग्यास दुसर्‍या प्रकारच्या अंब्युलन्स गाडींतून फील्ड-हॉस्पिटलमध्यें व तेथून शक्य तितक्या लवकर प्रथम एका व नंतर दुसर्‍या “ बेस ऑफ ऑपरेशन्स” कडे नेलें जातें. शेवटीं या ठिकाणाहून तो परत कामगिरीवर तरी जातो, नाहींतर इस्पितळी जहाजांतून घरीं पोहोंचविला जातो. या सर्व क्रिया सुयंत्र चालाव्या म्हणून अशी व्यवस्था केलेली असते कीं, सैन्याच्या प्रत्येक पथकावर एकेक वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला जात असून शिपायांच्या प्रकृतीची काळजी वाहणें व पथकावरील अधिकार्‍यास आरोग्यविषयक सल्ला देणें हीं कामें त्याजकडे सोंपविलीं जातात. पथक कामगिरीवर निघतांच त्या पथकांचें “स्ट्रेचर वेअरर्स”-वाहकमंडळ तो आपल्या ताब्यांत घेतो. हे वाहक अंगावर हत्यारांऐवजीं तांबडा क्रॉस अथवा अधिक चिन्ह असलेलीं लहानलहान आयुधें वापरतात व अशा रीतीनें आपला साळसूदपणा व्यक्त करतात. परंतु अलीकडे फार अंतरावरून लढाया होत असल्यामुळें यांतीलहि कांहीं जायबंदी झाले तर त्यांत नवल नाहीं. जखमी शिपायांनां फील्डहॉस्पिटलमध्यें पोंचतें करणें एवढेंच या वाहकांचें काम असतें. हिंदी सैन्यांत अशी व्यवस्था आहे की, फील्ड हॉस्पिटलमधील लोकच लढाईच्या वेळीं वाहक बनतात, व लढाई संपतांच पुन्हां आपल्या कामावर परत येतात. दक्षिण आफ्रिकेंतील बोअरयुद्धाच्या वेळीं या पद्धतीचें महत्त्व समजून आलें, कारण युद्ध संपतांच सगळें वाहकमंडळ इस्पितळांत अनेक जरूरीचीं व महत्त्वाचीं कामें करावयास उपयोगीं पडावें यासाठीं या दोन्ही व्यवस्थांचें समिश्रण होणें जरूर असतें.


(३) ड्रेसिंगस्टेशन अथवा जखमा बांधण्याचें स्थान दूरगोळीच्या टप्प्याच्या पलीकडे - असावें लागतें व तेथें पाण्याचाहि भरपूर पुरवठा असावा लागतो. या ठिकाणीं रोग्यांनां शक्य तितक्या सुखदायक अवस्थेंत ठेवण्यांत येतें, थकवा जाऊन उत्साह येईल असे पौष्टिक व उत्तेजक पदार्थ देण्यांत येतात  व नंतर त्याची फील्डहॉस्पिटलमध्यें रवागनी होते. जेव्हां घायाळ शिपायांनां रणमैदानांतून जलद काढून नेणेंची घाई उडते किंवा चांगले रस्ते नसून गाडयाहि चालत नाहींत. अशा परिस्थितींत तात्पुरतें वाहकाचें शिक्षण देऊन आसपासचे पुष्कळ लोक वाहकांच्या कामावर घेतात, व त्यांच्याकडून स्टेचर्स (डोल्या) वगैरे वाहून नेण्यांत येतात. १८९९ मध्यें टगेलाच्या लढाईनंतर जेव्हां हजारों जखमी शिपायांनां वाहून नेण्याची जरूर पडली तेव्हां व ईजिप्तमध्येंहि याच उपायाचा अवलंब केला होता. मंगोलियामध्यें जपानी लोकांनांहि हजारों चिनी मजुरांनां या कामावर लावलें होतें.
हिंदी वाहक:-हिंदुस्थानांत रॉयल आर्मी मेडिकल कोअरचे लोक या कामाकडे लावण्यात येत नाहीत. यासाठीं येथील रहिवाश्यांचीं मुद्दाम तयार केलेलीं पथकें हें वाहकाचें काम करीत असतात. हे लोक शंभर वर्षांपूर्वीच्या डोल्या वाहणार्‍या भोई अथवा वाहक जातींतील असतात. डोल्या लांकडाच्या केलेल्या असून त्यांनां वर झांकण असतें. त्या एका दांडयास लोंबकळतात व तो दांडा वाहक खांद्यावर घेतात. डोलीच्या सारखेंच दांडी म्हणून एक वाहन असतें. तें कापडाचें केलेलें असतें व बरेंच हलकें असतें. लढायांतून हें काम करतांना या वाहकांनीं दाखविलेल्या धाडसाची अनेकदां वाखाणणी झाली आहे. ही वाहकांची जात हल्लीं मात्र डोल्यांच्या प्रचारास प्रसंगचे नाहीसें होत चालल्यामुळें भराभर नाश पावत चालली आहे. याप्रमाणें ब्रिटिश साम्राज्याच्या इतर भागापेक्षां हिंदुस्थानांतील अ‍ॅब्युलन्सची पद्धत वेगळी आहे.

रेडक्रॉस वर्ग.-१९०५ सालीं इंग्लंडमधील ब्रिटिश रेडक्रॉस संस्थांचें एकीकरण होऊन ब्रिटिश रेडक्रॉस सोसायटी असें नवीन नांव धारण करण्यांत आलें. या संस्थेचा उद्देश लढाईच्या वेळीं जखमी व बिमार शिपायांनां लागणार्‍या साहाय्याची सर्व तयारी शांततेच्या काळांत करून ठेवण्याचा होता. इंग्लंडच्या लष्करखात्यानेंहि या संस्थेकडून शक्य तितकें साहाय्य घेण्याचें ठरविलें. १९०८ सालीं ग्रेटब्रिटनच्या संरक्षणासाठीं प्रादेशिक सैन्य उभारण्यांत आलें व या सैन्यांतील जखमी व रोगी लोकांच्या शुश्रुषेकरितां 'व्हालंटरी एड डिटॅवमेंट' नांवाचे स्वयंसैनिक दल उभारण्याची कामगिरी रेडक्रॉस सोसायटीकडे आली. महायुद्धामध्यें रेडक्रॉस संस्थेनें उत्तम कामगिरी बजावली. मेसापोटेमियांमधील रणक्षेत्रांत या संस्थेच्या शाखांनी केलेली कामगिरी अत्यंत वाखाणण्यासारखी होती. रणक्षेत्रावरून जखमी शिपायांनां सुरक्षित स्थळीं पोहोंचविणें, त्यांची योग्य शुश्रुषा करणें, त्यांनां शक्य तितकीं सुखाचीं साधनें उपलब्ध करून देणें इत्यादि गोष्टींत या संस्थेंनें महत्त्वाची कामगिरी बजाविली. युद्धतहकुबीच्या वेळीं या सोसायटीच्या ४०८३ तुकडया रणक्षेत्रावर काम करीत होत्या व त्यांत १२५५९३ स्वयंसैनिक होते. जखमी लोकांनां वाचण्यासाठीं देण्यांत आलेल्या पुस्तकांची संख्या पन्नास लाख होती. रेडक्रॉस सोसायटीनें काढलेल्या इस्पितळांमध्यें सर्वांत मोठें इस्पितळ 'किंग जॉर्ज इस्पितळ' नांवाचें असून त्यांत १६५५ रोग्यांची एका वेळीं सोय करण्यांत येत होती.

अमेरिकेमध्यें १८८१ साली 'अमेरिनक अ‍ॅसोसिएशन ऑफ रेडक्रॉस' संस्था स्थापन झाली. १९०५ सालीं या संस्थेनें 'नॅशनल रेडक्रॉस' असें नांव धारण केलें. १९१२ सालीं या संस्थेच्या शाखा अमेरिकेंतील सर्व भागांत पसरल्या होत्या. या संस्थेची मुख्य शाखा वॉशिंग्टन येथें असून तेथें या कार्यासाठीं एक प्रचंड इमारत बांधण्यांत आली व तिचा पाया १९१५ सालीं घालण्यांत आला. महायुद्धामध्यें, अमेरिकन सरकारच्या संमतीनें या संस्थेनें सर्व युध्यमान राष्ट्रांमध्यें आपलें काय्र सुरू केलें व सर्वांनां मदत करण्यास सुरवात केली. बेल्जम, इटली, जपान इत्यादि राष्ट्र्रांनी या संस्थेपासून फारशी मदत घेतली नाही. तथापि इतर राष्ट्रांनी मात्र या संस्थेचा भरपूर फायदा घेतला. १९१७ सालीं अमेरिका महायुद्धांत पडतांच विल्सननें या संस्थेचें कार्यक्षेत्र वाढविण्याचें ठरविलें. या कार्यासाठीं स्वतंत्र फंड उभारण्यांत आला. १९१७ सालीं अमेरिकेंतील रेडक्रॉस अ‍ॅसोसिएशनचे पन्नास लक्ष सभासद होते. व ३२८७ शाखा होत्या. उत्तरोत्तर या शाखा व संस्थेच्या सभासदांची संख्या वाढतच गेली. य संस्थेनें महायुद्धामध्यें जीं महत्त्वाचीं कार्ये केलीं तीं म्हणजे, जखमी लोकांच्या रणक्षेत्रावरून सुरक्षितपणें उचलणें, जखमी लोकांच्या शुश्रुषेसाठीं इस्पितळें उघडणें, जखमी लोकांच्या आप्तेष्टांनां रोग्यांची वेळच्यावेळीं वारंवार हकीकत कळविणें, सैनिकांनां चांगलीं वस्त्रें पुरविणें, शत्रूच्या ताब्यांत जे सैनिक सांपडले असतील त्यांनां अन्नपाणी, कपडेलत्ते इत्यादि पुरविणें, मृतांची उत्तरक्रिया व्यवस्थितपणें करणें हीं होत.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .